12 July 2020

News Flash

वैद्यकीय कार्याकडून समाजसेवेकडे

मामांचा व्यवसाय बंद पडला. ते पुण्याजवळच दिवे घाटाच्यावर झेंडे वाडीत शेती करू लागले.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. बाबा आढाव

पाणवठा चळवळ केवळ पाण्यापाशी न थांबता राज्यातील भटके-विमुक्त, देवदासी, प्रकल्पग्रस्त अशा अनेक अंगांनी विस्तारत गेली.काही ठिकाणी शेतजमिनींचे लढे उभे राहिले. मी महाराष्ट्र आरोग्य मंडळाचा १९६६ मध्ये राजीनामा दिला, त्यानंतर मी समाजकार्यात वैद्यकीय कार्य सोडून पूर्णत: झोकून दिले.. आणि मग अनेक सामाजिक कार्ये सुरू झाली.

माझे आजोबा विठ्ठल सखराम झेंडे (आईचे वडील) पुणे नगर परिषदेचे सभासद होते. ते शाहू महाराजांचे निष्ठावान सहकारी होते आणि सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. श्री शिवाजी मराठा सोसायटीचे २० हजार रुपये देणगी देणारे ते पहिले देणगीदार होते. त्या काळी आजोबांचा अबकारी व्यवसाय होता. त्यांना दम्याचा विलक्षण त्रास होता. त्यांना सतत धाप लागलेली असे. ते बिछान्यावर पडून-बसून असत. त्यांना त्रास होऊ नये म्हणून दिवाणखान्याची दारे-खिडक्या बंद ठेवाव्या लागत. त्यामुळे घरातील वातावरण आजारी वाटे. आजोबांना सर्वजण भाऊ म्हणत. सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीच्या अनेक मंडळींचा घरी राबता होता.

माझे थोरले बंधू रामअण्णा माझ्यापेक्षा आठ वर्षांनी मोठे होते. १९४१ला ते मॅट्रिक झाले आणि सरकारी नोकरीत लागले. त्यांना नोकरी करणं भाग होतं. ते शिवाजी मराठा हायस्कूलमध्येच शिकले. ‘मराठा ब्रदरहूड’ या चळवळीत त्यांचा सहभाग होता. आम्ही त्यांना अण्णा म्हणत असू. संरक्षण खात्यात अण्णांची नोकरी होती. त्यांना सार्वजनिक कार्याची आवड होती. देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि फाळणीमुळे पंजाबात दंगली उसळल्या. निर्वासितांचे लोंढे रस्त्यावर आले. या निर्वासितांची सेवा करण्यासाठी अण्णा आळीतील मुलांचे पथक घेऊन पंजाबला गेले होते. मात्र तेथे काम करणे अशक्य झाल्याने त्यांना लवकरच परतावे लागले. अण्णा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आळीत नागरिक सहकारी भांडाराची स्थापना केली आणि ती नावारूपाला आणली. हम सब हिंदी है! असा त्यांचा बॅनर असे. संरक्षण खात्याने अण्णांची बदली औरंगाबाद, जालना, सागर, जबलपूर अशा अनेक ठिकाणी केली. त्यामुळे त्यांचा पुण्यातील जनसंपर्क कमी झाला. माझे मामा बापूसाहेब, त्यांना सर्वजण मामाच म्हणत असत. मामांची सासुरवाडी ठाणे जिल्ह्यतील, व्यवसाय जंगल कॉन्ट्रॅक्टरचा. ते वासिंदला राहात.

