06 July 2020

News Flash

जहाँ प्यार ही प्यार पले

स्वातंत्र्य चळवळीत लाखोंच्या संख्येने स्त्रियांचा सहभाग वाढला आणि अशा शक्यता सर्वदूर दिसू लागल्या.

डॉ. भारत पाटणकर

परिवर्तनाच्या विचारांच्या वाहक होऊ शकणाऱ्या, तरुण स्त्री कार्यकर्त्यां या कष्टकरी-मजूर-कामगार स्त्रियांच्या वादळाला जन्म घालण्यासाठी झोकून देऊ शकतात. पूर्वी असे घडले आहे. आजही असे घडू शकते..

मुक्त मानवांच्या जगाचं स्वप्न हे या धरतीवर घट्ट पाय रोवूनच उभं असू शकतं. ‘जहाँ गम भी न हो, आँसू भी न हो, बस प्यारही प्यार पले’ असं स्वप्न अखंड मानव समाजाचं स्वप्न आहे. ते स्त्रियांसह आणि त्यांच्या मुक्त आविष्कारासहच असू शकतं. स्थिर शेतीचा शोध, त्यातून वरकड उत्पादनाची निर्मिती आणि ही निर्मिती होणाऱ्या क्षेत्राची संरक्षण व्यवस्था अशा नव्या व्यामिश्र समाजविकासात संघटित हिंसा करू शकणाऱ्या घटकाची निर्मिती झाली.

यातून पहिले शोषण, दडपणूक स्त्रियांचीच सुरू झाली. सर्व शोषणांचा अंत करणारी चळवळ होऊनही शोषितांना स्वत:शीच संघर्ष करण्याचा सर्वात कठीण प्रसंग स्त्रीमुक्तीच्या मार्गामध्येच आहे. हा संघर्ष पुरुषांनी आत्मटीका, आत्मपरीक्षण करून कधीच संपणार नाही. स्त्रियांनी कणखरपणे पुरुषांना मानुष बनवत नेणारा चिवट संघर्ष त्यासाठी अत्यावश्यक आहे. इतिहासात एके काळी स्त्रिया मुक्त होत्या. त्या पुन्हा एकदा मुक्त होऊ शकतातच. पण त्यासाठी नवी संस्कृती, नवी मूल्ये, नवे सामाजिक संबंध आणि नवे सामाजिक उत्पादन संबंध असे एक समग्र वास्तव निर्माण होत जायला पाहिजे. स्वातंत्र्य चळवळीत लाखोंच्या संख्येने स्त्रियांचा सहभाग वाढला आणि अशा शक्यता सर्वदूर दिसू लागल्या. १९६० च्या दशकाची अखेर ते १९८० च्या दशकाची अखेर याही काळात जगभरच्या तरुण-तरुणींच्या उभारीने अशा परिवर्तनाची झलक समोर आणली. हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रभर आणि देशभर स्त्रियांची समुदाय चळवळ संघटित झाली. जिथे चळवळ संघटित झाली तिथे स्त्रियांची जागृती वाढली. स्त्रिया चळवळीत पुढाकार घेऊ लागल्या. शेतमजूर, गरीब-मध्यम शेतकरी, कामगार, असंघटित क्षेत्रात अंगमेनहती काम करणाऱ्या स्त्रिया अशा थरातून, अल्पशिक्षित परिस्थितीतल्या स्त्रिया रणरागिणी बनल्या. समज घेऊन समाज बदलाचे स्वप्न बघण्याची, त्यासाठी प्रत्यक्ष चळवळ करण्याची कुवत त्यांच्यात निर्माण होऊ शकली. त्या चळवळीची गाणी बनवू लागल्या. चळवळीची, मानुषतेच्या प्रेमाची गाणी म्हणून लागल्या. धीटपणे नवऱ्यांसह इतर पुरुष सहकाऱ्यांच्या चुकाही दाखवू लागल्या. एक नवा माहौल तयार झाला. पण हा माहौल १९८० च्या दशकाच्या अखेरीपासून उतरतीला लागला.

वेगवेगळ्या नावाने ज्या स्त्री-मुक्तीच्या चळवळी स्वतंत्रपणे स्त्रियांच्या चळवळी म्हणून पुढे आल्या त्या रोडावत गेल्या. हयात चळवळींमध्ये फारसा जीव उरला नाही. जातीय अत्याचारांच्या विरोधात, आर्थिक आणि सामाजिक अत्याचारांच्या विरोधात तात्पुरत्या स्वरूपाच्या स्त्री-पुरुषांच्या चळवळी होत राहिल्या. वेगवेगळ्या शोषणांच्या संदर्भात अशाच प्रकारे स्त्री-पुरुषांच्या एकत्र चळवळी होत राहिल्या. त्यांच्यामध्ये स्त्रियांचा मोठा सहभाग होत राहिला. आजही होत आहे. पण स्त्रियांच्या मुक्तीशी जोडलेल्या थेट मुद्दय़ांना घेऊन होणाऱ्या स्त्रियांच्या समुदाय चळवळी सलगपणे कार्य करण्याची परिस्थिती संपत गेली.

