31 October 2020

News Flash

माझी जडणघडण

रसायनशास्त्रामध्ये मी पदवी घेतली, पण रसायनशास्त्रामध्ये मन लागत नव्हते

स्त्रीवादी कार्यकर्त्यांसह आनंद पवार

आनंद पवार

स्त्रीवादी संस्था-संघटनांचा माझ्या जडणघडणीमध्ये खूप हातभार आहे. मला स्त्रीवाद संकल्पना समजू लागली. मग ठरवले की, आपण पुरुषांसोबत काम करावे, पण स्त्रीवादी दृष्टिकोनातून करावे. स्त्रीवाद केवळ स्त्रियांबद्दल बोलत नाही तर स्त्रियांच्या नजरेतून जगाची परिकल्पना करतो. त्या काळामध्ये ‘स्त्रीवादी पुरुष’, की ‘स्त्रीवाद पुरस्कर्ते पुरुष’ अशी भयंकर चर्चा सुरू होती. माझं म्हणणं होतं की, मी स्त्रीवादी पुरुष आहे..

आनंद पवार हे ‘सम्यक’ या एनजीओचे कार्यकारी संचालक आहेत. स्त्री पुरुष समानता आणि हिंसामुक्त समाजासाठी ते स्वत: कार्यरत असून त्यासाठी कार्य करणाऱ्या तरुण-तरुणींना प्रशिक्षण देण्याचेही कार्य ते करतात. ‘साऊथ एशियन नेटवर्क टू एड्रेस मॅस्क्युलिनीटीज’ (सनम) या संस्थेचे ते सदस्य आहेत. तसंच ‘वुमन्स पीस मेकस प्रोग्रॅम’ (डब्ल्यूपीपी) च्या एशिया बोर्डचे ते एक सदस्य आहेत. राष्ट्र संघांच्या संस्थांसह अनेक आंतरराष्ट्रीय एनजीओंना, विकास संस्थांना ते मार्गदर्शन करतात.

नव्वदच्या दशकातील महाराष्ट्रातील निमशहरं केवळ लोकसंख्येने शहरं होती, मात्र संपूर्णत: ग्रामीण संस्कृतीमध्ये जगणारी होती. शेतकरी, नोकरदार किंवा डॉक्टर यांच्या मुलांच्या राहणीमानात फारसा फरक नसायचा. चुरगळलेले परंतु स्वच्छ शर्ट, अर्धी चड्डी आणि करदोडा सगळ्यांच्याच चड्डय़ांवर कसलेला असायचा. सगळे एकाच शाळेत शिकायचे आणि सगळ्यांचे नाक गळके असायचे. आर्थिक परिस्थितीमुळे राहणीमानात फारसा फरक नसायचा. कुर्डूवाडी हे सोलापूर जिल्ह्यतील असेच एक छोटे शहर. गावकी-भावकीमध्ये शहराचा सगळा कारभार चालायचा. गावामध्ये जत्रा, आठवडी बाजार, सणवार, स्पर्धा जोरात चालायच्या. शिवजयंतीला बैलगाडय़ांवर नाटकाचे प्रसंग घडायचे. गावामध्ये राहण्याच्या गल्ल्या जातीनुसार होत्या. माळी गल्ली, न्हावी गल्ली, मांगवाडा, महारवाडा अतिशय ठळकपणे अस्तित्वात होते आणि आजही आहेत.

माझ्या बालपणीचा काळ हा असा सामाजिक जाणिवा निर्माण होणारा होता. गावकीमध्ये असतं तसं राजकीय वातावरणही होतं, स्पर्धा होती पण द्वेष नव्हता. अशा वातावरणामध्ये आनंद पवार नावाच्या व्यक्तीचे सामाजिक-राजकीय भान तयार होत होते. गावाचा अत्यंत लाडका मुलगा अशी माझी ओळख होती. वडिलांचे गावातले स्थान सन्मानाचे होते. माझ्या एका जैन मित्राच्या आईने जेवायला वाढताना ताटात वरून चपाती टाकली होती यापलीकडे भेदभावाशी कसलीही ओळख नव्हती. घरामध्ये मोहरमची छत्री होती. बशीरमामा, निजाममामा, जब्बारशेठ मामा असे मुस्लीम-हिंदू प्रेमाचे वातावरण होते. बाबरी मशिदीच्या वेळी हिंसाचार झाला तरी गावातले वातावरण शांतच होते. एका अर्थाने मी अतिशय समृद्ध आणि शांततेच्या वातावरणामध्ये माझे बालपण काढले. खरं पाहता माझा आजचा सामाजिक जाणिवांचा प्रवास कुर्डूवाडीमध्ये सुरू झाला. माझे अनुभव विश्वसमृद्ध करण्यामध्ये या गावाचा आणि त्या काळातल्या सामाजिक परिस्थितीचा मोठाच हातभार आहे.

