डॉ. भारत पाटणकर

अनेक स्त्रियांनी पूर्णवेळ, बहुतांशवेळ स्वरूपात मुक्ती संघर्ष चळवळीत झोकून देऊन काम केलं. या सहभागामुळेच स्त्रियांचा सहभाग नेहमीच पुरुषांपेक्षा जास्त राहिला. फारच ओढाताणीच्या परिस्थितीत पुरुष कार्यकर्त्यांना लाजवील एवढय़ा प्रमाणात आंदोलनात पुढाकार घेतला. वेगवेगळ्या जातीय, धार्मिक, वांशिक, भाषिक पाश्र्वभूमीतून आलेल्या या कार्यकर्त्यां दुष्काळी परिसरात परिवर्तनाचं वादळ घोंघावत ठेवण्यात यशस्वी कार्य करीत राहिल्या.

‘मागोवा’ ग्रुप हा प्रामुख्याने उच्चशिक्षित तरुण-तरुणींचा ग्रुप होता. जगभरच्या तरुण-तरुणींच्या त्या काळातल्या नव्या उठावाची त्यांना जाणीव होती. स्वातंत्र्यानंतर दोन-चार वर्षांत जन्माला आलेली ही पहिली तरुण पिढी होती. चांगल्या पगाराच्या नोकऱ्या किंवा चांगल्या मिळकतीचे व्यवसाय करणे शक्य होईल, अशा प्रकारचे शिक्षण यापैकी बहुसंख्य तरुण-तरुणींना मिळालं होतं. पण तरीही या समाजात अशी जीवघेणी गरिबी, शोषण, दारिद्रय़ का आहे, निसर्ग संपत्तीची भरपूर उपलब्धता असतानाही असं होण्याचं कारण काय अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी भरपूर वाचन करणारी ही मंडळी होती. ‘मागोवा’ मंडळ हा एक व्यापक संचही या ग्रुपच्या भोवती जमला होता.

स्त्री-मुक्तीची विचारसरणी त्या काळी या सर्वामध्ये बिंबलेली नव्हती. ‘मागोवा’ मासिकातून स्त्री-मुक्ती चळवळीविषयी लेख छापले जात होते. स्वायत्त स्त्री-मुक्ती चळवळ उभारणीचा विचार हा या ग्रुपच्या अखेरच्या काळात आला. प्रामुख्याने वर्ग लढा आणि त्या माध्यमातून नव्या शोषणमुक्त समाजाकडे जाणारी क्रांती अशी विचारसरणी होती. श्रमिक संघटनेच्या माध्यमातून स्त्रियांचे संगठण आणि नंतर स्त्री-मुक्ती संघटना अशी वाटचाल झाली. पण वर्गाचा अंत करण्याबरोबर जातिव्यवस्थेचा अंत आणि स्त्री-मुक्ती यांसाठी संघर्ष करण्याची जाणीव पारंपरिक कम्युनिस्ट पक्षांपेक्षा वेगळेपणा सांगणारी होती.

‘मागोवा’ ग्रुप आणि ‘मागोवा’ मंडळ या माध्यमातून मी कामाला सुरुवात केली. पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून कार्यकर्त्यांच्या कम्यूनमध्ये राहू लागलो. कार्यकर्त्यांच्या अशा सामुदायिक वास्तव्याचा पहिलाच अनुभव मला आला. चहा करणं, भात शिजवणं, ऑम्लेट बनवणं, कालवण तयार करणं अशा गोष्टी करायला त्या जीवनातूनच शिकलो. स्त्री-कार्यकर्त्यां मात्र कोणी पूर्णवेळ झाल्याही नव्हत्या. त्यामुळे अशा पूर्णवेळ कार्यकर्त्यांनी, स्त्री-पुरुष कार्यकर्त्यांनी एकत्र राहण्याचा अनुभव त्या काळी आम्ही राहत असलेल्या दोन-तीन कम्यूनच्या (सहनिवास) जीवनात आला नाही. पण बैठकांमध्ये, गप्पागोष्टींमध्ये एकमेकांशी मोकळेपणाने वागणं, एकमेकांना टाळी देणं, पुरुष मित्रांप्रमाणेच स्त्री-मित्रांशीही तेवढय़ाच सर्वागीण देहबोलीसह वागणं अशी एक नवी संस्कृती मी अनुभवत होतो. ग्रामीण भागातून आलेल्या मला ही एक नवीन भेट होती. लैंगिक आकर्षणातूनच घसट आणि स्त्री-पुरुष सहकारी मित्र यांच्यातली घसट यामध्ये असलेल्या भेदरेषा जाणायला लागण्याच्या प्रक्रियेतून मी अलगदच गेलो. एकमेकांना अरे-तुरे म्हणणं, पुरुषा-पुरुषांत बोलयाचे किंवा स्त्रिया-स्त्रियांच्यात बोलण्याचे विषय चांगल्यापैकी मोकळ्या पद्धतीने स्त्री-पुरुष कार्यकर्ते एकत्र असताना बोलणं अशा अनेक नव्या सांस्कृतिक ‘माहोल’ची तोंडओळख मला झाली. मी त्यात रुळून गेलो.