मामा वासिंद-पुणे ये-जा करीत. पुढे शासनाने जंगलांचे लिलाव बंद केले. मामांचा व्यवसाय बंद पडला. ते पुण्याजवळच दिवे घाटाच्यावर झेंडे वाडीत शेती करू लागले. मामांच्या शारीरिक ठेवणीत आणि आवाजात मोठी जरब होती. आळीतील मंडळी त्यांना वचकून असत. मात्र १९३८ पर्यंत त्यांना मूलबाळ नसल्याने मामा-मामींनी माझे भरपूर लाड केले. आईची आई आजी तिला आम्ही वाडीची आई म्हणत असू. तिचे लक्ष शेतीमध्ये. कुटुंबाच्या या एकूण कारभारी व्यवस्थेत आईच्या वाटय़ाला नकळत पुढारीपण आलेलं. मामांच्या घरात दुकानदार – भाडेकरू आईला मॅनेजरीणबाई म्हणत. गल्लीतील काही आयाबाया दिवाणसाहेब म्हणत. कुटुंबातील व्यवस्था पाहण्याची जबाबदारी आईच्या अंगावर अशा तऱ्हेने पडलेली. अकाली वाटय़ाला आलेलं वैधव्य. आम्ही पाच भावंडं, तिच्या दोन बहिणी. १९३८ मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले ते १९४५ पर्यंत चालले. १९४५ मध्ये घरात वीज आली. युद्धकाळात जोडणी मिळत नव्हती. तर अनेक वेळा ब्लॅक-आउट घोषित केला जाई.  कंदील, टेंभा यांच्या प्रकाशात आम्हाला अभ्यास करावा लागे. १९४२ पासून रेशनिंग सुरू झालेलं. त्या वेळी साखरेसाठी रांगा लागत. घरातील धान्याचा पुरवठा आजी झेंडेवाडीवरून करीत असे. लग्नसमारंभातील विविध कार्याची जबाबदारी मामांवर असे. आमचे कुटुंब मान्यवर मानले जाई. वडील गेल्यानंतर आईने माहेरी आल्याबरोबर सेवासदनमध्ये दुपारच्या शिवणकामाच्या वर्गात नाव नोंदवले. तो कोर्स पूर्ण केला. त्या काळी आईने सिंगर मशीन खरेदी केली. घरात शिवणकाम सुरू झाले. त्यात दोघी मावश्या अन् आमच्या तीन बाहिणी तरबेज झाल्या. आईचे वडील आमचे भाऊ लवकरच गेले. १९३२-३३ दरम्यान ते गेले असावेत. मुला-मुलींनी शिकलंच पाहिजे हा आईचा आग्रह. त्यामुळे दोन बहिणी फायनलपर्यंत तर शेवटच्या इंदिराने अध्यापकीचा कोर्स पूर्ण केला. बहुजन समाजात त्या वेळेला लग्न ठरवताना मुलाचं शिक्षण मॅट्रिकपर्यंत आणि मुलीचे शिक्षण फायनलपर्यंत, असं सांगितलं जायचं.

१९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. त्यासाठी झालेल्या चळवळीत पोलिसांचा बंदी हुकूम मोडून रात्री मशाल मिरवणूक काढली. आम्हाला अटक झाली आणि कोर्टापुढे शिक्षाही झाली. संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर समाजवादी चळवळीत विशेषत: सेवा दलात विचारमंथन सुरू झालं. ‘साधना’ आणि ‘जनवाणी’ या साप्ताहिकातून त्यावर चर्चा सुरू झाली. चळवळीच्या काळात कला पथकाची उभारणी झालेली. सेवा पथकेही सुरू झाली. तत्पूर्वी १९५० ला विनोबा भावे यांनी सुरू केलेल्या भूदान पदयात्रेत अनेकांनी भाग घेतला. अनेकांनी सहकारी चळवळीत विशेषत: शेती सहकारी चळवळीत झोकून दिलं. मुंबईसारखे शहर विशेषत: कापड गिरण्यांतून समाजवादी चळवळ नेटाने पुढे चालली. याच काळात महाराष्ट्राच्या नवनव्या निर्मितीच्या विचारांची देवघेव सुरू झाली. नवा महाराष्ट्र कसा घडणार? लोकशाही समाजवादाचे स्वप्न कसं साकार होणार? तुरुंग, फावडे आणि मतपेटी या तीन हत्यारांचा वापर होत होता. मतपेटीवर काँग्रेसचीच मक्तेदारी होती. तिला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने आळा घातला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे सरचिटणीस एसेम जोशी होते. १९५७ ला झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाचे ३५ आमदार निवडून आले होते. परंतु १९६० नंतर चित्र पालटले. निवडून आलेली अनेक मंडळी काँग्रेसमध्ये गेली. मतपेटीच्या मार्गातील ही वाटचाल जीवघेणी ठरली.