आज मी करत असलेल्या सामाजिक कार्याची बीजे कदाचित याच कलाटणीमध्ये आहेत. १९९०मध्ये मी कुर्डूवाडी सोडून पुण्यामध्ये शिकायला आलो. नुकतीच आर्थिक उदारीकरणाची सुरुवात जगभरात सुरू झाली होती. १९९१ ला पहिल्यांदा वडापावची जागा पुण्यात ‘बर्गर’ने घेतली पण पुण्याचे सांस्कृतिक वातावरण मात्र उदार झाले नव्हते. मी स.प. महाविद्यालयात प्रवेश घेतला. मुळातच गाणं शिकावं म्हणून मी पुण्यात आलो होतो; महाविद्यालयात ‘कलामंडळ’ नावाचे एक प्रचंड प्रस्थ असते. त्यामध्ये प्रवेश मिळविण्यासाठी चाचणी परीक्षा होते. मीदेखील अशा चाचणी परीक्षेसाठी गेलो. कलामंडळाचे प्राध्यापक आणि प्राध्यापिका विद्यार्थ्यांची चाचणी घेतात. चाचणीमध्ये मी एक गाणं गायलं, मात्र त्या गाण्यामध्ये ‘ण’ ऐवजी ‘न’ असा उच्चार केला. माझ्या ग्रामीण जडणघडणीमध्ये ‘ण’ बाणाचा आम्ही कधीच उच्चारला नव्हता. मला अनुनासिक स्वरांची सवयच नव्हती. पण या एका कारणामुळे मला कलामंडळातून काढून टाकले. हा माझा भेदभावाचा पहिला ठळक अनुभव. ‘भेदभाव’ या शब्दाची अशी ओळख झाली. भाषाआधारित ग्रामीण- शहरी हा भेद पहिल्यांदा कळला. ब्राह्मणी-अब्राह्मणी उच्चारांचे गणितही कळले. मग मी वेगवेगळ्या आधारांवर होणाऱ्या भेदभावांचे निरीक्षण करायला सुरुवात केली.

शेतामध्ये ज्वारीच्या खळ्यातील पहिले ताट मातंग समाजाच्या लक्ष्मणला देऊन वर्षभर त्याचे शोषण केले जात होते, तीस वर्षांपासून विधवा असलेल्या माझ्या चुलतीला सगळ्या घरादाराचे पाणी भरावे लागत होते, सणावारांमध्ये घरातील स्त्रियांना एवढे कष्ट का घ्यावे लागत होते, गावातला महार ‘वेसकरी’ आम्ही दिलेल्या शिळ्यापाक्या अन्नावर का जगत होता, पारध्यांच्या म्हाताऱ्या तासन्तास भिकेसाठी घराबाहेर का उभ्या असत, यामागची भेदभावावर आधारलेली व्यवस्था समजायला लागली. आज जातीचा द्वेष इतका ठळक नाहीये, पण जातीव्यवस्था मात्र ठळक आहे. ‘आम्ही जाती मानत नाही’ असा म्हणणारा समाज वाढीस लागला आहे, त्यामुळे ‘जातव्यवस्था’ संपलीच आहे की काय असा आभास निर्माण होतो. त्यामुळे खरे पाहता हे प्रश्न संपले आहेत का, असा सवाल आपण विचारला पाहिजे. पुणेरी ‘ण’ने माझी भेदभावाची अक्कल वाढवली होती आणि त्यामुळे मला व्यापक भेदभावाची जाणीव व्हायला सुरुवात झाली होती. समाजातील सगळ्या भेदभावांचे माझे निरीक्षण आणि अभ्यास सुरू झाला होता.

रसायनशास्त्रामध्ये मी पदवी घेतली, पण रसायनशास्त्रामध्ये मन लागत नव्हते. माझा मित्र विनय ठाकूर रसायनशास्त्राशी खूप प्रामाणिक होता. पुढे त्याने खूप शिक्षण घेऊन ‘येले’ विद्यापीठात अमेरिकेमध्ये शिकवायला सुरुवात केली. पण माझं सामाजिक भान मला वेगळीकडेच बोलावत होते. मी पत्रकारिता निवडायचं ठरवले. पण १९९५ मध्ये पत्रकारितासुद्धा जास्तीतजास्त टेलिव्हिजनकडे झुकणारी झाली होती. मला लिखित पत्रकारितेमध्ये रस होता. डॉ. विश्वास मेहेंदळे यांची भेट झाली. ते म्हणाले, ‘‘समाजकार्य विषयामध्ये ‘विकासासाठी संचार’ असा विषय आहे.’’ त्या एका विषयासाठी मी अपघाताने समाजकार्याचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. माध्यमे आणि विकास हा माझ्या अभ्यासाचा विषय होता. म्हणून नासिकच्या ‘अभिव्यक्ती’ संस्थेमध्ये थोडे दिवस अनुभवासाठी गेलो आणि याच क्षेत्रात काम करण्याचे ठरवले. पुढे एका आरोग्य व्यवस्थापन संस्थेमध्ये काम केले. ‘स्त्रियांच्या आरोग्यामध्ये पुरुषांचा सहभाग’ असा त्या कामाचा विषय होता. जवळजवळ सहा वर्षे काम करून मी पुरुषांना समानतेचे धडे दिले. अंतिम मूल्यांकनाने माझे डोळे पुन्हा उघडले. ज्या कुटुंबातील पुरुष समानतेची भाषा शिकले होते, त्याच घरातील स्त्रिया कौटुंबिक हिंसाचार होतो असे सांगत होत्या. म्हणजे, पुरुष समानतेची भाषा शिकतात, मात्र त्यांचे सत्तासंबंध बदलतातच असे नाही हा धडा मला मिळाला. अतिशय निराश अवस्थेमध्ये मी पुढे काम सुरू केले. या वेळी मात्र जाणीवपूर्वक ‘स्त्रीवादी’ व्यक्ती व संस्थांसोबत काम करण्याचे ठरवले. या दरम्यान पुण्यामध्ये ‘ओलावा’ हा गट स्थापित झाला होता. समलैंगिक स्त्रियांच्या या गटाने माझ्या जाणिवा स्पष्ट करण्यासाठी खूप मदत केली. रीनचीन, सबा, शीबा, वृषाली आणि चतुरा यांचे आभार!

