21 October 2018

News Flash

‘समाज बदलला जाऊ शकतो’

संपदा ग्रामीण महिला संस्था (संग्राम)ने १९९२ पासून सहा संघटनांची बांधणी केली आहे.

संपदा ग्रामीण महिला संस्था (संग्राम)ने १९९२ पासून सहा संघटनांची बांधणी केली आहे. यामध्ये वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रिया (वेश्या अन्याय मुक्ती परिषद), समलिंगी संबंधातील पुरुष व तृतीयपंथीय व्यक्ती (मुस्कान), ग्रामीण महिला-बहुसंख्य दलित (विद्रोही महिला मंच), मुस्लीम महिला (नजरिया), वेश्याव्यवसायातील स्त्रियांच्या मुला-मुलींची संघटना (मित्रा) आणि एचआयव्हीग्रस्तांबरोबरच्या लोकांची संघटना (व्हॅम्प प्लस)यांचा समावेश आहे.

‘संग्राम’च्या ध्येयनामानुसार ‘समाज बदलला जाऊ शकतो, यावर लोकांनी विश्वास ठेवला पाहिजे,’ अशी ‘संग्राम’ची भूमिका आहे. अन्य लोकांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या मूठभर कार्यकर्त्यांपुरताच हा प्रश्न मर्यादित नाही. ज्यांना समाज बदलण्याचे ध्येय पटलेले आहे, त्यांनी स्वत:च्या अधिकारासाठी सक्षमतेने लढले पाहिजे. मला ‘संग्राम’च्या या सहा संघटनांचा आवाज व्यक्त केल्याशिवाय ही लेखमाला पूर्ण होणार नाही.

‘व्हॅम्प’च्या माया गुरव, संगीता मनोजी, निलव्वा सिद्धरेड्डी सांगतात, ‘‘आम्ही गल्लीत एचआयव्ही आणि एड्सविषयी, गुप्तरोगाविषयी इतर स्त्रियांना माहिती देतो, निरोधाचे प्रात्यक्षिक दाखवतो, वाटप करतो, सुरक्षित लैंगिक संबंधाची माहिती सर्व स्त्रियांपर्यंत पोचवतो, गल्लीमध्ये स्त्रियांची कम्युनिटी मीटिंग घेतो. या बैठकींमध्ये आमच्या सर्व प्रश्नांवर चर्चा करतो आणि तोडगा काढतो. आम्ही या व्यवसायाला सुरक्षित ठेवण्याकरिता सरकारबरोबर सातत्याने संवाद करीत आहोत. स्वत:च्या संमतीने वेश्याव्यवसायात येणाऱ्या स्त्रियांचे आम्ही जन्म दाखले तपासतो, तिला कोणी फसवून, पळवून तर आणले नाही ना याची खात्री करून घेतो. जर एखादी लहान मुलगी गल्लीत आली असेल तर तिची समजूत घालतो आणि तिला तिच्या पालकांच्या स्वाधीन करतो, गावी परत पाठवतो. ते जर शक्य झाले नाही किंवा तिची जबाबदारी घेणारे कोणी नसेल तर पोलिसांच्या मदतीने बालगृहात पाठवतो. आम्ही गल्लीत तंटामुक्ती समितीची स्थापना केली असून तिचा उपयोग आम्ही तंटेशोषण आणि हिंसेचे प्रश्न सोडविण्यासाठी करतो. आम्ही पॅरा लीगल वॉलिंटिअर म्हणून जिल्हा विधी प्राधिकरणाबरोबर लीगल एड क्लिनिकमध्ये काम करतो. संघटनाबांधणी आमचे मूळ ध्येय आहे. आम्ही स्वत:ला श्रमजीवी समजतो. आमच्या बाबतीत स्त्रीवादी कार्यकत्रे म्हणतात, ‘आम्हाला स्वत:च्या जिंदगीबद्दल काहीच कळत नाही,’ असे म्हणणे आमच्यावर अन्यायकारक आहे. आम्ही आज सक्षम झालो आहोत. आणि स्वत:चा आवाज निर्माण केला आहे. हा बळकट आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची शक्ती ‘संग्राम’ने आम्हाला दिली.’’

