|| डॉ. गिरीश कुलकर्णी

‘स्नेहालय’च्या कामामुळे देहव्यापारातील बळी स्त्रियांना आत्मभान येत गेले. समाजातील इतर स्त्रियांना असणारे हक्क स्त्री म्हणून आपल्यालाही मिळाले पाहिजेत, असे त्यांना वाटू लागले. वेश्यांवर पूर्वी कोणीही गुंड, मवाली, गुप्तरोगी, फुकटे पोलीस अध्र्या रात्री अथवा पहाटे उठवून त्यांची इच्छा नसताना शरीरसंबंध करायचे. काही वेळा तर आजारी, गर्भवती आणि मासिक पाळी चालू असणाऱ्या स्त्रियांवरही अत्याचार करायचे. एखादी लहान मुलगी आली तर तिच्यावर सामूहिक बलात्कारच व्हायचा वर नमूद केलेल्या लोकांकडून. अशा वेळी पोलिसांकडे तक्रार घेऊन गेल्यावर संपूर्ण पोलीस ठाणे जमा होऊन ‘हे बघा काय सांगतात, म्हणे ७७ वर बलात्कार झालाय.’ असे म्हणत आमची अक्षरश: कुचेष्टा करीत.

या स्त्रियांचे माणूस म्हणून अस्तित्व कोणी मान्यच करीत नव्हते. अशा अवस्थेतून या स्त्रियांना सक्षम करताना ‘स्नेहालय’च्या कार्यकर्त्यांनाही एक दृष्टी येत गेली. अनेक स्त्रियांना या प्रक्रियेतून जीवन जगण्याचा नवा उद्देश आणि प्रेरणा मिळाली. अशांची संख्या हजारच्या घरात आहे. परंतु या लेखमालेच्या मर्यादेत हे काही मोजके अनुभव – १ मे १९८९ – महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन मला लख्ख आठवतो. कारण त्या दिवशी चित्रागल्ली, भगतगल्ली, ममतेगल्ली, नांगरेगल्ली आणि मंगलगेटजवळचे मटण मार्केट या लालबत्ती भागात आम्ही पहिले स्वच्छता अभियान राबविले. काही कुंटणखान्यांत सिमेंट आणि विटांचे ओटे ग्राहकांसाठी बांधलेले होते. बहुतांश ठिकाणी जमिनीवरच व्यवहार होत. ज्यांना लहान बाळे अथवा मुले होती त्या मोजक्या ठिकाणी जुनाट लोखंडी खाटा होत्या. या खाटांना बांधलेल्या झोळ्यांत स्त्रिया त्यांची मुले बांधून ठेवत. बाळाकडे लक्ष द्यायला त्यापेक्षा मोठा भाऊ अथवा बहीण खाटेखालीच झोपविले जात. ग्राहक खोलीत असताना कुठलेच आवाज करायचे नाहीत, अशी शिस्त या मुलांना लावलेली होती. ५ वर्षांवरील मुले कुंटणखाण्याच्या घाणीत गोटय़ा, पत्ते, बिल्ले, सिगारेटची पाकिटे, आंब्याच्या कोया खेळत बसत. काही मोठी मुले-मुली गुटखा तंबाखूच्या पुडय़ा, कंडोम, उकडलेला हरभरा, शेंगदाण्याच्या पुडय़ा, पापड असा चखणा विकत. स्वयंपाकही तिथेच उघडय़ावर चाले. संडास भयंकर किळसवाणे होते. प्रत्येक खोलीत कोपऱ्यात एक मोरीचे भोक होते. तेथे पाण्याची एक कळकट बादली आणि ओशट मग्गा असे. कंडोम फेकायला एक कॅरीबॅग तेथेच ठेवलेली. या कॅरीबॅग ओसंडू लागल्यावर महिन्यात एखाद्या वेळी मध्यरात्री त्यांची सीना नदीच्या पुलावर जाऊन विल्हेवाट लावली जाई. सर्वत्र ओकारी येईल असा किळसवाणा दरुगध वर्षांनुवर्षे साचलेला होता. त्या दिवशी आम्ही श्रमदान करताना लोकवर्गणीतून आणलेले फिनेल, साबण, पावडरच्या पुडय़ा, संडास आणि बाथरूमचे ब्रश वापरले. स्त्रियांना फारच आनंद झाला. सर्वत्र फिनाइलचा वास दरुगधीची तीव्रता कमी करत होता. बायकांना आनंदलेल्या पाहून येथील मालकिणी मात्र अस्वस्थ झाल्या. चित्रागल्लीत कुंटणखान्याच्या सर्वात मोठय़ा मालकिणींनी नाक मुरडून म्हटले, ‘‘आले लई ७७ ७७  साफ करायला. बघू किती आणि कशी करतात ते..’’ मालकिणीचा कांगावा पाहून एक काळीसावळी, शिडशिडीत, कपाळावर ठसठशीत कुंकू लावलेली स्त्री झटकन पुढे आली. तिने म्हटले, ‘‘अहो अक्का, पहिल्यांदाच कोणी तरी आमच्यासाठी इथं गलिच्छ वस्तीत आलंय. तुमच्या का पोटात दुखतंय?’’ हे म्हणणाऱ्या या स्त्रीमागे इतर बायका लगेच उभ्या राहून मोठय़ाने आमच्या बाजूने मालकिणींना बडबडू लागल्या. यावर मालकिणी चिडीचूप झाल्या. या स्त्रीचा इतर स्त्रियांवरील प्रभाव, तिचे धाडस आणि नेतृत्वक्षमता यामुळे आमचे धडपडे टोळके एकदम प्रभावित झाले. या स्त्रीने स्वत: हातात झाडू-खराटे घेतल्यावर इतर स्त्रिया सरसावल्या.

