13 July 2020

News Flash

आयुष्यभराची शिदोरी

बाईला कॅम्पाउंडर डॉक्टरने वाचवलं ही बातमी गावात तसेच सर्व आदिवासी समाजात अफवेसारखी पसरली.

डॉ.रवींद्र कोल्हे ravikolhemelghat@gmail.com

बाईला कम्पाउंडर डॉक्टरने वाचवलं ही बातमी गावात तसेच सर्व आदिवासी समाजात अफवेसारखी पसरली. घरी पोहचलो. भयंकर भूक लागल्याची जाणीव झाली. आम्ही चूल पेटवून खिचडी मांडली. वाफ दिल्याबरोबर ताटात ओतून खिचडीला हात लावणार तोच दुसरे बोलावणे आले, पुन्हा बाळंतपणासाठी हजर होण्यासाठी. हरद्याला जाऊन पाहतो तर मातब्बर देवसा पटेलची पहिलटकरीण सून अडलेली होती. एकाच दिवशी दोन बाळंतपणाच्या केसेस म्हणजे आंधळा मागतो एक डोळा अन् देव देतो दोन. सहा महिने वाया गेलेले नव्हते, तर आयुष्यभराची शिदोरी त्या सहा महिन्यांनी दिल्याची जाणीव झाली..

अडीच महिने भटकंती करत असताना, बैरागडचा शोध लागला, पण हा सल्लाही मिळाला, ‘इथे राहू नका. सरकारी नोकरी करा. आदिवासी अंधश्रद्धाळू आहेत. तुमच्याकडे रुग्ण येणार नाहीत. प्रॅक्टिस करायची आहे तर धारणीसारख्या तालुक्याच्या ठिकाणी करा, जेणेकरून काही लोक फायदा घेतील.’ मात्र मी ठरवले की बैरागडलाच जायचे. एकीकडे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यांची सीमारेषा ठरवणारी तापी नदी तर दुसरीकडे लहानपणापासून मला खुणावणारा सातपुडा पर्वत, म्हणजे दुधात साखरच. ‘दुरून डोंगर साजरे’ ही म्हण मी ९ फेब्रुवारी १९८५ रोजी ‘जवळून डोंगर साजरे’ अशी केली.

सातपुडा ओलांडून बरागडला स्थायिक होण्याचे ठरवले. गावात डॉक्टर नव्हताच. मी मनाशी ठरवले की, दोन महिने एकही रुग्ण आला नाही, तरी झाडाखाली बसून वाट पाहायची. त्यानंतरच पुनर्वचिार करायचा, पण ती वेळ माझ्यावर आली नाही. पहिल्या दिवशी माझ्याकडे तीन रुग्ण आले. पहिला रुग्ण सांगत आला की मला थंडीताप आहे. मलेरिया डॉक्टरकडून गोळी आणली, घेतली आणि उलटय़ा सुरू झाल्या. निदान अगदी सोपे होते. क्लोरोफिलमुळे झालेला जठरदाह. त्यामुळे माझी कोंडी झालीच नाही. दोन महिने संपेपर्यंत रोज २० रुग्ण येऊ लागले.

