आनंद पवार

सगळ्या तथाकथित ‘एकटय़ा’ असणाऱ्या स्त्रियांनी एकटीच्या नावाने रेशनकार्ड मिळवले. अगदी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याशी भांडल्या. पुढे ‘सम्यक’ने वस्त्यांमध्ये ‘छेडछाड विरोधी’ समित्या स्थापन केल्या. मग महाविद्यालयीन मुलींसोबत ‘यप’ हा उपक्रम राबवला. याशिवाय या सर्व मुली व काही स्त्रियांसोबत ‘सेफ्टी-पिन’ नावाने आलेल्या मोबाइल-अ‍ॅपच्या द्वारे पुण्यातील अगदी २००० जागांची स्त्रियांसाठी किती सुरक्षितता आहे याबाबत विविध निकषांवर अभ्यास करून त्याचा अहवाल पुणे पोलीस आयुक्त व पुणे महानगरपालिका यांना सादर केला. असे अनेक उपक्रम ‘सम्यक’ने राबविले

आज जगामधे स्त्रियांसाठी असलेल्या सामाजिक, राजकीय, आर्थिक अवकाशाचे श्रेय हे आजवर स्त्रियांनी, स्त्रीवादी विचारांनी आणि स्त्री-संघटनांनी केलेल्या संघर्षांचा परिणाम आहे. या ‘संघटित’ संघर्षांचा इतिहास हा एका शतकाहून जास्त काळाचा आहे आणि हे सगळे संघर्षसुद्धा त्याआधी शतकानुशतके ‘व्यक्तिगत’ पातळीवर संघर्ष केलेल्या, स्त्रियांच्या इतिहासाच्या खांद्यावर उभारलेले आहेत. त्यामुळे आज स्त्रियांच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक हक्कांसाठी सुरू असलेले काम हे काही काल-परवा सुरू झालेले नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

स्त्रियांच्या हक्कांच्या लढय़ाचा इतिहास भारतामध्ये तर अनेक शतके मागे जातो. आज चळवळी किंवा संघटना किंवा संस्था करत असलेल्या स्त्री-हक्कांच्या कामांचा हा वारसा खूप जुना आहे याची जाणीव आपण इथे ठेवली पाहिजे. ब्रिटिशपूर्व अथवा दरम्यान, अथवा ब्रिटिशोत्तर काळामध्ये अनेक स्त्रियांनी संघर्ष केला, आपले विचार मांडले, लिखाण केले. यामध्ये विविध जाती, धर्म, विभाग, प्रांत अशा पाश्र्वभूमींच्या स्त्रियांचा सहभाग असल्याची नोंद स्त्री-अभ्यासामध्ये झालेली आहे. अनेक ज्ञात स्त्रिया तर आहेतच पण त्या पलीकडे अनेक अज्ञात स्त्रियाही असतील ज्यांची इतिहास नोंद करू शकला नाही. १९७५ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केलेल्या स्त्रियांविषयकच्या वर्षांपासूनच अशा नोंदींची सुरुवात झाली असे मानणे हे अपुरे ठरेल. अर्थात, पुढील अंकामध्ये १९७५च्या वर्षांचे महत्त्व, संयुक्त राष्ट्र संघाची स्त्रियांविषयक असलेली तत्कालीन धोरणे व त्याच्या पुढे झालेल्या परिणामांविषयी भविष्यवेध घेताना आपण काही स्वप्न पहिली पाहिजेत याविषयी लेखात वाचणार आहोतच.

आता आपण ‘सम्यक’च्या २००७ पासूनच्या स्त्रियांसोबतच्या सामुदायिक कामाबद्दल माहिती करून घेणार आहोत. हा भाग आपल्याला थोडा ‘प्रचारकी’ वाटण्याची शक्यता आहे, पण मागील एका दशकापासून ‘सम्यक’ स्त्रियांसोबत कशा प्रकारचे, कुठे कुठे आणि कसे काम करत आहे आणि त्याद्वारे काय छोटे-मोठे बदल घडू शकले आहेत हाच या लेखाचा मुख्य भर असणार आहे, ‘आत्मस्तुती’ हा इथे मुद्दा नसून किती विविध पातळ्यांवर काम करता येणे शक्य आहे, हे अभिव्यक्त करणे हा या लेखाचा उद्देश आहे. ‘सम्यक’च्या स्त्रियांसोबतच्या कामाचा आढावा घेताना स्त्रीहक्कांविषयक अनेक शतके (विशेषत: दक्षिण आशियामध्ये) झालेल्या विविध घडामोडींचा लेखाच्या सुरुवातीलाच उल्लेख करणे महत्त्वाचे वाटते. या लेखामध्ये आपण जरी ‘सम्यक’ने केलेल्या स्त्रियांसोबतच्या कामाबद्दल वाचत असलो तरी लिंगभाव ओळखीच्या अनेकविध छटांसोबत काम करत असतानाच विशेषत: ‘सम्यक’ने स्त्रियांसोबत केलेल्या आंतरराष्ट्रीय व विभागीय, राष्ट्रीय आणि स्थानिक, गाव, वस्ती पातळीवरच्या कामांबाबत आपण जाणून घेऊ या.

