|| डॉ. शमसुद्दीन तांबोळी

भारतीय समाजप्रबोधकांनी स्त्रियांच्या प्रश्नांना नेहमीच केंद्रस्थानी ठेवून मानवमुक्तीचा विचार समाजाला दिला आहे. महाराष्ट्रातील समाज सुधारकांनीही स्त्री दास्य मुक्तीचा विचार अग्रक्रमाचा ठरवलेला होता. हे वास्तव राजा राममोहन रॉय, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, र. धों कर्वे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्यातून प्रकट होते. हे असे असले तरी हमीद दलवाई वगळता मुस्लीम स्त्रियांच्या असह्य़ जखमांवर इतर समाजप्रबोधकांनी मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केल्याचे ठळकपणे आधोरेखित होत नाही.

मुस्लीम स्त्रियांच्या प्रश्नांवर तीव्रतेने आवाज उठवण्यासाठी हमीद दलवाईच जन्मावे लागले हे ऐतिहासिक सत्य आपल्याला स्वीकारावे लागेल. मुस्लीम समाजातही कर्तबगार, बंडखोर आणि प्रागतिक विचारवंत स्त्रिया निपजल्या, परंतु इतिहासाने त्यांची पाहिजे तशी नोंद घेतल्याचे दिसत नाही. मुस्लीम समाजात व्यक्तिगत पातळीवर अनेक बुद्धिप्रामाण्यवादी, उदारमतवादी व्यक्तिमत्त्वे झाली. मात्र मुस्लीम स्त्रियांच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेऊन त्यास समाज चळवळीचे रूप दिले नाही. मुस्लीम स्त्रियांच्या प्रश्नांवर समाजप्रबोधनाची चळवळ उभी करण्याचे श्रेय हमीदभाईंना द्यावे लागेल.

समाज सुधारक महात्मा फुले यांनी आपली पत्नी सावित्रीबाईंना स्वत: शिकवून त्यांच्याकडून स्त्री शिक्षणासाठी शाळा काढल्या. सावित्रीबाईंच्या सोबत कार्य करणाऱ्या पहिल्या मुस्लीम स्त्री शिक्षिका फातिमाबी शेख यांच्याबद्दल आजही फारशी माहिती उपलब्ध नाही. महात्मा फुलेंना सहकार्य करणाऱ्या उस्मान शेख यांची बहीण या पलीकडे फातिमाबी यांच्याबद्दल माहितीच नाही तर त्यांच्या जीवनप्रेरणा इतर स्त्रियांना मिळणार कशा? डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाची निर्मिती करताना त्यांच्यासोबत संविधान समितीत कार्य करणाऱ्या बेगम एजाज रसूल या उच्चविद्याविभूषित स्त्रीची माहिती अनेकांना नाही. कर्तबगार मुस्लीम स्त्रियांबद्दल असणारी अनभिज्ञता मुस्लीम स्त्रियांना अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देऊ शकली नाही. मुस्लीम महिला आंदोलन गतीमान न होण्याचे हे एक प्रमुख कारण म्हणावे लागेल.

१८ एप्रिल, १९६६ मध्ये हमीद दलवाई यांनी मोजक्या अशा सात स्त्रियांच्या समवेत मुंबई येथे विधानभवनावर मोर्चा काढून या प्रश्नांवर आवाज उठवण्यास सुरुवात केली. मुस्लीम व्यक्तिगत कायद्यातील तोंडी तलाक, बहुपत्नीत्व, हलाला अशा अन्यायकारक तरतुदी तसेच या कायद्यांतर्गत मूल दत्तक घेण्यास असणारी मनाई मुस्लीम स्त्रियांना संविधानिक अधिकारापासून कसे वंचित ठेवते याबद्दल तेव्हाचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना निवेदन दिले होते. ‘सदा ए निसवॉ’ म्हणजेच स्त्रियांची हाक नावाची संघटना स्थापन केली. १९६८ मध्ये ‘इंडियन सेक्युलर सोसायटी’ची स्थापना केली. स्त्रियांना समान अधिकार असावेत, भारतीय धर्मनिरपेक्षता मजबूत होऊन लिंगभेद दूर व्हावेत म्हणून समान नागरी कायद्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. मुस्लीम समाजात या संदर्भात लोकशिक्षण व्हावे, स्त्रियांचे आंदोलन उभे राहावे, विज्ञान व विवेकवादी अशा समाज प्रबोधनाची चळवळ उभी राहावी म्हणून दलवाईंनी आपल्या समविचारी मित्रांच्या मदतीने २२ मार्च, १९७० रोजी ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळा’ची स्थापना केली. लवकरच हे मंडळ सुवर्ण जयंती साजरी करणार आहे.