अर्थात, स्त्रीवादी संस्था-संघटनांचा माझ्या जडणघडणीमध्ये खूप हातभार आहे. नोकरी, म्हणून मी ‘तथापि’ नावाच्या संस्थेमध्ये काम केले. त्यामध्ये मी डॉ. मीरा सद्गोपाल यांना भेटलो.. मग पुढे मनीषा गुप्ते यांना भेटलो, किरण मोघे यांना भेटलो, शांता रानडे यांना भेटलो, लता भिसे यांना भेटलो, विद्याताई बाळ यांना भेटलो, मला स्त्रीवाद संकल्पना समजू लागली. मग ठरवले की, आपण पुरुषांसोबत काम करावे, पण स्त्रीवादी दृष्टिकोनातून करावे. स्त्रीवाद केवळ स्त्रियांबद्दल बोलत नाही तर स्त्रियांच्या नजरेतून जगाची परिकल्पना करतो. डॉ शर्मिला रेगे यांची बौद्धिक सोबत होतीच, पण डॉ. शर्मिला नव्हत्या. त्यानंतर मी ‘सम्यक’ म्हणून कष्ट घेतले.

त्या काळामध्ये ‘स्त्रीवादी पुरुष’ की, ‘स्त्रीवाद पुरस्कर्ते पुरुष’ अशी भयंकर चर्चा सुरू होती. माझं म्हणणं होतं की, मी स्त्रीवादी पुरुष आहे. मग यावर खूप चर्चा झाल्या. खूप वाद घातले. मग २००७ मध्ये ‘सम्यक’ची स्थापना केली. ‘सम्यक’ या शब्दाचा अर्थ मी शोधत फिरलो. कवी ग्रेस यांनी मला ‘सम्यक’ शब्दाचा अर्थ सांगितला. ते म्हणाले, ‘ ‘सम्यक’चा अर्थ, मध्यममार्ग नाही. हिंसा आणि अहिंसेचा मध्यम मार्ग काय असू शकतो? ते म्हणाले ‘सम्यक’चा अर्थ ‘सत्याचे ज्ञान’ जे सत्य आहे त्याचे आपल्याला ज्ञान हवे आणि आपले ज्ञान हे केवळ सत्यावर आधारलेले पाहिजे. कवी ग्रेस यांनी माझं आयुष्य सोप केलं. ‘सम्यक’ शब्दाचा मला अर्थ सांगितला.

माझ्या स्त्रीवादी संवेदना, जाणिवा या अशा छोटय़ा मोठय़ा अनुभवांमधून निर्माण झाल्या मग पुढे पुणे विद्यापीठाचे व इतर विद्यापीठांमधील स्त्री अभ्यास केंद्र आणि तत्सम अभ्यासक्रमांमध्ये मी शिकवायला सुरुवात केली. त्यामुळे स्त्रीवादी साहित्याचे खूप वाचनही झाले आणि मग स्त्रीवादाच्या सैद्धांतीकरणाची आवड निर्माण झाली, मग पुढे स्त्रीवादी शिकण्या- शिकवण्याच्या पद्धतींवर मी जगभर अभ्यास केला. स्त्रीवादी असण्यासाठी ‘योनी’ असलीच पाहिजे या तत्त्वाचा मी विरोध केला व राजकीयदृष्टय़ा पुरुष, स्त्रिया, ट्रान्स-जेन्डर हे खुले किंवा बाय-सेक्शुअल असू शकतात याबाबत मी वाद घातला. आणि त्यामधून स्त्रीवादी पुरुष म्हणजे कोण याबद्दल काही मतं मांडता आली. पुढील शनिवारच्या लेखामध्ये या अनुषंगाने आपण ऊहापोह करूया.

anandpawar@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2018 1:01 am

Web Title: article about anand pawar work against gender discrimination
Next Stories
1 सूरत बदलनी चाहिए..
2 ‘नया जमाना आएगा’
3 गुलामगिरीविरुद्धचे बंड
Just Now!
X