पण दीड महिना उलटून गेला तरी एकही बाळंतपणाची केस माझ्याकडे आलेली नव्हती. उगाचच मनाशी वाटायचे की, सहा महिने मुंबईला जाऊन महानगरपालिकेच्या सूतिकागृहात बाळंतपण हा विषय डॉक्टर दिनू दयाळ व मॅडम आहुजा यांच्या हाताखाली तत्परतेने व तन्मयतेने शिकलो. आयुष्यातील ते सहा महिने वाया गेले की काय? मुस्लीम लोक तर म्हणायचे, ‘डॉक्टर साहेब गोंड कोरकू की बाई जचकी (बाळंतपण) भले ही एक बार आएगी। लेकिन हमारी गोसा पडदा वाली बाई मर जाएंगी लेकिन मर्द डॉक्टर के पास नही आयेगी।’ चिंता आणखी वाढू लागली. मात्र बरोबर पावणेदोन महिने झाले असतील. मी आणि दिलीप दुपारच्या वेळी स्नानासाठी व कपडे धुण्यासाठी तापीतील काजळी बनात गेलो असता, कोणी तरी आम्हाला आवाज देत आहेत असे वाटले. किनाऱ्याकडे पाहतो तर गणीशेठ ट्रॅक्टर घेऊन आमच्याकडे येत होते. ‘‘जल्दी चलो, जल्दी चलो. कुटंगा के सरपंच के घर के लोगोनकी जचकी सुभह हुआ ओर अभी २ बजे तक फुल (नाळ) गिरा नही।’’ त्या परिस्थितीत आम्ही लगबगीने कपडे आवरले. ट्रॅक्टरवर स्वार झालो. गणीशेठने आमच्या घरासमोर ट्रॅक्टर उभा केला. आम्ही बाळंतपणासाठीची इमर्जन्सी किट उचलली आणि त्यांच्याच बरोबर कुटंगाच्या सानु मोतीराम यांच्या घरी गेलो. घरासमोर अख्खा गाव गोळा झाला होता. सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट काळी रेघ उमटलेली होती. कारण कुटंग्याकडे जात असतानाच गणीशेठने माहिती दिली होती की,  जिल्हा परिषदेच्या माजी सदस्यांची पत्नी अशीच बाळंत झाल्यावर फुल न पडल्याने अमरावतीला नेत असताना रस्त्यातच मरण पावली होती. त्यामुळे सगळेच चिंताग्रस्त होते.

आम्ही घरात गेलो. गुटगुटीत बाळ मुठी आवळून आईला लाथ मारत होते. नाळ न कापल्याने ते आईच्या योनी मार्गाच्या जवळ होते. दिलीप म्हणाला, ‘‘रवी तुला इथे राहावयाचे आहे. माझे तर अजून काही पक्के झालेले नाही. तर ही केस तूच हाताळावी म्हणजे या लोकांचा तुझ्यावरील विश्वास वाढेल.’’ मी पुढची प्रक्रिया सुरू केली, नाळ कापली आणि आईकडे स्तन्यपानासाठी द्यायला म्हणून बाळाला सुईणीकडे सोपवले. पहिल्या आरोग्य शिक्षणाचा धडा सुईणीला दिला की, नाळेला काहीही लावू नये. नाळ आपोआप काही दिवसांनी पडत असते, तोवर वाट पाहावी.

बाईला कॅम्पाउंडर डॉक्टरने वाचवलं ही बातमी गावात तसेच सर्व आदिवासी समाजात अफवेसारखी पसरली. आम्ही कुटंग्याला जाताना मोजके शब्द बोलणारे गणीशेठ बरागडला परतताना मात्र हशांचे कारंजे उडवत होते. घरी पोहोचलो. भयंकर भूक लागल्याची जाणीव झाली. आम्ही चूल पेटवून खिचडी मांडली आणि वर परात ठेवून ती लवकर शिजावी म्हणून वाट पाहू लागलो. वाफ दिल्याबरोबर ताटात ओतून खिचडीला हात लावणार तोच दुसरे बोलावणे, पुन्हा बाळंतपणासाठी हजर होण्यासाठी. हरद्याला जाऊन पाहतो तर मातब्बर देवसा पटेलची पहिलटकरीण सून अडलेली होती. तिला मी फॉरसेप्स लावून बाळंतपण केले. एकाच दिवशी दोन बाळंतपणाच्या केसेस म्हणजे आंधळा मागतो एक डोळा अन् देव देतो दोन. सहा महिने वाया गेलेले नव्हते, तर आयुष्यभराची शिदोरी त्या सहा महिन्यांनी दिल्याची जाणीव झाली.

