डॉ.रवींद्र कोल्हे ravikolhemelghat@gmail.com

बैरागड येथे सगळा आदिवासी समाज. येथे हुंडाबळी नाहीत. हुंडय़ासाठी कोणा मुलीचा विवाह थांबत नाही. उलट स्त्रीधनापोटी तिच्या वडिलांना लग्न खर्चाचा काही भाग वर पक्षाकडून मिळतो. विवाहित स्त्री जी मजुरी मिळवते त्यावर फक्त तिचाच अधिकार असतो, पतीचा नाही. पतीने ती हडपण्याचा प्रयत्न केला तर पंचायत तिला न्याय देते. अशा अनेक चांगल्या प्रथा येथील संस्कृतीत आहेत. असे असले तरी अजून येथे बऱ्याच सुधारणा होणे गरजेचे आहे.

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Loksatta chaturang Decisive women vote in election
निर्णायक ठरणारी स्त्री-मतं!
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’

जसजशी न्यूमोनिया व डायरियाची मुले जगू लागली, तसतसे लोक शेतीतील मरणारी तुरीची व हरभऱ्याची झाडे घेऊन माझ्याकडे येऊ लागले. त्यांना असे वाटले की डॉक्टरांकडे सर्वच प्रश्नाचे उत्तर आहे. बरे की त्या वेळी मी एमडी होतो. जरी प्रश्नांची उत्तरे माहीत नसली तरी ती उत्तरे कशी शोधावीत याचा गृहपाठ एमडीचा थीसिस करताना झाला होता. मी ‘पंजाबराव कृषी विद्यापीठ, अकोला’ यांची मदत घेऊन तड लावण्याचे ठरवले. त्यांनी सांगितले की, हा बुरशीमुळे होणारा आजार आहे. मेडिकल सायन्सेसमध्ये बुरशीजन्य आजार म्हणजे अशक्यप्राय व वेळखाऊ प्रकरण असते. कृषी शास्त्रज्ञाने त्यावर तत्कालीन उपाययोजना अशी केली होती की, त्यांनी बुरशीजन्य आजार प्रतिबंधक जातीच शोधून काढल्या होत्या. त्यांनी मला असा सल्ला दिला की, अमुक जाती वापरा त्या बुरशीरहित आहेत. मी ही गोष्ट लोकांना सांगितली असता, लोकांनी मला शेतीचा तुकडा भाडय़ाने दिला आणि तुम्हीच तो प्रयोग करून दाखवा, असे आव्हानही दिले. ‘आधी केले मग सांगितले’, हे विनोबांकडून शिकलो होतोच. अशाप्रकारे शेतीच्या प्रयोगाची सुरुवात झाली. चांगले बियाणे निर्माण होणे, शेती विकासाचे अपरिहार्य अंग होते.

मजुरांना योग्य मजुरी हा दुसरा भाग- स्वत:ला ट्रस्टी मानून शेती कसण्यास मी सुरुवात केली. त्यामधून पहिली अडचण अशी लक्षात आली की पुरुषाला दररोज ३ रुपये मजुरी तर स्त्रियांना फक्त २ रुपये दिले जातात. हा दीडपटीचा फरक मला मान्य होण्यासारखा नव्हता. पहिले पाऊल मी उचलले की स्त्रियांनाही पुरुषांएवढी मजुरी मी दिली. गावात अशी पद्धती रूढ असते की एकाने जो रोज दिला तोच इतरांना देणे बंधनकारक ठरते. त्यामुळे गावातील मोठे शेतकरी नाराज झाले, कारण त्यांच्याकडे रोज ५० स्त्री मजूर काम करत होत्या. त्यामुळे त्यांना दररोज माझ्यामुळे ५० रुपयांचा भुर्दंड बसला होता. शेतात काम नसतानाच्या दिवसात मजुरांना घरी बसून राहावे लागे. उपासमार होई. ही अडचण सोडवण्यासाठी मी रोजगार हमी योजनेचे तिन्ही खंड वाचून उत्तर शोधले. नमुना ४ भरून, ५ मध्ये पावती घ्यायची. जुने काम संपण्याच्या १४ दिवस आधी नवीन काम मागायचे, कामे स्वत:च सुचवायची. जेणेकरून सतत मजुराला काम मिळत राहील. तेथे स्त्री आणि पुरुषांना सारखी मजुरी मिळत असे. मुलांसाठी पाण्याची सोय, सावलीची सोय. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, काम ८ कि.मी.पेक्षा जास्त दूर असल्यास शासकीय खर्चाने वाहतुकीची सोय, तसेच निवारा उपलब्ध करण्यासाठी अर्धा दिवस जास्तीची मजुरी असे बारकावे मला समजायला लागले आणि माझ्या प्रबोधनातून सर्व मजुरांना हे समजले.

