13 July 2020

News Flash

चळवळी, मोहिमा, शिबिरं

प्रतिष्ठानची नोंदणी महात्मा फुले यांचे वडिलोपार्जित गाव खानवडी येथल्या पत्त्यावर झाली.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. बाबा आढाव

राष्ट्र सेवा दलाने सातारा जिल्ह्य़ातील नायगांव (सावित्रीबाई फुल्यांचे माहेर) येथे व मराठवाडय़ातील औरंगाबाद येथे मोठय़ा परिषदा घेतल्यात. या प्रश्नांबरोबर कागद, काच, पत्रा गोळा करणाऱ्या स्त्रियांची चळवळ उभी राहिली. कचऱ्याचे संकलन, ओला-सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण व कचऱ्याचे रि-सायकलिंग पुनर्उत्पादन यातून चळवळीने आगळंवेगळं रूप प्रकट केलं. पुण्याच्या कष्टकरी स्त्रिया आंतरराष्ट्रीय पातळीवरही जिंकल्या  आणि पुनर्उत्पादनाचा प्रयोग करून दाखवला..

महात्मा जोतिराव फुले समता प्रतिष्ठानची स्थापना १९७० मध्ये झाली. मी सत्यशोधक चळवळीची वाट मनोमन स्वीकारली होती. मुस्लीम सत्यशोधक मंडळाची स्थापना त्याच दरम्यान झाली. प्रतिष्ठानची नोंदणी महात्मा फुले यांचे वडिलोपार्जित गाव खानवडी येथल्या पत्त्यावर झाली. त्याच काळात विलासराव साळुंके यांची पाणी पंचायतची मोहीम सुरू होती. महाराष्ट्रातील कायमच्या दुष्काळी पट्टय़ात खानवडी हे गाव येतं. दुष्काळी प्रश्नाला भिडावं असं वाटत होतं. ‘एक गाव एक पाणवठा’चे पहिले शिबीर जवळच सासवडला झाले.

खानवडी-सासवड अंतर १० किलोमीटर आहे. पाणवठा मोहिमेतले अनुभव विलक्षण होते. कोरडवाहू शेतकरी म्हणत- पाण्याचाच पत्ता नाही? तुम्ही पाणवठय़ांचं काय बोलताय? तर भटके विमुक्तांतील फलटणच्या एकाने मला विचारले, आम्हाला गाव नाही तर पाणवठा कशाचा? आम्ही प्रतिष्ठानच्या मार्फत फुले यांच्या जीवनकार्याचे संशोधन सुरू केले. महात्मा फुले यांचे व सावित्रीबाईंच्या अस्सल फोटोची काचेवरील निगेटिव्ह पुण्याच्या शाहू चौकातील गोपीनाथ एकनाथ पालकरांनी आम्हाला दिली. तर वऱ्हाडातील चिखलीच्या पंढरीनाथ पाटील यांनी आम्हाला ‘आम्ही पाहिलेले फुले’ यासाठी आठवणी संग्रह उपलब्ध करून दिला. फुल्यांच्या सहकाऱ्यांचा शोध सतत सुरू राहिला. त्यातून काहींची कृष्णाजी पांडुरंग भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे, डॉ. विश्राम रामजी घोले अशा अनेकांनी चरित्रे प्रसिद्ध करण्यासाठी खूप धडपड केली. पाणवठा मोहिमेत ही कागदपत्रे गोळा करण्याचे काम अनायासे करता आले

