30 May 2020

News Flash

मानियले नाही बहुमता..

इंग्रजीच्या भीतीतून सहावीला शाळा सोडल्यानंतर मी एम.ए. इंग्रजीत केले.

|| डॉ. शमसुद्दीन तांबोळी

इंग्रजीच्या भीतीतून सहावीला शाळा सोडल्यानंतर मी एम.ए. इंग्रजीत केले. याच विषयाचा प्राध्यापक झालो. नंतर एम.एड. एलएलबी आणि पीएच.डी. केली. दहा पुस्तकांचे लेखन संपादन केले. यासाठी मला पाठबळ व प्रोत्साहन देणाऱ्यांनी मी मुस्लीम असल्याचा पक्षपाती विचार किंचितही येऊ दिला तर नाहीच, उलट माया दिली. हा आजच्या बदलत्या काळात फार मोठा संदेश आहे. समाजातील फार थोडेच लोक पक्षपाती असतात, असा अनुभव मी अनेक वेळा घेतला आहे. आयुष्यात यश-अपयश, चढ-उतार आले, वाद-प्रतिवाद झाले. संघर्ष करावा लागला तरीही, ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता’ हेच ब्रीद जोपासले.

प्रा. डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी हमीद दलवाई यांचे ‘लोकशिक्षणातील योगदान’ या विषयावर पीएच.डी. केली असून ते मराठवाडा मित्र मंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळा’चे ते अध्यक्ष असून ‘मुस्लीम सत्यशोधक पत्रिके’चे संपादकही आहेत. ‘प्रोग्रेसिव्ह मुस्लीम फोरम’, ‘राष्ट्रीय एकात्मता समिती’, ‘एस. एम. जोशी शिक्षण व आरोग्य निधी’ या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांची दहाहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘हमीद दलवाई स्टडी सर्कल’ची त्यांनी स्थापना केली आहे. मुस्लीम स्त्रियांच्या प्रश्नावर त्यांनी विशेष कार्य केले असून त्यांच्या कार्याचा गौरव अनेक मान्यवर संस्थांनी पुरस्कार देऊन केला आहे.

परभणी जिल्ह्य़ातील राणीसावरगाव हे माझे जन्मगाव. मंगळवारचा आठवडा बाजार आणि रेणुकादेवीचे दर्शन घेण्यासाठी आजूबाजूचे लोक मोठय़ा संख्येने येत. त्या काळी गावात मोजकीच किराणा दुकाने होती. मोहीदिन म्हणजे माझ्या वडिलांचे किराणा दुकान म्हणजे ग्राहकांची अक्षरश: रांग. तसे हे छोटेखानी दुकान, पण प्रामाणिकपणा आणि सज्जनपणा याची ख्याती लोकांची गर्दी वाढवणारी होती. आईवडिलांना एकूण नऊ  अपत्ये झाली. त्यात मी आठवा. माझा धाकटा भाऊ  जन्मत: मनोदुर्बल होता.

गावात जिल्हा परिषदेची शाळा आणि एक स्वतंत्र कन्याशाळा होती. माझ्या भावंडांपैकी कोणीही दहावी पार केली नाही. मी शाळेत जावं, असं आईला वाटायचं, तर वडिलांना मी दुकानात काम करावं, असं वाटायचं. दुकानात शाळेतील शिक्षक मासिक खातेदार होते. त्यांनीच माझ्या वडिलांना सांगितलं, ‘‘मोहीदिनभाई, एक तो बच्चे को मदरसेमें डालो..’’ मदरसा हा शब्द शाळा या अर्थाने वापरला जाई. वडिलांना पटवून केंद्रे गुरुजींनी मला शाळेत प्रवेश घेऊन दिला. १ जून ही माझी जन्मतारीख त्यांनीच ठरवली आणि १९६२ हे वर्षही. तिसरी-चौथीत असतानाच मला शाळेचा कंटाळा आला. घरातील धड उर्दू-हिंदी नसलेली मुसलमानी भाषा आणि शाळेतील शुद्ध मराठी भाषा यांनी माझा गोंधळ उडवला. पाचवीला अनिवार्य आलेली इंग्रजी भाषा भुतासारखी वाटत होती. सहावीला असतानाच इंग्रजीच्या गुरुजींनी इंग्रजी शब्दाचे स्पेलिंग आणि अर्थ सांगता आला नाही म्हणून शेंदीच्या फोकाने फोडले. मी शाळेला रामराम ठोकला. शाळा सोडून दिल्यानंतरच्या वर्षांने मला अनेक वाईट अनुभव दिले. शिक्षणाशिवाय असणाऱ्या जगण्यातील विदारकता या वयात जाणवली. स्वातंत्र्यदिनी, प्रजात्ताकदिनी शाळेतील स्पर्धा, जल्लोष, प्रभातफेरी या वातावरणाने पुन्हा शाळेचे आकर्षण वाढवले. आमच्या शेजारी राहणाऱ्या रमेशराव कुलकर्णी गुरुजींनी मला पुन्हा शाळेत प्रवेश मिळवून दिला. आता आत्मप्रेरणा निर्माण झाली होती. समजून घेण्याची, स्पर्धा करण्याची आणि अभ्यासाची ओढही वाढली. खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्याचे हे टर्निग पॉइंट ठरले.

