ब्राझीलचे प्रख्यात लेखक पावलो फ्रेर यांनी Pedagogy Of The Oppressed या पुस्तकात ‘शांततेची संस्कृती’ (कल्चर ऑफ सायलेन्स) या मुद्दय़ावर नेमके बोट ठेवले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, अशी स्थिती म्हणजे, दबलेल्या वर्गाचा आवाज राज्यकर्त्यांपर्यंत न पोहोचणे. शाळा, प्रसारमाध्यमे व अन्य संस्थांवर नियंत्रण ठेवणारा हा ‘प्रतिष्ठित’ समाज कोणी काय बोलावे आणि काय पाहावे या निर्णयावर नियंत्रण ठेवतो. हा समाज वपर्यंत आवाज पोहोचू देत नाही. खऱ्या जीवनात अत्याचाराविरुद्ध प्रतिकार करून लढा देणाऱ्या भंवरीदेवी या मागासवर्गीय स्त्रीवरील अत्याचाराविरुद्धच्या लढय़ाची माहिती बहुसंख्यांना का नसते? तिच्यावर झालेल्या अत्याचाराची घटना मागे टाकून दूरचित्रवाणीवरील मालिकेतील तुलसी हे पात्र मात्र घराघरांत माहिती असते. अशा स्थितीत समाजातील तळागाळापर्यंत वस्तुस्थितीची जाणीव करून देणे आणि त्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून देणे हीच स्थिती बदलण्याचा एकमेव मार्ग असतो. १९९९ मध्ये जागतिक बँकेने दिवसाला एक डॉलरपेक्षाही कमी उत्पन्न असलेल्या साठ हजार लोकांना प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा कोणता आहे? असा प्रश्न केला होता. या सर्व लोकांच्या उत्तरात अन्न, निवारा किंवा आरोग्य हे मुद्दे नव्हतेच मुळी, तर बोलण्याचा हक्क नसणे हा मुद्दा होता. हा बोलण्याचा हक्क मिळवून देण्याचे काम ‘संग्राम’ करते.

हक्काचा लढा

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांच्या विविध समस्यांवर ‘संग्राम’ आणि ‘व्हॅम्प’ (वेश्या अन्याय मुक्ती परिषद) काम सुरू केल्यावर २००२ मध्ये, कर्नाटकातील निपाणी येथे सर्कल इन्स्पेक्टरने राजकीय दबावातून ‘व्हॅम्प’ची कार्यकर्ती शबानाला एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या पत्रकारासमोर अश्लील शब्दात संबोधिले. तिचा एफआयआर नोंदविण्याकरिता ती नागरिकच नाही, असे वक्तव्य केले. २००५ मध्ये अमेरिकेतील एका नागरिकाने सांगली व मिरज पोलिसांबरोबर सुटकेच्या नावाखाली गल्लीमध्ये धाड टाकून वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांनाच गुन्हेगार ठरवले. इतकेच नाही तर ‘संग्राम’ संस्थेवर घणाघाती आरोप केले. आजदेखील या धाडीची आठवण आली की अनेकींच्या मनात दहशत आणि अमानुष वागणुकीची भयप्रद आठवण जागी होते. २०१२ मध्ये सातारा येथे एका पोलीस अधिकाऱ्याने ‘व्हॅम्प’च्या कार्यकर्तीला ती आई होण्यास लायक नसल्याचे जाहीरपणे वक्तव्य केले. तिला पोलिसांच्या मारहाण, दबाव आणि भेदभावाला, अन्यायकारक पद्धतीला तोंड द्यावे लागले. वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया माणूसच आहेत, त्या देशाच्या नागरिकच आहेत, हे प्रस्थापित करण्यासाठी ‘संग्राम’ला अशा अनेक पातळ्यांवर मोठा लढा द्यावा लागला.

