13 December 2017

News Flash

मार्ग शोधताना..

मॅगसेसे पुरस्कारविजेत्या नीलिमा मिश्रा यांचा जन्म जळगाव जिल्ह्य़ातल्या बहादरपूर या गावी झाला.

नीलिमा मिश्रा | Updated: August 5, 2017 1:01 AM

आज ग्रामीण भागातील शेतकरी व स्त्रियांच्या रोजगाराचे काम मोठय़ा प्रमाणावर यशस्वीपणे उभे राहिले आहे.

मी स्वतंत्र व्यक्ती आहे आणि मला माझ्या समाजासाठी काही करायचे आहे, याचा शोध, नीलिमा मिश्रा यांना खूप लवकर लागला आणि त्यातूनच वयाच्या १३ व्या वर्षीच लग्न न करण्याचा आणि समाजासाठी पुढचे आयुष्य झोकून द्यायचा निर्णय त्यांनी घेतला. अर्थात नेमकं काय आणि कसं करायचं या  शोधप्रवासात अनेक जण भेटत गेले, अनेक गोष्टी होत गेल्या आणि आकाराला आलं एक मोठं काम.. ग्रामीण लोकांसाठीचं. जे त्यांना रेमन मॅगसेसे पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार देऊन गेलं. हा प्रवास कसा होता, हे सांगणारे नीलिमा यांचे चार लेख दर शनिवारी.

मॅगसेसे पुरस्कारविजेत्या नीलिमा मिश्रा यांचा जन्म जळगाव जिल्ह्य़ातल्या बहादरपूर या गावी झाला. धुळ्यातील जय हिंद महाविद्यालयात मानसशास्त्र या विषयात पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून क्लिनिकल सायकॉलॉजी या विषयात एम.ए. ही पदवी घेतली. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी १९९५ ते २००३ या काळात डॉ. एस. एस. कलबाग यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पुणे जिल्ह्य़ातील पाबळ येथील विज्ञान आश्रमात काम केले. तेथे त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडतानाच तरुणांसाठी आणि स्त्रियांसाठी कार्य केले. बचतगटाच्या माध्यमातून ग्रामीण विकास साधता येतो हे लक्षात घेऊन त्यांनी २००० मध्ये स्त्री सक्षमीकरणासाठी ‘भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन’ची स्थापना केली. तर २००८ मध्ये ‘भगिनी निवेदिता फाऊंडेशन’ची स्थापना केली. या दोन्ही संस्थांचे कार्य उत्तर महाराष्ट्रातल्या ४ जिल्ह्य़ांमध्ये चालते. प्रथम बहादरपूर येथे महिलांचा बचतगट त्यांनी तयार केला. तेथे तयार केलेल्या बचत गटाच्या माध्यमातून गोधडी बनवण्यास सुरुवात केली. बहादरपूरच्या ‘गोधडय़ा’ विदेशात लोकप्रिय झाल्या आहेत. नीलिमा यांनी पूर्व खान्देश व पश्चिम खान्देशात बचत गटाचे जाळे तयार करून महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्यांनी ऊसतोडणी कामगारांच्या सावकाराकडे गहाण असलेल्या जमिनी सोडवून दिल्या. त्यांच्या या कार्याचा गौरव प्रतिष्ठेचा रेमन मॅगसेसे पुरस्काराने करण्यात आला. त्याचप्रमाणे २०१३ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

आज ग्रामीण भागातील शेतकरी व स्त्रियांच्या रोजगाराचे काम मोठय़ा प्रमाणावर यशस्वीपणे उभे राहिले आहे. आत्तापर्यंतच्या प्रवासातील अनुभवातून या कामाची वाटचाल सुरू आहे. प्रगतीचा एक एक टप्पा गाठला जातोय. ग्रामीण विकासाचे हे कार्य चालू असतानाच गावांमध्ये हजारो वर्षांपासून वसलेली संस्कृतीही तितक्याच पारंपरिक पद्धतीने सुरू असल्याचे दिसते आहे, समाजोपयोगी प्रथाही आहेत. काही कालबाह्य़ प्रथांचाही आज उलगडा होत आहे. पिढय़ान्पिढय़ा चालू असलेल्या या परंपरेचा अभिमानही वाटतो. या प्रथा किंवा रीती कशा निर्माण झाल्या असतील याबद्दल कुतूहल निर्माण होते..