आंतरराष्ट्रीय पातळीवर आतापर्यंत ‘सम्यक’ने केवळ एक संसाधन संस्था म्हणून काम केले आहे. यामध्ये, नेदरलॅण्डस (हॉलण्ड), व्हिएतनाम, इंडोनेशिया, श्रीलंका, नेपाल, बांगलादेश आदी देशांमध्ये ‘सम्यक’ने पुरुषत्वाविषयींच्या संकल्पनांना चालना देणारे व याविषयी काम करण्याच्या आवश्यकतेविषयी विविध प्रशिक्षण कार्यक्रम घेतले आहेत. यामध्ये काही विशेष उल्लेख करावा असे, काम मी नेदरलॅण्डमधील ‘विमेन पीसमेकर प्रोग्राम’ (हहढ) या संस्थेसोबत प्रामुख्याने केले. ‘सम्यक’ म्हणून मी या संस्थेच्या आशिया बोर्ड समितीचा सदस्य राहिलो आहे. पुढे मी याच संस्थेच्या आंतरराष्ट्रीय सल्लागार समितीवर काम केले. या दरम्यान संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेच्या पारित केलेल्या ठराव १३२७ नुसार, ‘स्त्रिया, शांतता व सुरक्षा’ या विषयामध्ये ‘पुरुषत्वाचा’ मुद्दा मांडणे गरजेचे आहे याबाबत विविध देशांसहित संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेदरम्यान होणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या परिषदांमधून मांडणी केली. ‘सम्यक’ केवळ निमित्त होते मात्र या विषयीची मांडणी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेमध्ये झाली हे विशेष महत्त्वाचे. या शिवाय ‘वुमेन इन नीड’ (हकठ) या संस्थेसोबत श्रीलंकेमध्ये, पुढे याच विषयी काम करणाऱ्या व्हिएतनाम, बांगलादेश, नेपाळ, इंडोनेशिया या देशांमध्ये पण या विषयाची मांडणी करता आली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ‘स्त्रिया, शांतता आणि सुरक्षितता’ याविषयी मांडणी करताना त्या त्या समाजिक- राजकीय परिस्थितीतील पुरुषत्वाच्या संकल्पनांचेही विश्लेषण करण्याची गरज का आहे, हे आंतरराष्ट्रीय परिघातील स्त्रियांनी मांडायला सुरुवात केली. ही मांडणी स्थानिक, विभागीय अथवा जागतिक पातळीवर सुरू झाली. त्यासाठी आफ्रिकेपासून ते उत्तर आशियापर्यंत ‘सम्यक’ला निमंत्रित करणाऱ्या स्त्रीवादी संघटनांचे खरेच आभार मानायला हवेत.

दक्षिण आफ्रिका आशिया पातळीवर ‘सम्यक’चे स्त्रियांसोबतचे काम हे ‘संसाधन केंद्र’ पद्धतीचे राहिले. उदाहरणार्थ, पुरुषत्वाच्या मुद्दय़ांवर स्त्रीवादी दृष्टिकोनातून काम करण्याची गरज का आहे याविषयी भारत, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, अफगाणिस्तान या देशांतील स्त्रीवादी संघटनांशी चर्चा करता आली. अशी मांडणी खरं तर १९८०च्या दशकामध्येच स्त्रीवादी चळवळीतील काही व्यक्तींनी सुरू केली होती. कमला भसिन या अशाच एक महत्त्वाच्या स्त्रीवादी संघटक यांनी आधीच ही मांडणी करून ठेवली होती. त्याचाच प्रचार-प्रसार करण्याचे काम ‘सम्यक’ने दक्षिण आशिया पातळीवर केले. यामधून खूप स्त्रीवादी पुरुषांना एकूण लिंगभाव-न्यायाच्या चळवळीमध्ये ‘पुरुषत्वाच्या’ मुद्दय़ांवर काम करण्याची गरज का आहे व ते कसे करावे? याबाबत स्पष्टता आली. आज रोजी दक्षिण आशियामध्ये स्त्रीवादी सामाजिक न्यायावर अवलंबलेली समाजव्यवस्था कशी असावी याबाबत जी मांडणी केली जाते हा याच चर्चेचा परिपाक आहे असे मला वाटते. मागील पाच वर्षांपासून ‘पुरुषत्वाच्या’ संकल्पना बदलणे यामध्ये दक्षिण गोलार्धातील स्त्री चळवळीचा मोठाच हातभार लागला आहे आणि त्यामुळेच लिंगभाव न्यायाचा मुद्दा हा केवळ ‘लिंगभाव’ समानतेचा मुद्दा नसून त्या या समाजातील, त्या त्या काळातील, त्या त्या संस्कृतीतील सत्ता संबंधांचा अभ्यास असायला हवा असे प्रकर्षांने वाटते. त्यामुळे लिंगभाव ही संकल्पना ‘पुरुष’ ‘स्त्री’ या द्वयार्था पलीकडे गेली पाहिजे.