या काळात स्त्री-सहकाऱ्यांकडून भरपूर शिकायला मिळालं. पुरुषी वर्चस्ववादी व्यवहार जे नेणिवेतून घडतात ते त्यांच्याकडून समजू लागलं. स्वत:च्या अहंला मध्यवर्ती ठेवून नकळत झालेल्या चुकांवर झालेली टीका खेळीमेळीनं स्वीकारायला शिकण्याची सुरुवात झाली. आईपेक्षा किंवा नातेवाईक स्त्रियांपेक्षा वेगळ्या स्त्रिया ज्या वेळी जवळिकीनं वागत असतात त्यावेळी स्त्रीचे एक वेगळं दर्शन घडू शकतं. या स्त्री-सहकाऱ्यांमुळे तसं दर्शन मला झालं. एक नव्या सांस्कृतिक विश्वाची कवाडं खुली झाली. स्त्री-पुरुष पूर्णवेळ कार्यकर्ते असते आणि त्यांचं सहवास्तव्य असणाऱ्या कम्यूनमध्ये राहण्याचा अनुभव घेता आला असता तर त्या काळातच जास्त बदलण्याची संधी मिळू शकली असती.

‘मागोवा’च्या विसर्जनाच्या काळात असंच नाही, पण जवळजवळ या प्रकारचं वास्तव्य करण्याचा अनुभव आला. लग्न केलेले स्त्री-पुरुष कार्यकर्ते आणि दोन पूर्णवेळ पुरुष कार्यकर्ते हे सहवास्तव्य करण्याचा हा अनुभव होता. यामध्ये सर्व ‘किरकोळ’ वाटणाऱ्या पण महत्त्वाच्या मुद्दय़ांना सामोरं जाण्याचा प्रसंग आला. जेवण कुणी बनवायचं, भांडी कुणी घासायची, घर कुणी झाडायचं अशा प्रकारचे मुद्दे पुरुष-प्रभुत्ववादी नेणिवेमुळे उपस्थित होणारच होते. त्यांना सामोरं जावं लागलं. स्वत:ला बदलण्याची प्रक्रिया सुरू करावी लागली. बदलण्यासाठी स्वत:शीच संघर्ष करावा लागतोय हे लक्षात आलं. पण या नव्या जीवनसरणीमध्ये आम्ही कमावलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्रियांना यापैकी पुरुष कार्यकर्त्यांच्या बाबतीत लैंगिक स्वरूपाच्या शारीरिक आक्रमणाची भीती न वाटणं. उपनगरात डास प्रचंड असल्यामुळे आणि जागेच्या वगैरे अडचणीमुळे अगदी एका मच्छरदाणीत अंथरूण टाकून लग्न झालेले स्त्री-पुरुष कार्यकर्ते आणि इतर पुरुष कार्यकर्ते निवांत झोपू शकणं आम्हाला शक्य झालं. त्याकाळी आणि नंतरही येणाऱ्या अनुभवांच्या पाश्र्वभूमीवर ही खरंच मोठी कमाई होती.

आणीबाणीच्या काळात भूमिगत राहून चळवळी करण्याच्या कालखंडानंतर पुन्हा एकदा मोकळेपणानं आंदोलनं उभारायला सुरुवात झाली.

गिरणगावमध्ये क्रांतीबा फुले सांस्कृतिक मंच, समग्र सडक नाटक चळवळ, लोकाधिकार चळवळ, पोस्टर प्रदर्शन चळवळ अशा बहुविध चळवळी सुरू झाल्या. आमच्या पिढीच्या लगेचच नंतरची पिढीसुद्धा यात पुढकारानं सहभागी झाली होती. यात स्त्रिया आणि पुरुष दोन्हीही होते. डिलाइल रोडच्या, सत्यशोधक पाश्र्वभूमी असलेल्या हेब्बाळ जळद्याळ गावच्या सहनिवासी कामगारांच्या गाळ्यानं आम्हाला सत्यशोधक विचारांबरोबर व्यवहाराची शिकवण दिली. आमच्या जीवनात विचारविश्वात महात्मा जोतीराव फुले प्रवेशले. दलित पँथरशी मैत्री असल्यामुळे जरी बाबासाहेबांची भेट झाली होती तरी या काळात डॉ. बाबासाहेबही फुल्यांबरोबरच आमच्या हृदयात जाऊन बसले. मार्क्‍सला मायक्रोस्कोपखाली ठेवण्यासाठी दोन मायक्रोस्कोप आमच्या दृष्टीमध्ये बसले! स्त्री-मुक्तीच्या विचारांना नवा आधार, नवी प्रेरणा मिळाली.