हळूहळू गावागावातून बाळंतपणासाठी बोलावणे येऊ लागले. अडलेल्या बाळंतिणी काकुळतीने म्हणायच्या, ‘कोल्हे डॉक्टर को बुलाव’. या सगळ्याचे श्रेय डॉ. दिनू दयाळ आणि डॉ. आहुजा यांना आहे. त्यांनी मला लहान बाळाला जसे आपण एक, दोन, तीन शिकवतो. तो चुकीचा गिरवत असेल तरी न रागावता त्याची चूक दुरुस्त करतो त्याप्रमाणे आयुष्यभराची शिदोरी दिली. सोबत हाही विश्वास दिला, ‘कधी पशांसाठी अडले तर २५ पशांचे पत्र टाक. आम्ही आहोत.’ मॅडमना स्वत:च्या आयुष्यात पाहिलेले स्वप्न मी पूर्ण करणार, असा विश्वास वाटला असावा.

एक दिवस पहाटे अजान झाली आणि युसूफ सेठने आवाज दिला. ‘‘डॉक्टर शाब उठो तुम्हारी चाची जचकी मे मरने को है। कल दोपरसे उनको खूब दर्द है। जचकी नाही हो रही है।’’ मला माहीत होते त्यांची पत्नी हृदयविकाराच्या आजाराने पीडित होती. जाऊन पाहतो तर ती निपचीत पडलेली होती. २० तास कळा देऊन प्रचंड थकली होती. मी त्यांना आणि तिला धीर दिला. तासाभरानंतर तिचे बाळंतपण सहजी आटोपले. मुस्लीम स्त्रिया माझ्याकडे येणारच नाहीत, हा समजही दूर झाला. याचा मला सार्थ अभिमान वाटला. गावातील श्रीमंतांच्या घरचे बाळंतपण पुरुष डॉक्टरच्या हाताने झाल्याने गरिबांचाही मार्ग मोकळा झाला. त्यानंतर त्यांचीही बाळंतपणे माझ्याकडे येऊ लागली. पण बाळंतपणातीलच एका घटनेने पुढे शिकायला जाण्याची गरज निर्माण केली.

‘‘अब ये डॉक्टर पहले जैसे नही रहा। लाश को रोककर बठा है। बहुत लालची बन गया है।’’ केस बाळंतपणाच्या नंतर धनुर्वाताची होती. अर्थातच गर्भधारणा झाल्यानंतर धनुर्वाताची लस त्या बाईला मिळाली नव्हती. मीही चंग बांधला होता की तिला पायी चालतच घरी पाठवायचे. धनुर्वाताने मरू द्यायचे नाही. मला माझ्या मानलेल्या आईची सोबत मिळालेली होती. गीताताई म्हसकार (घटलाडकी तालुका, चांदुर बाजार) माझा उत्साह वाढवत स्वत: वेळी-अवेळी जागत त्या आणि मी रुग्णाची देखभाल करत होतो. आठ दिवसांनी रुग्णाने डोळे उघडले. आमचा आनंद गगनात मावेना. ताईंनी मायेचा हात तिच्या आणि माझ्या डोक्यावरून फिरवला. मला मिळालेला सगळ्यात मोठा पुरस्कार होता तो. ती स्त्री चालत तिच्या घरी गेली, मात्र वर्षभरात दोन स्त्रिया आणि ४ अर्भके पहिल्या वर्षांतच धनुर्वाताने माझ्याच दवाखान्यात दगावली. ज्यांच्यामुळे मी एम.डी. करण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला.