आमची उमेद वाढविणाऱ्या त्या स्त्रीचे नाव होते लता पवार. आम्ही तिला लताक्का म्हणू लागलो. कोणे एके काळी मराठी विषयात एम.ए. केलेली लताक्का पूर्वी पाटबंधारे विभागात कारकून म्हणून कामाला लागली. इंग्रजी आणि मराठी भाषेत तसेच टायपिंग आणि शॉर्टहँड यात निपुण असल्याने तिने चांगले नाव कमावले. परंतु घरची परिस्थिती फार दुबळी. अशा स्थितीत लग्न झालेल्या एका मोठय़ा गुन्हेगार आणि पुढाऱ्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून वापरले. तिला २ मुले झाली. मुले नको असलेल्या या पुढाऱ्याने तिचा अनन्वित छळ केला. समाजात जो कोणी लताक्काला आश्रय देई, त्याचा तो राजरोस काटा काढायचा. अखेरीस मुलांचा जीव वाचविण्यासाठी जीवघेणी पळापळ करीत असताना लताक्का श्रीरामपूरला पोहोचली. काही दिवस रुग्णालयात आयाचे, खाणावळीत स्वयंपाकाचे काम केले. एकटय़ा आणि आधार नसलेल्या बाईचे होतात तसे सर्व छळ होऊन लताक्का तिच्या इच्छेविरुद्ध मोरगे आणि सुभेदार वस्तीच्या मधल्या पट्टय़ातील प्रचंड मोठय़ा लालबत्तीत आणली आणि वापरली गेली. उपासमार आणि जबरदस्तीमुळे तिला नको त्या देहव्यापाराचा स्वीकार करावा लागला. श्रीरामपूरनंतर सिन्नर, शेवगाव येथील कुंटणखाण्यात मालकिणींनी देण्याघेण्याच्या व्यवहारात तिला वापरले.

लताक्काला आम्ही विश्वासात घेऊन आमच्या कल्पना सांगितल्या. आमच्यासोबत सूर जुळल्यावर गेली अनेक वर्षे देहव्यापारातून मुक्त होण्याची वाट पाहणाऱ्या लताक्काने ‘स्नेहालय’चे उपाध्यक्षपद पहिल्या विश्वस्त मंडळात स्वीकारले. प्रथमपासून या ‘स्त्रियांसोबत स्त्रियांसाठी’ हे तत्त्व ‘स्नेहालय’ टीमने अनुसरले. लताक्काने खानदेशातून आलेली अंजना सोनवणे, परभणी जिल्ह्य़ातून आलेली गीता मोरे, करमाळ्याहून आलेली शबनम, कला केंद्रात नाचून थकल्यावर चौफुल्याहून आलेली संगीता आदींना ‘स्नेहालय’चे आजीव सदस्यत्व, जबाबदाऱ्या समजावून दिल्या. सदस्यत्वाची पावती फाडताना, ‘तुम्ही लाच किंवा भाडं देत नसून तुमची स्वत:ची एक चळवळ आणि अस्तित्व निर्माण करीत आहात’, हे लताक्काने त्यांच्या भाषेत समजावून दिले. त्यामुळे त्यांच्यातून ‘स्नेहालय’ला आजीव सदस्य आणि विश्वस्त मिळवणे सोपे गेले. ‘स्नेहालय’ या स्त्रियांचीच स्वत:ची संस्था बनल्याने त्यांची बालके आरंभी ‘स्नेहालय’च्या रात्र सेवा केंद्रात, नंतर माझ्या घरी आणि १९९५ नंतर संस्थेच्या अहमदनगर जिल्ह्य़ातल्या निंबळक येथील पुनर्वसन केंद्रात आणताना विश्वासाचे प्रश्न निर्माण झाले नाहीत.