खरे म्हणजे या काळात स्त्रियांमधल्या शिक्षितांचे प्रमाण वाढले. प्रस्थापित राजकीय व्यवस्थेनेसुद्धा स्त्रियांचे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हक्काचे स्थान निर्माण करणारे कायदे केले. पुरुषांनाही हे नवे वास्तव सवयीचे होऊ लागले. स्त्रियांना या नव्या वास्तवात धिटाईने संचार करण्यात संकोच वाटण्याचे बंद होऊ लागले. पण दुसऱ्या बाजूला स्त्रियांवरच्या अत्याचारात वाढच होत गेली. त्या विरोधातल्या स्त्रियांच्या समुदाय चळवळी क्षीण होत गेल्या. विविध क्षेत्रांमध्ये स्त्रियांचे शोषण वाढत गेले. त्या रोजगाराच्या संधीमधून पुरुषांपेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात हद्दपार होत गेल्या. याला शेतमजूर आणि कष्टकरी शेतकरी या राबणाऱ्या जनतेचाच फक्त अपवाद म्हणता येईल. पण तिथेही रोजगाराचे दिवस कमी होत गेले.

असे अंतर्विरोधी वास्तव असूनही या काळात स्त्रियांच्या, तरुणींच्या जागृतीचे निखारे अजूनही धुमसते आहेत, त्यांच्या मुक्तीच्या प्रेरणा जिवंत आहेत याचे दर्शन घडवणाऱ्या सामाजिक प्रक्रियासुद्धा घडल्या. त्या सांस्कृतिक चळवळीच्या क्षेत्रात घडल्या, आर्थिक क्षेत्रामधल्या चळवळीत घडल्या, अत्याचारविरोधी शक्ती संघटित करण्यातूनही दिसून आल्या. १९९९ ला सुरू झालेल्या ‘विद्रोही सांस्कृतिक चळवळ’ या सांस्कृतिक-साहित्यिक क्षेत्रात पुढे आलेल्या चळवळीची सुरुवात प्रामुख्याने तरुण-तरुणींनीच केली. किमान पुढचं एक दशक तरी ही चळवळ महाराष्ट्राच्या तरुण-तरुणींचा आकर्षण बिंदू ठरली. सर्व बहुजन जाती-जमातींमधल्या, सर्व धर्मामधल्या तरुणाईला या चळवळीने भारून टाकलं. मी या चळवळीच्या संस्थापकांपैकी एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून या नव्या उभारीचा साक्षीदार आणि सहभागी कार्यकर्ता. पुन्हा एकदा १९६७ ते ७५ या काळातला माहौल तरुणाईमध्ये तयार होताना मी अनुभवला. कवी, लेखक, कलाकार, सांस्कृतिक क्षेत्रात नवनिर्माण करण्याची परंपरा असलेली तरुणाई या चळवळीच्या ‘सहित्य-संस्कृती’ संमेलनामध्ये जीव ओतून सहभागी झालेली मी पाहिली. माझ्यातल्या तारुण्याच्या ऊर्मीना पुन्हा फुलोरा आणण्याचे काम विद्रोही सांस्कृतिक चळवळीने केले. तरुण स्त्रियांच्या मुक्त संचाराला मुक्त परिसर निर्माण करण्याची कुवत या माहौलमध्ये होती. तशी प्रक्रिया घडायला सुरुवातही झाली. यातून स्त्रीमुक्तीची एक ताज्या दमाची चळवळ अलगदच उभी राहू शकली असती. पण प्रत्यक्षात तसे झाले नाही. परिवर्तनाच्या राजकीय विचारसरणींच्या वेगवेगळ्या मांडण्या पायाभूत धरून तयार झालेल्या प्रवाहांच्या संकुचित राजकीय हितसंबंधांमुळेच या चळवळीत फूट पडत गेली. अनेक गट तयार झाले. असे झाले की वाहत्या, खळाळत्या पाण्याच्या प्रवाहाऐवजी डबकी तयार होतात. आणि डबक्यांचे जे होते ते त्यांचे होण्याची प्रक्रिया सुरू झाली.

अजूनही मला असे वाटते की मूळ भूमिकेच्या व्यापक पायावर ही चळवळ पुन्हा एकदा एकसंधपणे उभी राहिली तर पुन्हा एकदा तरुणाईचे सांस्कृतिक वादळ उठेल. यातूनच स्त्रीमुक्तीच्या नव्या चळवळीचा, निर्भय आणि विमुक्त पद्धतीने स्त्रियांनी समाजात स्वाभिमानी संचार करण्याचा उगम होणे शक्य आहे.