दहावीनंतरच्या शिक्षणासाठी गावातील विद्यार्थी या भागातल्या जिल्ह्य़ाच्या ठिकाणी जात. रामचंद्र कांगणे, गंगाधर गीते, आडे गुरुजी आणि इतर शिकलेल्या तरुणांनी गावात समाजसुधारक मंडळ सुरू केले होते. मी समाजसुधारक मंडळाकडे आकर्षित झालो. त्यांच्यासोबत कार्यक्रमात सहभागी होत होतो. फुले, आगरकर, आंबेडकर या सुधारकांच्या प्रेरणादायी विचाराने भारावून आम्ही हा वसा चालवण्याचा प्रयत्न करीत होतो. हे गावातील काही उच्चवर्गीय आणि प्रस्थापितांना आवडत नव्हते. याच काळात मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे यासाठी आंदोलन भडकले होते. ‘घरात नाही पीठ अन् मागतायत विद्यापीठ’ अशी घृणा पसरवणारी भाषा कानावर यायची. यातूनच गावात वाद, भांडणे, मारामारी झाली. समाजसुधारक मंडळाचे कार्यकर्ते पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांनाच डांबले. मलाही पोलिसांनी पकडून गंगाखेडच्या पोलीस स्टेशनवर डांबले. विजेचे शॉक देत असत. मी अल्पवयीन असल्याने मला परभणीच्या रिमांड होममध्ये ठेवले. या बाल सुधारगृहात मुस्लीम मुलांची संख्या जास्त होती. मुले फार विचित्र वागत. माझ्या थोरल्या भावाने चार-पाच दिवसांत मला तेथून बाहेर काढले होते. तळागाळातील विदारकतेचे दर्शन मी कमी वयात अनुभवले. आमच्यावर गावात आणि पोलिसांनी केलेल्या अन्यायाची माहिती देण्यासाठी आम्ही तेव्हाच्या गृहराज्यमंत्र्यांना पत्र पाठवले होते. आश्चर्य हे की, आमच्या त्या साध्या पत्राची नोंद घेऊन आम्हाला दिलासा देणारे पत्र व चौकशीचे आदेश गृहराज्यमंत्र्यांनी दिले होते. हे गृहराज्यमंत्री भाईं वैद्य होते.

मुस्लीम स्त्रियांचे प्रश्न किती गंभीर असतात आणि पुरुषी अहंकार कोणत्या थराला जाऊ शकतो हा अनुभव मला घरातच आला माझ्या मोठय़ा बहिणीच्या रूपान! मुस्लीम स्त्रियांच्या अनेक व्यथा मला लहान वयातच अनुभवाला मिळाल्या. मी इयत्ता नववी-दहावीला परभणीतील मराठवाडा हायस्कूलमध्ये शिकायला आलो होतो. मला परभणीच्या शासकीय मुलांच्या वसतिगृहात प्रवेश मिळाला होता. माझे वर्गशिक्षक अशोक परळीकर होते. माझी मराठी भाषा, माझ्या सवयी, अभ्यासाची ओढ यामुळे त्यांना माझ्याविषयी आस्था होती. माझ्या शाळा सोडण्याच्या दाखल्यावर माझे नाव ‘शमशु’ होते. अशोक परळीकरांनी त्याचे ‘शमसुद्दीन’ केले. हैदराबाद मुक्तिसंग्रामावर त्यांनी पुस्तक लिहिले होते. हमीद दलवाई यांच्याविषयी सर्वप्रथम माहिती त्यांनीच मला दिली. दहावीनंतर मी पुण्याला जावे हे त्यांनीच सुचवले. पुण्याला ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळा’च्या संपर्कात राहण्याचा सल्ला त्यांनीच दिला होता. मी दहावीला उत्तम गुण मिळवून शाळेत प्रथम आलो आणि मला पुण्यातील संत ज्ञानेश्वर या शासकीय मुलांच्या वसतिगृहात प्रवेश मिळाला.

