19 November 2017

News Flash

आदर्श गावासाठी..

आज सरकारी मदतीशिवाय २००० पासून ते आजपर्यंत जी कामे होत आहेत त्यांचे श्रेय रमेशजी

नीलिमा मिश्रा | Updated: August 26, 2017 2:46 AM

लोकसहभागातून लोकविकास - स्त्रियांचा सहभाग गावच्या विकासात महत्त्वाचा ठरतो आहे.

आमच्या ‘आदर्श गावा’च्या संकल्पनेस आम्ही ग्रामरचना प्रकल्प असे संबोधतो. त्यासाठी बहादरपूर व शिरसोदे या गावांचे ५५ गल्लींमध्ये विभाजन करण्यात आले असून प्रत्येक गल्लीमध्ये ५ स्त्रियांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती आपल्या गल्लीची कामगिरी वाढवण्यासाठी प्रयत्नशील असते. शौचालय बनवणे, वृक्ष लागवड, परिसर स्वच्छता, बचतगट नियमित चालवणे, उद्योग वाढवणे, रुफवॉटर हार्वेस्टिंग, प्रत्येक स्त्री व तिच्या कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष ठेवणे आदी. लोकसहभागातून लोकविकासाचा आमचा प्रयत्न आहे.

गोधडी व भरतकाम उद्योगातून येथील स्त्रियांना रोजगार मिळाल्यावर उद्योगाची इतर अनेक द्वारे खुली झाली. उदाहरणार्थ पेटीकोट बनवणे, त्याला रंग देणे, पटीयाला पँट, सलवार, कुर्ता तयार करणे इत्यादी व्यवसाय मोठय़ा प्रमाणात सुरू होऊन हजारो स्त्रिया आपल्या पायावर उभ्या राहू लागल्या. त्यातून त्या आपल्या कुटुंबांना आर्थिक मदत करण्यास सक्षम होऊ लागल्या.

याशिवाय आपल्या परिसराची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे कार्यही होतेच. दिल्ली, मुंबई, बंगळुरु, पुणे, शेगांव अशा वेगवेगळ्या भागांमधून शेतकऱ्यांसाठी अर्थव्यवस्था उभ्या राहू लागल्या. यामध्ये काही अर्थसहाय्य करणाऱ्या संस्था शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घेत परतफेडीसाठी होणारा विलंब लक्षात घेऊ लागल्या. त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल संजय शेलगीकर यांचा. २००४ पासून शेतकरी बंधूंसाठी विविध संस्थेमार्फत अर्थसहाय्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत आणि आजही शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी अर्थसहाय्य देणारी व्यवस्था उभी करण्यासाठी धडपडत आहोत. शेतकऱ्यांबद्दल किंवा शेतीबद्दल अनेक तज्ज्ञ वेगवेगळे विचार मांडतात. मात्र शेतकऱ्यांना जाणून घेणारी, त्यांचे प्रश्न प्रत्यक्ष पहाणारी, अनुभवणारी व्यक्तीच त्यांना समजू शकते. पाऊस आपल्या हातात नाही, कधी सुका दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ, बाजारभाव आपल्या हातात नाही, दर वर्षी बियाणे, खत, मजुरी यांचा खर्च वाढत जातो. मात्र येणाऱ्या उत्पादनाचे भाव त्याप्रमाणात वाढत नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न वाढतच आहेत. त्यावर आमच्या परीने मदत म्हणून आम्ही शेकडो शेतकऱ्यांना कूपनलिका, ठिबक सिंचन, जलवाहिन्या, शेती साहित्य-औजारे यासाठी अर्थसहाय्य केले. यातून मिळालेल्या अनुभवाने शेतकऱ्यांसाठी एक मॉडेल तयार केले, मात्र तयार केलेल्या मॉडेलसाठी सहाय्य मिळविणे कठीण गेले. कारण प्रत्यक्ष मदतीसाठी, उपायांसाठी फारच थोडे हात पुढे येतात. शेतकरी बंधूंसाठी किती लिहिणार आणि काय लिहिणार?  रोजच विविध माध्यमांतून विचार मांडले जातात. त्यापलीकडे आमच्याकडे सांगण्यासारखे काही नाही, असे वाटते. मात्र शेतकऱ्यांशी चर्चा करून तयार केलेल्या मॉडेलवर आम्ही काम करत आहोत. त्यासाठी व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यातून शेतकऱ्यांचे प्रश्नकायमस्वरूपी सुटतील अशी आशा करतो.

