रामापूर येथे १९८६ मध्ये ग्रामीण स्त्रियांनी एकत्र येऊन ‘संपदा ग्रामीण महिला’ संस्था सुरू केली. मतभिन्नतेच्या नेहमीच्याच समस्येमुळे संस्था चालवणे या गटाला अवघड झाले व या संस्थेचे कार्य १९९२ मध्ये बंद केले गेले. याच वेळी १९९२ मध्ये आम्ही एच.आय.व्ही./एड्स या समाजात झपाटय़ाने पसरणाऱ्या आजाराविषयी जनजागृती व प्रतिबंधाचे काम करण्यासाठी एक संस्था स्थापण्याचा विचार करत होतो. या वेळी व्ही. एम. देशपांडे यांनी या संस्थेविषयी माहिती दिली. ‘ही संस्था नोंदणीकृत असून बंद पडली आहे. तुम्ही हे कार्य या संस्थेमार्फत पुन्हा का चालू करत नाही?’ असे त्यांनी विचारल्यावर सांगलीतील स्थानिक स्त्रियांना घेऊन, प्रभाताई कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली उषा उदगांवकर, शीतल प्रताप, उज्ज्वला परांजपे, वंदना दांडेकर या संचालिकांद्वारे ही संस्था चालवण्यास सुरुवात केली; परंतु मी स्वत:ला ‘संपदा ग्रामीण महिला संस्थे’ची म्हणून बघू शकत नव्हते, कारण मी मुळी ग्रामीण महिला नव्हतेच. म्हणून या नावातील शब्दांची पहिली अक्षरे ‘सं’, ‘ग्रा’, ‘म’ घेतली व त्याचे ‘संग्राम’ झाले आणि अशा प्रकारे ‘संग्राम’चा जन्म झाला.

पण मला संस्था सुरू करायची होती, ते तरी कशासाठी? मिरज मिशन हॉस्पिटलमध्ये एका बाईचे सिझरीन करताना एच.आय.व्ही. बाधित रक्त दिले गेले. साहजिकच या घटनेने प्रचंड खळबळ माजली. त्या काळात मी ‘द इंडियन एक्स्प्रेस’मध्ये काम करत होते. या घटनेवर मी लिखाण केले. वाईट बाब अशी की, पुढे या विषाणूची लागण तिचा नवरा व माझ्या माहितीप्रमाणे मुलांनाही झाली. त्यामुळे त्या बाईचे आयुष्य अक्षरश: उद्ध्वस्त झाले. जेव्हा ही घटना उघडकीस आली तेव्हा मुंबईतील डॉक्टर सांगलीकडे धावले. ही घटना शहरातून ग्रामीण भागाकडे ‘विषाणूचा प्रसार कसा होऊ शकतो’ हे स्पष्ट करत होती. या घटनेने मला प्रेरित केले आणि सांगली व मिरजेत या समस्येवर काम करायचे मी ठरवले. तेव्हापासून आतापर्यंत मी हे काम करते आहे.

माझे त्याआधीचे शिक्षण विज्ञानशाखेचे- (बी.एस्सी.- लाइफ सायन्स). एच.आय.व्ही.च्या विषाणूच्या शास्त्रामध्ये मला रस वाटू लागला. नुसते लिहून भागणार नाही तर त्यासाठी काही तरी केले पाहिजे याची जाणीव माझ्या समाजकार्यातल्या शिक्षणातून येत होती. या आजाराची तेव्हा सुरुवात झाली होती. वैद्यकशास्त्राचे, समाजाचे लक्ष त्यावर केंद्रित झाले होते. अशा तऱ्हेने आम्ही शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या वस्तीत त्यांच्या प्रश्नांवर काम करू लागलो. मला आठवते, याच वेळी मी माझी मत्रीण वंदना दांडेकरच्या घरी जाऊन ‘आपण काही तरी करायला हवे’ अशी सतत चर्चा करत होते. १९९१-९२ च्या दरम्यान एकदा अचानक जाणवले की, वाटप होणाऱ्या निरोधचे प्रमाण आधीपेक्षा खूप कमी झालेय. मी या स्त्रियांना निरोध वापराचे प्रमाण कमी झाल्याचे कारण विचारले तर त्यांनी सांगितले, ‘‘फेब्रुवारीमध्ये १० वी, १२ वीच्या परीक्षा चालू झाल्याने हे प्रमाण कमी झालं आहे.’’ याचाच अर्थ असा की, पौगंडावस्थेतील मुले, तरुण या स्त्रियांकडे मोठय़ा संख्येने येत होते.

