21 October 2018

News Flash

आयुष्याची समृद्ध समज

लहानपणी संघ काय सेवादल काय मी कुठेच फार काळ टिकलो नाही.

लहानपणी संघ काय सेवादल काय मी कुठेच फार काळ टिकलो नाही. त्या घडय़ा ठीक असतील पण मी त्यात फिट बसणारा प्राणी नव्हे इतकं ‘सेल्फ-रिअलायझेशन’ मला झालं. हृदयात करुणेचा अखंड स्रोत, डोक्यात व्यवस्थाबदलाशी बांधिलकी तर आसपास स्वतंत्र प्रज्ञेच्या मारेकऱ्यांनी रचलेली कोंडी अशी गोची. पुढे एकदा व्यावसायिक समाजकार्यकर्ता बनून या कोंडगळीतून निसटू देणारा स्कायवे मला मिळाला. कुठल्याच मंचाशी निष्ठा नसेल तर कोणी मला पुरस्कृत करणार नाही, उचलून धरणार नाही, झालेच तर खुल्लमखुल्ला नाहीतर अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न केला जाईल हे कळले. हल्लेखोरांच्या या आघाडीवर मात्र जबरदस्त स्त्रीपुरुष समानता दिसली. अर्थात राजकारणात असूनही प्रत्येक वेळी विनाशर्त मदतीला धावून येणारे डॉ. विनय सहस्रबुद्धेंसारखे सुसंस्कृत अपवाद होतेच.

माझी आयुष्यविषयक समज वाढविण्यात अनेक स्त्रिया कारणीभूत झाल्या. माझी पत्नी प्रीती ही त्यातली महत्त्वाची, पण तिच्याबाबत एरवीही मी लिहितो, बोलतो म्हणून इथे ते टाळतो. बहुतेकांप्रमाणे माझ्याही आयमुष्यावर माझ्या आईचा प्रभाव आहे. जेमतेम चार मराठी इयत्ता शिकलेल्या माझ्या आईने बौद्धिके वा शिबिरे न घेता माझ्यावर उदारमतवाद, धर्मनिरपेक्षता,  श्रमप्रतिष्ठा, लिंगाधिष्ठित भेदाभेद विरोध, शिक्षणाचे महत्त्व असले भक्कम संस्कार केले. तिने सतत सारे घरकाम करावे हे पाहून मला रडू येई व तेव्हापासून भांडी घासणे, लादी पुसणे, घर साफ ठेवणे, कपडे वाळत घालणे व सुकल्यावर घडय़ा करून ठेवणे, बाजूला उभे राहून बायकोला स्वयंपाकात सर्व प्रकारची मदत करणे हे सर्व मी अभिमानाने रोज न चुकता करतो.

अनेक वर्षे क्षेत्रीय कामासाठी झोपडपट्टय़ा, खेडी व दुर्गम आदिवासी पाडय़ावर मैलोन्मैल पायपीट केली. हजारो आदिवासी कुटुंबे वेठबिगारीतून सोडवली. मोडलेला माणूस व बेचिराख निसर्ग पुन्हा उभारण्यासाठी अनेक पथदर्शक क्षेत्रीय प्रकल्प चालवले. ग्रामीण कार्यातली माझी टीम ही बव्हंशी स्थानिक तरुणतरुणींची होती. गावबैठका, सभा, निषेध-मोर्चे, रास्ता रोको, उपोषणे व लौकिकार्थाने विधायक म्हटले जाणारे प्रकल्प. सर्वत्र ग्रामीण स्त्रिया आघाडीवर होत्या. यथावकाश शहरी कार्यकर्ते येऊन मिळाले, पण त्यातही मुली व तरुण स्त्रिया अग्रेसर होत्या. त्या साऱ्या स्त्रियांपुढे मी रोज नतमस्तक होत असतो.

मागास-शोषित आदिवासींच्या जगण्याला प्रतिष्ठा मिळावी यासाठी मी अनेक कामं केली. पूर्ववेठबिगार ठाकर-कातकऱ्यांच्या बालकांसाठी एक आश्रमशाळा उभारली.  सुप्रियाताईं सुळे यांनी ती शाळा पुढे स्वत:कडे घेतली. शाळेचा १०वीचा निकाल १०० टक्क्यांवर नेला. शाळा कबड्डीत राज्यभरात अजिंक्यपद टिकवून राहिली. ताईंचा लोकसंग्रह, वैचारिक परिपक्वता, सर्वसमावेशकता या गोष्टी मला लक्षवेधी वाटल्या. देशाच्या राजकारणाच्या दर्जाबाबतच्या आशा उंचावल्या.

