माझा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात एका साधनविहीन भटक्या कुटुंबात झाला. स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळात लहान असलो तरी समजण्या-आठवण्याचे वय होते. त्या वेळी आमचा मुक्काम गुलबर्गा जिल्ह्य़ातील तडोळा या गावी होता. निजामांचे राज्य आणि ब्रिटिश अमलाखालील मुंबई प्रांताच्या सीमेवरचे हे गाव. गावात सभा, बैठका व्हायच्या. तिरंगा घेऊन प्रभातफेऱ्या व मिरवणुका निघायच्या. गांधीवादी व आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी गावातल्या मुलांना गोळा करून जमेल तिथे बाराखडय़ा व उजळणी शिकवायला सुरुवात केलेली. या गावातही गावच्या कडेला असलेल्या चिंचेच्या झाडाखाली शाळा सुरू झाली. मलाही शाळेत नेऊन बसवण्यात आले. लहानमोठे सारे एकाच वर्गात. गावातल्या मुली मात्र या शाळेचा भाग नव्हत्या. सुरू झाली म्हणता म्हणता झाडाखालच्या शाळेचे वर्ष संपले. बाराखडय़ा, जोडशब्द, उजळणी, बेरीज-वजाबाकी इत्यादी मास्तरांना जेवढे येत होते तेवढे त्यांनी शिकवले. शाळा बंद पडली तसे आमचे शिक्षणही बंद पडले. पुढील शिक्षणासाठी गावात दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. भिक्षुकीसाठी वडील आणि चुलत्यांच्या ताफ्याबरोबर माझेही गावोगाव फिरणे सुरू झाले. शाळेत जाणाऱ्या गणवेशातल्या आठ-दहा वर्षांच्या मुली पाहिल्या की, अक्षरे काढण्यासाठी माझ्या पाटी-पेन्सिलचा हट्ट धरल्याबद्दल आईकडून बेदम मार खाणारी माझी बहीण मला आठवायची. इच्छा व समर्थता असूनसुद्धा ती शिकू शकली नाही याची खंत मनात कायम राहिली. भटकंतीच्या काळात काही देवमाणसे भेटली. माझी शाळा पुन्हा सुरू झाली, परंतु आईबापापासून दूर राहून. दोन राज्यांतल्या आठ शाळा, तीन महाविद्यालयांतून शिक्षण घेतल्यावर शेवटी धारवाड विद्यापीठाचा पदवीधर झालो; पण ही वाटचाल फार खडतर ठरली. अपमान, अवहेलना, तुच्छता, भूक, आळ इत्यादी संकटांना नेहमीच सामोरे जावे लागले. काही चांगली माणसे, चांगले मित्र मिळाले म्हणून या संकटांवर मला मात करता आली. शिक्षणासाठी असलेल्या शासकीय सोयी-सवलतीचा लाभ मला मिळू शकला नाही. त्यासाठीच्या नियमांना अनुसरून आवश्यक ओळखपत्र सादर करणे आवाक्याबाहेरचे होते. कष्ट करूनच जगावे व शिकावे लागले.

ज्यांचे गावात घर नाही, रानात शेत नाही, स्थिर व प्रतिष्ठित व्यवसाय नाही; जे घातक व्यसनांचे व अंधश्रद्धांचे बळी आहेत अशांची मुले-मुली कशी शिकणार? परंपरागत व्यवसाय आणि वाईट चालीरीतींचा आग्रह धरणाऱ्या जातपंचायतीचा प्रभाव असलेल्यांना शिक्षणाचे महत्त्व कोण पटवणार? अस्थिर भटक्या जमातींच्या मुला-मुलींना सहजपणे कसे शिकता व जगता येईल, हा विचार मला नेहमीच बेचैन करीत राहिला.