यावर काम करणे एकटीला अशक्य होते. यासाठी एक गट तयार करणे गरजेचे होते. ‘वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया’ हा विषय तर आमच्यासाठी अगदीच नवीन होताच, पण या आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन मी थोडे मनाविरुद्धच, पण परदेशी फंडिंग घेण्याचा निर्णय घेतला व कामाला सुरुवात केली. एच.आय.व्ही. हा काही फक्त या वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांचाच प्रश्न नव्हे; पण समाजाचा आणि शास्त्रज्ञांचाही रोख त्यांच्यावरच होता आणि या स्त्रियांच्या साहाय्याचा नव्हता, तर साथीचे कारण म्हणून त्यांना दोषी ठरवणारा होता. हा प्रकल्प स्त्रीकेंद्रित असल्याने आम्ही या स्त्रियांबरोबर काम सुरू केले.

मात्र ‘चळवळ’ केल्याशिवाय बदल होत नाहीत. चळवळीसाठी त्यातले लोक जेव्हा त्या स्वत:च्या समस्या आहेत असे समजून त्या सोडवण्यासाठी जबाबदारी घेतात तेव्हाच ती यशस्वी होते. याच विचारातून या स्त्रियांना सक्रिय करायचे मॉडेल मी आणले. यात वस्तीतल्या स्त्रियांनी स्वत: निर्णय घेणे, आराखडा तयार करणे आणि याबरोबर स्वत:चा विचार करून स्वत:ला सक्षम करणे सुरू झाले.

समाजाच्या मुख्य प्रवाहातून हे बाजूला पडलेले लोक होते. म्हणूनच पहिल्यांदा आम्ही निरोध घेऊन त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांना सांगितले, ‘‘हा रबराचा तुकडा तुमचे आयुष्य वाचवू शकतो, आम्हाला तुमच्याशी बोलायचेय.’’ या स्पष्टपणे बोलण्याची मदतच झाली. आमचे फक्त एवढेच म्हणणे होते की, या बायकांनी ‘निरोध’ वापरून सुरक्षित राहावे आणि सरकारची इच्छा आम्ही या बायकांसाठी काम करावे अशीच होती; पण त्यामागचा हेतू त्या बायांच्या भल्याचा होता असे मात्र वाटत नव्हते. या बायकांकडे येणारे पुरुष हे ‘पूल’ म्हणून संबोधले जायचे. त्यांना सुरक्षित ठेवले तर सामान्य लोक सुरक्षित राहतील, अशी धारणा होती. मी त्यांना ‘शरीरविक्रय करणाऱ्या’ न म्हणता ‘समाज’ म्हणते. त्यामुळे त्यांच्याशी माझा संवाद होतो. ही माणसे सारखी फिरत असतात. एकमेकांना माहिती देणे-घेणे खूप वेगाने होत राहते. मग त्या पद्धतीवर विश्वास ठेवून संपूर्ण माहिती पसरवली तर तीही वेगानेच पसरणार हे लक्षात आले. ही संवादाची पद्धती त्यांची स्वत:ची आहे, म्हणून माझा त्यावर विश्वास आहे. सगळ्यात पहिला प्रश्न काय यायचा? तर ग्राहक निरोध वापरायला नकार देतो. का नकार देतो? तर त्याला समाधान मिळत नाही. ‘केल्यासारखं वाटत नाही’. त्यावर मी ‘केल्यासारखं वाटत नाही’ या नावाचा प्रबंधच एका आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर केला होता. मग आता या नकाराला करायचे काय? तर त्याला सांगायचे की, हे वापरल्याने तुझी बायकामुलेही सुरक्षित राहतील. त्याला माहिती द्यायची, बायकापोरांचा मुद्दा मांडायचा. मग, ‘आपण सुरक्षित आणि बायकापोरे सुरक्षित’ ठेवायचा हा उपाय आहे म्हटल्यावर तो लगेच तयार होतो. मी हे काम करायचे जेव्हा ठरवले तेव्हा माझ्यासमोर खूप अडचणी होत्या. पहिली- भाषा! मला मराठी यायचं नाही. सुरुवातीला माझ्यासोबत मुंबईचे विजय ठाकूर होते. त्यांना ‘समाजा’त काम करण्याचा खूप अनुभव होता. मी भाषा येत नसल्याच्या कमतरतेचाच सकारात्मक उपयोग करून घेत असे, ते पाहून ते म्हणाले, ‘तू तुझं काम चालू करच. बस्स!’