भारताच्या पातळीवर स्त्रिया आणि किशोरवयीन मुलींचे विविध राज्यांमध्ये विविध संस्थांनी प्रशिक्षण कार्यक्रम घेतले. हे सर्व अर्थात विविध संस्था- संघटनांच्या माध्यमातून घेतले गेले. यामध्ये अर्थातच उत्तर भारतीय संस्था- संघटनाची मक्तेदारी आहे, पण याला अपवाद म्हणून ‘मिया’, ‘मॅजिक बस’, ‘ब्रेक थ्रू’, अशा संस्थांचा उल्लेख करता येईल. या सगळ्या संस्था संघटनांमध्ये ‘सम्यक’ने स्त्रीवादी भूमिकेतून लिंगभेदभाव आणि पितृसत्ता, त्याशिवाय लिंगाधारित हिंसा लैंगिक हिंसा याबाबत प्रशिक्षण कार्यक्रम घेतले व चर्चा केल्या. अशा सामाजिक संस्थांशिवाय ‘सम्यक’ने ‘कॉमनहेल्थ’ जे स्वयंसेवी संस्था आणि व्यक्तींचे विचारपीठ आहे त्याद्वारे लिंगभाव, पितृसत्ता व त्याचा सुरक्षित गर्भपाताशी कसा संबंध आहे यावर मांडणी केली. खरे तर ‘गर्भलिंग निदान’ हा मुद्दा आणि ‘गर्भपाताचा अधिकार’ हा मुद्दा एकमेकांपासून कसा वेगळा आहे याबाबत देशभर मांडणी केली. याशिवाय राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या संस्था- संघटनांचे प्रशिक्षण केले. खरं सांगायचं तर या सगळ्या मागच्या दशकांमध्ये किती स्त्री कार्यकर्त्यां किंवा व्यक्ती स्त्रियांच्या हक्कांच्या किंवा या विविध स्त्रीवादी मागण्यांच्या बाजूने उभ्या राहिल्या हे सांगणे अवघड आहे. पण आमचा अंदाज आहे की अगदी शेकडो, हजारो नव्हे, तर स्त्रिया या जाणिवांसह भारतभर उभ्या राहिल्या. त्यापैकी स्वयंसेवी संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या अनेक स्त्री कार्यकर्त्यां आजही दूरध्वनीद्वारे त्या कशा या सगळ्या मुद्दय़ांबाबत जनजागृती, वकिली करत आहेत हे सांगतात. हे वास्तव आहे.

जागतिकीकरणाच्या रेटय़ामध्ये तुम्ही सहजपणे जागतिक, आंतरराष्ट्रीय अथवा विभागीय काम करू शकता. मात्र गाव-वस्ती पातळीवर आपण काही काम करतो का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. खरं पाहता, ‘सम्यक’चे काम हे स्थानिक झोपडपट्टी, गावपातळीवरून जागतिक पातळीवर गेले. स्त्रियांसोबतच्या कामाचे इथे आपण दोन भाग करू या. एक ‘सम्यक’चे स्वत:चे प्रत्यक्ष काम आणि इतर स्थानिक संस्थांना मदत करण्यासाठी. पुण्यामध्ये ‘सम्यक’ मुळातच शहरी वस्त्यांमध्ये काम करते. यामध्ये सगळ्यात पहिला प्रयत्न होता तो वस्त्यांमध्ये काम करणे. यामध्ये सगळ्यात पहिला प्रयत्न होता तो वस्त्यांमध्ये स्त्रियांसाठी वाचन केंद्र सुरू करण्याचा.