‘मित्रा’ संघटनेचे राजू नाईक, दीपक मोदी व महेश मनोजी त्यांच्या मनोगतातून व्यक्त करतात की, ‘मित्रा’ संघटनेमुळे आमची आई व आमचे नाते खऱ्या अर्थाने आई लेकराचे झाले आहे. आम्ही शाळेत जात असताना शाळेतील शिक्षक व मित्रमंडळींकडून आम्हाला ‘गल्लीतल्या बाईची मुले’ म्हणून हिणवले जात होते. त्यातून होणाऱ्या कलंक, भेदभावामुळे आम्ही स्वत:च्या आईकडे तुच्छतेने पाहत होतो. पण ‘संग्राम’ संस्थेने आमची आई व आमच्यामध्ये संभाषण घडवून आणण्यासाठी वेळोवेळी बैठकांचे आयोजन केले. परिणामी आम्हाला आमची आई कळली व तिने आम्हाला जिवंत ठेवण्यासाठी घेतलेल्या कष्टाची जाणीव झाली. आता आम्हाला आईचा सन्मान वाटतो. त्यासाठी ‘गल्लीतल्या आईची गोष्ट’ हा दीपावली अंक प्रकाशित केला. या सर्व प्रक्रियेतून असे ठरवले की, आम्ही जे सोसले ते आता गल्लीतील इतर मुला-मुलींना सोसावे लागू नये. त्यांनी शिक्षण घ्यावे व स्वत:च्या आईबाबत त्यांची आत्मीयता वाढावी याकरिता ‘मित्रा’ संघटनेची स्थापना केली. ‘मित्रा’मार्फत गल्लीतील मुला-मुलींना व त्यांच्या आईला शिक्षणाचे महत्त्व पटावे म्हणून सायंकाळी ६ ते ८ या वेळेत शिकवणी वर्ग घेतले जात आहेत. आमच्यातीलच काही जण शिक्षक म्हणून काम करतात. याबरोबरच निपाणी येथे ‘मित्रा’ हॉस्टेलची स्थापना केली आहे. सध्या या ठिकाणी ३७ मुले-मुली शिक्षण घेत आहेत. शिकवणी वर्ग आणि ‘मित्रा’ हॉस्टेलमधील मुलांची शैक्षणिक प्रगती पाहून तसेच अर्धवट शाळा सोडलेल्या मुला-मुलींच्या आईंनी ‘मित्रा’ संघटनेकडे मागणी केली. त्यामुळे ‘संग्राम’ व ‘व्हॅम्प’च्या मदतीने स्वाध्यायांची सुरुवात केली. यामध्ये मुलांना शिक्षण देऊन बाहेरून दहावी परीक्षा देण्याची तयारी करीत आहोत. गल्लीतील किशोरवयीन मुली शिक्षणाच्या प्रवाहात आल्याने त्यांचे किशोरवयीन विवाह होणे बंद झाले आहे.’’

विद्रोही महिला मंच-ग्रामीण महिला संघटनेच्या सुलभा होवाळे, यशोदा न्यायनीत (सरपंच बोरगाव) व संगीता भिंगारदिवे सांगतात, ‘‘आम्ही गाव पातळीवर अभियान राबवतो. यामध्ये महिला युवक-युवती यांच्यामध्ये एचआयव्ही एड्सविषयी माहिती, लैंगिकता शिक्षण यांसारख्या कार्यक्रमामध्ये समावेश केला. आम्ही निव्वळ स्त्रियांच्याच आरोग्याच्या मुद्दय़ावर न थांबता एकंदरीत गावपातळीवर भेडसावणाऱ्या सर्व समस्यांवर काम करतो. शिवाय ग्रामपंचायतीचा कारभार व त्यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये स्त्रियांना सामावून घेण्यासाठी प्रयत्न करतो. गावोगावी ‘संग्राम ग्राम एकता मंच’ची स्थापना करून स्त्रियांवर होणाऱ्या हिंसेला आळा घालण्याचा प्रयत्न करीत आहोत. शालेय पातळीवर किशोरवयीन मुलींवर वाढणाऱ्या हिंसेविरोधीही आवाज उठवला गेला.