मंडळाच्या कार्यात बुद्धिप्रामाण्यवादी असणाऱ्या आणि ‘इस्माइल युसूफ कॉलेज’च्या प्राचार्या कुलसुम पारेख यांनी मोलाचे योगदान दिले. हमीदभाई काही काळ या महाविद्यालयात  होते, तेव्हा त्यांची जवळून ओळख झाली होती. त्या काळात प्राचार्या कुलसुम पारेख यांनी आंतरधर्मीय विवाह केला होता. मंडळातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या परिषदांमध्ये उच्चविद्याविभूषित अशा मरियम रिफाई, अ‍ॅड. नजमा शेख, प्रा. मुमजाज रहिमतपुरे, मेहरुन्निसा दलवाई यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

मुस्लीम महिला परिषदेत एक सत्र नेहमी तलाक आणि बहुपत्नीत्वाच्या बळी ठरलेल्या स्त्रियांसाठी राखून ठेवले जात असे. या सत्राचे नाव असे ‘मेरी कहानी, अपनी जुबानी’ म्हणजे माझी कथा माझ्या तोंडून. यात अनेक स्त्रिया आपल्या साचलेल्या वेदना मोकळ्या मनाने व्यक्त करीत. अनेक वेळा हुंदके देत, भावना आवरत झालेल्या अन्यायाला वाट करून देत. श्रोत्यांना सुद्धा अश्रू आनावर होत. मात्र या उपस्थित स्त्रियांना आपणही बोलावे अशी प्रेरणा मिळत असे. यानिमित्ताने स्त्रियांना बोलते करून त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न मंडळाकडून आजही केला जातो. यामुळे स्त्रिया एकवटल्या जातात. अन्यथा त्यांना एकत्र येवून आपले दु:ख व्यक्त करण्यासाठी जागा तरी मिळणार कोठून?

मुस्लीम व्यक्तिगत कायद्यातील अन्यायी तरतुदींचे हत्यार बनवून पुरुष प्रधान मानसिकतेने अनेक स्त्रियांवर अन्याय केला आहे. त्यांना असहाय्य, अबला बनवून त्यांचे मानसिक खच्चीकरण केले आहे. हा इतिहास आणि वर्तमान आहे, परंतु भविष्य असे असणार नाही असा निर्धार आजच्या तरुण मुली करीत आहेत. गुलामगिरी विरुद्धचे बंड अंतिमत: विजयी होणारे असते. हे ऐतिहासिक सत्य या युवतींना उमजले आहे.

‘मुस्लीम सत्यशोधक मंडळा’तर्फे मुस्लीम महिला मदत केंद्र चालवण्यात येते. असहाय्य स्त्रियांना समुपदेशनाबरोबरच कायद्याविषयक सल्ला देण्यात येतो. शैक्षणिक मदत केली जाते. हमीद दलवाई स्टडी सर्कलमार्फत स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाते. या मुस्लीम युवती मंडळाच्या विविध कार्यक्रमात सहभागी होतात. भाषणे करतात, सूत्रसंचालन करतात, मोर्चात सहभागी होतात, नाटकांचे अभिवाचन करतात. यातून या मुलींचे मनोबल वाढतेच, त्याबरोबरच त्यांचा आत्मसन्मान जागा होतो. मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे कार्यकर्ते तसेच संपर्कातील मुस्लीम कुटुंबे मुलांमुलींच्या लग्नात पारंपरिक निकाह बरोबरच या विवाहाची नोंद ‘विशेष विवाह कायदा १९५४’ अंतर्गत करतात. नोंदणी विवाह केल्यास त्यांना एकतर्फी तलाक, बहुपत्नीत्व यांसारख्या अन्यायी प्रथांपासून सुरक्षित वाटते.

