काय कामं करावीत हे आपण न ठरवता ज्यांच्यासाठी काम करायचं आहे त्यांच्याकडूनच त्यांचे प्रश्न कोणते व त्यावर मार्ग कसा काढावा हे त्या लोकांशी चर्चा करून ठरवावं आणि त्यातून कामाची आखणी करावी असं ठरवलं. चार पुस्तकं वाचून, पदवी घेऊन आपण तज्ज्ञ बनत नाही. तर हजारो वर्षांपासून जी समाज रचना आहे त्या समाजालाच त्यांचे प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरंही माहीत असतात, हे लक्षात घेऊन मी वाटचाल सुरू केली.

गावातल्या  लोकांसाठी काम करण्यापूर्वी ग्रामीण जनतेचा विकास कसा होईल? त्यांचे प्रश्न कसे सुटतील? कोणत्या कामापासून सुरुवात करावी? हे प्रश्न डोक्यात होते. ‘शिक्षणातून ग्रामविकास’ ही संकल्पना एस. एस. कलबाग सरांनी दिली. गावासाठी काम करायचं होतंच, मात्र त्या आधी स्वत:च्या ज्ञानात अधिक भर घालण्याची गरज जास्त वाटली.

एम.ए.पर्यंत जरी शिक्षण घेतलं असलं तरीसुद्धा जीवन व्यवहाराच्या गोष्टींचा संबंध मात्र आला नव्हता. त्या जीवन व्यवहाराच्या गोष्टींचं ज्ञान कलबाग सरांसोबत मिळेलच ही खात्री झाली. तसंच डोक्यात असंख्य प्रश्नांनी गर्दी केली होती. त्यातील बरेचशे प्रश्न मूर्खपणाचे होते. माझ्या या मूर्ख प्रश्नांची उत्तरंही मला हवी होती. तशी संधी व त्यासाठी प्रोत्साहन मला सरांनी दिले. सर शास्त्रज्ञ होते आणि मी कला शाखेची विद्यार्थिनी. मला विज्ञानाचा जराही गंध नव्हता असं म्हटलं तरी चालेल. जेव्हा कलबाग सर तांत्रिक आणि वैज्ञानिक विचार मांडायचे तेव्हा मला सुरुवातीला फार संकोच वाटे. मात्र हा संकोच त्या वेळेस लोप पावला जेव्हा मी सरांना सांगितले की, ‘‘मला अनेक गोष्टी माहिती नाहीत. माझी सुरुवात शून्यापासून आहे.’’ सरांना हे सांगितल्यानंतर माझ्या मनातला संकोच दूर झाला. सरांनीही माझं शिक्षण गृहीत न धरता मला शून्यापासून शिकवण्यास सुरुवात केली.

कलबागसर एकदा मला म्हणाले, ‘‘जरी तुला विज्ञान येत नसलं तरी तुझ्याकडूून येणारे प्रश्न मला अर्थपूर्ण वाटतात. त्याचं कारण म्हणजे तुझ्याकडे आधीपासूनच काही गृहीतकं नाहीत. अर्धवट पूर्वग्रहीत ज्ञानापेक्षा शून्य ज्ञान असलेलं उत्तम.’’ माझ्या प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांना काय काय प्रश्न पडू शकतात आणि त्यांचे निराकरण कसे करता येईल याची कल्पना येत असे. तसं त्यांनी माझ्याजवळ बोलून दाखवलं होतं. त्यांनी सांगितलं, ‘‘तुला पडलेल्या प्रश्नांमुळे घाबरू नकोस, उलट त्याचं उत्तर ऐकून घेऊन तुझे विचार आणि संकल्पना अधिक स्पष्ट करत जा.’’ प्रश्नांच्या उत्तरांसह त्यांनी मला प्रात्यक्षिकांतूनही ज्ञान दिलं. उदाहरणार्थ, इलेक्ट्रिक वायिरग करणं, खाद्यपदार्थ बनवणं, पॅथालॉजिकल चाचण्या, कुक्कुटपालन, वेल्डिंग करणं, शेती करणं, हिशोब ठेवणं, संगणकाचं ज्ञान, पुस्तक छापणं, बाइंडिंग करणं आणि इतर.

मी सरांसोबत जरी काम करत होते तरी माझ्या गावात कोणतं काम केलं पाहिजे म्हणजे ग्रामस्थांचे आजचे प्रश्न, समस्या आजच सुटतील  याचा विचार सतत होता. त्यावेळेस २३ शाळांमध्ये ‘मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख’ हा कार्यक्रम राबविला जाई. आणि या कार्यक्रमाचं नेतृत्व माझ्याकडे आलं. त्यामुळे त्या शाळांना भेटी देऊन अभ्यासक्रम कसा राबविला जातोय, शाळांचे, शिक्षकांचे काही प्रश्न आहेत का? त्यांचं प्रशिक्षण आखण्याचं काम, निदेशक सभा, मुख्याध्यापक सभा आयोजन करण्याची जबाबदारी माझ्याकडे होती.