आम्ही फक्त पीडित स्त्रीपुरतेच काम मर्यादित न ठेवता गावपातळीवर कुठलीही स्त्री हिंसेची शिकार होऊ नये यासाठी कार्यक्रम घेण्याचे ठरवले. एचआयव्ही, लैंगिकता, लिंगभेद, आरोग्य याबरोबरच हिंसा म्हणजे काय? हिंसेचे प्रकार व हिंसा कशी ओळखावी, इतकेच नव्हे तर हिंसा झाल्यास काय करावे? त्याला कसे सामोरे जावे? या मुद्दय़ावर चर्चा करू लागलो. जेव्हा कायदेविषयक मार्गदर्शनाची गरज वाटली त्या वेळी ‘संग्राम’ व नॅशनल लीगल एड सव्‍‌र्हिसेस अ‍ॅथॉरिटी बरोबर कार्यक्रम घेतला व त्यानंतर लगेचच आमच्यातील काही जणींची पॅरा लीगल वॉलंटिअर म्हणून निवड केली गेली. जिल्हा विधि सेवा प्राधिकरणामार्फत प्रशिक्षणे झाली व न्याय व्यवस्थेचा महत्त्वाचा घटक म्हणून काम करू लागलो आहोत.

परंतु आम्ही कार्यकर्ता म्हणून काम करीत असताना, कामाचा आढावा घेतानादेखील आम्हाला आत्मविश्वास नव्हता, धाडस नव्हते, काम कितपत यशस्वी झाले हे कळत नव्हते. संकल्पना ठोस नसल्याने बऱ्याच वेळा काम करूनदेखील चळवळ उभी करू शकत नव्हतो. त्यामुळे ‘संग्राम’ने लता पी. एम. या स्त्रीवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांमार्फत दरमहा दोन दिवस ‘विद्रोही महिला मंच’च्या कार्यकतीर्ंसाठी अभ्यासवर्ग सुरू केला आहे. याचा मुख्य उद्देश हा आहे की, सामाजिक बदल घडावा व सामाजिक चळवळ भक्कम व्हावी. अभ्यास वर्गादरम्यान आम्ही स्त्रीमुक्ती चळवळीची गाणी शिकलो. त्याचबरोबर धाडसाने बोलण्याचे कौशल्य संपादन केले. अभ्यासवर्गातील विषय हे प्रामुख्याने चळवळ व आंदोलनांच्या उभारणीवर आधारलेले आहेत.

आम्ही गावपातळीवर महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांची विचारसरणी आत्मसात करून, गावातल्या लोकांना पटवून देऊन प्रत्येक गावात त्यांच्या जयंत्या साजऱ्या करू लागलो आहोत. अभ्यासवर्गात इतिहासकालीन स्त्रीजीवन, १२ व्या शतकातील संतांची चळवळ, गौतम बुद्ध, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र यावर आम्हाला शिक्षण मिळाले आहे.

‘नजरिया’ या मुस्लीम संघटनेच्या जुबेदा आत्तार, जाहिदा पखाली व तबस्सुम मुल्ला म्हणतात की, ‘‘सांगली व मिरजेतील जातीय दंगलीचे परिणाम मुस्लीम समाजातील स्त्रियांनी सोसले आहेत. त्यानंतरच्या काळात लगेचच आम्ही ‘संग्राम’शी जोडून मुस्लीम स्त्रियांच्या प्रश्नावर काम करण्याचे ठरवले. मुस्लीम समाजातील स्त्री म्हणून पूर्वी आम्ही घराबाहेर पडत नव्हतो. आमच्या समाजातील स्त्रिया तसेच मुला-मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न आम्हाला प्रामुख्याने महत्त्वाचा वाटतो. मुलांच्या शैक्षणिक सुविधा अधिक लाभदायक व्हाव्यात यासाठी सरकारदप्तरी भेटी देतो. कल्याणकारी योजनांची माहिती मिळवून त्याचा प्रसार आमच्यातील स्त्रियांपर्यंत पोहचवतो. आम्ही फक्त आमच्या आरोग्याच्या प्रश्नावर काम करतो, असे नाही तर स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार व हिंसेविरोधी आवाज उठवतो. महिला गटात कार्यक्रम घेतो. युवक- युवतींना एकत्र करून लैंगिक शिक्षण देतो. मदरसा भेटीतून औपचारिक शिक्षणाच्या प्रश्नाकडे लक्ष दिले जावे याची जागृती करतो. ट्रिपल तलाकच्या प्रश्नावर आम्ही मुंबई, कोल्हापूर, सांगली येथे चर्चासत्रात भाग पण घेतला आहे. स्त्रियांवर लादल्या जाणाऱ्या जाचक नियमाविरोधी आम्ही काम करण्याचे ठरवले आहे. भविष्यकाळात आम्ही आमचे काम ‘नजरिया’च्या मार्फत असेच पुढे ठेवून चळवळ उभी करणार आहोत.

