24 May 2020

News Flash

वादळांकडून वादळांकडे घोंघावताना

१९७३ ला सांगली जिल्ह्यच्या कासेगाव परिसरात ‘श्रमिक संघटना’ या नावाने शेतमजुरांची चळवळ उभारण्यात पुढाकार.

डॉ. भारत पाटणकर

मिरज मेडिकल कॉलेजला असताना आम्ही एक अभ्यासमंडळ चालवायचो. त्या संचाचा संबंध मागोवानावाच्या अपारंपरिक मार्क्‍सवादी गटाशी आला. जगभर चाललेल्या त्या काळातल्या परिवर्तनवादी चळवळी, देशातल्या अस्वस्थ तरुणांच्या, त्या काळी उफाळून येत होत्या. दलित पँथर्स, साहित्याच्या क्षेत्रातली लिट्लि मॅगझीनची चळवळ, युवक क्रांतिदल अशा सर्वाचा माहोल होता. एक आणखी पुढचं वादळ उठलं होतं. त्यात घोंघावायची तयारी झाली.

डॉ. भारत पाटणकर हे १९७१ मध्ये मिरज मेडिकल कॉलेज येथून एम. बी. बी. एस. उतीर्ण. १९७२ ते १९७३ मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये पदव्युत्तर शिक्षण, जे. जे. आणि जी. टी. हॉस्पिटलमध्ये हाऊस सर्जन म्हणून काम. १९७३ च्या अखेरीस शिक्षण सोडून कामगार – कष्टकऱ्यांच्या चळवळीत पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करण्यास सुरुवात. १९७३ पासून ‘मागोवा’ या कम्युनिस्ट गटात सभासद म्हणून  पूर्णवेळ कार्य.१९७३ ला सांगली जिल्ह्यच्या कासेगाव परिसरात ‘श्रमिक संघटना’ या नावाने शेतमजुरांची चळवळ उभारण्यात पुढाकार.

सत्यशोधक चळवळीचा समृद्ध वारसा असलेला मुलुख. महात्मा फुलेंपाठोपाठ राजर्षी शाहू महाराजांच्या परिवर्तनवादी, जातीअंतक कार्यक्रमाची पेरणी झालेला मुलूख. मराठी माणसांच्या शिवछत्रपतींनी रयतेचं राज्य स्थापन केलेली भूमी. जुना सातारा जिल्हा म्हणजेच आजचे सातारा-सांगली जिल्हे आणि कोल्हापूर जिल्हा. मानव मुक्तीच्या विचारांची वादळामागून वादळं घोंघावली इथे. वादळांची परंपरा दुथडी भरून घोंघावणाऱ्या कृष्णेसारखी प्रवाही राहिली. सामाजिक परिवर्तन, सांस्कृतिक परिवर्तन, आर्थिक परिवर्तन, कलेच्या क्षेत्रातली क्रांती अशा सर्वागांनी नवनव घडवण्याची हिंमत असणारी माणसे या परिसरात जन्मली, घडली आणि समष्टीशी जोडली गेली.

अशा परिसरात माझा जन्म झाला प्रतिसरकारच्या चळवळीत अग्रभागी असलेल्या बाबूजी आणि इंदुताई पाटणकर यांच्या पोटी. आईचे वडील दिनकरराव निकमसुद्धा स्वातंत्र्य चळवळीचे अग्रणी. क्रांतिसिंह नाना पाटील, कर्मवीर भाऊराव अण्णा, क्रांतिवीर नागनाथ नायकवडी ही नावं बालपणापासूनच माहीत व्हावीत एवढंच नव्हे तर सानेगुरुजींसह अशा सर्वाच्या मांडीवर खेळण्याची संधी मिळावी ही गोष्ट ओघानेच येणारी ठरली. प्राथमिक शाळेत असल्यापासूनच या सर्वाची भाषणं अण्णाभाऊ साठे-अमरशेखांची गाणी, पोवाडे, लावण्या ऐकण्यासाठी वेगळं काही करावंच लागलं नाही. याच किशोर वयात संयुक्त महाराष्ट्रासाठीचे मोर्चे, सत्याग्रह पाहण्याचा, अनुभवण्याचा प्रसंग. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या अत्रे, डांगे, दत्ता देशमुख, एस्. एम्. जोशी इत्यादींच्या बैठकीत बसण्याची दिव्यसंधी. सत्याग्रहींना झालेल्या अटक, काठय़ा घेऊन दरडावणारे पोलीस असेही सर्व कोवळ्या वयात अनुभवण्याचं ‘भाग्य’ लाभलेलं. १३-१४व्या वर्षीच वाढदिवसाला भेट म्हणून ‘कम्युनिस्ट पक्षाचा जाहिरनामा’, ‘रवींद्रकी कहानियाँ’, ‘श्यामची आई’, ‘गॉर्कीची आई’, ‘व्होल्गा ते गंगा’ अशी पुस्तकं मिळण्याची आणि ती भान हरपून वाचण्याची सुरुवात झाली. ‘गर्जा जय जयकार क्रांतीचा’ ही कुसुमाग्रजांची कविता तर आई दररोजच सकाळ-संध्याकाळ म्हणायची. ‘सदैव सैनिका पुढेच जायचे’, ‘भारत झाला जागा जगता- भारत झाला जागा’, ‘उठाव झेंडा बंडाचा – झेंडा आपुल्या रक्ताचा’ अशी सर्व गाणी तिला पाठच होती. अशी गाणी आणि चळवळीच्या गोष्टी ऐकण्यातूनच माझा पिंड घडत गेला.