संस्थेच्या भूमिका ठरवताना मासिक सहविचार सभा प्रत्येक लालबत्तीत आयोजिली जायची. त्यापूर्वी लताक्काशी आमचा दीर्घ संवाद व्हायचा. आमच्या बुद्धिजन्य आणि नैतिक कल्पनांना लताक्काच्या जळजळीत अनुभवांची आणि वास्तवाची जोड मिळायची. त्यामुळे ठरवलेले प्रत्येक कार्यक्रम, भूमिका आणि धोरणे यांना स्त्रियांचा उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद मिळत असे. प्रत्येक बाईने व्यसने सोडवण्यासाठी व्यसनमुक्तीचे शिबिर करावे, आपली मुले ‘स्नेहालय’ संस्थेत घालावीत, शिधापत्रिका, निवडणूक ओळखपत्र आणि बँकेत खाते काढावे, मुला-मुलींच्या जन्माची नोंद करावी, जातीचे दाखले मिळवण्याची धडपड करावी, अशा मुद्दय़ांवर सहमती घडविण्यात आणि या कामांचा पाठपुरावा सरकारदरबारी करण्यात लताक्काने महत्त्वाची भूमिका बजावली. ‘स्नेहालय’ने वेश्यांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेला जागा मागितली. हक्काचे घर मिळाल्याशिवाय कुंटणखान्यात राहणाऱ्या स्त्रियांचे फुटकळ रोजगार कौशल्यांमुळे पुनर्वसन होणार नव्हते. त्यासाठी सुधाकर नाईक, शरद पवार आणि मनोहर जोशी या तीन मुख्यमंत्र्यांना ते नगर जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर असताना वेश्यांचे शिष्टमंडळ घेऊन लताक्का भेटली. त्यापूर्वी जागा- जमिनी शोधात महसूल अधिकाऱ्यांकडे प्रचंड पाठपुरावा केला. लताक्का, अंजना, शबनम, गीता या टीमने नगर जिल्ह्य़ातील प्रत्येक लालबत्ती भागातील प्रत्येक स्त्रीच्या मनात ‘स्नेहालय’ची भावधारा रुजविली.

‘स्नेहालय’ची चळवळ सक्षम झाल्यावर १९९५ नंतर आम्ही कार्यकर्त्यांनी मुक्तिवाहिनी सुरू केली. नगर जिल्ह्य़ातील सर्व कुंटणखाने बाललैंगिक शोषणमुक्त करण्याचे तिचे उद्दिष्ट होते. या कामात कुंटणखाना चालविणाऱ्यांशी उघड वैर पत्करावं लागणार होतं. लताक्का, अंजना, सावित्री कांबळे यांना कादिर या मित्राची रिक्षा आम्ही ठरवून दिली. नगर, श्रीरामपूर, कोपरगाव, शेवगाव, जामखेड, श्रीगोंदा, माही जळगाव अशा प्रत्येक लालबत्तीत, ढाबे आणि हॉटेलांमधून त्यांनी धंद्यातील प्रत्येक बळी स्त्रीशी संवाद केला. कितीही दबाव मालकिणी, दलालांनी आणला तरीही उठाव करायचा आणि अल्पवयीन मुलीला ‘स्नेहालय’कडे पाठवायला लावायचे. ऐकले नाही तर ‘स्नेहालय’द्वारा पोलिसांशी संवाद करून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्याखाली छापामारी करायला लावायची, हे मिशन या स्त्रियांनी यशस्वी केले. मालकिणींवर धडाधड गुन्हे दाखल झाल्यावर आणि जामीन नाकारले गेल्यावर त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. लहान मुलींना कोणीही ठेवायचे नाही, असा ठराव प्रत्येक लालबत्तीत एकमताने होऊ लागला. बाहेरच्या हॉटेल आणि ढाब्यांवर धंद्यासाठी आणलेल्या अल्पवयीन मुलींच्या वापराबद्दल गुन्हे दाखल झाल्याने धाक निर्माण झाला.