‘मुस्कान’चे रावसाहेब मोरे व सुधा पाटील सध्या तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी काम करीत आहेत. ‘व्हॅम्प प्लस’ व ‘नॅशनल नेटवर्क ऑफ सेक्स वर्कर्स’ (एनएसडब्ल्यू) या संघटनेच्या राष्ट्रीय को-ऑíडनेटर किरण देशमुख म्हणतात की, ‘‘आम्ही सेक्स वर्कर स्वत: प्रशिक्षक झालो आहोत. ‘व्हॅम्प’ इन्स्टिटय़ूटमार्फत फक्त स्थानिकच नव्हे तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘संग्राम’ व ‘व्हॅम्प’च्या कामाच्या अनुभवावर आधारित प्रशिक्षण वर्ग आयोजित केलेली आहेत. वेश्याव्यवसाय करणाऱ्या आम्ही इतक्या सक्षम झालो की, भारताबाहेर जाऊन स्वासा (सेक्स वर्कर्स अ‍ॅण्ड अलाइज इन साउथ एशिया) मार्फत आम्ही भारत, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, कम्बोडिया, थायलंडर, ब्राझील, ऑस्ट्रेलिया या देशातील सेक्स वर्कर्सना चांगले जगणे, त्यांचे अधिकार या विषयावर प्रशिक्षण दिलेले आहे.

‘कसम’ – सेंटर फॉर अ‍ॅडव्होकसी ऑन स्टिग्मा अ‍ॅण्ड मार्जनिलायझेशनच्या संचालिका आरती प आपल्या या संस्थेच्या भूमिकेबद्दल सांगतात की, ‘कसम’मार्फत वेश्यांवरील कलंक आणि भेदभावाची धोरणे, जाचक कायदेकानू यांचा त्यांच्या जीवनावर होणाऱ्या परिणामांचा संशोधन करून तो प्रकाशित करणे व मानवाधिकारासाठी लढणाऱ्या संघटनांच्या माध्यमातून परिघावर राहणाऱ्या समाजाचा आवाज भारत सरकार आणि जागतिक पातळीवर पोहोचवण्याचे काम आम्ही करत आहोत. तसेच भारतातील वेश्यांच्या वेदनांची जिनिव्हामध्ये जाऊन सिडॉ (कन्व्हेन्शन ऑन द इलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्मस ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट वुमेन) समितीसमोर मांडणी केली आहे.

‘संग्राम’चे शशिकांत माने व शांतिलाल काळे म्हणतात की, ‘‘शिक्षणाच्या अभावामुळे परिघावर राहणाऱ्या समाजाच्या संघटनांच्या लढाईमध्ये तांत्रिक मदतीचा अभाव जाणवला. ती तांत्रिक मदत आम्ही देतो. यात प्रामुख्याने साध्या-सोप्या भाषेत माहितीचे भाषांतर करून देतो. त्यांना अहवाल लिखाणामध्ये तसेच कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी मदत करतो. तसेच आर्थिक व्यवहार सांभाळण्याचे कौशल्य व मार्गदर्शन करतो.’’

असा आहे हा २५ वर्षांतील ‘संग्राम’चा प्रवास.. खूप काही घडवलेला आणि घडवू पाहणारा..

मीना सरस्वती सेषू

meenaseshu@gmail.com

(सदर समाप्त )

First Published on December 30, 2017 12:11 am

Web Title: meena saraswati seshu 2017 last marathi articles in chaturang