पुण्याला माझ्या परिचयातील कोणीच नव्हते. वसतिगृहाचे गृहपाल विठ्ठलराव सोनवणे यांनी मला फार सहकार्य केले. गंगाखेडचे प्राचार्य आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामदास डांगे यांनी शाहू महाविद्यालयात जाण्याचा सल्ला दिला. प्राचार्य व. वा. देशमुख यांच्या नावे शिफारसपत्र दिले. देशमुख सरांनी मला प्रवेश दिला. मी ११ वी ते बी.ए.पर्यंतच्या परीक्षेत महाविद्यालयात प्रथम येत होतो. राष्ट्रीय सेवा योजनाच्या विविध उपक्रमांत आघाडीवर होतो. या काळात माझी प्रा. विलास चाफेकर सरांशी ओळख झाली. त्यांनीच घेतलेल्या सामाजिक जाणीव शिबिरात माझी ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळा’चे सय्यदभाई यांच्याशी ओळख झाली. चाफेकर सर ‘प्रवाही’ मासिक काढत होते. त्या संपादक मंडळात मला घेण्यात आले होते. थोडय़ाच दिवसांत माझी अजित सरदार, वसुधा सरदार यांच्याशी ओळख झाली. विचारवंत प्रा. गं. बा. सरदार यांच्या घरी मी, हरी नरके, अविनाश हावल, संजय पवार, विद्या कुलकर्णी व इतर तरुण सामाजिक विषयावर चर्चा व विविध उपक्रम चालवण्यासाठी नियमित भेटत असू. याच काळात माझी विनायकराव कुलकर्णी यांचीही ओळख झाली.

सय्यदभाईंनी मुस्लीम सत्यशोधक मंडळाचा रास्तापेठ येथील पत्ता दिला होता. तेथे दररोज सायंकाळी कार्यकर्ते येत. तेथे मुस्लीम महिला मदत केंद्र चालवत. आठवडय़ातून किमान एक-दोन तलाकची नवी प्रकरणे घेऊन स्त्रिया आणि त्यांचे कुटुंबीय येत असत, त्यांच्या समस्या मांडत. यातून मला मुस्लीम प्रश्न अधिक समजत गेला. मी मंडळात सक्रिय झालो. मंडळामार्फत आयोजित केलेल्या अभ्यास शिबिरात एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, यदुनाथ थत्ते, प्रा.ग. प्र. प्रधान, भाई वैद्य, बाबा आढाव, बाळासाहेब भारदे, प्रा. मे. पु. रेगे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, रा. प. नेने, पन्नालाल सुराणा, डॉ. सत्यरंजन साठे आणि अशा अनेक मान्यवरांच्या विचारातून मुस्लीम समाजप्रबोधन, धर्माधता, धर्मवादी राजकारण, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा, समान नागरी कायदा यांसारखे विषय समजून घेत होतो. यानिमित्ताने हमीद दलवाई यांच्यासमवेत कार्य करणाऱ्या अनेकांशी संवाद वाढला. हमीद दलवाई यांच्या कार्याचे मोल समजू लागले.

१९८५ मध्ये तेव्हाच्या पुणे विद्यापीठातील इंग्रजी विभागात मी एम.ए. करीत होतो. याच काळात सर्वोच्च न्यायालयाने शहाबानो प्रकरणात निवाडा दिला. या वेळी मुस्लीम जमातवादाचे उग्र स्वरूप पाहाता आले. सय्यदभाई, मेहरुन्निसा दलवाई, हुसेन जमादार आणि मंडळाच्या इतर कार्यकर्त्यांसोबत मी दिल्लीला जाऊन तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी, राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग, कायदामंत्री अशोक सेन यांना भेटून शहाबानो प्रकरणात न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवावा आणि मुस्लीम व्यक्तिगत कायद्यात सुधारणा करावी, अशी मागणी केली. या काळात आंदोलने, उपोषण, परिषदाचे आयोजन करून मुस्लीम स्त्रियांच्या प्रश्नावर सरकार दरबारी आणि लोकदरबारी आवाज उठवत होतो. या काळात सय्यदभाईंबरोबर तमिळनाडू, मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश अशा विविध राज्यांत जाऊन परिषदांचे आयोजन आणि लोकसंपर्क करीत होतो. या प्रयत्नांतून ‘ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह मुस्लीम कॉन्फरन्स’ची स्थापना झाली. त्याचा खजिनदार व नंतर सरचिटणीस म्हणून काम करताना स्वत:ला अनुभवांनी विस्तारत गेलो.