सरांबरोबर काम करता करता ५ वर्ष झाली. एके दिवशी सरांनी मला त्यांच्या संस्थेचं पुढील दायित्त्व सांभाळण्याविषयी चर्चा केली. त्यावेळेस सरांना मी माझ्या स्वभावगुणांविषयी कल्पना दिली. ती अशी की, मला जर एखादी भिंत बांधायची असेल तर जोपर्यंत मला त्या कामाचा पूर्ण अंदाज बांधता येईपर्यंत प्रत्येक वीट ही माझ्या हाताने रचलेली हवी असते. एखाद्या ठिकाणपर्यंत पोहोचायचे असल्यास विशिष्ट अंदाज येईपर्यंत मला माझ्या पावलांनी रस्ता पार करायचा असतो. अशा वेळेस जर कोणी मला सोपा मार्ग देत असेल तर तो मला नको असतो. मला पक्का अंदाज आल्यावर मग मदत घेण्यास हरकत नाही. दुसरं असं की, माझ्या गावाचं निरीक्षण मी बालपणापासून करत आले आहे. उदाहरणार्थ, अशिक्षित असल्या तरी स्त्रियांना वर्षभरासाठी टिकाऊ पदार्थ बनविण्याचं कौशल्य येत होतं. सणासुदीला मिष्टान्न बनवणं, लग्नकार्यात सुंदर गाणी म्हणणं, त्यावर नाचणं, अल्प कमाई असून घर नीटनेटकेपणाने चालवणं, काटकसरीने संसार करणं. शेतकऱ्यांचे शेतीसाठीचे कष्ट हे सगळं जवळून पाहिलं होतं. त्यामुळे माझं गाव, गावाचा प्रत्येक कोपरा न् कोपरा, तिथले लोक या सगळ्या गोष्टी माझ्या हृदयात अगदी रुतून बसल्या होत्या. माझं गाव हीच माझी प्रयोगशाळा आहे. मला तिथेच काम करायचं होतं. सरांना या गोष्टीची मी जाणीव करून दिली आणि माझं पुढचं नियोजित कार्य हे आपल्या गावातच करायचं आहे हे स्पष्टपणे सांगितलं.

गावात काम कसं आणि कोणत्या मार्गाने सुरू करायचं याचा रस्ता मात्र सापडत नव्हता, हे मी सरांना सांगितलं. त्यावर सरांनी मला एक संधी देऊ केली. भारतात वेगवेगळ्या राज्यांत ज्या संस्था आहेत त्यांना भेट देऊन कोणती कामं करावीत याचं नियोजन करण्याची. सरांच्या सांगण्यावरून मी वेगवेगळ्या राज्यातील संस्थांना भेटी दिल्या. मात्र या संस्थांना भेटी दिल्यावर काय करू नये याचीच यादी तयार झाली. त्यात सर्वात प्रथम सरकारचा पैसा घेऊन काम करू नये हे लक्षात आलं. याचाच अर्थ प्रकल्पांवर आधारित काम न करता प्रश्नांवर आधारित कामाची रचना व्हावी. दुसरं म्हणजे काय कामं करावीत हे आपण न ठरवता ज्यांच्यासाठी काम करायचं आहे त्यांच्याकडूनच त्यांचे प्रश्न कोणते व त्यावर मार्ग कसा काढावा हे त्या लोकांशी चर्चा करून ठरवावं आणि त्यातून कामाची आखणी करावी. चार पुस्तकं वाचून, पदवी घेऊन आपण तज्ज्ञ बनत नाही. तर हजारो वर्षांपासून जी समाजरचना आहे त्या समाजालाच त्यांचे प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरंही माहीत असतात. मात्र आपला लोकांवर विश्वास असणं गरजेचं आहे.

सरांबरोबर काम करताना, आपल्याला जी तळमळ बालपणापासून होती तीच तळमळ अजूनही आहे का, हे तपासण्यासाठी दोनदा काही महिन्यांसाठी कोणतंही वेतन न घेता काम करण्याचे प्रयोग मी केले. त्या दरम्यान असं लक्षात आलं की वेतन मिळो अथवा न मिळो काम करण्याच्या दृढनिश्चयावर कोणताही परिणाम होत नाही. अशा पद्धतीने कलबाग सरांबरोबर आठ वर्ष काम केल्यानंतर आपल्या गावात आपण काम करू शकतो, असा आत्मविश्वास आल्यावर ३१ मे २००३ रोजी गावात राहून पूर्ण वेळ काम करण्यासाठी मी परतले. त्यापूर्वी २००० मध्ये गावात ‘भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन’ या नावाने संस्था नोंदणी करून कामाला सुरुवात केली होती. त्याद्वारे गावातील कार्याची वाटचाल सुरू झाली.

नीलिमा मिश्रा nilammishra02@yahoo.com