माझे लग्न झाल्यावर स्त्रियांच्या अडचणी तेथील स्त्रिया अधिक स्पष्टपणे स्मिताशी बोलू लागल्या. त्यातून मग श्रमदानातून आणि शासकीय योजनेतून २०० पेक्षा जास्त शौचालये महिला सरपंच आणि सदस्य असलेल्या आमच्या ग्रामपंचायतीने १९९७ मध्ये बांधलीत ती आजतागायत वापरली जात आहेत. आमच्या घरीही त्या वेळीचे शौचालय आजही आम्ही वापरतो. पिण्याचे पाणी आणण्यासाठी स्त्रियांच्या आयुष्यातील रोज दोन ते अडीच तास खर्च होतात हे लक्षात आले. प्रचंड श्रमशक्ती ती ओझी वाहण्यात खर्च होत होती. म्हणून बैरागड गावात पहिली नळयोजना सुरू झाली. पुढे ते लोण मेळघाटभर पोहोचले. प्रथम चौकाचौकात सार्वजनिक नळातून पाणीपुरवठा झाला. नंतर ‘निरी’च्या मदतीने मोठय़ा नळयोजना आखल्या जाऊन घराघरात पाण्याचे नळ पोहोचून स्त्रियांच्या कष्टाची बचत झाली. त्यांचा वेळ परसबाग भाजीपालानिर्मिती, शिवणकाम, विणकाम, भरतकाम, लोकरीचे विणकाम अशा विधायक पद्धतीने वळवण्यात आला. अंबर चरख्याच्या मदतीने सूतकताईचा प्रयोगही केला. त्यासाठी मी एक आठवडा ग्रामउद्योग संघ गोपुरी, वर्धा येथे जाऊन प्रशिक्षणही घेतले. मात्र त्याचा सर्वस्वीकार होऊ शकला नाही. कारण पेळू आणणे, सूत पोहोचवणे, कापड आणणे अशी कामे रस्तेच नसल्यामुळे मोठय़ा प्रमाणावर जमले नाही.

स्त्रियांवर धनदांडग्यांकडून होणाऱ्या अन्यायाचे बारकावे लक्षात येऊ लागले. त्याच्या सोडवणुकीत स्मिता हात घालू लागली आणि कामाला वेगळीच दिशा गवसली. स्त्रियांचा आमच्यावरील विश्वास वाढू लागला. कायदा, त्यातील पळवाटा, त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा, अधिकार आणि त्यांचा गैरवापर असे विविध पलू समजून घेता आले. त्यातून कसा मार्ग काढायचा याची ब्लू पिंट्र ठरू लागली. न्यायदेवतेची होणारी कुचंबणा आणि सर्वसामान्यांशी न्यायासाठीची धडपड यातील दरी कशी भरून काढता येईल असे विचारचक्र आम्हा दोघांचेही फिरू लागले. एक दिवस असा आला की, गावातील अशिक्षित शांताने गावातील मोठय़ाच्या शिरजोर पोराला खडसावले, ‘‘ये ज्यादा आगे मत बढम्ना नहीं तो पुलीस केस कर  दूँगी, पन्ध्रह दिन फुकटमे सेंटर (जेल) चला जायेगा.’’ आम्हाला घेतलेल्या कष्टाचे चीज झाले असे वाटले. याच शांताने प्रेमविवाह केला होता. तिचा पती दारूच्या नशेत सतत तिला मारझोड करायचा. त्या कुरबुरी घेऊन ती आमच्याकडे यायची. मी तिला समजवायचो, ‘‘घर संसार में छोटी बडी बाते चलती है, दुर्लक्ष कर, जाऊ दे. किती भांडतो हे सांगतेस तेवढा प्रेमही करतो हे तू कधीच का सांगत नाहीस.’’ असे म्हणून विषय थांबायचा. पण एक दिवस त्यांचे भांडण विकोपाला गेले तेव्हा मी सल्ला दिला की तू एवढी धडधाकट असून एवढा मार का खातेस. तू पण ठोशाला ठोसा लगाव. मग काय दुसऱ्याच दिवशी शांताने ज्या जळत्या लाकडाने नवरा तिच्या मांडीला चटके देत होता तेच लाकूड त्याचा हातून हिसकावून घेऊन त्याच्या चेहऱ्यावर चटके दिले आणि त्याला घराबाहेर काढून दरवाजा बंद केला. तो घाबरून ओसरीत हात-पाय जवळ घेऊन आपली अब्रू तोंड झाकून वाचवण्याचा प्रयत्न करू लागला. पुरुषप्रधान गाव इरेला पेटले. एक ट्रॅक्टर भरून स्त्री-पुरुष शांताची तक्रार देण्यास तिच्या पतीसोबत पोलीस ठाण्याला निघाले. ते पाहून शांता घाबरून स्मिताकडे आली आणि तिला घेऊन पोलीस ठाण्यात गेली. दोन्ही बाजूंनी तक्रार नोंदवल्या गेल्या. कौटुंबिक मामला असल्याने स्त्री सदस्यांच्या समक्ष सुनावणी झाली. शांताने आपले जुने माराचे डाग, चटके दाखवले. तिच्या पतीने, ‘लोकच मला घेऊन आलेत. मी शांता सोबत या पुढे सुखात संसार करीन. तिला अजिबात त्रास देणार नाही,’ असं लिहून देऊन प्रसंग टाळला. त्यानंतर त्यांचे भांडण पुन्हा झाले नाही. यातून अनेक स्त्रियांवर होणारे घरातील अन्याय संपुष्टात आले.