पुढे शिक्षण व लोकसंपर्कामुळे माझ्या जाणिवा व्यापक होत गेल्या. काही जण विकासप्रक्रियेला रेल्वे गाडीची उपमा देतात. गाडी धावत असली तरी मागचा डबा मागेच राहतो असे म्हणतात. इथे तर अस्थिर व पोरक्या भटक्या जमातींचा डबाच गाडीला जोडलेला नाही. अशा भटक्या विमुक्त जमातींचा समुदायच इतरांपेक्षा जास्त दुर्लक्षित व जास्त मागास. त्यांच्या स्त्रिया दुप्पट मागास. त्यांच्या लाखो मुली केवळ शिक्षणापासूनच नव्हे तर माणुसकीपासूनही वंचित व पीडित राहिल्याची खंत विद्यार्थिदशेपासूनच मनात राहिली होती. ही बेचैनी व खंत घेऊनच १९६४ ला नशीब अजमावयाला मी मुंबई गाठली. सुरुवातीला पाच-सहा महिने दादर प्लॅटफॉर्मवर किंवा फुटपाथवर राहावे लागले. एक दिवसही बेकार राहिलो नाही. स्टेशनवर हमालीपासून ते रोजंदारीवर मिळतील ती कष्टाची कामे केली. रोजंदारीची तीन रुपये मजुरी होती. त्या वेळी ६० पैशाला ‘राइस प्लेट’ मिळायची. रोज तीन वेळा जेवलो तरी पैसे वाचायचे. त्यामुळे उपजीविकेचा प्रश्न उद्भवला नाही. २ ऑगस्ट १९६५ रोजी मला मुंबईत सरकारी नोकरी लागली. त्यामुळे आर्थिक सुरक्षितता व वैचारिक स्थिरता मिळाली. स्वत: विकत घेतलेल्या वर्तमानपत्रात व रेडिओवर बातम्या वाचायला व ऐकायला मिळू लागल्या. त्या वेळी मुंबईत दलित पँथरची चळवळ बहरत होती. बातम्या वाचता वाचता त्यांच्या सभांना जाऊ लागलो. नामदेव ढसाळ, राजा ढाले, शृंगारपुरे यांची भाषणे मनाचा ठाव घेऊ  लागली. मी सोसलेले-भोगलेलेच ते बोलत आहेत असे वाटायचे. डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुलेंच्या विधानांचा व विचारांचा उल्लेख त्यांच्या भाषणातून व्हायचा. त्यामुळे त्यांच्याबद्दलचे आकर्षण वाढले. वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी, परीक्षेच्या अभ्यासक्रमापलीकडचे वाचायला सुरुवात केली ते डॉ. बाबासाहेबांच्या आणि महात्मा फुलेंच्या साहित्यापासून. प्रश्नाळू व चिकित्सक वृत्ती वाढीस लागली. सर्व काही सहन करण्याची सवय लावून घेतलेले मुर्दाड मन जागे होत गेले. मानसिक गुलामगिरी लोकांच्या मनात किती खोल ठासून भरली आहे ते कळू लागले. कर्मविपाकाचा सिद्धांत नव्याने कळला. दु:ख, दैन्य, रोगराई हे सारे नशिबाचा भाग आहे म्हणून नवस-सायास करीत, कुढत-कुजत जगणाऱ्यांचा अनुभव घरातल्यापासूनच होता. बहिणीच्या घरी जाताना मामा प्रेमाने आपल्या लहान भाचीला खाऊचा पुडा घेऊन जातो तसा प्रस्थापित समाज जागृतीचा व विकासाचा पुडा घेऊन वंचितांच्या दारात गेल्याचे विश्वाच्या इतिहासात उदाहरण सापडत नाही. संघर्ष केल्याशिवाय कोणालाच काही मिळालेले नाही हे मात्र स्पष्ट आहे. म्हणूनच दुर्लक्षितांनी, उपेक्षितांनी जागे व्हावे, ज्ञानी व्हावे, समस्येचे-दु:खाचे कारण समजून घ्यावे, एकत्र यावे, जबाबदारीची जाणीव ठेवून अधिकार, न्याय व सन्मान यासाठी लढावे, ही फुले-आंबेडकरांकडून अनेक तपशिलांसह मिळालेली शिकवण खूप भावली, भिडली.

एकीकडे हे मनन-चिंतन वाढत गेले. दुसरीकडे मुंबई परिसरातल्या भटक्या विमुक्तांच्या वस्त्यांचा व दुसरीकडे त्यांच्यासाठी असलेल्या शासकीय कल्याणकारी योजनांचा शोध व अभ्यास सुरू झाला. भटक्या विमुक्तांसाठी असलेल्या कल्याणकारी योजनांचा आढावा घेण्यासाठी नेमलेल्या सात आमदारांच्या संयुक्त समितीचा अहवाल मिळाला. ‘खर्च मोठा, लाभ मात्र छोटा’, ‘कल्याणकारी योजना काचेच्या कपाटातील शोभेच्या वस्तू ठरल्या आहेत.’ अशा काही शेलक्या वाक्यांनी योजनांच्या अंमलबजावणीची समितीने संभावना केलेली दिसली. बेचैनी आणखी वाढली. वास्तवाचा अनुभव, अभ्यास व सदरचा अहवाल आणि भविष्यातला अपेक्षित किमान कार्यक्रम या मुद्दय़ांवर मी एक दीर्घ लेख लिहिला, जो १० व ११ नोव्हेंबर १९७१ रोजी पूर्वार्ध व उत्तरार्ध अशा दोन भागांत ‘महाराष्ट्र टाइम्स’ या वर्तमानपत्रात छापून आला. हे माझे पहिलेच वृत्तपत्र लेखन. माझ्यासाठी महत्त्वाची व प्रोत्साहनपर गोष्ट म्हणजे माझ्या लेखावर गोविंदराव तळवलकरांनी अग्रलेख लिहिला. मी सुचविलेल्या जागृती व संघटन कार्याचे आणखी महत्त्व वाढवले. भटक्या विमुक्तांतून कमी, पण इतर समाजघटकांतून अनेक मान्यवर कर्त्यांधर्त्यांचा खूप प्रतिसाद, प्रेम व सहकार्य मिळाले. भटक्या जमातींपैकी असलेले, मुंबईचे नगरसेवक दौलतराव भोसले, निवृत्त सरकारी अधिकारी अ‍ॅड. बी. एस. गोक्राळ यांची पुढील कार्यात साथ मिळाली. या सर्व सहानुभूतीदारांच्या सहकार्यामुळेच ९ जानेवारी १९७२ रोजी मुंबईत कामगार क्रीडा मैदान, एल्फिन्स्टन रोड येथे तमाम भटक्या विमुक्त जमातींची राज्यव्यापी पहिली ऐतिहासिक परिषद घेऊ  शकलो. परिषदेस सुमारे पंचवीस हजार लोक उपस्थित होते. परिषदेत राज्यस्तरीय व्यापक संघटनेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्या वेळचे राज्याचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक, विधान परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब भारदे, समाज कल्याणमंत्री बाबूराव भारस्कर यांची उपस्थिती पुढील संघटन कार्यास मार्गदर्शक व साहाय्यभूत ठरली.  समाजात विषमता आहे, शोषण आहे; पण सर्वत्र तेच आहे असे नाही. क्रूरतेबरोबर मानवता आहे. तुच्छतेबरोबर प्रेम आहे. वाईटाबरोबर चांगुलपणा आहे. हे सारे मी माझ्या विद्यार्थिदशेपासून अनुभवले आहे. आता तर परिषदेच्या निमित्ताने अनेकांच्या चांगुलपणातून सामाजिक पराक्रमाचे दर्शन झाले. भटक्या विमुक्तांच्या दैनावस्थेबद्दलची बेचैनी, चीड कमी करण्यासाठी जिद्दीने व सचोटीने लढत राहिलो तर समाजातला चांगुलपणा जरूर साथ देईल असा आत्मविश्वास अनुभवातून मिळाला आणि त्याच वेळी लढत राहण्याचा निर्धार केला.