शेतकऱ्यांना जाणून घ्यायचे असेल तर सर्वप्रथम आवश्यक आहे ते अन्नदाता म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवणे व तो विश्वास ठेवूनच सध्याची व पुढील पावले आमच्याकडून उचलली जात आहेत. हे पाऊल उचलताना निसर्गाने शेतकऱ्यांबरोबर केलेला खेळही ध्यानी घेतला आहे. कधी सुरुवातीचा पाऊस कमी त्यासाठी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागते. कधी शेवटचा पाऊस कमी त्यामुळे ४० ते ५० टक्के उत्पन्नात घट होते. कधी गारपीट तर कधी वादळाने शेतातली काडी न काडी बरबाद होते. या वर्षी तर पाऊसच नाही. अशा स्थितीत शेतकरी काय नियोजन आणि व्यवस्थापन करतील? म्हणून शेतकऱ्यांवर भरवसा ठेवून त्यांच्या गरजा पूर्ण करा, अशी सर्व जबाबदार घटकांना आमची विनंती आहे. या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी आम्ही जे मॉडेल तयार करीत आहोत. त्यासाठी आपणा सर्वानी मदतीचा हात द्यावा, असे आवाहन करीत आहोत. मात्र हो, यासाठी आपणास शेतकरी जे उपाय सुचवितात त्यावर विश्वास ठेवायला हवा. आम्ही आमच्या पातळीवर प्रयत्न करतो आहोतच. त्यातलाच एक ग्रामरचना प्रकल्प.

आदर्श गावाच्या दिशेने..

उद्योग व आर्थिक सहाय्य यामुळे घराघरांत पसा येऊ लागला आहे. त्यामुळे त्या पातळीवर प्रयत्न चालूच राहिले तसेच आदिवासी शेतकरी बंधूंची सावकाराकडून जमीन सोडवणे, आदिवासी भागातील डोंगराळ क्षेत्रात जेथे वीज पोहचलेली नाही अशा ३५०० घरांमध्ये ‘सेलको’च्या माध्यमातून घराघरांत सौर ऊर्जेचे दिवे पोहचविणे, घराघरांमध्ये शौचालय बनविणे, सामूहिक शौचालयाचे अभिनव उपक्रम राबविणे अशी कामे चालू झाली. अशातच आदर्श गाव निर्मितीचे स्वप्न पूर्ण करण्याचे राहिले.

आदर्श गावांबाबतीत आमच्या कल्पना मात्र थोडय़ा वेगळ्या आहेत. यामध्ये काही कालावधी पुरता प्रयत्न करणे असे नसून आदर्श व जबाबदार जीवनशैली ही कायमस्वरूपाची होऊन त्यातून निर्माण होणारी आदर्श संस्कृती पिढय़ांपिढय़ा चालेल अशी योजना आहे. त्यामुळे ही योजना वेळखाऊ व संथ गतीची आहे. आमच्या ‘आदर्श गावा’च्या संकल्पनेस आम्ही ग्रामरचना प्रकल्प असे संबोधतो. ग्रामरचनेचे कार्य बहादरपूर व शिरसोदे या दोन्ही गावांमध्ये राबविले जात असून, या दोन्ही गावांचे ५५ गल्लींमध्ये विभाजन करण्यात आले आहे. या प्रत्येक गल्लीमध्ये ५ स्त्रियांची गल्ली समिती स्थापन करण्यात आली असून प्रत्येक गल्ली समिती आपल्या गल्लीची कामगिरी वाढवण्यासाठी प्रयत्नशील असतात. प्रत्येक गल्लीत पंधरवडय़ाला बठक होत असते. या बठकीत गल्लीतील कामांची आखणी करण्यात येते.