१९९९ पर्यंत प्रत्येक ग्राहकाकडून स्त्रियांना मिळणाऱ्या पैशांतील निम्मे मालकिणीला द्यावे लागत. पोलिसांचा, दलालांचा, धंद्याच्या वेळी बालके सांभाळणाऱ्या आणि सामुदायिक स्वयंपाक करणाऱ्या वृद्ध वेश्यांचा, खास प्रेमाच्या माणसाचा असे अनेक हिस्से, घरभाडे, डॉक्टरचा खर्च, खासगी सावकारांचे व्याज असे सर्व दिल्यावर ग्राहक सोसणाऱ्या बाईला रुपयातील फार तर फार १० पैसे उरायचे. त्यावर व्यसनांचा अलग बोजा पडायचा. १९९६ च्या सुमारास नगर जिल्ह्य़ातील लालबत्तीतील स्त्रिया ग्राहकाकडून एका वेळचे २५ रुपये घ्यायच्या. १० गिऱ्हाईकांनी पैसे देऊनही तिच्याकडे उरलेल्या २५ रुपयांत तिचे आणि तिच्या मुलांचे पोटभर जेवण होत नसे. या सर्व प्रश्नांत आम्ही बाहेरच्या कार्यकर्त्यांनी भाषणे करून बदल होणार नव्हता. ज्यांचा हा प्रश्न होता त्यांना एका दिशेने नेत एका समान वैचारिक पायावर उभे करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आम्ही संयमाने केले. संधी मिळताच त्याचा स्फोटकासारखा वापर केला. नगर-पुणे रस्त्यावरच्या भोलेनाथ ढाब्यावरून एका ट्रकचालकाने कॉइन बॉक्सवरून ‘स्नेहालय’मध्ये मध्यरात्री फोन केला. एक बाई ढाब्याच्या पाठीमागे बेशुद्ध पडली आहे. तुमचे नाव आणि नंबर ढाब्याच्या वेटरने गुपचूप सांगितला, म्हणून कळविले, असे सांगून त्याने धाडकन फोन ठेवला. आम्ही पोहोचलो. तेथे ललिता निर्वस्त्र पडली होती. तिच्यावर शिकारी कुत्र्यांनी हल्ला केल्यासारखी तिची अवस्था होती. सर्व अंगावर मारहाणीच्या, लैंगिक अत्याचाराच्या जबर खुणा. तिला थोडेसे शुद्धीवर आणून चहा पाजून स्कूटरच्या मध्ये बसवून आम्ही जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले. दोन दिवसांनी ती बोलण्याच्या अवस्थेत आली. तिने सांगितले की, तिचे मूल आजारी आहे. उपचारांसाठी पैसे हवे होते. नगरमध्ये दगडफेकीमुळे गल्ल्या बंद होत्या. म्हणून ती पुणे रस्त्याला आली. सारोळा कासार येथील जत्रा आटोपून परतणाऱ्या आणि प्रचंड दारू प्यायलेल्या तीन पोलिसांना आणि त्यांच्याबरोबरच्या दोघांना मध्यरात्री ललिता तिथे सापडली. त्यांनी तिला जनावरासारखे वापरले. सकाळीच दुसऱ्या ढाब्यावरची बातमी आली. तेथे नगर तालुक्याच्या साहाय्यक पोलीस निरीक्षकानेच एका वेश्येचे सर्व पैसे हिसकावून घेऊन तिला जबर मारहाण केली होती. ही प्रकरणे वेश्यांच्या असंतोषाचा विस्फोट होण्यास तात्कालिक कारण बनली. पोलिसांविरुद्ध ‘भीक मांगो आंदोलन’ केले.  अधीक्षकांना सर्व गावांतून भीक मागून जाहीरपणे लाच दिली. म्हणजे ही रक्कम त्यांच्या टेबलावर फेकली. यापुढे कर्मचाऱ्यांमार्फत वेश्यांकडून हफ्ते वसुली करण्याऐवजी नागरिकच या स्त्रियांतर्फे सामूहिक वर्गणी करून थेट हप्ता देतील, अशी भूमिका जाहीरपणे शबनम शेख आणि अत्याचारित ललिताने मांडली. गृहमंत्र्यांपर्यंत ती पोहोचवली. माध्यमांनी या आंदोलनास प्रसिद्धी दिली. खूप गदारोळ आणि आरोप-प्रत्यारोप झाले. नैतिक-अनैतिक, कायदेशीर-बेकायदेशीर अशा अनेक अंगांनी देहव्यापारातील स्त्रियांची चर्चा झाली. लताक्का, मीना शिंदे, रजिया शेख यांनी पत्रकारांना रोखठोक माहिती दिली. पोलिसांच्या प्रचंड नाराजी आणि दहशतीला तोंड देऊन एकही तक्रारदार चौकशीत फुटला नाही. या चळवळीमुळे स्त्रियांचे वाढलेले मनोबल अधोरेखित झाले. पोलीस हप्ता बंद झाला.

girish@snehalaya.org

chaturang@expressindia.com