‘मागोवा’पेक्षा या नव्या संचाची सांस्कृतिक-सामाजिक-आर्थिक मुळं वेगळी होती. त्यामुळे यात आलेल्या स्त्री-पुरुषांच्या स्त्री-मुक्ती विषयक नेणिवासुद्धा वेगळ्या होत्या. पुरुषांच्या बरोबरीने आणि कधी त्यांच्यापेक्षाही जास्त कर्तबगारीने संसार केलेल्या घरच्याच स्त्रियांचे अनुभव यांच्या गाठीशी होते. त्यामुळे त्यांनी चालवलेल्या वेगवेगळ्या चळवळींमध्ये तसा दृष्टिकोन येत होता. सडक -नाटकं लिहिताना आणि विशेषत: ‘स्त्री-मुक्तीची ही ललकारी’ हे सडक नाटक लिहिताना आणि रस्त्यावर आणताना या नेणिवा-जाणिवा आपसूकच त्यात प्रवेश करीत होत्या. कामगार-कष्टकरी असलेल्या स्त्रियांचे  स्त्री-मुक्तीचे प्रश्न आणि पांढरपेशा स्त्रियांचे तसेच प्रश्न यामधली तफावत महात्मा जोतिबा फुले यांनी पुढे आणलेली आत्मसात करण्याबरोबरच स्वत:च्या कुटुंबातल्या अनुभवांचाही आधार मिळत होता. कारण या संचातली ९०-९५ टक्के तरुण-तरुणी कामगार-कष्टकरी कुटुंबातून आलेले होते. शोषित जाती-जमातींमधून आलेले होते. इतिहासात आणि वर्तमानातही यासारख्या कुटुंबातल्या स्त्रिया ‘चूल-मूल’ एवढय़ाच कामात बंदिस्त असलेल्या कधीच असू शकत नव्हत्या. पुरुषांच्या बरोबरीनेच नाही तर संसाराचा गाडा ओढण्यात पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणातली जबाबदारी स्त्रियाच उचलण्याची परंपरा या कुटुंबामध्ये राहिलेली आहे.

अशाच संचात आधी ‘मागोवा’शी संबंधित असलेल्या जुन्या कार्यकर्त्यांसह विस्तार करून ‘श्रमिक मुक्ती दल’ या संघटनेचा जन्म झाला. वर्गीय, जातीय आणि स्त्री म्हणून होणाऱ्या शोषणांचा अंत करूनच नवा पर्यावरण संतुलित समृद्ध समाज जन्माला येऊ शकतो अशी नवी विचारसरणी या संघटनेने स्वीकारली. पर्यायी समाजाची झलक दाखवणारे बदल आजही घडवीत जाण्याचं नवं धोरण स्वीकारलं. गिरणी कामगारांच्या ८२-८३ च्या ऐतिहासिक संपातल्या महत्त्वपूर्ण सहभागाच्या पाश्र्वभूमीवर दुष्काळी टापूमधली चळवळ, गावाकडे गेलेल्या गिरणी कामगारांच्या धाग्यातून सुरू झाली. दुष्काळ निर्मूलन, समन्यायी पाणी वाटप, बळीराजा या जनतेने बांधलेल्या आणि चालवलेल्या धरणाची बांधणी, अशा माध्यमातून काम करताना ‘स्त्री-मुक्ती संघर्ष चळवळ’ स्थापन झाली. ‘मुक्ती संघर्ष चळवळ’ या व्यापक चळवळीचा भाग म्हणून सुरू झाली.

पुन्हा एकदा कम्यूनचा अनुभव, माझ्यापेक्षा तरुण पिढीच्या सहभागाने घेता आला. पण आता मुंबईऐवजी सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्याचा परिसर होता. गावोगावच्या जनतेने निर्माण केलेलं संघटनेचं कार्यलय म्हणजेच कम्यून सहजीवन. जनतेने दिलेलं धान्य आणि चटणी-मीठ-मसाला. त्यातून सर्वानी पाळी-पाळीने जेवण करणं, भांडी घासणं, स्वच्छता करणं. सर्वानी मिळून चर्चेतून धोरणं ठरवणं, कार्यक्रम ठरवणं. स्त्री-पुरुष कार्यकर्ते एकत्र राहणं, एकत्र काम करणं. एक नवा, प्रगत आणि जीवन व्यवहारात बदल घडवणारा अनुभव. नेणीव-जाणिवेत बदल घडवणारा अनुभव.

टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेसमधून एम्.एस्.डब्ल्यू. केलेल्या नागमणी राव, कोलकात्याहून मैत्रीसंबंधाने या भागात आलेल्या गौरी डे, मधून-मधून मोठय़ा कार्यक्रमांच्या तयारीसाठी येणाऱ्या कुंदा प्र.नी., कासेगावहून येऊन सर्व कार्यक्रमांमध्ये उठावणी करण्यात सहभाग करणाऱ्या इंदुमती पाटणकर, प्रसिद्ध समाज शास्त्रज्ञ गेल आम्व्हेट यांनी पूर्णवेळ, बहुतांशवेळ स्वरूपात मुक्ती संघर्ष चळवळीत झोकून देऊन काम केलं. या सहभागामुळेच स्त्रियांचा सहभाग नेहमीच पुरुषांपेक्षा जास्त राहिला. गावागावातील कार्यकर्त्यांच्या घरात, गर्दीत मुक्काम करणं, ग्रामपंचायतीत मुक्काम करणं, चालत प्रवास करणं, मिळेल तेव्हा जेवणं अशा फारच ओढाताणीच्या परिस्थितीत पुरुष कार्यकर्त्यांना लाजवील एवढय़ा प्रमाणात आंदोलनात पुढाकार घेतला. वेगवेगळ्या जातीय, धार्मिक, वांशिक, भाषिक पाश्र्वभूमीतून आलेल्या या कार्यकर्त्यां दुष्काळी परिसरात परिवर्तनाचं वादळ घोंघावत ठेवण्यात यशस्वी कार्य करीत राहिल्या.

परित्यक्तांच्या हक्कांची वादळी आणि नवे पायंडे पाडणारी चळवळ याच वादळाचा भाग होती. पालक म्हणून परितक्त्यांच्या मुलांना आईचं (परित्यक्तेचं) नाव लावू शकणं. स्वत:चं घर उभारण्यासाठी गावठाणात, गरज पडल्यास विस्तार करून, हक्काचा प्लॉट आणि भाजीपाला घेण्यासाठी जागा मिळणं, पोटगी मिळणं अशा मुद्दय़ांवर चळवळ झाली. यशस्वी झाली. चिवट संघर्षांतून हे यश मिळत गेले. पुरुष कार्यकर्त्यांनी मदत केली. मंचावर आणि पुढाकारात स्त्री-कार्यकर्त्यांच राहिल्या. रडत बसून दु:ख सोसत राहणाऱ्या, खाली मान घालून जगणाऱ्या आणि संपूर्ण समाजाने एकटय़ा पाडलेल्या स्त्रियांची ही चळवळ उभी राहणे आणि यशस्वी होत जाणे म्हणजे या स्त्रियांना स्वाभिमान मिळणे. आत्मसन्मान, माणूस म्हणून स्थान, व्यक्ती म्हणून निर्णयाचं स्वातंत्र्य या लढय़ातून स्त्रियांना मिळालं.

दारुबंदी, अत्याचार निर्मूलन, मालमत्तेत हिस्सा, मिळकतीत समान अधिकार अशा अनेक मुद्दय़ांवर हजारो स्त्रियांची चळवळ उभी राहिली. सातारा, सांगली, जिल्ह्यंमध्ये पसरली. राजकीय क्षेत्रात सर्व स्त्री-उमेदवारांचं पॅनल इंदोली गावात उभं करण्यात आलं. १९८५-८६च्या दरम्यान झालेला हा प्रयोग महाराष्ट्रातला तरी पहिलाच प्रयोग होता.

स्त्रियांच्या या चळवळीने चळवळीतल्या पुरुष जनतेच्याही जीवनात बदल घडवला. नवं वास्तव निर्माण केलं. स्त्री कार्यकर्त्यांनी पुरुष कार्यकर्त्यांमध्ये बदल घडविला. आज जो काही जास्त मानुषपणा आणि स्त्रीमुक्तीपोषक भाग माझ्यासारख्याच्या जाणीव-नेणीव-व्यवहारामध्ये आहे त्याला स्त्रियांची ही आणि एकंदर मुक्ती चळवळ आणि स्त्री-कार्यकर्त्यांची लढाऊ समीक्षाच कारणीभूत आहे एवढं निश्चित.

krantivir@gmail.com

chaturang@expressindia.com