|| डॉ. कुमार सप्तर्षी

जगभर स्त्रियांच्या चळवळींचा एक जमाना गाजत होता. १९७५ नंतर हा जमाना सुरू झाला. पाश्चात्त्यांच्या चळवळीचा अभ्यास करणाऱ्या स्त्रीवादी विचारवंत स्त्रिया तयार झाल्या. संशोधने खूप झाली. भारतात मात्र ही चळवळ शहरांपुरती मर्यादित राहिली. साहित्य, समाजकारण, राजकारण यांची स्त्रीवादी समीक्षा होऊ लागली. ग्रामीण भागात सगळा आनंदच होता. मात्र, हायस्कूल व महाविद्यालयांतील विद्याíथनींची संख्या वाढली. ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण घेण्याची हजारो वर्षांतली पहिली संधी मिळाली. त्या संधींचे त्यांनी सोने केले.

आजही ग्रामीण भागात ५ किलोमीटरच्या परिसरात शाळा असेल तरच मुलींना शिक्षणासाठी पाठवतात. ग्रामीण भागातील बहुतांश मुलींच्या आया अशिक्षित आहेत. ३०-४० वर्षांपूर्वी ७ व्या इयत्तेचे शिक्षण संपल्यानंतर म्हणजे वयाच्या १२-१३व्या वर्षी मुलींचे विवाह होत. त्यातून हुंडाबळी, पत्नीला मारहाण इत्यादी घटना घडत. गर्भाशयाची पिशवी पूर्णपणे विकसित झालेली नसताना मुलींना गर्भारपणाला तोंड द्यावे लागे. जन्माला आलेली मुले किमान आवश्यक (३ किलो) वजनापेक्षा कमी वजनाची असत. त्यातून काही समस्या निर्माण होत. लवकर गर्भधारणा झालेल्या आया लवकर मृत्यू पावत.

३४ वर्षांपूर्वी ४ हजार लोकवस्तीच्या एका खेडय़ात मी शाळा सुरू केली. प्रारंभीच्या काळात मुलींचा अवतार अगदी गबाळा असे. आता तो बदलला आहे. तेव्हा नाव विचारले तरी मुली फक्त लाजत. आता मुली स्मार्ट दिसू लागल्यात. बॉबकट, स्वच्छ कपडे, पायात चप्पल, टापटीप गणवेश असतो. विचारलेल्या प्रश्नाला त्या डोळ्याला डोळा भिडवून न लाजता उत्तर देतात. आज घरात शिक्षणाला विरोध असला तरी त्या हट्टाने शिकतात. शिक्षण थांबले की विवाह होणार अन् सारे संपणार याची त्यांना पूर्ण कल्पना असते. म्हणून अभ्यास करतात. काही जणी पोलीस खात्यात भरती होण्याची आकांक्षा बाळगतात. पोलीस झाल्यानंतर आपण अधिक सुरक्षित होऊ असे त्यांना वाटते. सुरक्षिततेची हमी मिळाली तरच स्वातंत्र्याला सुरुवात होईल अशी त्यांची धारणा बनलीय. मुलगी पोलीस खात्यात असेल तर कुटुंबालाही संरक्षण मिळते. त्यामुळे घरातून फारसा विरोध होत नाही. आजच्या काळातील ग्रामीण मुलींना छोटे कुटुंब हवे असते. त्यांनी व्यक्तिगत घराचे स्वप्न मनात रंगविलेले असते. नवरा, बायको अन् मुले.. बस्स! मोठय़ा आकाराच्या एकत्र कुटुंबात राहाणे त्यांना पसंत नाही. त्यात स्त्रीला अजिबात स्वातंत्र्य नसते असे त्यांना वाटते. पालक मुलींसाठी जी स्थळे पाहतात त्याचे निकष मात्र जुनेच आहेत. खातंपितं घर हाच आदर्श. मोठं कुटुंब, मोठी शेती, जनावरांची अधिक संख्या हे त्यांचे निकष. मुलींना मात्र शिकलेला आणि मित्र होऊ शकणारा नवरा हवा असतो. हे स्वप्न नेहमीच पुरे होत नाही. पुरुष, मुलांमध्ये शिक्षणाची ओढ, बायकोबरोबर मैत्रभाव, सामंजस्य, उदारता या गोष्टी आजही ग्रामीण भागात दुर्मीळ आहेत. मर्दपणाच्या विकृत कल्पना त्यांच्या डोक्यात लहानपणापासून घुमत असतात. अत्यल्प असले तरी पळून जाऊन मित्राशी लग्न करण्याचे प्रमाण मुलींमध्ये वाढत आहे. कोपर्डीसारखी प्रकरणे घडल्यानंतर मात्र मुलींना अल्पवयातच उजवून टाकण्याची, शिक्षणापासून वंचित ठेवायची प्रवृत्ती ग्रामीण भागातील पालकांमध्ये वाढू लागली आहे. एकुणात मुली मुलांपेक्षा अधिक गतीने बौद्धिक व भावनिक पातळीवर विकसित होताना आढळतात. अजून व्यक्तिस्वातंत्र्य, पुरुषांशी स्पर्धा करण्याची प्रवृत्ती, घटस्फोटाची तयारी असणे वगरे शहरातील प्रवृत्तींचा ग्रामीण मुलींना अजून स्पर्श झालेला नाही.