करुणा आणि भिडेची गोष्टही अशीच. माजी सैनिक भिडे वन खात्यात नोकरीला होते. करुणा दहावी झालेली. एका एनजीओची कार्यकर्ती म्हणून गावात आली. भिडेच्या प्रेमाने रजिस्टर लग्न करून विवाहित झाली. भिडेला रोज सायंकाळी दारू प्यायची सवय. त्यातून करुणाला तो बुटाच्या ठोकरीने तुडवायचा. कधी दात तोड, कधी नाका-तोंडातून रक्त काढ. पाठी-पोटावर सतत हिरवे डाग. ती अर्ध्या रात्री रडत यायची. आम्ही तिला कित्येकदा पोलीस ठाण्यात जा, तुझा प्रश्न कायमचा सुटेल असे सांगायचो, पण तिच्या मागे-पुढे कुणी नसल्याने ती घाबरायची. मात्र एक दिवस ती मार खाऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. त्या दिवशी तिने भिडे करुणावर चालवायचा तेच शस्त्र भिडेच्या पाठीवर चालवल्याने तेव्हापासून तो करुणाशी सज्जनासारखा वागू लागला.

व्यसनमुक्ती ही तिथली खरी गरज होती. घराघरातून होणारे अन्याय आणि घराबाहेरील होणारे अन्यायही व्यसनाने होतात हे दिसत होते, पण त्यावर उत्तर सुचत नव्हते. कारण दारू ही घराघरात गाळली जायची. शेताशेतात आणि जंगलात मोहाची झाडे आहेत. मोहफूल वेचणे, सुकवणे आणि सणावाराला दारू गाळणे ही सांस्कृतिक बाजू होती. दारूचा वनौषधी म्हणून उपयोग कधी व्यसनाधीनतेकडे जाईल आणि अन्याय सुरू होईल, यातली रेषा स्पष्ट नव्हती. जसे पंचायतीचे अधिकार वाढले तसे गावच्या पंचायतीने असे निर्णय केले की जो दारू पिऊन सापडेल त्याला एक हजार ते दोन हजार रुपये दंड व जो दारू विकेल त्याला २ ते ५ हजार रुपये दंड. हळूहळू अशी प्रकरणे गावपंचायतीसमोर येऊ लागली. त्यात दंड सुनावले जाऊ लागले. अधिकारांची अंमलबजावणी होऊ लागली. स्त्रियांवरील घरातील अन्यायाला जरब बसू लागली. ‘गाव करी ते राव न करी’ हेच खरे.