आजही आम्ही कासेगाव जि. सांगली इथल्या जुन्या वडिलार्जित घरात राहतो. दुसरीकडे घर बांधलं किंवा घेतलं नाही आणि घेणं शक्यही नाही. ४३ वर्षे पूर्णवेळ चळवळीचं काम करीत आलो. काही कमावण्याचा प्रश्नच आला नाही. सुरुवातीची काही र्वष चळवळीच्या घरांमध्ये, जनतेच्या घरांमध्ये राहिलो-जेवलो. भागाकडे आल्यानंतर ‘मुलुखात फिरून आले तरी घरी कासेगावात’ असाच राहिलो. आईला तीन पेन्शन्स होत्या शिक्षिका म्हणून, वडिलांची विधवा म्हणून केंद्राची स्वातंत्र्यसैनिक म्हणून आणि स्वत:ची स्वातंत्र्यसैनिक म्हणून. या सर्वाची उधळण ती माझ्या, चळवळीत फिरण्याच्या कार्यासाठी करीत राहिली. जगप्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ, लेखिका आणि कार्यकर्ती असणारी माझी सहचारिणी,

गेल ऑम्व्हेट सुद्धा अशाच प्रकारे व्यवहार करीत राहिली. अगदी परवा-परवापर्यंत. निवृत्त होईपर्यंत. आता शेतीतल्या उत्पन्नाचा काही भाग घेऊन चालू आहे. कारण आता मायेची पखरण करणारी आई नाही. चळवळ चालूच राहणार आहे. जिवात जीव असेपर्यंत. वादळाचं घोंघावणं रोमारोमात मुरलंय. त्याला पर्याय नाही.

ऐतिहासिक पाटणकर घराण्यातल्या कुटुंबात जन्माला आलेल्या वडिलांवर- त्यांच्या आई-वडिलांवर गाव सोडून जगायला कासेगावी येण्याचा प्रसंग १०० वर्षांपूर्वी आला. इथं भूमिहीन आणि बेघर कुटुंब म्हणूनच जगणं सुरू झालं. आजी-आजोबा शेतमजुरी करून जगायचे. दोघेही अंगठेबहाद्दर. ते तसेच राहावे, त्यांच्यासारखे सर्वच कष्टकरी जाती-जमातींचे लोक तसेच राहावेत हाच जातिव्यवस्थेचा नियम. अशा या अंगठेबहाद्दरांनी माझ्या वडिलांना सातवीपर्यंत शिकवलं. त्या काळात सातवी पास म्हणजे मास्तरकी नक्कीच. प्राथमिक शाळेची मास्तरकी म्हणजे प्रतिष्ठेची. वडिलांनी तिच्यावर लाथ मारून स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली. आजी-आजोबांच्या सुखाच्या काळाचा विचार केला नाही आणि आणखी एक  आश्चर्याची बाब म्हणजे आजीलाही वडिलांचा निर्णय स्वाभिमानाचा वाटला. खरं म्हणजे आजोबा ‘फिजिकली चॅलेंज्ड’ असल्यामुळे घर चालवण्याची जबाबदारी आजीच्याच खांद्यावर होती. ती फारच कर्तृत्ववान होती. मी भरपूर शिकलो पाहिजे, असं तिला काळजापासून वाटायचं. मला मेडिकलला प्रवेश मिळाल्यावर तिनं माझ्यावर मुक्यांचा वर्षांव केला होता. माझ्या जीवनावर प्रभाव असलेली ती सुंदराबाई