हमीद दलवाई यांच्याविषयी अत्यंत आदर असणारे, दलवाई यांना उर्दू नियतकालिकातील महत्त्वाच्या लेखांचे मराठीत अनुवाद करणारे ज्येष्ठ पत्रकार स. मा. गर्गे यांची ओळख झाली होती. ते पुण्यातील मराठवाडा मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष होते, तर शंकरराव चव्हाण हे अध्यक्ष होते. मराठवाडय़ातील मान्यवरांनी पुण्यात काढलेल्या संस्थेबद्दल मला मनापासून आदर वाटत होता. माझ्यासोबत बीएड करणाऱ्या प्रा. ज्योती कदम (गायकवाड) यांच्याकडून या महाविद्यालयात इंग्रजी विषयासाठी प्राध्यापक पदाची जागा असल्याचे समजले. मी ताबडतोब प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांना भेटायला गेलो. मी मराठवाडय़ाचा असल्याने तसेच माझ्या सामाजिक कार्याचे महत्त्व विचारात घेऊन त्यांनी मला महाविद्यालयात नोकरी देण्यास होकार दिला. गेली जवळपास तीन दशके मी या महाविद्यालयात आहे. मी आज ज्या ठिकाणी आहे तिथपर्यंत येण्यासाठी या संस्थेचे योगदान मोठे आहे.

हमीद दलवाई यांचा समाजप्रबोधनाचा वारसा पुढे घेऊन जायचा असेल तर हमीद दलवाई सर्वार्थाने समजून घेतले पाहिजेत, या विचाराने मी हमीद दलवाई यांच्यावर पीएच.डी. करण्याचे ठरवले. सावित्रीबाई पुणे विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विभागात संशोधन कार्य केले. या काळात माझे संशोधन मार्गदर्शक डॉ. सुनंदा ऐडके यांनी मार्गदर्शनच नाही तर सतत प्रेरणा दिली. दलवाई यांच्यावर पीएच.डी.चे कार्य माझ्याकडून झाले, याचे मोठे समाधान वाटते.

मला या ठिकाणी आनंदाने सांगावेसे वाटते की, इंग्रजीच्या भीतीतून सहावीला शाळा सोडल्यानंतर मी एम.ए. इंग्रजीत केले, याच विषयाचा प्राध्यापक झालो. नंतर एम.एड. एलएलबी आणि पीएच.डी. केली. दहा पुस्तकांचे लेखन संपादन केले. या सर्व उपलब्धीसाठी मला पाठबळ व प्रोत्साहन देणाऱ्यांनी मी मुस्लीम असल्यामुळे पक्षपाती विचार किंचितही येऊ दिले तर नाहीच, उलट माया दिली. हा आजच्या बदलत्या काळात फार मोठा संदेश आहे. समाजातील फार थोडेच लोक पक्षपाती असतात. असा अनुभव मी अनेक वेळा घेतला आहे.

हमीद दलवाई म्हणत- व्यक्तिगत कायद्याच्या बळी ठरलेल्या मुस्लीम स्त्रिया स्वत:हून रस्त्यावर येतील आणि आधुनिक शिक्षण घेणारे तरुण जेव्हा वाढतील तेव्हाच मुस्लीम समाजप्रबोधनाचा विचार पुढे जाईल. आज भारतात आणि जगात जमातवादी दहशतवादी कारवाया वाढत आहेत. त्याबरोबरच अनेक स्त्रिया सर्वोच्च न्यायालयात दाद मागत आहेत. दमनशक्तीविरोधात महिला संघटना आंदोलन करीत आहेत. आधुनिक शिक्षण घेणाऱ्या मुस्लीम तरुणांचा ओढा मंडळाकडे वाढत आहे. त्यामुळे कामासाठी हवी तेवढी ऊर्जा मिळत आहे. प्रतिकूलता कितीही उग्र असली तरी जीवनात प्रयोजन असल्याने निराशेतून काम सोडून देण्याचा विचार मनाला शिवत नाही. व्यक्तिगत जीवनात मोठय़ा प्रमाणात यश-अपयश, चढ-उतार आले, वाद-प्रतिवाद झाले, संघर्ष करावा लागला तरीही, ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता’ हे संत वाक्य आणि  ‘..अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप ..’ हे ब्रीद हवी तेवढी प्रेरणा देते. समाजभान कायम राहण्यासाठी आणखी काय हवे?

tambolimm@rediffmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2018 2:55 am

Web Title: girls education in islam
Next Stories
1 सत्यमेव जयते!
2 चळवळी, मोहिमा, शिबिरं
3 वैद्यकीय कार्याकडून समाजसेवेकडे
Just Now!
X