भटक्या विमुक्तांच्या इतर मागण्यांपैकी, भटक्या विमुक्तांना ‘हाऊसमध्ये’ प्रतिनिधित्व हवे, ही एक आमची मागणी होती. मुख्यमंत्री महोदयांनी मला विचारले, ‘‘तू काय करतोस?’’ मी म्हणालो, ‘‘शासकीय सेवेत आहे. नोकरी सोडायचा माझा विचार नाही.’’ ते म्हणाले, ‘‘नाव तरी सुचवा.’’ दौलतराव भोसले राजकारणात होतेच. समाजवादी परिवारात वाढलेले अभ्यासू होते. त्यांचे वक्तृत्वही छान होते; पण ते होते प्रजासमाजवादी या विरोधी पक्षाचे. म्हणून आम्हा कार्यकर्त्यांचा पहिला प्रयत्न सुरू झाला तो, दौलतरावांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करावा यासाठी. तीन-चार महिने गेले चर्चा करण्यात. त्यांनी इतर स्नेह्य़ांचेही सल्ले घेतले. शेवटी ते तयार झाले आणि जाहीररीत्या त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मग आमची शिष्टमंडळे भेटू लागली, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष बॅ. रजनी पटेल आणि महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष वसंतदादा पाटील यांना. ४ एप्रिल १९७३ रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेवर भटक्या विमुक्त जमातींचा पहिला ऐतिहासिक मोर्चा आम्ही काढला. मुख्यमंत्री महोदयांनी स्वत: मोर्चास सामोरे येऊन मोर्चाचे निवेदन स्वीकारले. हा पण भटक्यांच्या चळवळीत इतिहास घडला.

पुढील काही महिन्यांतच भटक्या विमुक्तांचे प्रतिनिधी या नात्याने, दौलतरावांची महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्यपदी राज्यपालांतर्फे नेमणूक झाल्याची घोषणा झाली. भटक्या विमुक्तांच्या संदर्भात महाराष्ट्रात हे असे पहिल्यांदा घडले आणि देशातसुद्धा. संघटनात्मक कार्यास आलेल्या या राजकीय यशामुळे आम्हा कार्यकर्त्यांत आनंद व उत्साह वाढला. आम्ही तो साजराही केला.

केंद्रीय भटके विमुक्त जाती जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष असणारे बाळकृष्ण सिद्राम रेणके हे सध्या भटक्या विमुक्तांच्या राष्ट्रीय संस्था, संघटनांचे व्यासपीठ असणाऱ्या ‘लोकधारा’चे अध्यक्ष आहेत. अत्यंत खडतर परिस्थितीत  शिक्षण घेऊन ते सरकारी नोकरीत रुजू झाले होते. दरम्यानच्या काळात त्यांनी भटक्या विमुक्तांसाठी कार्य सुरू केले होते. १९७३ मध्ये नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी भटके विमुक्तांच्या चळवळीत झोकून दिले. तेव्हापासून आजतागायत भटक्या विमुक्तांचे प्रश्न, त्यांची कारणे, त्यावर उपाय यासाठी त्यांचा लढा सुरूच आहे. ते एक प्रयोगशील शेतकरीदेखील असून त्यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारतर्फे ‘कृषिरत्न’ व सेंद्रीय शेतीचे शिल्पकार’ या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.

बाळकृष्ण रेणके

sdri1982@gmail.com

chaturang@expressindia.com