शहाबानो प्रकरणादरम्यान तत्कालीन राष्ट्रपती, पंतप्रधान यांना निवेदन देत असताना मंडळाच्या स्त्री कार्यकर्त्यांसमवेत व्यक्तिगत कायद्याची बळी ठरलेल्या अनेक स्त्रिया होत्या. त्यात मुमजाज इनामदारही होत्या. मंडळाच्या आधुनिक मोकळ्या वातावरणातून त्यांच्यात नवा आशावाद निर्माण झाला. त्या आरोग्य खात्यात नोकरी करीत होत्या. समाजसेवेची आवड होतीच. त्यांनी आंतरधर्मीय विवाह केला. त्यांना क्षमा नावाची मुलगी आहे. या मुलीने सैनिक शाळेतून शिक्षण घेतले, एमबीए झाली. मुमजाज यांनी जाणीवपूर्वक या मुलीचे एका पंजाबी मुलाबरोबरच नोंदणी पद्धतीने विवाह करून दिला. या विवाह प्रसंगी सर्वधर्मीय परिवार आनंदाने सहभागी  झाले. मुमजाज यांच्या आरोग्य खात्यातील उल्लेखनीय कार्याबद्दल दोन वर्षांपूर्वी त्यांना माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते ‘फ्लॉरेन्स नाईटिंगेल’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शहनाज शेख या कराड येथील कार्यकर्त्यां आहेत. त्यांच्या विवाह प्रसंगी काही गोष्टी लपवून तर काही गोष्टी खोटय़ा सांगून लग्न केले. तिचा नवरा डॉक्टर होता. शहनाजने घरातील वास्तवाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता सासरच्यांना राग आला आणि या रागातून त्यांना मानसिक, शारीरिक त्रास द्यायला सुरुवात झाली. शहनाज माहेरी येताच वर्तमानपत्रातून तिला तलाकची नोटीस देण्यात आली. शहनाजने अशा प्रकारचा तलाक मला मान्य नाही, असे खडसावून सांगितले. नवऱ्याने दुसरा विवाह केला. आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध न्यायालयीन लढा देण्याचा निर्धार शहनाजने केला. पदवीधर असणाऱ्या शहनाजने कराडच्या विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला. स्वत:ची लढाई स्वत: लढली. विविध उच्च, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा बारकाईने अभ्यास केला. शहनाजने स्वत:ला इन्साफ मिळवून दिला आहेच शिवाय अनेक स्त्रियांना मदतही करीत आहे. तिने आता स्त्री सबलीकरणासाठी स्वत:ची संस्था उभी केली आहे. शहनाजने टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून एम. ए.साठी प्रवेश घेतला आहे.

२६ नोव्हेंबर, २०१६ मध्ये ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळा’तर्फे राष्ट्रीय पातळीवर मुस्लीम महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. उत्तराखंडमधील काशीपूर येथून सायराबानो आणि तिचे भाऊ या परिषदेला आले होते. यासंदर्भात आलेली वर्तमानपत्रातील बातमी वाचून आणि माझा दूरध्वनी क्रमांक इंटरनेटवरून मिळवून बारामतीच्या आर्शिया बागवानने मला संपर्क केला. आईवडिलांसमवेत येवून भेटली. अभ्यासात हुशार आणि रूपवती असणाऱ्या आर्शियाला १० वी शिकत असतानाच वयाच्या सोळाव्या वर्षी निकाहची गळ घालण्यात आली. लग्नानंतर तुला शिकवू असे आश्वासन दिले गेले. माहितीतील पाहुणे आहेत म्हणून घरच्यांनी कर्ज काढून निकाह लावून दिला. वर्षभरात आर्शियाला मुलगा झाला. घरात मोठय़ा प्रमाणात अंधश्रद्धा पाळण्यात येत होत्या. लग्नानंतरचा निकोप आनंद मावळला आणि घरात वाद, भांडणे, शारीरिक छळ सुरू झाला. नवऱ्याने काही दिवसांसाठी माहेरी जाण्याची सूचना केली. आर्शिया आपल्या लहान बाळासह माहेरी आली आणि पाठोपाठ तलाकची नोटीसही. खरं तर अठरावं र्वष हे लग्नाचं वय! पण या वयात आर्शियाला एका बाळासह तलाक देण्यात आला. मी आर्शियाला ‘शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय’च्या समुपदेशन केंद्राकडे घेवून गेलो. तिचे मनोबल वाढवले. ती मंडळाच्या कार्यात भाग घेवू लागली. भाषणे करू लागली, परिषदेतील तलाक प्रश्नांवरील नाटय़ अभिवाचनात भूमिका केली. तिचा न्यायालयीन संघर्ष आजही चालू आहे. आर्शियाचे धाडस व कर्तृत्व पाहून एका वृत्तवाहिनीने तिला ‘सावित्री पुरस्कार’ देऊन सन्मानित केले. तिने मागच्याच वर्षी तीन वर्षांनंतर मराठवाडा मित्र मंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयातून १२ वीची परीक्षा दिली आणि प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. आर्शियाला कायद्याच्या अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचा आहे. मराठवाडा मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांनी तिच्या केवळ एलएलबी नाही तर एलएलएमपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. स्वत:वर झालेल्या अन्यायाविरोधात लढताना इतरांना मदत करण्याची प्रेरणा जशी आर्शियाला मिळाली तशी आता आर्शियासुद्धा इतरांसाठी प्रेरणा ठरत आहे. यावर्षी आर्शियाबरोबरच एकतर्फी तलाकची बळी ठरलेली पुण्याच्या २० वर्षीय अरबीननेसुद्धा बारावीला प्रवेश घेतला आणि अरबीननेसुद्धा यावर्षी बारावीत प्रथमश्रेणी मिळवून उत्तीर्ण झाली. या सर्व मुलींमध्ये आत्मसन्मानाबरोबरच आत्मविश्वास निर्माण झाला आहे. अन्यायाविरोधातील लढाईत ते सर्वात पुढे असतात. मागच्याच वर्षी तोंडी एकतर्फी तलाक विरुद्ध कायदा करण्याचा प्रयत्न होत असताना शहनाज, आर्शिया, अरबीन, आयेशा या तरुणींनी निर्भीडपणे प्रसारमाध्यमातून अनिष्ट प्रथांना विरोध केला. प्रश्नांचा भडिमार करून तलाकच्या समर्थकांच्या नाकीनऊ आणले.