महाराष्ट्रातील शिक्षण, सहकार, आरोग्य, शेती या क्षेत्रांत अनेक संस्था उभ्या राहिल्या. आम्हाला वाटले वैद्यकीय क्षेत्रातही काही घडावे. हडपसरच्या दवाखान्याची प्रगती विलक्षण गतीने वाढली. महाराष्ट्र आरोग्य मंडळाची स्थापना १९६२ ला झाली. डॉ. सि. तु. गुजर, डॉ. गोपाळ शहा, डॉ. मरतड पाटील, डॉ. सिंधू केतकर असे आम्ही पाच जण आजीव सदस्य होतो. डॉ. सिंधू केतकर वगळता बाकीच्यांनी खासगी व्यवसाय सोडून सार्वजनिक सेवेचे व्रत स्वीकारले. धर्मादाय संस्था नव्हे तर समाजवादी संस्था, फी आकारली जाई परंतु ती संस्थेकडे जमा होई. डॉक्टरांना दरमहा आमदाराइतके मानधन मान्य झाले. महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे अध्यक्ष एसेम जोशी होते. मंडळाच्या वतीने हडपसरला साने गुरुजी रुग्णालय सुरू झाले. सुरुवातीला क्ष किरण विभाग, रक्त, लघवी, थुंकी, तपासणी, नेत्रचिकित्सा, सूतिकागृह – शल्यकर्म विभाग असे विभाग सुरू झाले. जनतेने मनापासून या उपक्रमांचे स्वागत केले. दाद दिली. क्ष किरण विभागाच्या उद्घाटनाला त्या वेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आले होते. महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या वतीने आजाराचे संशोधन सुरू झाले. आदिवासी भागात सिकलसेल अ‍ॅनेमियाचे संशोधन सुरू झाले. महाराष्ट्रातील मेडिकल जर्नलमध्ये पेपर प्रसिद्ध झाला.

अच्युतराव पटवर्धन, अण्णासाहेब सहस्रबुद्धे यांच्यासारख्या मंडळींनी या उपक्रमांचे मनापासून स्वागत केले. त्या काळात कॉटेज् हॉस्पिटल रुग्णालय चालवायचे की आलिशान इमारती उभारायच्या? असे काही प्रश्न उपस्थित झाले. परकीय मदत घ्यायची नाही. शासनाकडेही हात पसरायचा नाही, अशा व्रतस्थ भूमिकेमुळे फार कसोटीला उतरावे लागत होते. जे काही करायचे ते जनतेच्या सहकार्याने. शासनाची मदत, अनुदान नको ती जमीन उपलब्ध करून घेण्याइतपत हे मान्य होऊनही मंडळाने १२ गुंठे जमीन खरेदी केली. एक मोठी चाळ भाडय़ाने घेतली. वैद्यकीय क्षेत्रात लोकांना आधुनिकता हवी होती. तीही स्वस्तात! आमच्याकडे बैलगाडय़ांतून रुग्ण येत.