मधल्या काळात गीताताईंमुळे आणखी एक गोष्ट झाली. त्यांचे परिचित पोलीस इन्स्पेक्टर धारणीला बदलून आले. ते डय़ुटीवर आले असताना त्यांनी दोन पथ्ये सांगितली. मेळघाटात यशस्वी व्हायचे असेल तर तुमच्या मुलाला म्हणावे एक भागणी (मोलकरीण) ठेवू नको आणि दोन शिडू (मोहाची दारू) पिऊ नको. त्या वर्षांतच रामनवमीच्या बिलद ढाणू यात्रेत जाण्याचा प्रसंग आला. तेथे मोठय़ा प्रमाणावर पशुपक्ष्यांचे बळी दिले जात होते. ते पाहिले आणि रात्रभर बिछान्यात तळमळत होतो. महात्मा गांधी, विनोबा भावे, गाडगेबाबा डोळ्यांसमोरून हलत नव्हते. विनोबांनी सांगितलेले सूत्र आठवले. काही बदलायचे असेल तर त्याला पर्याय द्या. मग ठरले की, बळी प्रथा बंद करायची. व्यसनाधीनता कमी करायची तर या उत्सवांना खेळाची जोड द्यावी लागेल. पुढील वर्षी कबड्डी व हॉलीबॉल हे सामने त्याच पर्वात सुरू केले अन् छातीएवढा मुंडक्यांचा ढीग गुडघ्याएवढा झाला. पुढे माझे लग्न झाल्यानंतर माझी पत्नी स्मिता माझ्यावरच हरकत घेऊ लागली की, तुम्हाला यात्रेत बळी कसे चालतात. मी तिला वस्तुस्थिती समजावून सांगितल्यावर दोघांचे असे ठरले की, पुढील वर्षी स्वत:ची मान देऊन बळी बंद करायचे. त्याप्रमाणे १९९१ पासून रक्ताचा एकही थेंब आजपावेतो पडलेला नाही.

लग्न होण्याआधीचे दीड वर्ष गणीशेठने मला त्याची ओसरी झोपायला, त्याचे बंद पडले दुकान दवाखान्यासाठी दिले. माझ्यासाठी रुग्ण, त्यांचे नातेवाईक, माझे मित्र व नातेवाईक या सगळ्यांना विनामूल्य जेवूखाऊ घातले. गणीशेठ जरी अशिक्षित होते तरी ते अनुभवाने औषधाचे नाव घेताच पटकन बॉक्स काढून देत असत. सगळे गावकरी त्यांना कंम्पाउंडर म्हणून चिडवत असत. माझे लग्न झाल्यानंतर गावकऱ्यांनी जे घर (झोपडी) बांधून दिली त्यात गणीशेठचाच पुढाकार होता.

एम.डी. करताना माझे शिक्षक प्राध्यापक इंगोले मॅडम, पाठक मॅडम, वासुदेवन या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली १९८६ ते १९८८ दरम्यान मी मेळघाटच्या माता आणि बालमृत्यूंचा सखोल अभ्यास केला. त्यातून पुढे कुपोषण शब्दाचा जन्म झाला. मॅडम पाठकांनी मला अभ्यास किती सखोल असावा याचे मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, ‘स्काय इज द लिमिट.’ अन् खरोखरच पुढे बीबीसी रेडिओने माझी सखोल मुलाखत प्रसिद्ध करून माझ्या थीसिसला क्षितिजापलीकडे पोहोचवले. त्याचाच डेटा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे मांडण्यात आला आणि मेळघाटच्या बालमृत्यूचा प्रश्न जगासमोर आला. वृत्तपत्रांनी आणि पुढे १९९७ नंतर इलेक्ट्रॉनिक मीडियानेदेखील या प्रश्नाला सक्रिय पाठिंबा देऊन त्याचे विविध पलू जनतेसमोर आणले. हा प्रश्न सोडवण्यासाठीची राजकीय इच्छाशक्ती १९९३ मध्ये सर्वप्रथम जागरूक झाली. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांनी मेळघाटला भेट दिली. वस्तुस्थिती समजून घेतली व उकल सुरू झाली. नंतरच्या काळात प्रत्येक मुख्यमंत्र्याने मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यावर महिन्याच्या आताच मेळघाटला अवश्य भेट दिली.

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 1:01 am

Web Title: dr ravindra kolhe transformed the lives of the tribals of melghat
Next Stories
1 निर्धार पक्का झाला..
2 स्त्रीपुरुष समता : भविष्याचा वेध
3 सुधारणेचे विविध उपक्रम
Just Now!
X