गेल्या १७ वर्षांपासून बहादरपूर या जन्मगावी आमचे काम उभे राहिले. ही कामे करताना जो आनंद आणि समाधान मिळते त्याचे वर्णन शब्दात करण्याजोगे नाही. याच गावातून प्रेरणा घेऊन या कामाचे स्वप्न बघितले. या साऱ्या कामाबद्दल लिहिण्याआधी बालपणाकडे वळून पाहावे लागणार आहे, कारण बालपणातल्या छोटय़ातल्या छोटय़ा गोष्टीच आपल्या आयुष्यावर व व्यक्तिमत्त्वावर मोठा ठसा उमटवत असतात. म्हणून आजच्या या लेखाची सुरुवात बालपणाच्या अनुभवांनी व त्या दिशेने बघितलेले स्वप्न, त्यासाठी केलेली वाटचाल, मार्गदर्शनासाठी केलेले प्रयत्न, स्वप्नांची धुंदी आणि गुरूच्या रूपाने भेटलेले डॉ. एस. एस. कलबाग या सगळ्यांचा संदर्भ या लेखात देण्याचा प्रयत्न आहे.

गावात काम करण्याआधी घेतलेले प्रशिक्षण, अनुभव, गुरूंकडून मिळालेले मार्गदर्शन याची सविस्तर मांडणी आणि गावात कामाची सुरुवात, टप्प्याटप्प्याने मिळालेला लोकसहभाग त्यानंतर स्त्रियांमध्ये निर्माण झालेली उद्योजकता, शेतकरी बंधूंचे प्रश्न, आदिवासी भागात पोहोचविलेले सौरदिवे इत्यादी कामांची माहिती पुढील लेखांमध्ये येईलच.

बालपणीच्या गोष्टी आठवताना पहिल्यांदा आठवते ती ‘स्व’ची झालेली ओळख. मला जाणवले की, मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे. घरातील इतर सदस्यांशी माझे वेगवेगळे नाते आहे. आणि माझ्या या स्वजाणिवेबरोबरच मला गावातील लोकांच्या परिस्थितीविषयी जाणीव होऊ लागली, स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव होत असताना इतर लोकांना होणारा त्रास आणि कष्ट या बाबतीतही काही गोष्टी जाणवू लागल्या. इतरांचं दु:ख ऐकताना आपल्या डोळ्यात अश्रू येत आहेत हेही जाणवले. ग्रामीण भागात असल्यामुळे अनेक गोष्टींच्या उणिवा, मर्यादा जाणवत गेल्या. आणि त्यातूनच काही तरी करायचा दृढनिश्चय झाला व नंतर त्याचे ध्येयात रूपांतर झाले. या ध्येयाची धुंदी अशी होती की, दैनंदिन व्यवहारातल्या गोष्टी करताना ते स्वप्न जगायला मी सुरुवात केली. भांडी धुताना, गुरांचे शेण आवरताना, शेणाच्या गवऱ्या करताना, गाईच्या धारा काढताना, शाळेत जाताना भविष्यात काय करणार, काय करावे लागेल याचे चित्र स्पष्ट होऊ लागले. कल्पना मांडणं सुरू झाले आणि त्यानुसार आराखडे आखणे सुरू झाले..

याला पोषक म्हणून आई दिवसभरामध्ये जे जे काही करी त्याची भर पडत गेली. उदाहरणार्थ, मुंग्यांना साखर आणि पीठ देणे, चिमण्यांना दाणे टाकणे, स्वयंपाक करताना पहिली भाकर गाईची व शेवटी कुत्र्यांसाठी करणे, कुणी दारी आला तर त्याला पोटभर जेवण देणे. या सारख्या गोष्टींचा प्रभाव सकारात्मकरीत्या होत गेला. फक्त आपलेच पोट भरणं नव्हे तर आपल्या भोवतालचे प्राणी व मनुष्यजीव यांचाही विचार होणे आवश्यक आहे, हे संस्कार होत गेले. त्याच काळातले शाळेचे योगदानही महत्त्वाचे होते. उदाहरणार्थ, वेळोवेळी होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धा, समाज व देशाप्रति आपल्या असलेल्या कर्तव्याबद्दलचे गुरुजनांकडून मार्गदर्शन मिळत होते. सोबत गल्ली व गावातील लोक यांच्याकडून मुलांनी कसे राहावे, काय केले पाहिजे याबाबत मिळणारे मार्गदर्शनही प्रेरणादायी असे. एकंदरीत आपल्या शिवाय इतरांप्रती असलेली संवेदना इतकी प्रगल्भ होऊ लागली की जे जे स्वप्न निरंतर बघत आले तशा तशा त्या दिशेने वाटाही मिळत गेल्या. हो, या सर्वासाठी कोणाजवळ बोलावे, कोणाला सांगावे, सांगितले तर हसतील किंवा वेडे म्हणतील म्हणून परमेश्वराशीच संवाद साधत गेले. आपण कसे राहतो आहे, कसे दिसतोय, चप्पल घातली की नाही, कपडे टापटीप आहेत का या गोष्टींकडे माझे कधी लक्षही गेले नाही, पण आपण जे स्वप्न बघितले आहे त्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी काय करायला पाहिजे, याचेच विचार सुरू झाले. त्यातूनच एक ठाम निर्णय वयाच्या १३व्या वर्षीच घेतला तो लग्न न करण्याचा. आणि आपले सारे आयुष्य गावात राहून गावासाठीच घालवायचे हेही ठरले. मात्र यासाठी अभ्यास, अनुभव या गोष्टींची गरज होतीच.