१९६१ -६२ ला पुण्यात पानशेतचा प्रलय झाला आणि १९६२ ला नानासाहेब परुळेकरांनी स्थापन केलेल्या नागरी संघटनेच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मला उभे राहावे लागले. मी निवडून आलो खरा, परंतु नाना पेठ ते हडपसर, पुणे महानगरपालिका  अशी विलक्षण ओढाताण सुरू झाली. १९६३ ते १९७१ हा काळ पुणे महानगरपालिकेचे सदस्य म्हणून काम पाहावे लागले. गुरुवर्य बा. ग. जगताप, एसेम जोशी, नानासाहेब गोरे, राज्याचे चीफ इंजिनीअर चाफेकर इत्यादींच्या बरोबर काम करता आले. नगरपालिकेच्या व्यासपीठावरून आम्ही अनेक विषयांची वाच्यता केली. झोपडपट्टी सुधारणा आणि निर्मूलन, आरोग्य, समान पाणी पुरवठा, नागरी आरोग्य, शिक्षण. पुढे याच काळात प्राथमिक शिक्षणाबरोबर माध्यमिक शिक्षणाची जबाबदारी महानगरपालिकेने घेतली. मनपाचे हायस्कूल सुरू झाले आणि याच काळात बालगंधर्व रंगमंदिर, सारसबाग अस्तित्वात आले. झोपडपट्टी सुधारणा आणि निर्मूलन प्रश्नाला अंदाजपत्रकात प्राधान्य न मिळाल्याने मी पुणे महानगरपालिकेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मध्यंतरीच्या काळात १९६७ आणि १९७१ अशा दोन वेळा खेड लोकसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवली. दोन्ही वेळा पराभव पत्करावा लागला. मी तो मार्ग सोडला.  १८७३ ला पुण्यात महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली, तसेच छत्रपती शाहू महाराज आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची जन्मशताब्दी लक्षात घेऊन ‘एक गाव एक पाणवठा’ ही चळवळ सुरू केली. त्याला जोडूनच विषमता निर्मूलन समितीची शिबिरे सुरू झाली. दलित पँथरच्या रूपाने दलित चळवळीने याच काळात पेट घेतलेला होता. युवक क्रांती दलाची सुरुवातही याच काळात झाली होती.

पाणवठा चळवळ केवळ पाण्यापाशी न थांबता राज्यातील भटके-विमुक्त, देवदासी, प्रकल्पग्रस्त अशा अनेक अंगांनी विस्तारत गेली. काही ठिकाणी शेतजमिनींचे लढे उभे राहिले. मी महाराष्ट्र आरोग्य मंडळाचा १९६६ मध्ये राजीनामा दिला. हे मध्येच सांगायचे राहून गेले. १९६६ नंतर मी समाजकार्यात वैद्यकीय कार्य सोडून पूर्णत: झोकून दिले. माझ्या या निर्णयाला शीलाने संमती दिली. आमचं लग्न झालं तेव्हा ती भुसावळला होती. रेल्वे परिचारिका म्हणून काम करीत होती. मात्र रेल्वे सोडून पुणे महानगरपालिकेच्या सेवेत तिने नोकरी सुरु केली. १९६६ ला आमचा विवाह झाला. माझा हा दुसरा विवाह. पहिला १९५६ ला झालेला. तो अवघ्या काही महिन्यांतच संपुष्टात आला. दुर्धर आजाराने पहिल्या पत्नीचे निधन झाले.

१९६२ ला महाराष्ट्र राज्य धरण आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेची स्थापना झाली. पानशेत धरण फुटले यामुळे पुनर्बाधणीच्या काळात बुडणाऱ्या शेतकऱ्यांनी जोरदार उठाव केला. ती चळवळ राज्यभर पसरली. परिषदेचे पहिले अध्यक्ष क्रॉमेड दत्ता देशमुख होते. राज्यातला पहिला पुनर्वसन कायदा १९७६ ला मंजूर झाला. परंतु त्यासाठी तीव्र संघर्ष करावा लागला. १९६५ ला लाभ क्षेत्रातील दौंड हवेली तालुक्यात मंत्री यांनी घेतलेल्या जमिनीत सत्याग्रह झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या पत्नी वेणूताई इत्यादींची नावे पुढे आली. १९६९ला जुन्नर तालुक्यातील कुकडी धरणाचा भूमिपूजन समारंभ प्रकल्पग्रस्तांनी उधळून लावला. आधी पुनर्वसन मगच धरण हा नारा बुलंद झाला. प्रकल्पग्रस्तांचे लढे आजही सुरू आहेत. एका मूलभूत प्रश्नाची मांडणी यानिमित्ताने झाली. जुन्या संपत्तीच्या जमिनीच्या फेरवाटपाचा प्रश्न बाजूला ठेवला गेला तरी सार्वजनिक खर्चाने नव्याने उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पांचा लाभ बुडणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना का मिळू नये? या प्रश्नाचे उत्तर लाभक्षेत्रात प्रकल्पग्रस्तांचे विकसनशील पुनवर्सन या उत्तराने मिळाले. कोल्हापूर, सांगली, बेळगाव या भागातील देवदासींचा प्रश्न असाच धसाला लागला. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांना दखल घ्यावी लागली. देवदासींना पेन्शन मिळू लागली.  देवदासींची मुलं-मुली शाळेत दाखल झाली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जट निर्मूलन मोहीम सुरू केली. संयुक्त महाराष्ट्राच्या सहा चळवळींत अग्रेसर असलेल्या हमाल माथाडींसाठी महाराष्ट्र शासनाने १९६९ ला महाराष्ट्र माथाडी, हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन आणि कल्याण) अधिनियम १९६९ हा कायदा मंजूर केला.

