हिराबाई खांडेकर नावाची मेंढपाळ २००६ मध्ये माणदेशी बँकेत आली आणि तिने मोबाइलसाठी कर्जाची मागणी केली. बँकेच्या व्यवस्थापक त्यांना म्हणाल्या, ‘‘अहो बाई, तुम्ही मोबाइलसाठी कर्ज कशाला घेत आहात? तुम्ही हा मोबाइल मुलाला देणार, शिवाय त्याचा रिचार्जसाठीचा खर्च आला.’’ त्यावर हिराबाई म्हणाल्या, ‘‘अहो, मला माझ्या मुलासाठी मोबाइल नको आहे. मी शेळ्या-मेंढय़ा पाळते आणि पोटापाण्याच्या, चारा-पाण्याच्या शोधात मला सहा-सहा महिने माझ्या कुटुंबापासून दूर राहावं लागतं. त्या वेळी मला माझ्या कुटुंबाच्या संपर्कात राहता यावं, म्हणून मला मोबाइल पाहिजे.’’ त्या असंही म्हणाल्या की, ‘‘मला मोबाइल वापरता येत नाही, तुम्ही मला मोबाइल कसा वापरायचा ते शिकवा.’’

हिराबाईंकडून धडा मिळाला, केवळ बँक स्थापन केली की काम झालं, असं होत नाही. मन विचार करू लागलं, ग्रामीण भागातील स्त्रिया ज्या कधीही शाळेत गेल्या नाहीत किंवा ज्यांचे चौथी-पाचवी शिक्षण झालं आहे त्या कुठला व्यवसाय करू शकतात. कशा प्रकारे त्यांचा ‘हिसाब, हिम्मत आणि हुन्नर’ या माध्यमातून विकास करता येईल? हिराबाई २००६ मध्ये मोबाइल मागत होती, ज्या वेळी मध्यमवर्गीय कुटुंबामध्येसुद्धा सर्वाकडे मोबाइल नव्हता. जर हिराबाई स्वत:साठी मागासलेला विचार करत नाही, तर आपणही कुठल्याही गोष्टीवर तोडगा देताना तो नावीन्यपूर्णच दिला पाहिजे हे मी पक्कं केलं. आपल्याही विचारात गरीबांसाठी उपाय सुचविताना दारिद्रय़ नसावं किंवा कमी खर्चाच्या उपाययोजना नसाव्यात. स्त्रियांमध्येही हे दिसून आलं की त्या जोखीम घ्यायला तयार आहेत, त्यांची ‘बिझनेस वुमन’ बनण्याची तयारी आहे, अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यास त्या उत्सुक आहेत. आज माणदेशी उद्योगिनी (बिझनेस स्कूल)मधून प्रशिक्षण घेऊन अनेक स्त्रिया शेळी डॉक्टर, सायकल रिपेरिंग, बायोमास, टू-व्हीलर रिपेअिरग, केबल नेटवर्किंग, मशरूम लागवड, रेशीमउद्योग, रोपवाटिका, कॅटिरग, सुतारकाम, कुंभारकाम, बांबू वर्क यासारख्या व्यवसायात उतरल्या आहेत. स्त्रिया माणदेशी ‘टोल फ्री’ क्रमांक १८००२१२२११२ चा लाभ घेऊन आपल्या व्यवसायनिगडित अडचणींवरदेखील पर्याय काढत आहेत. एवढेच नव्हे तर त्या ‘मोबाइल अ‍ॅप’चा वापरदेखील आत्मविश्वासाने करीत आहेत.

ज्या वेळी बिझनेस स्कूल सुरु केले, त्या वेळी ज्या स्त्रिया व मुली अगदी खेडय़ात राहत होत्या त्यांनी प्रश्न  केला की, आमच्याकडे बिझनेस स्कूलमध्ये यायला प्रवासासाठी पसा नाही आणि वेळदेखील नाही. यातून २००७ मध्ये आम्ही चार चाकांवर चालणारी फिरती व्यवसाय शाळा सुरू केली. खेडय़ांमध्ये जाऊन ही मोबाइल बस स्त्रियांना प्रशिक्षण देऊ लागली. घरपोच भांडवलाबरोबर, घरपोच व्यवसाय प्रशिक्षणाची सोय स्त्रियांसाठी झाली.