ज्या क्रांतिवर बाबूजी पाटणकरांना, माझ्या वडिलांना, ब्रिटिशांचे पोलीस पकडू शकले नाहीत, मारू शकले नाहीत त्यांचा अमानुष खून स्वातंत्र्यानंतर आलेल्या सत्तेतील राजकीय कटातून झाला. २६ जानेवारी १९४७ ला, काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीतल्या प्रथेप्रमाणे, स्वातंत्र्य दिन साजरा करीत असताना त्यांनी शपथ घेतली होती, ‘‘आज माझे ध्येय जोरदार आणखी पुढे न्यायचे अशी मी प्रतिज्ञा केली. वाटेल ते झाले तरी संपूर्ण स्वातंत्र्य आणि समाज सुधारणा जोपर्यंत झाली नाही तोपर्यंत थोडंसुद्धा थांबायचं नाही असं ठरवलं.. इंदिरे, तूसुद्धा स्वातंत्र्य दिन साजरा केला असशील..’’ ही शपथ त्यांनी त्यांच्या डायरीत लिहून ठेवली आहे. नंतर १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. नवा स्वातंत्र्य दिनही त्यांनी साजरा करायला सुरुवात केली. पण संपूर्ण स्वातंत्र्य मिळालं नाही. भांडवलशाही, जातीय शोषण, स्त्रियांची पिळवणूक, धर्माधता हे सगळं तसंच राहिलं. ते आणि त्यांचे देशभरचे अनेक सहकारी स्वातंत्र्यपूर्व काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीत होते. अशा सर्वानी काँग्रेस सोडली. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासह सर्वानी खऱ्या-खुऱ्या स्वातंत्र्याची चळवळ सुरू केली. ही चळवळ सत्तेत गेलेल्या अनेक धुरिणांना झोंबत होती. माझ्या वडिलांच्या आधीही काही महत्त्वाच्या प्रमुखांचे खून पाडले गेले. वडिलांच्या बाबतीत हे घडणं फारच अशक्य वाटणारं होतं त्या काळात. पण ते या खुनशी शक्तींनी घडविलं. एका मानवमुक्तीच्या वादळाकडून दुसऱ्या आणि पुढच्या टप्प्याच्या वादळाकडे घोंघावताना त्यांचा अंत केला गेला. वाघाची सहचारिणी वाघीण एकटी राहिली. तीच मग वादळ बनली. स्त्रियांच्या शोषणाविरुद्ध, दडपणुकीविरुद्ध बंड करण्याचं धाडस जिने स्वातंत्र्य चळवळीमधल्या सहभागाबरोबरच केलं तिने चळवळ पुढे चालू ठेवली. माझ्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाच्या घडणीमध्ये तिचा वाटा आभाळापेक्षाही मोठा आहे. पराभवाचंही रूपांतर विजयात करण्याची शक्ती अंगात मुरवली. स्त्री-मुक्तीचं बाळकडू तिने बालपणापासून मला पाजलं.