समुदाय चळवळ म्हणून मी दुसरी चळवळ १९९० नंतरच्या काळात अनुभवतो आहे. कष्टकरी, कामगार अशा राबणाऱ्या जनतेची. धरणग्रस्त, दुष्काळग्रस्त, पवनचक्क्यांसंदर्भातल्या वाऱ्यावरच्या हक्काची प्रस्थापना करणारी, प्रदूषणकारी उद्योगाला पर्याय देऊन नव्या ऊर्जा निर्मितीचा प्रस्ताव मांडणारी समान पाणी वाटपाची. त्याचबरोबर बडवे हटाव, विठोबा-रखुमाई मुक्ती आंदोलन, अंबाबाई गणमाता मुक्ती आंदोलन अशाही चळवळी आहेत. या सर्व चळवळींमध्ये स्त्रियांचा सहभाग प्रचंड संख्येने होत आहे. या स्त्रिया निर्भय आहेत. स्वत:च्या हक्कासाठी रणरागिणी बनणाऱ्या आहेत. त्या वेळी स्त्री म्हणून त्यांच्यावर अन्याय होण्याची परिस्थिती तयार झाली. त्यावेळी त्या स्त्रिया हातात कोयते घेऊन प्रचंड संख्येने शांततामय पण निर्धारयुक्त मोर्चात सहभागी होण्याचे दर्शन मला घडले. ‘निखारे विझलेले नाहीत’ असा संदेश या स्त्रियांनी त्यांच्या कृतीतून दिला. पण त्यांना सहकार्याची गरज आहे हे पण लक्षात आले. एवढे झाले तर त्या संपूर्ण समाजालाच निर्भय बनवण्याची करामत करू शकतील अशी कुवत मला वरचेवर त्यांच्यात दिसत आहे. स्त्रियांची ही शक्ती, राबणाऱ्या जनतेच्या विचारातून नवा समाज घडवणाऱ्या परिवर्तनाच्या चळवळीचा कणा बनू शकते. पर्यावरण संतुलित, समृद्ध, विकेंद्रित कृषी-उद्योगांनी युक्त, शोषणमुक्त समाजाला जन्म घालणाऱ्या चळवळीचा कणा. स्त्री म्हणून, जात म्हणून, वर्ग म्हणून, जमात म्हणून विविधांगी शोषण झेलणाऱ्या या स्त्रियांनीच या परिवर्तनाचे नेतृत्व केले पाहिजे. पुरुषांनी त्यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झाले पाहिजे. अशी अशक्य वाटणारी गोष्ट या स्त्रिया शक्य करून दाखवू शकतात.

स्त्रियांच्या वादळाला जन्म घालण्यासाठी झोकून देऊ शकतात. पूर्वी असे घडले आहे. आजही असे घडू शकते. आज असे घडण्यासाठी काय व्हावे लागेल असा प्रश्न आहे. मला वाटते त्यांनी आपल्या मनात कोंडलेल्या अवस्थेला मुक्त केले पाहिजे. स्वयंसेवी संस्था, बुद्धिजीवी व्यवसाय, यांत्रिक पद्धतीने कामाला जुंपणाऱ्या नोकऱ्या यांची सुरक्षित वाटणारी बेटं सोडून उसळी मारली पाहिजे. नाहीतर अत्याचार, शोषण, पिळवणूक, हिंसा, दडपशाही, हुकूमशाही यांनी गजबजून विक्राळ झालेल्या आणि अंगावर येणाऱ्या सध्याच्या परिस्थितीत गप्प बसून गुदमरणेही शक्य होणार नाही. परिस्थितीच्या पोटात या तऱ्हेच्या नव्या रणरागिणींचा जन्म होण्याची शक्यता प्रचंड आहे.

आज स्त्रीमुक्तीतून मानवमुक्तीचा समाज आणू इच्छिणाऱ्या गावोगावच्या, शहरोशहरीच्या स्त्रियांना आंतरिक उमाळ्यानं साद घातली तर त्यांचे असे वादळ घोंघावणे अवघड नाही. कारण त्यांच्या नेणिवेत आज हे वादळ आहे हे ४५ वर्षांमध्ये विकसित झालेली माझी नेणीव-जाणीव मला सांगत आहे.

krantivir@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2018 1:01 am

Web Title: dr bharat patankar article on power of feminist movement in india
Next Stories
1 ..अर्धे हात मुठी वळवतात तेव्हा
2 पुरुषांना ‘मानुष’ बनवणारी स्त्रीशक्ती
3 वादळांकडून वादळांकडे घोंघावताना
Just Now!
X