काही ओळखदेख, शिफारस नसताना राष्ट्रीय महिला आयोगाच्या पूर्वाध्यक्षा डॉ. पूर्णिमा अडवाणी यांनी मला आयोगाचा तज्ज्ञ म्हणून नेमलं. देहबाजारातील स्त्रियांच्या शोषणाविरोधात आम्ही बरंच काम केलं. त्या वेळच्या आयोगाच्या सदस्या निर्मला सीतारामन (आजच्या संरक्षणमंत्री) यांनी व मी काही कामे एकत्रपणे केली. जमेल त्या व्यासपीठावरून सर्वाना सोबत घेऊन महिलांचे विषय पुढे रेटत राहिले पाहिजेत या विश्वासाने काम करणारी माझी जुनी मैत्रीण शिवसेना नेता डॉ. नीलम गोऱ्हे ही माझ्या कौतुकाचा विषय आहे. आमच्या कामाबाबत कायम आस्था ठेवून विनाअट मदत करणाऱ्या निर्मला सामंत-प्रभावळकर. प्राचीन काळापासून पुरुषी वर्चस्वाखालच्या राजकारणात या सर्व स्त्रियांनी स्वत:चं एक लक्षणीय स्थान निर्माण केलं हे पाहणं हा माझ्यासाठी एक उत्सव असतो.

मी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत २० वर्षे प्राध्यापकी व संशोधन केलं. व्यावसायिक समाजकार्याची जगभर दखल घेतली जावी, यासाठी मी खूप मेहनत व रिस्क (जोखीम) घेतली आहे. ट्रकने प्रवास, अरुंद वाईट रस्ते यापायी एक दिवस पाठ पूर्णपणे मोडली. वाटले प्रवास संपला. एक दिवस पुन्हा उठून चालण्याची अंधूक आशा उराशी बाळगत अनेक महिने निपचित पडून राहिलो. एक दिवस चालू लागलो तेव्हा लक्षात आलं की माझा प्रवास संपलेला नव्हता. रिक्षा, बस, सायकल, बाइकच्या प्रवासावर बंदी आल्याने प्रवास आश्रमशाळा चालविण्यापुरता मर्यादित केला व लक्ष शहरी कामाकडे केंद्रित केलं.

मानवी वाहतूकविरोधी कामात मला देहबाजारात विकल्या गेलेल्या व दिवसामागे बिनओळखीच्या दीड-दोन डझन गिऱ्हाईकांकडून बलात्कारित व्हावं लागणाऱ्या लाखो महिला व मुलींना भेटता आलं. माझ्या अस्तित्वावर त्या प्रत्येक गोष्टीची एक जखम होऊन कायम भळभळत राहिली आहे.  माझ्या पत्नीने व मी कामाठीपुऱ्याच्या देहबाजारातील स्त्रियांना घरवाल्या, दलाल, ट्रॅफिकर्स यांच्याकडून होणाऱ्या शोषणाच्या विरोधासाठी सक्षम बनवणे, त्यांच्या मुलामुलींना आयुष्य निवडण्याची संधी उपलब्ध करून देणे, ही कामे सुरू केली. या कामाची दखल घेण्यात बराच काळ शहरी स्त्रियांनी उत्सुकता दाखवली नव्हती. शारदा साठे, ज्योती म्हापसेकर, फरिदा लांबे, शशी मिश्रा आयएएस हे अपवाद.

जगभरच्या भूतदयावादी नेत्या अमृतानंदमयी देवींनी (अम्मा)  मला सांगितले – माझ्या मुला तू इथे येऊन अम्मांच्या युनिव्हर्सिटीत शिकव. त्यानंतर मी सहा वर्षे अमृता विश्वविद्यालयात व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून येऊनजाऊन शिकवलं. पूजाअर्चा, यज्ञविधी या कशातच न पडता अध्यात्म साधायला त्यांनी मला शिकवलं. या विषयावर माझी तळमळ लक्षात घेऊन अम्मांनी माझ्याशी चर्चा केली. धर्मगुरू पोप यांचे व्हॅटिकनला भेट द्यायचे टांगत राहिलेलं निमंत्रण अम्मांनी स्वीकारलं व जगातील सर्व धर्माच्या प्रमुखांना रोमला बोलावून ३ डिसेंबर २०१३ रोजी मानवी वाहतुकीविरोधात – व्हॅटिकन जाहीरनामा- प्रसृत केला. त्याचा मसुदा बनताना त्यात योगदान देण्याची संधी मला मिळाली.

फार धडपड न करतादेखील ट्रॅफिकिंगविषयक कामाने मला जगभर फिरवले.  एकपॅट या बालकांच्या बाजारू लैंगिक शोषणाविरोधात काम करणाऱ्या जागतिक चळवळीच्या जगभरच्या प्रतिनिधींनी आमसभेत माझी बिनविरोध त्यांच्या संचालक मंडळावर व नंतर उपाध्यक्ष म्हणून निवड केली. अनेक देशांत बालक-संरक्षणविषयक कायदे बनण्यासाठी मी फिरलो. २०१५ मध्ये अमेरिकेच्या पुढाकाराने चाललेल्या प्रतिष्ठित फुलब्राइट फेलोशिपसाठी माझी निवड झाली व त्यानुसार मी अमेरिकन विद्यापीठात एक वर्षभर शिकवले.

कामानिमित्ताने भेटलेल्या जगभरच्या स्त्रियांनी माझे आयुष्य व मानवी आयुष्याची समज बहुपरिमाणी व समृद्ध केली आहे.

डॉ. प्रवीण पाटकर

pppatkar@gmail.com

chaturang@expressindia.com

First Published on January 6, 2018 4:48 am

Web Title: articles in marathi on what is the role of men in women empowerment