१९७५, १९७६ ही वर्षे आणीबाणीची अन् आमच्या तुरुंग यात्रेचीही. विषमता निर्मूलन समितीच्या शिबिरांची याच काळात सुरुवात झाली. दरवर्षी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, पु.ल. देशपांडे, रा.ना.चव्हाण, इंडियन सेक्युलर सोसायटीचे प्रा.ए.बी.शहा, प्रा. गं. बा. सरदार, विनायकराव कुलकर्णी, रा.प. नेने अशी कितीतरी मंडळींची उपस्थिती शिबिरांना लाभली. महाराष्ट्र राज्यात लातूरचे जनार्दन वाघमारे, आंबेजोगाईचे प्रा. सबनीस, उदगीरचे डॉ. ना.य. डोळे अशा किती तरी मंडळींनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. आदिवासी पट्टय़ात अस्पृश्यता नसेल असे मला वाटले होते. डॉ. कुमार शिराळकरांनी तेथे दौरा आखला होता. पण तेथेही िलगभेद, अस्पृश्यता आणि जाती-व्यवस्थेचा प्रत्यय आला. पाणवठा मोहिमेत सत्यशोधक गावांना आवर्जून भेटी दिल्या. ‘पाणवठा’ पुस्तकात ही हकीकत प्रसिद्ध झाली आहे. ‘एक गाव एक पाणवठा’बरोबर ‘एक गाव एक मसनवटा’ अशीही मागणी पुढे येऊ लागली. १९८२ मध्ये पुण्यात िहदू-मुस्लीम दंगल झाली. मशिदीत शस्त्रास्त्र ठेवल्याच्या संशयावरून वातावरण पेटले. एसेम जोशी यांच्यासह साहित्यिक शंकरराव खरात, प्रा. गं.बा. सरदार या सगळ्या मंडळींच्यासह  शर्तीचे प्रयत्न झाले. नाना पेठेतील मन्नुशा मशिदीची पोलिसांनी सर्वाच्या देखत पाहणी केली. वातावरण निवळण्यास मदत झाली. त्यातूनच पुढे राष्ट्रीय एकात्मता समिती नाना पेठेतील अहिल्याश्रमांत संघटित झाली. राष्ट्रीय एकात्मता समितीचे काम आजही चालू आहे. राष्ट्रीय एकात्मता समितीचे स्वतंत्र बँक खाते आहे. यासाठी स्वतंत्र निधी निर्माण करण्यात आला असून याचे बँक खाते समिती चालवते. फक्त निधी संकलनच नव्हे तर त्यांच्या वारंवार परिषदा होतात. महात्मा जोतिराव फुले प्रतिष्ठानच्या वतीने पुरोगामी सत्यशोधक हे त्रमासिक गेली ४०-४५ वर्षे सुरू आहे. सत्यशोधक, ब्राह्मणेतर, दलित, स्त्री-मुक्ती, कष्टकरी यांच्या चळवळीतील कागदपत्रांचे पुनर्मुद्रण पुरोगामी सत्यशोधकमध्ये केले जाते. ‘शरीर विकणाऱ्या स्त्रिया’ हा लेख पहिल्या अंकात प्रसिद्ध झाला. तो शीला आढाव यांनी लिहिला. त्यावेळी त्या पुणे महानगरपालिकेच्या गाडीखान्यातील स्त्रियांसाठी चाललेल्या दवाखान्यात काम करीत होत्या. हा लेख खूप गाजला. मात्र बक्षीस म्हणून की काय तर पुणे मनपाच्या आरोग्य खात्याने त्यांची बदली अन्यत्र केली. अ‍ॅड. दत्ता काळेबेरे यांनी प्राथमिक शाळेतल्या वाङ्मयीन पुस्तकांची पाहणी करून त्यातील अंधश्रद्धाळू भाग वगळण्याची मागणी लावून धरली. विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या संस्कारक्षम वयातच सत्यशोधक विचारांचा संस्कार व्हावा, अशी मागणी सतत केली. पुढे