मुस्लीम समाजात अनेक मागासजाती आहेत. आपले जातीय मागासलेपण किंवा कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीचा बाऊ न करता प्रतिकूल परिस्थितीशी सामना करीत सना शेख यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमात पदवी मिळवली. ती डॉक्टर झाली. सिंबॉयसिस महाविद्यालयातून व्यवस्थापन विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. स्वत:चे क्लिनिक काढले. मुंबईच्या मुलाने लग्नाची मागणी घातली. डॉ. सना शेख यांनी उच्च शिक्षण घेतलेले असल्याने मुस्लीम सामाजिक प्रश्नाबरोबरच मुस्लीम स्त्रियांच्या वैवाहिक समस्यांची जाणीव होती. डॉ. सना यांचे वडील मंडळाच्या संपर्कात असल्यामुळे त्यांना ‘विशेष विवाह कायदा १९५४’ याची कल्पना होती. डॉ. सना यांचा या विशेष विवाह कायदांर्तगत विवाह नोंदवला होता. असे असतानाही डॉ. सना यांच्या नवऱ्याने दुसरे लग्न केले. पुण्याच्या कुटुंब न्यायालयात हे प्रकरण निवाडय़ासाठी दाखल झाले. नवऱ्याने दुसरे लग्न केलेले असल्याने डॉ. सना यांनी समुपदेशनाची प्रक्रिया नाकारून ही केस चालवली. चार महिन्यांपूर्वीच कुटुंब न्यायालयाने नवऱ्याला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

डॉ. सना शेख यांनी मुस्लीम तरुणींना भविष्यातील येऊ घातलेल्या समस्या निवारणाचा मार्ग दाखवला आहे. डॉ. सना आरोग्यविषयक प्रकल्पानिमित्ताने विविध शहरात जात असतात.

मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या मंचावरून युवक-युवती एकत्रपणे शपथ घेवून निर्धार करतात की, जोपर्यंत मुस्लीम व्यक्तिगत कायद्यात सुधारणा होऊन अन्याय निवारण होत नाही किंवा सर्वाना समान अधिकार देणारा कायदा होत नाही तोपर्यंत आम्ही ‘स्पेशल मॅरेज अ‍ॅक्ट १९५४’ अंतर्गतच विवाह करणार आहोत. या कायद्याची अनिवार्यता सर्वधर्मसमुदायांना आहेच, आज मात्र मुस्लीम मुलींना या कायद्याची उपयुक्तता जास्त आहे.

मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या मुशीत तयार होणाऱ्या तरुण विविध क्षेत्रात प्रावीण्य दाखवीत आहेत. कायदा, पत्रकारिता, साहित्य, क्रीडा, राजकारण, प्रशासन, शिक्षण, व्यवसाय आणि विज्ञान इत्यादी अभ्यासक्रमात यश संपादन करीत आहेत. अनेक मुस्लीम मुली आणि मुले जात-धर्मापलीकडच्या विश्वाकडे वाटचाल करीत आहेत. मंडळासाठी हे चित्र आश्वासक आहे.

व्यक्तिगत कायद्याच्या बळी ठरलेल्या अनेक स्त्रियांनी या आपत्तीतून आत्मशोध घेतला. स्वत:च्या बळावर उभ्या राहिल्या आणि इतरांनाही बळ देत आहेत. या स्त्रियांनी विविध क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. फक्त मुस्लिमांसाठी नव्हे तर मानवता समृद्ध करण्यासाठी योगदान देत आहेत. यांच्याविषयी समजून घेऊ या पुढच्या लेखात.

tambolimm@rediffmail.com

chaturang@expressindia.com