सोलापूर जिल्ह्य़ातील महुद गावच्या सुनिता कांबळे शेळी डॉक्टर म्हणून काम करतात. त्या ऑगस्ट २०१७ मध्ये विमानात बसून दिल्लीला गेल्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते ‘भारतातील पहिली शेळी डॉक्टर स्त्री’ म्हणून पुरस्कार घेऊन आल्या. सुनीताताईंचे नववीपर्यंत शिक्षण झाले आहे पण त्यांची भारत सरकारनेदेखील दखल घेतली. ज्या सुनीताताई शाळेत असताना व नंतरदेखील कधी साधे गुलाबाचे फूल घेण्यासाठी स्टेजवर गेल्या नाहीत त्या आज दिल्लीला जाऊन भाषण ठोकून, पुरस्कार घेऊन आल्या. आज सुनीताताईंसारख्या १३ ‘शेळी डॉक्टर’ माणदेशीमध्ये काम करीत असून सातारा जिल्ह्य़ातील तीन हजार पेक्षा जास्त शेतकरी स्त्रियांना त्यांनी शेळ्यांसाठी घरपोच लसीकरण, कृत्रिम रेतन आणि प्राथमिक उपचारांविषयी सेवा दिली आहे. आणि याचा थेट फायदा शेळीपालन करणाऱ्या स्त्रियांना होत आहे. या शेळी डॉक्टर स्त्रियांना सुरुवातीला खूप अडचणी आल्या. त्या सांगायच्या की, ‘‘ग्रामीण भागात स्त्रिया काही वेगळे करायला लागल्या की त्यांची चेष्टा होते. सुरुवातीला आम्हाला हे काम करताना बघून लोक हसायचे, पण आम्ही जिद्द सोडली नाही. आता, आमच्यात या कामामुळे एक वेगळ्याच प्रकारचं धाडस आणि आत्मविश्वास आलाय. आज आम्ही अ‍ॅप्रन घालून दुचाकीवर गावोगावी जाऊन भेटी देतो. आम्हाला गावकरी ‘गोट डॉक्टर’ म्हणून ओळखतात.’’ असं सन्मानपूर्वक जीवन स्त्रियांना मिळावं ज्याचा त्यांना आनंद घेता येईल हे आमच्या लक्षात आलं.

उद्योगिनीमधून बचत व कर्जाची माहिती मिळाल्यावर, मी माझा कर्जाचा अर्ज बदलला व तो २५ हजार रुपयांवरून १२ हजारांवर केला. कारण, आठवडी बाजारात बसून भाजी विकणाऱ्या मुलानी भाभी यांनी सांगितलं की, ‘‘मला १२ हजार रुपयांच्या कर्जाचीच गरज आहे. तेवढेच द्या. बाकीचा पका बिनकामी खर्च होणार. म्हणजे बाकीचे पैसे मी फेडू शकेन का नाही याची शाश्वती नाही.’’

निरक्षर म्हणून स्त्रियांनी बँकिंग क्षेत्रापासून दूर राहू नये या विचारातून सुरू केलेला आर्थिक साक्षरता कार्यक्रम हा व्यवसाय शाळेचा एक महत्त्वाचा भाग ठरला. कर्ज घेणारी प्रत्येक स्त्री हा कोर्स करते आणि स्त्रियांच्या विनंतीवरून यामध्ये पुरुषांचादेखील सहभाग करून घेतला आहे. स्त्रीच्या पतीला कर्जामध्ये सह-कर्जदार म्हणून सामावून घेतले जात आहे.

