० सिरॅमिक, स्टोनलाइन, ग्रॅनाइड व इतर नॉनस्टिक भांडी दिसायला मनमोहक व आकर्षक असतात. तसेच स्वयंपाक करण्यास सोईची व साफ करण्यास सहज सुलभ असतात. या भांडय़ात कमी तेलात स्वयंपाक करता येतो व तापमान सर्वत्र सारखे असल्याने पदार्थही लवकर शिजतो.
० यातील बरीचशी भांडी १८० अंश सेल्सियसला ओव्हनमध्येही वापरता येतात.
० भांडी वापरताना साबणाच्या कोमट पाण्याने धुऊन व कोरडे करून गॅसवर ठेवावे. ही भांडी जास्त तापमानावर ठेवू नयेत.
० या भांडय़ात अमोनिया, व्हिनेगर, लिंबू, फळांचा रस, टोमॅटो सॉस अशा अल्कली पदार्थाचा वापर करू नये.
० ही भांडी गरम असताना साफ करू नये. गरम भांडय़ावर पाणी पडल्यास भांडय़ाच्या कोटिंगवर (टेफ्लॉन) त्याचा परिणाम होऊन ते निघून जाण्याची शक्यता असते.
० भांडी लगेचच साफ करणार नसल्यास थोडी थंड झाल्यावर त्यात पाणी घालून ठेवावे म्हणजे तेलाचा चिकटपणा पकडणार नाही.
० नॉनस्टिक भांडी कधीही खसखसून घासू नयेत. त्याचे कोटिंग निघून जाते.
० नॉनस्टिक भांडय़ात अन्न शिजवताना लाकडाच्या चमच्याचा वापर करावा.
० भांडी साफ करण्यासाठी सोडायुक्त साबण, ब्लीच, तारेचा स्क्रबर यांचा वापर करू नये. यासाठी स्पंज, नायलॉन स्क्रबर, लिक्विड सोप आणि कोमट पाणी याचा वापर करावा.
० भांडी धुऊन झाली की स्वच्छ पुसून कोरडी करावी.
० भांडे नेहमी कोरडे करून गॅसवर ठेवावे. भांडे व्यवस्थित गरम झाल्यावर नंतर त्यात तेल घालावे.
० नॉनस्टिक भांडी लटकवून ठेवावी किंवा प्रत्येक भांडय़ामध्ये कपडा टाकून एकावर एक ठेवावी.
० इतर भांडय़ांबरोबर नॉनस्टिक भांडी ठेवल्यास त्या भांडय़ांच्या घर्षणाने त्यावरील कोटिंग निघून जाण्याची शक्यता असते आणि जिथे कोटिंग निघाले आहे त्या जागी पदार्थ भांडय़ाला चिकटून राहतो.
० भांडय़ात तेलाचा चिकटपणा जास्त राहिल्यास त्यात पाणी व थोडी डिर्टजट पावडर घालून उकळा. थोडय़ा वेळाने ते पाणी काढून टाकून नेहमीप्रमाणे स्वच्छ करून घ्या.
० गरम साबणाच्या कोमट पाण्यात मऊ
कपडा बुडवून त्याने नॉनस्टिक भांडी स्वच्छ करून घ्या. नंतर स्वच्छ पाण्यात विसळून पुसून ठेवा.
– उषा वसंत
unangare@gmail.com
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 21, 2015 12:15 am