‘स्त्री-मुक्ती’चा विचार स्त्रीपुरता मर्यादित राहाणे समाजहिताच्या दृष्टीने योग्य नाही. पुरुषप्रधान संस्कृतीमधून, पुरुष हा स्त्रीचा मालक असतो, या संस्कारातून आणि मर्दपणाच्या पोकळ कल्पनांतून पुरुषांची सुटका होणे तितकेच आवश्यक आहे. तरच खऱ्या अर्थाने स्त्री-मुक्ती चळवळ सफल होईल. विवाह हा दोघांच्या विकासाला परस्परपूरक असला पाहिजे. त्यासाठी स्त्री व पुरुष यांच्या समान सहभागाच्या चळवळी झाल्या पाहिजेत. दोघांनी विकसित होऊन समाजातील अन्य प्रश्नांना भिडले पाहिजे. मुक्त झालेल्या स्त्री-पुरुषांमधील एकंदरीत समज व्यापक बनायला हवी. त्यासाठी घरात सुसंवाद हवा. स्त्रीवादी संघटना स्त्रियांच्या प्रश्नांवरच लक्ष केंद्रित करतात. वेळप्रसंगी पुरुषांच्या विरोधात आक्रमक बनतात. स्पर्धा, मात करण्याची प्रवृत्ती, दुसऱ्याला पराभूत करून स्वत: विजयी होण्याची आकांक्षा अशा पुरुषी दुर्गुणांचा स्त्रीवादी स्त्रिया नकळत स्वीकार करतात. त्या स्त्रियांपुरत्याच मर्यादित राहतात. अंतिमत: हे वातावरण समाजाला फारसे पोषक ठरत नाही. क्रिया-प्रतिक्रियांचा खेळ सुरू होतो. त्यातून समाजातील प्रतिगामी शक्तींना अधिक बळ मिळते.

शहरातील स्त्रिया शिक्षणात पुढे गेल्या. त्यांना भरपूर पगाराच्या नोकऱ्या मिळू लागल्या. तथापि एकूणच सुशिक्षितांमध्ये वाढलेल्या आत्मकेंद्री प्रवृत्तीच्या त्यादेखील बळी ठरत आहेत. केवळ स्वत:च्या कुटुंबापुरताच त्यांचा प्रगतीचा विचार मर्यादित होतो. समाजात वाढणारी विषमता, कष्टकरी अशिक्षित स्त्रियांचे हाल याकडे डोळ्यांवर कातडे ओढून पाहिले जाते. स्त्रीच्या वाटय़ाला आलेला गौण दर्जा संपला तरी ती नव्या उच्चभ्रू वर्गाच्या जाणिवेत अडकते. फावला वेळ शॉिपग, ब्युटीपार्लर वगरे चंगळवादी कृतींमध्ये ती व्यर्थ घालवते. आत्मभान आल्यानंतर समाजभान आपोआप यायला पाहिजे, ते विसर्जित होते.

काही कारणाने का होईना, राजकारणात स्त्रियांना राखीव जागा मिळू लागल्या आहेत. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महापालिका यात त्यांना अध्यक्ष-सभापती होण्याची संधी राखीव जागांमुळे मिळते. तिथेही पुरुषप्रधान संस्कृतीचा तिच्या भोवतीचा घेरावा अजूनही संपत नाही. तिला बाहुली बनवून तिचे मालक पडद्याआड काम करू इच्छितात. ‘ब्र’ नावाच्या कविता महाजन यांच्या कादंबरीत आदिवासी सरपंचपदावरील स्त्रियांच्या भीषण व करुण कहाण्या वर्णन केलेल्या आहेत. सरपंचबाईला ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये येऊ दिले जात नाही. कारण सार्वजनिक ठिकाणी ऊठ-बस केल्याने स्त्रीच्या तथाकथित चारित्र्याबाबतच्या प्रतिमेला कलंक लागतो, अशी मान्यता समाजात रुजलेली आहे. ग्रामसेवक तिच्या घरी कागदपत्रे पाठवून सह्य़ा घेतात. काही जणी मात्र या विपरीत परिस्थितीत आपल्या हुशारीने टिकून राहतात, आपले कार्य नेटाने करतात. अशा कर्तबगार स्त्रिया हीच भविष्यातील आशा आहे. बौद्धिक पातळीच्या बाबतीत स्त्रिया पुरुषांपेक्षा कमी असतात, हा खोलवर रुजलेला एक निर्थक गरसमज. त्याला धक्के देण्याची जबाबदारी कर्तृत्ववान स्त्रिया आणि त्यांना साथ देणारे उदारमतवादी पुरुष यांच्यावर आहे. वास्तवात असे आढळते की, स्त्रियांमध्ये जिव्हाळा, ममता अधिक असल्याने त्या पुरुषांपेक्षा अधिक माणुसकीपूर्ण व दर्जेदार व्यवस्थापन करू शकतात.