ग्रामीण स्त्रियांमध्ये सुप्तगुण, कौशल्य दडलेले असतात, त्यांचा योग्य वेळी, योग्य ठिकाणी वापर केला तर एक उत्तम उद्योजक निर्माण होऊ शकतो हे या स्त्रियांमुळेच आम्हाला शिकायला मिळाले. द्रोण-पत्रावळीचा व्यवसाय करणाऱ्या मंगलताई सांगतात, ‘‘आदर्श उद्योजिका पुरस्कार देऊन माणदेशीने माझी समाजात ओळख व अस्तित्व निर्माण केले. दुसऱ्यांकडून कच्चा माल आणणारी, मी आज दुसऱ्यांना कच्चा माल पुरवते.’’ स्त्रियांचा पसा, व्यवसाय व मालमत्तेवर ताबा राहावा या उद्देशाने देशी एमबीए प्रोग्रॅम आपण फाऊंडेशनमार्फत चालवत आहोत व यामधून हजारो रोल मॉडेल निर्माण होत आहेत. आज अडीच लाख स्त्रियांनी व्यवसाय प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे. सध्या ‘माणदेशी बिझनेस स्कूल’च्या महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरातमध्ये १५ शाखा आहेत.

अजून एक उदाहरण सांगावंसं वाटते ते म्हणजे, बानुबाई पिसाळ यांचं. त्या चहाचा गाडा चालवतात. दररोज त्यांचा गाडा कोर्टाच्या समोर लागे. वकील, पोलीस येवून त्यांच्या गाडय़ावर चहा प्यायचे. एक दिवस शुक्रवारी पोलिसांनी बानुबाईंना अटक केली. कारण होतं की, त्या व्यवसायासाठी घरगुती गॅसचा वापर करीत होत्या, पण बानुबाईंना तर हे माहीतच नव्हतं की, व्यवसायासाठी व्यावसायिक गॅसचा वापर केला पाहिजे. बानुबाईंसारख्या स्त्रिया ज्यांना आपला व्यवसाय वाढवायचा आहे पण लाख अडचणी येतात, अशा स्त्रियांसाठी ‘चेंबर ऑफ कॉमर्स’ची सुरुवात झाली. व्यवसायाची जाहिरात, ब्रॅण्डिंग, नोंदणी करायची आहे, बाजारपेठ पाहिजे आहे, तसंच कायदेशीर माहिती हवी असल्यास स्त्रिया चेंबर ऑफ कॉमर्सचे सदस्य बनतात.

पुष्पा वसव (पूजेचं साहित्यविक्रेत्या) म्हणायच्या, ‘‘मला लाज वाटते हे सांगायला की मी चौथी शिकले. मला शिकायचय.’’ त्याप्रमाणे ‘माणदेशी’ने सुरु केलेल्या ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठा’मधून त्यांनी एम.ए. केले, त्यांना पीएच.डी. करायची आहे. एवढेच नव्हे तर आठवी नंतर शिक्षण सोडलेल्या आपल्या सुनेलाही त्यांनी  मुक्त विद्यापीठामधून शिक्षण पूर्ण करायला लावलं. २०११ मध्ये सुरू झालेल्या या केंद्रामधून ९१९ विद्यार्थ्यांनी  आपलं अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण केलं आहे.

किराणा दुकान चालवणाऱ्या शेखभाभी अभिमानाने सांगतात की, ‘‘मी स्वत:चं घर बांधलं व माझ्या मुलांना स्वत:च्या पायावर उभं केलं.’’ शेख भाभींना जेव्हा मी विचारलं, ‘‘तुमचं भांडवल काय हो?’’ शेख भाभी अभिमानाने म्हणाल्या, ‘‘माझं धाडसच, माझं भांडवल.’’ मनात विचार आला, केवढं मोलाचं आणि महत्त्वाचं वाक्य आहे हे आणि शेख भाभींसारख्या ज्या स्त्रिया संघर्षांतून विश्व उभं करतात त्या सर्व स्त्रियांना प्रोत्साहन देणारं आहे.