त्यासाठी पुढील शिक्षण हे पुणे किंवा मुंबईसारख्या शहरात घेण्याचे ठरले. स्वप्न बघण्याचे व स्वप्नपूर्तीसाठी नियोजन करण्याचे धाडस हे केवळ माझ्या वडिलांमुळे शक्य झाले. कारण त्यांच्याबद्दल मला हा विश्वास होता की ते कधीच नाही म्हणणार नाहीत. स्वतंत्र व्यक्तिमत्त्वास त्यांनी महत्त्व दिले आणि म्हणूनच स्वप्न बघताना जेवढे मोठे आणि दूपर्यंतचे बघू शकत होते त्यात कुठेही अडथळा येईल असे वाटले नाही. पुढे पुणे विद्यापीठात शिकायला गेल्यावर तिथल्या मत्रिणींना आपण पुण्यात का आलो आहे, भविष्यात काय करायचे आहे ही माहिती देत गेले. त्या वेळी काही जणी मला दिशाही दाखवू लागल्या. त्याच काळात लातूर येथे भूकंप झाला होता. तेथे काम करण्यासाठी इच्छुक कार्यकर्त्यांची गरज आहे, असे पोस्टर्स ठिकठिकाणी लावलेली असत. माझ्या मत्रिणी मला सुचवायच्या की, ‘तुला समाजकार्य करायचे आहे, मग तू या कार्यात सामील का होत नाहीस?’ मला मात्र ग्रामरचनेचे, गावउभारणीचे रचनात्मक व दीर्घकालीन अशा प्रक्रियेत गुंतायचे होते हे स्पष्ट होते, त्यामुळे मी त्याकडे फार लक्ष दिले नाही. एम.ए.चे दुसरे वर्ष संपत आले. परीक्षा झाल्या, तरीही योग्य दिशा सापडली नाही. परीक्षा देऊन घरी आले. मात्र दोन वर्षे पुण्यात राहूनही आपणास दिशा मिळाली नाही याचे दु:ख होते. मनात तळमळ खूप होती. कधी कधी एकांतात ओक्साबोक्शी रडायचेही. आपणास नेमके काय करायचे आहे हे कुणास सांगताही येईना. मात्र गावातील लोकांच्या अडचणी सुटल्या पाहिजेत, त्यांच्यासाठी सोयी उपलब्ध व्हाव्यात हे स्पष्ट होते. मात्र ते कसे करणार, त्यासाठी काय करणार हे त्या वेळी कळत नव्हते, सुचत नव्हते.

एक दिवस माझी मत्रीण निरीती जैन हिने नाराज होऊन मला पत्र लिहिले, ‘‘तू ज्या कामासाठी पुण्यात आलीस त्या कामाची संधी तुला लातूर भूकंपाच्या ठिकाणी मिळाली होती व तू ती संधी नाकारलीस हे पाहून मला अतिशय दु:ख होतंय. दुसरे म्हणजे तू परत गावी गेलीस, तेथे राहून तू काय करणार आहेस हे मला कळत नाही.’’ माझ्या वडिलांना जेव्हा हे कळले तेव्हा त्यांनाही अतिशय राग आला व त्यांनी मला विचारले की, ‘‘तू घरी धुणीभांडी करणार आहेस का? यासाठी तुला शिकवले का? तुला दुसरे काहीही करायचे नाही, नोकरीही करायची नाही मग तू नेमके काय करणार आहेस?’’ मला काही सुचेना. काय बोलावं ते कळेना. त्यांनी रागाने मला सांगितले, ‘‘तुला जे करायचे आहे ते करून दाखव आणि ते केल्याशिवाय या घरात पाय ठेवू नकोस.’’ त्यांनी मला अक्षरश: घरातून बाहेर काढले.

मी परत पुण्यात आले. गेल्या दोन वर्षांत मी अनेकांना सांगून ठेवले होते की, जर तुम्हाला सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांची माहिती मिळाली तर मला नक्की सांगा आणि त्याचा परिणाम म्हणूनच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सटाण्याचा एक मित्रांचा ग्रुप होता त्यांनी डॉ. एस. एस. कलबाग व त्यांच्या ‘विज्ञानआश्रम’च्या कार्याची माहिती दिली. १९ जुलै १९९५ रोजी डॉ. कलबाग यांना भेटण्यास गेले. त्यांचे काम बघितले. ते बघताना, त्यांच्याशी बोलताना वाटले की, ‘हो मला माझा मार्ग सापडला’ व कलबाग सरांसोबत पुढील वाटचाल सुरू झाली.. ती पुढच्या लेखात..

नीलिमा मिश्रा nilammishra02@yahoo.com

First Published on August 5, 2017 1:01 am

Web Title: magsaysay and padma shri award winner neelima mishra article
टॅग Neelima Mishra