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, तृतीयपंथीय यांच्या हक्कांचा लढा भारतात १९९० मध्ये सुरू झाला. त्यांच्याबाबतचे गरसमज दूर करण्याची नितांत गरज आजही आहे. वेश्या व्यवसाय म्हणजे पिळवणूक, असेच आत्तापर्यंत मानले जात होते. वेश्या व्यवसाय म्हणजे लिंगभेदाचा सर्वात घृणास्पद प्रकार असल्याचे मतही महिला हक्क चळवळीतून व्यक्त केले जात होते. मानवी हक्क चळवळीच्या मते हा प्रकार म्हणजे दंडुकेशाही, हिंसाचार आणि लैंगिक पिळवणूक होती; पण ‘एचआयव्ही/एड्स’च्या आक्रमणानंतर या समजुतीत बदल झाला. १९९७ नंतर वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांच्या चळवळीकडे लोकांचे लक्ष जायला लागले. ‘एचआयव्ही’च्या प्रसारासाठी वेश्या व्यवसाय करणारे जबाबदार नसल्याचे या चळवळीतून समजले. काळजी घेतली, तर ‘एचआयव्ही’चा प्रसार रोखता येतो, हेही समजले. २०१३ मध्ये भारत सरकारच्या म्हणण्यानुसार वेश्या व्यवसाय करणाऱ्या समाजाच्या सहभागामुळेच प्रचलित समाजामध्ये ‘एचआयव्ही’चा प्रसार यशस्वीपणे रोखता आला आहे.

यासाठी वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांकडे फक्त बळी म्हणून पाहण्यापेक्षा माणूस, नागरिक अशा दृष्टिकोनातून पाहावे लागेल. चळवळीच्या निमित्ताने प्रथमच त्यांच्या हक्काच्या मागण्यांकडे लक्ष गेले आहे. कोणत्या हक्कांची ते मागणी करत आहेत? समाजात सन्मानाने राहता यावे, शिक्षण मिळावे; पाणी, निवारा आणि आरोग्य असे अधिकार ते मागत आहेत. हिंसाचारमुक्त वातावरण असावे आणि मतदानासारखे नागरी हक्क असावेत, अशा साध्या मागण्या आहेत त्यांच्या, पण मानवी हक्कांचा विचार करता, आजही त्या दुय्यम स्थानी आहेत.

प्रचलित समाजातील स्त्रियांना पुरुषी वर्चस्वाला सतत तोंड द्यावे लागते. पुरुषी दडपशाहीचे जे उघड व हिंसक स्वरूप आहे, ते या व्यवसायातील स्त्रियांच्याही वाटय़ाला गुंडगिरी, दडपशाही, अत्याचार, बलात्कार अशा भयंकर स्वरूपात अधिकांशाने येते. प्रचलित समाजाबाहेर राहण्याची किंमत त्यांना अत्यंत टोकाच्या अत्याचाराला सामोरे जाऊन द्यावी लागते. त्यांना या अत्याचारातून सोडवण्यासाठी तसेच त्यांचे जीवन सुरक्षित ठेवण्यासाठीच ‘व्हॅम्प’ संघटनेची उभारणी केली गेली. ‘व्हॅम्प’ ही संघटना बळकट होऊन केवळ रूपाच्या जोरावर नव्हे तर विचार आणि कृतीच्या जोरावर तिने पुरुषप्रधान संस्कृती, जातिव्यवस्था यांनाच नकळत का होईना आव्हान निर्माण केले आहे. हे आव्हान केवळ पुरुषी मोजमापातलेच नाही, तर स्त्रियांच्या हक्काच्या जाणिवेतून उभे राहिलेले आहे.

वेश्या व्यवसाय करणे हा समाजाच्या दृष्टीने नेहमीच गंभीर गुन्हा ठरला आहे. त्यामुळे वेश्या व्यवसायातील स्त्रियांना दडपणे किंवा जास्तीत जास्त सुधारणे हाच आतापर्यंतचा समाजाचा दृष्टिकोन राहिला आहे व त्यांची सुटका करून पुनर्वसन करणे हीच योग्य कारवाई आहे, असे समजून पोलीस व राज्यकत्रे ती कारवाई वारंवार अमलात आणतात. वेश्या अन्याय मुक्ती परिषद (व्हॅम्प) या संघटनेची मते मात्र यापेक्षा वेगळी आहेत आणि तीही त्यांच्याबरोबर इतकी वर्षे काम केल्यानंतर तयार झाली आहेत. ‘वेश्या व्यवसाय हेच आमचं काम आहे’ हे आता या व्यवसायातल्या स्त्रियांनी स्वीकारले आहे. शतकानुशतके चालू असलेल्या या व्यवसायातील स्त्रियांनी स्वत:ची अशी वेगळी कुटुंबव्यवस्था निर्माण केली आहे. एवढेच नव्हे तर स्वत:चे वेगळे अर्थशास्त्र कुटुंबप्रमुख म्हणून निर्माण केले आहे. किरण देशमुख म्हणतात की, ‘‘आम्ही स्वत:च कुटुंबप्रमुख आहोत. आमचे कुटुंब, मुलाबाळांचे शिक्षण, आरोग्य यासाठी कुटुंबप्रमुख म्हणून आम्ही जबाबदारी सांभाळतो. वेश्या व्यवसाय हे आमचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. वेश्या व्यवसाय हेच आमचं काम आहे.’’