हिराबाई, बानुबाई, मुलानी भाभी, शेख भाभी वा सुनीताताई असो या स्त्रियांच्या कहाण्या आणि अनुभवातून हे माणदेशी मॉडेल उभं राहिलं आहे. या अनुभवाची जगाला ओळख व्हावी म्हणून त्यांना हक्काचं दालन मिळवून दिलं, ‘माणदेशी एफएम तरंग वाहिनी’ने अर्थात कम्युनिटी रेडिओ स्टेशनने. अगदी अंगठेबहाद्दर असलेल्या केराबाई ‘माणदेशी रेडिओ’वर रोज वेगवेगळ्या कला सादर करतात. माणदेशची पहिली ओळख १९६०च्या काळात व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘माणदेशी माणसं’ आणि ‘बनगरवाडी’ या दोन महत्त्वाच्या साहित्यकृतींमुळे झाली. माणदेश हा दुष्काळाबरोबर संस्कृती व साहित्यासाठीदेखील प्रसिद्ध आहे. हा वसा पुढे ‘रेडिओ’च्या माध्यमातून चालू राहावा व माणवासीयांच्या कला-कौशल्यांना वाव मिळावा या उद्देशाने रेडिओ केंद्राची स्थापना केली. दीड लाख श्रोतावर्ग असलेल्या रेडिओची कीर्ती ११० गावांमध्ये पसरली आहे.

उद्योजिका तयार करायच्या म्हणजे महत्त्वाची कामगिरी पार पाडावी लागते ती स्त्रियांच्या व्यवसायाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची. सुरुवातीला आम्हीच स्त्रियांचं उत्पादन घेऊन ते विकायचो. पण नंतर लक्षात आलं की, स्त्रियांनी स्वत:च त्यांचं उत्पादन विकलं पाहिजे, जेणेकरून त्यांना ग्राहकाच्या मागणीचा, चवीचा अंदाज येईल. त्यांच्याशी कशा वाटाघाटी करायच्या हे स्त्रियांच्या लक्षात येईल. त्यामुळे ग्राहकांशी स्त्रियांनीच सामना केला पाहिजे आणि त्यातून ‘माणदेशी महोत्सव’ भरविण्यास सुरुवात केली. महोत्सव दर वर्षी सातारा शहर व मुंबई शहरात भरवला जातो. २०० उद्योजिका स्त्रिया आपले स्टॉल लावतात व लाखाने पैसे कमवितात. शेतकरी व व्यावसायिक स्त्रियांना मोठय़ा व नियमित स्वरूपाची बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून फार्म टू मार्केट, वेअरहाऊस आणि कोल्डस्टोरजची सुरुवातदेखील केली आहे.

‘फ्रीडम राइड’ या कार्यक्रमातून सायकल मिळालेली निशा सांगते, ‘‘मला मिळालेल्या सायकलमुळे मी शाळेत वेळेवर पाहोचू शकते व अभ्यासाला वेळ देऊ शकते. मी महत्त्वाकांक्षी बनले आहे व आता उच्चशिक्षण मिळविण्याचं स्वप्न पाहू शकते.’’ शाळा दूर असल्याकारणाने मुलींनी शाळा सोडू नये यासाठी आजपर्यंत ९३६० मुलींना मोफत सायकलचं वाटप केलं आहे.

रेश्मा म्हणते, ‘‘गुराढोरांच्या मागे धावून माझे पाय मजबूत झाले आणि मला धावायची सवय लागली. मी म्हशी चारायला जायची आणि बाजूलाच असलेल्या ‘चॅम्पियन टँक’वर मुलांना खेळताना बघायची. मला कोचने विचारलं, ‘‘तू धावणार का?’’ मी लगेच हो म्हणाले. दररोज मी खेळायला/पळायला ग्राऊंडवर जाऊ लागले. माझ्या आईबाबांना वाटायचं मी गुरांना चरायला घेऊन गेलेय.’’ रेश्मा ही लांब-अंतर धावणारी खेळाडू आहे व पुणे आंतरराष्ट्रीय २१ किमीच्या मॅरेथॉनमध्ये ती सहाव्या स्थानावर आलेली आहे. रेश्माची ऑलिम्पिकमध्ये पोहोचण्याची इच्छा आहे. माणची मुलं ही पाणीदार आहेत आणि त्यांच्यात वेगळ्या प्रकारची ऊर्जा आहे. या ऊर्जेतून खेळाडू तयार होऊ शकतात हे लक्षात आलं आणि माणदेशी चॅम्पियन्स स्पोर्ट्स प्रोग्रामची स्थापना झाली. २०१० मध्ये सुरू झालेल्या या क्रीडा संकुलामार्फत चार हजार विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे, त्यापैकी १५० विद्यार्थ्यांनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