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या नेतृत्वाखाली अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मोहीम सुरू झाली. विदर्भात शाम मानवांनी हेच काम चालवले. १९७७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे केलेल्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाची ५० वर्षे पूर्ण झाली. तो दिवस फार मोठय़ा उत्साहाने साजरा झाला. मराठवाडय़ाच्या विद्यापीठाचे नामांतर आंदोलन सुरू झाले. त्यासाठी लाँग मार्च निघाले. आम्हाला वाटेतच अटक करून विसापूरच्या तुरुंगात ठेवले. नंतर मुंबईच्या ऑर्थर रोडवरील जेलमध्ये व ठाण्याच्या जेलमध्येही राहावे लागले. १७ दिवसांचे उपोषण केले. पुढे मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी यासाठी पुण्यात मोठी परिषद घेण्यात आली. या परिषदेला शरद पवारांपासून शरद पाटील या मंडळींनी हजेरी लावली. आम्ही बारामती तालुक्यातील ३७ गावांना भेटी  दिल्या, पदयात्रा केल्या. अ‍ॅड. विजय मोरे यांनी त्याचे नियोजन केले. याच काळात देवदासींच्या प्रश्नांची वाच्यता झाल्यानंतर पुण्यात नवऱ्याने ‘टाकून दिलेल्या’ स्त्रियांची परिषद संघटित झाली आणि तिला उत्स्फूर्तपणे हजारो स्त्रियांनी हजेरी लावली. या स्त्रियांचे म्हणणे – केवळ खाना, कपडा, मकान एवढं म्हणू नका, आम्हाला इज्जत हवीय! राष्ट्र सेवा दलाने सातारा जिल्ह्य़ातील नायगांव (सावित्रीबाई फुल्यांचे माहेर) येथे व मराठवाडय़ातील औरंगाबाद येथे मोठय़ा परिषदा झाल्या. पुण्यासारख्या भागात महर्षी कर्वे यांनी हिंगणे येथे महिलाश्रमाची स्थापना केली होती. रमाबाई रानडे यांचे सेवा सदन, पंडिता रमाबाईंचे केडगाव येथील ‘मुक्ती सदन’ उभे राहिले. मात्र बहुजन समाजात अशी संस्था अद्याप उभारली गेलेली नाही. हे कटू वाटले तरी वस्तुस्थिती निदर्शक आहे. या प्रश्नाला भिडण्याची गरज आहे. ‘समान काम समान दाम’ मागणीबाबतही अशीच उपेक्षा आहे. या प्रश्नांबरोबर कागद, काच, पत्रा गोळा करणाऱ्या स्त्रियांची चळवळ उभी राहिली. ज्यातील ९९ टक्के स्त्रिया दलित आहेत. कचऱ्याचे संकलन, ओला-सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण,  रि-सायकलिंग पुनर्उत्पादन यातून चळवळीने आगळंवेगळं रूप प्रकट केलं. पुण्याच्या कष्टकरी स्त्रिया आंतरराष्ट्रीय पातळीवरही  जिंकल्या व पुनर्उत्पादनाचा प्रयोग करून दाखवला. अंगणवाडी सेविका, मोलकरणी, बांधकाम व्यवसायातील स्त्रिया अशा अनेक घटकांनी सामाजिक सुरक्षा कायद्याची मागणी केली आहे व आंदोलने सुरू ठेवली आहेत. ‘आयुष्यभर राब-राब राबायचे. म्हातारपणाचे काय?’ या प्रश्नाचे उत्तर मागण्यासाठी दिल्लीपर्यंत मोच्रे काढले. पायी-मोटार सायकलवर – रेल्वेने तेथे जाऊन ‘जंतर-मंतर’ गाजवले. २००८ मध्ये देशात सामाजिक सुरक्षा कायदा मान्य झाला. ३१ डिसेंबर २००८ या दिवशी त्यावेळच्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी त्यावर सही केली. आज प्रतिभा पाटील यांचे वास्तव्य पुण्यातच आहे. महाराष्ट्र राज्यात त्या समाज कल्याण मंत्री असताना ‘देवदासी प्रथा निर्मूलन व पुनर्वसन’ हा कायदा मंजूर झाला.

१९६९ मध्ये हमालांसाठी माथाडी कामगार कायदा मान्य झाला. १९८० मध्ये पुण्यात अंमलबजावणी सुरू झाली. आणि व्यापाऱ्यांच्या दुकानात काम करणाऱ्या व मार्केट समित्यांतून मातेरं गोळा करणाऱ्या स्त्रियांना न्याय मिळू लागला. माथाडी, हमाल व इतर शारीरिक अंगमेहनतीची कामे करणाऱ्या असुरक्षित कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळण्याची वाट  दृष्टिपथात आली. सामाजिक सुरक्षा कायद्यात कष्टकऱ्यांना ओळखपत्र मिळावे, जीवन विमा व आजारपणात साहाय्य मिळावे व म्हातारपणात पेन्शनची तरतूद व्हावी अशी कलमे, अशाबाबत महाराष्ट्र शासनाने काहीही केलेले नाही. नाममात्र मंडळे स्थापन केली आहेत, पण त्यांना कृती कार्यक्रम दिलेला नाही. बांधकाम मजूर हे त्याचे ढळढळीत उदाहरण.