आज वेश्या व्यवसाय हा जरी जगण्याचा मार्ग असला तरी त्यात गरीब वर्गातील लोकच प्रामुख्याने भरती होत आहेत व त्यातून पुन्हा हा वर्गच भरडला जात आहे. म्हणूनच देह व्यापार व वेश्या व्यवसाय यात फरक करणे आवश्यक आहे. कारण हा व्यापार ही गुन्हेगारी असून वेश्या व्यवसायातील स्त्रिया केवळ या व्यापारातील प्यादी आहेत. मुख्य प्रवाहातील संशोधक व अभ्यासकसुद्धा या दोन गोष्टी एकमेकांपासून अलग करून पाहूच शकत नाहीत. कारण या गोष्टींचे आकलन होणे खरेच अवघड आहे. त्यामुळे या स्त्रियांना ‘बळी’, शोषित, पीडित समजणे एवढय़ावरच विश्लेषकांचे लक्ष केंद्रित होते.

प्रचलित स्त्री-पुरुष संबंधांना आव्हान देणारे त्यांचे ‘वेगळेपण’ या विश्लेषणात येतच नाही; पण जेव्हा या स्त्रियांमध्ये इतकी वर्षे आम्ही काम केले तेव्हा त्यांच्यावर होणारा अन्याय व शोषण दिसत असूनही या वेगळेपणाची व त्यातील ताकदीची जाणीव आम्हाला सातत्याने होत गेली. त्यातूनच या प्रश्नाचे विश्लेषण करण्याची एक नवीन पद्धती आमच्या हाती लागली. हे प्रकर्षांने एच.आय.व्ही. प्रतिबंधाच्या कामामध्ये स्पष्ट दिसू लागले. वेश्या व्यवसाय करणारी स्त्री निरोध वापरून स्वत:चे संरक्षण तर करतच होती, आजारी पडली तर डॉक्टरकडे जाऊन औषध उपचार घेण्याचे मानसिक व आíथक बळ तिच्या हातात आहे. वेश्या व्यवसायात असलेल्या या नवीन कुटुंबव्यवस्थेचा जसजसा आम्ही अभ्यास करत गेलो तेव्हा अनेक गोष्टी लक्षात येऊ लागल्या. संगीता मनोजी म्हणतात की, ‘‘आमची कूस आमची पोरं! आम्हीच आमच्या पोरांचे जतन करतो. आमच्या पोरांवर कुठल्याही पुरुषाचा हक्क नाही.’’ तसेच मिरजेच्या भारती म्हणतात, ‘‘आमच्याकडे येणाऱ्या काही पुरुषांना आम्ही मालक (नवऱ्यासारखे) समजतो. मात्र आम्ही त्यांना परवानगी दिली तरच ते आमच्या घरात येऊ शकतात.’’ स्त्री-पुरुष संबंधांमध्ये या स्त्रिया वर्ग/ धर्म/ जात यापलीकडे पोहोचलेल्या व मुक्त आहेत हेही आम्हाला जाणवत गेले. त्याचा अधिक शोध घेऊन ते स्वच्छपणे सर्वापुढे येणे आम्हाला गरजेचे वाटते.

खरं म्हणजे हे वेगळेपण समजण्यासाठी आम्ही काही फार प्रयत्न केले असे नाही, पण ते वेगळेपणच इतके ताकदीचे आणि लक्षवेधी होते की टाळताच येऊ नये.

मीना सरस्वती सेषू

meenaseshu@gmail.com