स्वातंत्र्यानंतर समाजवादी पक्ष. मग डावा समाजवादी गट (मार्क्‍सवादी-लेनिनवादी आणि पुढे १९५२ ला भारतीय कम्युनिस्ट पक्ष ही वाटचाल मी इतिहासात नंतर वाचली. माझं घरच या इतिहासाच्या वाटचालीचं एक केंद्र होतं. एवढंच काय भारतीय कम्युनिस्ट पक्षातून ‘मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष’ अशी नवीन निर्मिती होत असतानाचे विवाद मी माझ्या घरी अनेक वेळा अगदी गरमा-गरम चर्चेतून ऐकलं. संसार आणि शिक्षिकेची नोकरी सांभाळून आई या सर्व प्रक्रियेची साक्षीदार होती. या सर्व प्रक्रियेनं मला घडवलं. १९६७ मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मी प्रवेश घेतला. एम.बी.बी.एस. होण्यासाठी एम.डी.एम.एस होण्यासाठी. अभ्यासाबरोबरच कॉलेज मॅगझिन काढण्यात भाग घेतला. कविता लिहिल्या. आमच्या महाविद्यालयामध्ये झालेल्या भ्रष्ट व्यवहारामुळे इंडियन मेडिकल कौन्सिलने एम.बी.बी.एस. झालेल्यांना डॉक्टर म्हणून प्रमाणित करण्याचं नाकारलं. सुमारे तीन महिने कॉलेज बंद करून आमची विद्यार्थी चळवळ रस्त्यावर होती. मी या संपात पुढाकार घेतला. स्टेजवरून कविता म्हणून स्फूर्ती देण्यामुळे विद्यार्थ्यांनी माझं नामकरण ‘संप कवी’ असं केलं! ही माझ्या आयुष्यात मी सहभाग घेतलेली, पुढाकारात असलेली पहिली मोठी चळवळ. त्यानंतर इंटर्नशिप करताना, मुंबईला हाऊस सर्जन असतानाही मोठय़ा चळवळीत पुढाकाराने सहभाग घेतला. माझं चळवळं जीवन सुरू झालं.

१९७१-७२-७३ चा महाराष्ट्रव्यापी महाभयंकर दुष्काळ पडला. इंटर्नशिपला असताना रोजगार हमीच्या कामावरील मजूर स्त्री-पुरुष जनतेला वैद्यकीय मदत करण्यासाठी आमचे संच पाठवले जाऊ लागले. औषधांचं किट घेऊन आम्ही जायचो. ही औषधं पुरेशी दिली जात नाहीत म्हणून भांडण करावं लागलं. भ्रष्टाचार काय असतो याचा पहिल्यांदाच अनुभव घेतला. त्याविरुद्ध यशस्वी संघर्ष केला. पण या अनुभवातून माझ्या जीवनाची दिशा बदलायची होती हे मलाच माहीत नव्हतं. आम्हाला दिसत होतं की, लोकांना प्रचंड अ‍ॅनेमिया आहे, व्हिटॅमिनस्ची प्रचंड कमतरता असण्याची लक्षणं आहेत. पिण्याच्या लायकीचं पाणी नसल्यामुळे हगवण वगैरे आजार होत आहेत. त्यांची प्रतिकारशक्तीच एवढी क्षीण झाली आहे की त्यांना इतरही आजार भेडसावतात. पण या सर्वाचं मूळ अठरा विशे दारिद्रय़ आणि उपासमारीत आहे.

माझ्या डोक्यात आम्हाला असलेला एक महत्त्वाचा विषय पोखरू लागला. ‘प्रतिबंधक आणि सामाजिक औषधशास्त्र’ यातच सारी उत्तरं होती. रोग किंवा आजार होऊच नये म्हणून काय करायचं त्याची उपाययोजना. रोग होऊच नयेत म्हणून काही करणं म्हणजे धंद्याला मारक! यातून माझं मन प्रचंड अस्वस्थ झालं. माझं शोषण मुक्तीच्या चळवळीविषयीचं वाचन, आजपर्यंत चळवळमय घराने केलेले संस्कार हे सर्व उफाळून वर आलं. मनाने निर्णय घेतला. आता चळवळीत झोकून द्यायचं. मिरज मेडिकल कॉलेजला असताना आम्ही एक अभ्यासमंडळ चालवायचो. त्या संचाचा संबंध ‘मागोवा’ नावाच्या अपारंपरिक मार्क्‍सवादी गटाशी आला. जगभर चाललेल्या त्या काळातल्या परिवर्तनवादी चळवळी, देशातल्या अस्वस्थ तरुणांच्या त्याकाळी उफाळून येत होत्या. दलित पँथर्स, साहित्याच्या क्षेत्रातली ‘लिट्लि मॅगझीन’ची चळवळ, युवक क्रांतिदल अशा सर्वाचा माहोल होता. एक आणखी पुढचं वादळ उठलं होतं. त्यात घोंघावायची तयारी सुरू झाली.. त्याविषयी पुढील शनिवारी.

krantivir@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2018 1:02 am

Web Title: dr bharat patankar experience
Next Stories
1 फलश्रुती
2 संघर्षातील यशोगाथा
3 ज्योत से ज्योत जगाते चलो..
Just Now!
X