अलीकडे महाराष्ट्रात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या काही हजारांत तर देशात काही लाखांच्या घरात पोहोचली आहे. नुकतीच एका शेतकरी स्त्रीवर आत्महत्या करण्याची वेळ आल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. शेतकरी पुरुष आत्महत्या करतो पण तो गेल्यावर कुटुंबाचा सारा भार स्त्रियांना उचलावा लागतो. या घटिताकडे जावे तेवढे लक्ष जात नाही. परिवर्तनाची चळवळ अनेक अंगांनी सुरू आहे. मात्र या चळवळींच्या दिशा काही वेळा परस्परविरोधी असल्याचे लक्षात येते. भारताच्या संविधानांतील मूल्यांचा स्वीकार मनोमन झालेला नाही. आजही ही मने सनातनीत अडकलेली आहेत. महात्मा जोतिराव फुल्यांनी सत्यशोधक चळवळीची मांडणी केली. या चळवळींचे पुढे ब्राह्मणेतर, दलित अशा वाटचालीत रूपांतर झाले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या दाभोलकरांसारख्या मित्राचा खून झाला. त्यांच्या अंत्ययात्रेत उत्स्फूर्तपणे घोषणा दिली गेली. ‘फुले, शाहू, आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर!’ कॉम्रेड पानसरेंची हत्या झाली आणि घोषणेत त्यांचं नाव गोवलं गेलं. फुले-शाहू-आंबेडकर ही विचारधारा सत्यशोधक चळवळीतूनच प्रवाही झाली आहे. महर्षी विठ्ठल रामजी िशदेंनी ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय!’ या बोधवचनाचा उच्चार केला. बहुजन पक्षाची स्थापना केली. मुळात फुले यांनी स्त्री-शूद्रातिशूद्र असा शब्दप्रयोग केलेला आहे. फुल्यांनी स्त्री या घटकाला अनन्यसाधारण प्राधान्य दिलेले आहे. स्त्री श्रेष्ठ का पुरुष श्रेष्ठ? असा प्रश्र उपस्थित करून मातृत्वाचं वरदान असणारी स्त्री असा निर्वाळा दिला आहे. आणि ते त्यांनी सारं संवादरूपात लिहिले आहे. फुल्यांचा संवाद विद्वत्जनांपेक्षा सामान्य मानल्या गेलेल्या स्त्री-पुरुषांशी अधिक आहे. फुले यांनी केलेल्या सत्यशोधनाच्या मांडणीची सुरुवात सावित्रीबाईंपासून सुरू झालेली आहे. सावित्रीबाईंनी केशवपनाला विरोध करण्यासाठी न्हाव्यांचा संप घडवून आणला. आपल्या भारत देशात स्त्रियांना मतांचा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातच मिळवून दिला होता. पुढे स्त्रिया ग्रामपंचायत, जिल्हा परिषदा, महानगरपालिकापर्यंत पोचल्या. मात्र राज्यांच्या विधानसभेत व लोकसभेत त्यांचा प्रवेश अद्याप मुक्त झालेला नाही. तो व्हावा यासाठी आरक्षण मान्य झालेलं नाही. शिक्षणातील संधी मिळाल्याने मुलींची प्रगती धुमधडाक्याने होत आहे हे वास्तव डोळे दिपवणारे आहे. पुण्यातील सत्यशोधक महिलांनी नुकतीच वैकुंठ स्मशानभूमीसमोर निदर्शने केली. नवरा मेला-मंगळसूत्र तोडणार नाही, कुंकू पुसणार नाही, बांगडय़ा फोडणार नाही असे फलक हातात घेऊन निदर्शने केली. भारतातील एकूण असंघटित कष्टकऱ्यांची संख्या ५० कोटींच्या पुढे गेलेली आहे. स्त्री कष्टकऱ्यांचे प्रमाण खूप मोठे आहे. त्याविषयी पुढील शनिवारच्या अंतिम लेखात.

rahul.nagavkar@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2018 4:22 am

Web Title: article about movement by social activist dr baba adhav
Next Stories
1 वैद्यकीय कार्याकडून समाजसेवेकडे
2 चळवळींचे बाळकडू
3 जहाँ प्यार ही प्यार पले
Just Now!
X