स्त्री-दास्य हा भारतीय समाजाचा ठळक गुणविशेष आहे. जातिसंस्था व स्त्री-दास्य यांचा अन्योन्यसंबंध घनिष्ठ आहे. जातिसंस्था जशी मोडकळीस येईल तशा स्त्रिया गुलामगिरीच्या विळख्यातून आपली सुटका करून घेत राहतील. दुर्दैव हे आहे की, प्रस्थापित राजकारण व राजकीय नेते स्त्री-दास्य व जात यांचे समूळ उच्चाटन करण्यास तयार नाहीत. राजकीय पातळीवर जातीय समीकरणे तयार करून त्यांना सत्ता मिळवायची आहे. तसेच आपल्या पक्षात स्त्रियांची वेगळी महिला आघाडी करून त्यांना निर्णयातील सहभागापासून दूर ठेवायचे आहे. स्त्रीला शून्यवत बनवण्यासाठी बलात्कार हे हत्यार सर्रासपणे वापरले जात आहे. बलात्कार हे लैंगिक सुखाची प्राप्ती करण्याचे साधन नव्हे. पुरुषांची इच्छापूर्ती करण्यासाठी स्त्रियांचा जन्म झालेला आहे, या भूमिकेला नकार देणाऱ्या स्त्रियांना धडा शिकवणे ही बलात्काराच्या गुन्ह्य़ामागची खरी प्रेरणा असते. ‘मनुस्मृती’तील संकल्पनांप्रमाणे स्त्रिया शूद्र मानल्या आहेत. प्रत्येक जातीने आपल्या समूहातील स्त्रिया गुलामीविरुद्ध बंड करणार नाहीत याची काळजी घ्यायची ठरले आहे. ज्या देशात या मूलभूत स्वरूपाच्या घृणास्पद संकल्पना पूर्णत: बदलत नाहीत त्या देशाला भविष्यात कदापि प्रगती करता येणार नाही.

अमेरिकेपेक्षा दरडोई उत्पन्नाच्या निकषानुसार नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क वगरे दहा देश वरचढ आहेत. त्यांचा इतिहास पाहाता ३००-४०० वर्षांपासून स्त्रियांविषयीचा आदर व समानता हा सद्गुण त्यांनी बालपणापासून आपल्या नागरिकांमध्ये प्रयत्नपूर्वक रुजवला. त्यामुळे त्यांची आíथक परिस्थिती अतिशय संपन्न बनली. भारतात मात्र स्त्रीचे मन मोडून टाकण्यात वर्षांनुवष्रे धन्यता मानण्यात आली. त्यामुळे देशाची आíथक प्रगती होत नाही. १२व्या शतकात बसवराज या कर्नाटकातल्या महामंत्र्याने सुमारे ३५० जातिसमूह एकत्र करून त्यांना नवी मूल्ये दिली. त्यालाच लिंगायत समाज म्हणतात. त्यांनी स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा दिला. परिणाम असा झाला की, खडखडाट असलेली कर्नाटक राज्याची तिजोरी संपत्तीने भरभरून वाहू लागली. ‘स्त्रियांना समान दर्जा देणे म्हणजेच आíथक प्रगती करणे’ हे समीकरण जगातल्या कोणत्याही ठिकाणी सिद्ध झाले आहे.

भविष्यकाळात खूप प्रबोधन होणे आवश्यक आहे. प्रबोधन ना फक्त स्त्रियांचे, ना फक्त पुरुषांचे व्हावे. समस्तांमध्ये स्त्रीचा आदर हा विचार रुजवला पाहिजे. पृथ्वीच्या अंतापर्यंत पुरुषाला मूल होणार नाही हे नक्की! मग त्याग, व्रतवैकल्ये, उपास-तापास या गोष्टी स्त्रीच्या वाटय़ाला कशासाठी? स्त्रियांचे उत्तम भरणपोषण झाले व त्यांचे मानसिक स्वास्थ्य जपण्यात आले तरच ६ पौंडांची मुले जन्माला येण्याची हमी मिळते. अन्यथा ३ पौडांची मुले जन्माला येतात. सध्या भारतात ३० कोटींच्या आसपास मुले जन्मवेळी वजन कमी असलेली जन्माला येतात. अशी कुपोषित मुले तशीच राहिली तर आयुष्यात कर्तृत्वहीन व आमिषाला बळी पडणारी असू शकतात. सारांश रूपाने सांगायचे तर राजकीय पक्षांमध्ये स्त्री-दास्यमुक्तीचा विचार कशा पद्धतीने मांडलेला आहे त्यावरून त्यांचे मोल ठरवले जावे. केवळ स्त्रीवादही नको आणि पोकळ, टाकाऊ पुरुषप्रधानताही नको. स्त्री-पुरुषांमध्ये माणुसकीचा मैत्रभाव आणि समानता हवी. सर्व चळवळींमध्ये स्त्री-दास्यमुक्तीचा विचार प्रधान बनायला हवा.

mgsnidhi@gmail.com

chaturang@expressindia.com