१९७२ च्या दुष्काळात रोजगार हमी कायदा मान्य झाला. राज्याचे धोरण कृषी, औद्योगिक विकासाचे होते. राज्यात अनेक सहकारी साखर कारखाने उघडलेले होते. ऊस तोडणीच्या टोळ्या दुष्काळी भागातून ऊस मळ्याकडे आणि साखर कारखान्यांकडे पंढरपूरच्या वारकऱ्यांप्रमाणे चालू लागल्या. इकडे महाराष्ट्र आरोग्य मंडळ, साने गुरुजी रुग्णालयाची वाढ झपाटय़ाने झाली. तेथे वैद्यकीय शिक्षण संस्था उभारली गेली. तेथे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय साकारलेले आहे. १९७५ च्या आणीबाणीत आम्हालाही जेल यात्रा घडली. २४ तासांत झोपडय़ा पाडणाऱ्या कारवाईला आम्ही विरोध केला.

१५ महिने आत होतो. येरवडा कारागृहात होतो. जेलमध्ये आमच्याबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक दिग्गज होते. १९७७ ला जेलमधून सुटका झाल्यानंतर मी ‘संघाची ढोंगबाजी’ आणि ‘संघापासून सावध’ या दोन पुस्तिका प्रकाशित केल्या. १९७७ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मी जनता दलाचा प्रचार केला. मात्र उमेदवारी स्वीकारली नाही आणि पक्षसदस्यत्वही स्वीकारले नाही. देवदासी, भटके-विमुक्त, हमाल, माथाडी आणि घरकाम करणाऱ्या भगिनी, धरण आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी, जागृत अपंग संघटना, पथारी व्यावसायिक, रिक्षाचालक, मोलकरणी, कागद – काच, पत्रा वेचक कष्टकरी, बांधकाम मजूर, शेतकऱ्यांपासून शेतमजूर, आता शेतकरी आंदोलनापर्यंत प्रवास सुरू राहिला. या प्रवासात अनेक वेळा जेल-यात्रा घडली. पंढरीच्या वारकऱ्यांप्रमाणे यात खंड पडला नाही. शेवटची जेल यात्रा २०१० ला झाली, पोलीस अटक मात्र अधूनमधून सुरूच आहे.

आणीबाणीच्या काळात हमालांनी हमाल भवनाची निर्मिती केली. २ ऑक्टोबर १९७४ ला हमाल पंचायत कष्टाची भाकर सुरू झाली. १९७७ ला हमाल भवनाचे उद्घाटन जॉर्ज फर्नाडिस यांनी केले. पुढे पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनीही भेट दिली. कष्टाची भाकर, हमाल नगर, हमाल भवन, हमाल पतपेढी, कष्टकरी विद्यालय असे उपक्रम वाढत होते.

१९८० ला अनेक घडामोडी झाल्या. नाना-भवानी-गणेश-रविवार पेठेतील बाजार गुलटेकडी मार्केट यार्डात शिफ्ट झाला. हमालांच्या पाठीवरील पोतेही हलके झाले. याच काळात माथाडी हमाल कामगार कायद्याची वाटचाल गतीने सुरू झाली. हमाल-मापाडय़ांना बाजार समितीवर प्रतिनिधित्व मिळाले. महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाची स्थापना १९८० ला झाली..

rahul.nagavkar@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2018 1:02 am

Web Title: baba adhav story from doctor to social activist
Next Stories
1 चळवळींचे बाळकडू
2 जहाँ प्यार ही प्यार पले
3 ..अर्धे हात मुठी वळवतात तेव्हा
Just Now!
X