ग्रामरचनेत समाजासाठी विविध व्यवस्थांची सोय करण्यात येते. मात्र या व्यवस्थांचा लाभ घेण्यासाठी लोकांना काही आदर्श निकषांचे पालन करणे गरजेचे आहे. (उदाहरणार्थ शौचालय बनवणे, वृक्ष लागवड, परिसर स्वच्छता, बचतगट नियमित चालवणे, उद्योग वाढवणे, लोकसहभाग, रुफवॉटर हार्वेस्टिंग, स्त्रियांचे रक्तातील हिमोग्लोबिनच्या प्रमाणाकडे लक्ष ठेवणे, कुटुंबांच्या आरोग्य तक्त्यात असलेल्या व्यायामाचे पालन करणे, पंधरवडय़ातील बठकीतील उपस्थिती इत्यादी.) ज्यानुसार निकषांचे किती पालन केले जाते त्यानुसार व्यवस्थांचा लाभ मिळवता येतो. जसे पिण्याचे शुद्ध पाणी (पाणी शुद्धीकरण यंत्राद्वारे शुद्ध केलेले) अल्पदरात पुरवण्यात येते. ज्या कुटुंबांनी सर्व आदर्श निकषांचे पालन केले आहे त्यांना काही प्रमाणात मोफत पिण्याचे शुद्ध पाणी देण्यात येते. शाळेतील विद्यार्थाना कौशल्य शिक्षण व मूल्य शिक्षण देऊन एक जबाबदार नागरिक बनवण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे. त्यासाठी बालसभा, अभ्यासवर्गही घेतले जातात. लोकसहभागातून लोकविकासाचा हा प्रयत्न सुरू तर झाला आहे.

ही कामे करताना ज्या लोकांनी मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य केले त्या लोकांचा उल्लेख केल्याशिवाय या कामाचे लिखाण पूर्ण होणे अशक्य आहे. आज सरकारी मदतीशिवाय २००० पासून ते आजपर्यंत जी कामे होत आहेत त्यांचे श्रेय रमेशजी कचोलिया यांना जाते. त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला. डॉ. एस. एस. कलबाग सरांनी समाजाबद्दलची जी दृष्टी दिली तेही योगदान मोठे आहे.

या शिवाय श्री गजानन महाराज संस्थेचे शिवशंकरभाऊ पाटील, संजय शेलगिकर, रमेश पानसे सर, बाबूभाई ठक्कर, जितूभाई कुटमुटिया, हरीश हांडे, रावसाहेब बढे, उदय महाजन, शशिकांत धामणे, भगवान अमृतकर यांचे अनमोल मार्गदर्शन सतत मिळत राहिले आहे व अजूनही मिळत आहे. डॉ.जगन्नाथ वाणी यांचे योगदान आम्ही कसे विसरणार? त्यांच्यासह भवरलालजी जैन यांनीही योग्य मार्गदर्शन करून हे कार्य पुढे चालू ठेवण्यास मदत केली. आम्ही फक्त कलाकार म्हणून काम करताना दिसतो. मात्र वर नमूद केलेल्या या सर्व मंडळींनी निर्माता, निर्देशक म्हणून भूमिका निभावल्या व निभवत आहेत. माता-पित्यांचे ऋण, आशीर्वाद, संस्कार व त्यांनी दिलेली संधी यामुळेच चांगले लोक भेटले आणि अनेक वाटा सुलभ झाल्या.

ध्येय डोळ्यासमोर आहे, ध्येयपूर्तीसाठी प्रक्रिया सुरू आहे, चांगले लोक भेटत आहेत. पुढील योजना पूर्णफळाला जातील असे स्पष्ट चित्र दिसत आहे. सुरुवातीच्या काळात ज्या स्त्रिया घरातून बाहेर पडण्याबाबत साशंक असत त्याच स्त्रिया आता आपल्या गावातच तयार केलेल्या कपडय़ांच्या व इतर वस्तूंच्या मार्केटिंगसाठी दूरदूरच्या गावी जात आहेत व त्यातून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. एवढेच नव्हे तर इतर ठिकाणच्या गरजू स्त्रियांनाही या प्रवाहात आणत आहेत. हे प्रवाह असेच सुरू राहावेत.. राहातील हीच प्रार्थना!

(समाप्त)

नीलिमा मिश्रा  nilammishra02@yahoo.com

First Published on August 26, 2017 2:46 am

Web Title: neelima mishra article on ideal village concept