मी टाटा इन्स्टिटय़ूटमधून शिकलेली, मुख्य प्रवाहातली, इंग्रजी बोलणारी बाई – म्हणजे माझी आणि या स्त्रियांची गाठ घालून देणेच आधी अवघड. नगरपालिकेचे अधिकारी तयार नसायचेच; पण मग माहिती द्यायचे काम महत्त्वाचे आहे, हे सांगितल्यावर तयार व्हायचे. यातून हे अधिकारी यायचे तेव्हा या बायकांना वाटायचं की ते मते मागायला आलेत; पण मी परत परत येते, काही तरी बोलू पाहाते, हे पाहून मग त्यांनाही शेवटी माझ्याविषयी विश्वास वाटू लागला.

त्यांच्याशी संवाद साधायला सुरुवात केली. सातत्यानं तिथे जाणे, बायकांशी बोलणे, परत परत निरोधविषयी सांगणे. तेच शब्द, तीच पद्धत, तीच भाषा परत परत म्हणजे शब्द आणि तोच (निरोध), हेच संवादाचे माध्यम होते. तिथे जाणे नि निरोध उघडून दाखवणे अजिबात सोपे नाही. ‘समाजा’ला निरोध वापरण्याचा आग्रह करताना त्यांचे स्वत:चे आरोग्य सुरक्षित राहते याची जाणीव होऊ लागली. त्यांना समजावून दिले की, ही माहिती तुमच्यापुरती मर्यादित न ठेवता इतर लोकांनाही द्या. मी सगळ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्याचा परिणाम म्हणजे व्हॅम्प (वेश्या अन्यायमुक्ती परिषद) संघटनेची बांधणी. ही संघटना महाराष्ट्र व कर्नाटकातील साधारणपणे हा व्यवसाय करणाऱ्या ५५०० स्त्रियांमध्ये एचआयव्ही एड्स प्रतिबंध, आधार व आरोग्य हक्काचे काम अविरतपणे आजदेखील करीत आहेत. तो सारा अनुभव पुढच्या (१६ डिसेंबर) लेखात.

‘‘माझे शिक्षण विज्ञानशाखेचे- (बी.एस्सी.- लाइफ सायन्स). एच.आय.व्ही.च्या विषाणूच्या शास्त्रामध्ये मला रस वाटू लागला. नुसते लिहून भागणार नाही तर त्यासाठी काही तरी केले पाहिजे, याची जाणीव माझ्या समाजकार्यातल्या शिक्षणातून येत होती. या आजाराची तेव्हा नुकतीच सुरुवात झाली होती आणि त्यासाठी वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना प्रामुख्याने जबाबदार धरले जाऊ लागले होते. साहजिकच तेथूनच त्यांच्या प्रश्नांवर काम करायला सुरुवात झाली.’’  वेश्या व्यवसायातील स्त्रियांसाठी काम करताना आलेले अनुभव सांगताहेत सामाजिक कार्यकर्त्यां मीना सेषू. त्यांचे चार लेख सलग चार शनिवारी.

मीना सरस्वती सेषू

meenaseshu@gmail.com