सर्वात आव्हानात्मक गोष्ट म्हणजे, २०१२च्या दुष्काळात, माणसांना आणि जनावरांना प्यायला पाणीच नव्हते. कुटुंबच्या कुटुंब जगायला बाहेर निघून जाऊ लागली. अशा वेळी ‘माणदेशी’ने चाराछावणी सुरू केली आणि ७० गावांमधून १४ हजार जनावरे, ६ हजार कुटुंबांना छावणीत आसरा दिला. माणदेशातल्या शेतकरी कुटुंबाने बेंदूर छावणीवर केला. बेंदूर बलांचा वर्षांचा सण पण बल व बलांचा मालक छावणीवर तर बेंदूर छावणीवरच होणार. माण तालुक्यातल्या गावात वीस दिवसांनी टँकरने पाणी यायचं. जगाचा अन्नदाता आपल्या मुलाबाळांसह व गुरांसह छावणीत होता. शेतकरी कधी भीक मागत नाही. शेतात कष्ट करून दुपारी झाडाखाली जेवायला बसला तरी रस्त्यांनी जाणाऱ्याला भाकरीचा रुमाल सोडताना म्हणणार, ‘या जेवायला.’ नंतरच आपल्या तोंडात घास घालणार. त्या शेतकऱ्यांना चारा, पाण्यासाठी घर सोडून छावणीत यावे लागले. दीड वर्ष चाराछावणी चालली. बायका तीन दगडांच्या चुली मांडून छावणीतच स्वयंपाक करायच्या. धगधगत्या उन्हात, शेतकरी छावणीत चारा/पाण्यासाठी तास न् तास रांगेत उभ्या राहायचा. आपल्या अन्नदात्याला रांगेत ताटकळत उभं राहायला नको म्हणून छावणीची वॉर्डवार विभागणी केली. छावणीला गावाचं रूप आलं. बाबूंचे मोठे मनोरे उभारून लाइटची व्यवस्था छावणीत करण्यात आली होती. आम्ही ठरवलं, छावणीत शेतकऱ्यांना घरासारखी व्यवस्था केली गेली पाहिजे. म्हणून छावणीवर चारा, पाणी, पेंड, शेडनेट, येणाऱ्या जाणाऱ्यासाठी रिक्षा सर्व सोयी करण्यात आल्या. अशी छावणी परत व्हायला नको म्हणून पावसाचा थेंब न थेंब आडवण्यासाठी गाळ उपसा उपक्रम राबविला. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सिमेंट बंधारा बांधण्याची कामे हाती घेतली. म्हसवड परिसरातील गावांमध्ये नऊ अद्ययावत बंधारे कोटय़वधी रुपये खर्चून बांधले आहेत. माण तालुक्यातील शेतकरी लुबाळदादा म्हणतात, ‘‘माणचा भाग म्हणजे पाण्याचे दुíभक्ष, नेहमीच दुष्काळ. या भागाला निसर्गाची साथ नाही. कुठलीच मुलगी लग्न करून माणला यायला तयार होत नव्हती कारण दररोज सकाळी उठून पाण्यासाठी पाच किमी पायपीठ करावी लागायची. ‘माणदेशी’ने बांधलेल्या बंधाऱ्यामुळे कायापालटच झाला.’’

चेतना सिन्हा

chetna@manndeshi.org.in