डॉ. रोहिणी यांच्या नावाने ही वाचन केंद्रे सुरू झाली. हे २००७ ‘आलोचना’ नावाच्या पुण्यातीलच स्त्रीवादी संसाधन केंद्राच्या मदतीने घडले. त्यांनी पुस्तके दिली, वस्तीतील स्त्रिया नजरेसमोर पडेल ते वाचत सुटल्या. साधारणपणे आठवी ते बारावी पास अथवा नापास स्त्रियांची वाचनाची भूक प्रचंड होती. त्या अक्षरश: पुस्तकाची पाने ‘खात’ होत्या. पण मग पुढे स्त्रियांच्या प्रजनन हक्कांविषयी, विशेषत: प्रजनन मार्गातील जंतूसंसर्ग याविषयी जागृती व शहरी (पुणे) आरोग्यसेवा, त्यावरील इलाजाची मागणी असे काम सुरू केले. सरळ गेल्या त्या पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागावर विरोधी मोर्चा घेऊन. खासकरून महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये प्रजनन मार्गावरील औषधोपचार मिळावे म्हणून धरणे झाले, निवेदने झाली. पुण्यातील शहरी स्त्री आरोग्य चळवळीचा फारसा आधार नसतांनाही त्यांनी तो प्रश्न मार्गी लावला

तसेच झाले वस्तीमधील ‘एकटय़ा’ असणाऱ्या स्त्रियांबद्दल. सगळ्या तथाकथित एकटय़ा असणाऱ्या स्त्रियांनी एकटीच्या नावाने रेशनकार्ड मिळवले. अगदी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याशी भांडल्या. पुढे ‘सम्यक’ने मागच्या लेखात उल्लेख केलेल्या प्रीती डोईफोडेच्या मदतीने वस्त्यांमध्ये ‘छेडछाड विरोधी’ समित्या स्थापन केल्या. मग महाविद्यालयीन मुलींसोबत ‘यप’ हा उपक्रम राबवला. याशिवाय या सर्व मुली व काही स्त्रियांसोबत ‘सेफ्टी-पिन’ नावाने आलेल्या मोबाइल-अ‍ॅपच्या द्वारे पुण्यातील अगदी २००० जागांची स्त्रियांसाठी किती सुरक्षितता आहे याबाबत विविध निकषांवर अभ्यास करून. त्याचा अहवाल पुणे पोलीस आयुक्त व पुणे महानगरपालिका यांना सादर केला. वस्तीमधील किशोरवयीन मुलींसाठी ‘समतेसाठी नाच करा’ असा कार्यक्रम राबविला. अनेक कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष हस्तक्षेप केला. हा हस्तक्षेप भावनिक-मानसिक मदत ते कायदेशीर मदत इथपर्यंत केला गेला. पुणे शहरातील कागद-काच पत्रा उचलणाऱ्या स्त्रियांची ‘महिला हिंसाचार’ याबाबत प्रशिक्षणे केली व एक केंद्र स्थापित करण्याचा प्रयत्न केला. पुणे महानगरपालिकेचे सध्याचे सह-आयुक्त ज्ञानेश्वर मोडक जेव्हा ते नागरविकास योजनेचे प्रमुख होते तेव्हा त्या सर्व यंत्रणेचे ‘स्त्री हिंसा’ कशी ओळखावी, नोंदवावी व त्या पुढे कार्य करावे असे प्रशिक्षण केले. असे अनेक उपक्रम ‘सम्यक’ने राबविले. आता शेवटचा मुद्दा असा आहे की, एखादी स्वयंसेवी संस्था व्यक्ती अथवा संघटना एका विशिष्ट संस्थेपर्यंत पोहोचू शकते पण, त्या पलीकडे एक खूप मोठा समाज, सरकार, धोरणे, कार्यक्रम इत्यादी अस्तित्वात असतात आता याचे काय करायचे? या पुढच्या लेखात आपण समाज परिवर्तनाचा इतिहास, स्त्रियांचे अधिकार, त्यासाठी केले गेलेले कायदे त्या कायदाकानूमधील अडचणी व पुढच्या समाजाचा विचार करता या पुढील दिशा काय असावी यावर चर्चा करणार आहोत. हा लेख संपवताना मला फक्त वाटते की, या लेखातून मांडलेल्या स्त्रीवादी चळवळीचा आणि आजच्या आपल्या ‘असहिष्णू’ होत चाललेल्या समाजाचा काही संबंध आहे हे तपासून पाहावे. भेटू पुढच्या अंकामध्ये..

anandpawar@gmail.com

chaturang@expressindia.com