इतर अनेक बाबतीत खरं तर हा आदिवासी समाज सुसंस्कृत मानायला हवा. कारण इथे ‘मुलगी झाली हो’ असे दु:ख कोणालाही होत नाही. उलट मुलगी झाल्याचा आनंदोत्सव साजरा होतो. त्यामुळे येथे स्त्री-भ्रूणहत्या होत नाहीत. त्याबद्दल लोकजागृती करण्याचा प्रश्न आमच्यासमोर आलाच नाही. येथे मुले-मुली वयात आल्यावर स्वत:चा जोडीदार निवडतात. ही निवड करताना जर मुलगी गर्भवती झाली तर समाज तिच्याकडे अथवा तिच्या कुटुंबीयांकडे वाईट किंवा वेगळ्या नजरेने पाहात नाही. ‘बच्चे से होती है गलती’ असे मोठय़ा मनाने स्वीकारून घेतले जाते. त्यामुळे अवैध गर्भपात, कुमारी माता किंवा अवैध संतती असे शब्द इथे नाहीत. कोणीही उदरातील गर्भाला नष्ट करत नाही. समाज गर्भवती मुलीचा विवाह सहज स्वीकारतो. प्रसंगी लग्नात दूध पिणारे मूलही आईसोबत सासरी जाते. आईच्या दुधावर बाळाचा हक्क समाज मानतो. त्यामुळे कोणीही मुलं कचरापेटीत, सार्वजनिक ठिकाणी फेकून पळून जात नाही. नवजात मृत अर्भक पुरून टाकण्याची गरज पडत नाही. कारण अशा संततीला सामाजिक मान्यता आहे. त्यामुळे माझ्या शहरातून आलेल्या पत्नीच्या डोक्यात अनाथ बालिका आश्रम उघडण्याचा जो विचार होता तो आजतागायत पूर्ण झाला नाही. तिला त्याबद्दल अर्थातच आनंद वाटतो. जी गोष्ट अनाथालयची तीच गोष्ट वृद्धाश्रमाची. प्रत्येक घराला वृद्धांची गरज आहे. वृद्ध घरात असणे प्रतिष्ठेचे आहे. त्यामुळे वृद्धाश्रम येथे निर्माण झाले नाही. समाजातील स्त्रिया मोकळेपणाने गावात आणि जंगलात दिवसाच नव्हे तर रात्रीही िहडू-फिरू शकतात, नाचू-गाऊ शकतात. हे आमचेच निरीक्षण आहे असे नाही तर जिम कॉब्रेटने सुद्धा ‘मेरा भारत’मध्ये आदिवासी स्त्री ही जंगलाची राणी आहे, हातात प्राण्यांपासून स्वरक्षणासाठी कोयता असला की ती घनदाट जंगलात एकटी फिरते असे निरीक्षण नोंदले आहे.

आणखी एक स्त्री जीवनाचा महत्त्वाचा पलू असा की, येथे हुंडाबळी नाहीत. हुंडय़ासाठी कोणा मुलीचा विवाह थांबत नाही. उलट स्त्रीधनापोटी तिच्या वडिलांना लग्नखर्चाचा काही भाग वर पक्षाकडून मिळतो. विवाहित स्त्री जी मजुरी मिळवते त्यावर फक्त तिचाच अधिकार असतो, पतीचा नाही. पतीने जर तिची घमोडी (घामाने मिळवलेली रक्कम) हडपण्याचा, हिसकवण्याचा वा हिरावण्याचा प्रयत्न केला तर ती गावपंचायतीसमोर दाद मागते व पंचायत तिला न्याय देते. तिची रक्कम परत करायला लावते व पतीला दंडही सुनावते. स्नानासाठी स्त्री आणि पुरुषांचे पाणवठे प्रत्येक गावात वेगवेगळे आहेत. स्त्रियांच्या स्नानाच्या जागेकडे पुरुष फिरकत नाहीत. जर एखाद्या माथेफिरूने असा प्रयत्न केला तर तो वाळीत टाकला जातो. अशा अनेक चांगल्या प्रथा येथील संस्कृतीत असल्यामुळे आम्हाला येथील समाजात सामावून जाणे सहज शक्य झाले.

असे असले तरी अजून येथे बऱ्याच सुधारणा होणे गरजेचे आहे. दळणवळणाच्या सोयी, आरोग्याच्या अधिक सोयी येथे होणे आवश्यक आहेत आणि त्यासाठी अधिकाधिक तरुण आणि सक्षम हातांची गरज आहे.

(समाप्त) chaturang@expressindia.com