News Flash

‘नया जमाना आएगा’

पतीच्या निधनानंतर उम्मेद न हारता संसार आणि सामाजिक कार्य मोठय़ा उम्मेदीने करतात

डॉ. शमसुद्दीन तांबोळी

जगातील मुस्लीम देशांत दहशतवादी कारवाया वाढत असतानाही मुस्लीम महिला संघटनांची पीछेहाट होत नाही हे महिला चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी आश्वासक आहे. एकंदरीत जागतिक पातळीवर स्त्रियांच्या आंदोलनाचा प्रभाव वाढत असताना दिसत आहे. अनेक मुस्लीम स्त्रिया शिक्षण, संशोधन, क्रीडा, वैद्यकशास्त्र, वकिली, साहित्य, चित्रपट यात स्वकर्तृत्वाने वेगळं विश्व निर्माण करत असल्याने मुस्लीम स्त्रियांसाठी ‘नया जमाना आऐगा’ असा भरोसा निर्माण झाला आहे.

स्त्रिया या समाजव्यवस्थेच्या कणा असतात. जगातील बहुतेक धर्मानी स्त्रियांवर अनेक मर्यादा घालून त्यांच्या क्षमता विकसित करण्यात अटकाव केला. समाजातील ५० टक्के असणाऱ्या स्त्रियांची प्रतिभा आणि प्रगल्भतेचा संकोच केला यामुळेच मानवतेचे मोठे नुकसान झाले आहे.

मुस्लीम स्त्रिया अनेक समस्यांशी झुंजतात. त्यांची स्थिती नक्कीच शोचनीय आहे. मात्र मुस्लीम स्त्रियांच्या समस्यांवर सातत्याने होणाऱ्या चर्चा आणि ऊहापोहातून मुस्लीम स्त्रियांची एक नकारात्मक प्रतिमा तयार झाली आहे. या वास्तव प्रतिमेत बरेच तथ्य असले तरी अनेक स्त्रिया या गडद प्रतिमेला तडा देऊन स्वकर्तृत्वातून वेगळे विश्व निर्माण करीत आहेत. जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक मुस्लीम स्त्रियांनी त्यांचे वेगळेपण सिद्ध केले आहे. महंमद पैगंबर यांची प्रथम पत्नी खदीजाबी यांच्या तेजस्वी आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाची अनेकांना माहिती आहेच. तसेच आयशा या पत्नीच्या अनेक धाडसी आणि बंडखोर कथा इतिहासात सापडतात. नंतरच्या काळात पुरुषवर्चस्व मानसिकतेने अनेक पद्धतीने स्त्रियांचे मानसिक खच्चीकरण करण्यास सुरुवात केली आणि या स्त्रियांना पुरुषांची सर्वार्थाने सेवा करणारी दासी बनवली. या स्त्रीदास्य प्रतिमेवर हल्ला करणाऱ्या अनेक स्त्रिया इतिहासाने पाहिल्या आहेत.

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो सत्तेवर येऊ नयेत म्हणून अनेक प्रयत्न झाले, परंतु संघर्ष करून त्या पंतप्रधान झाल्या. बांगलादेशातही शेख हसीना यांनी हा कित्ता गिरवला. पाकिस्तानातील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मानवीहक्कांची लढाई लढणाऱ्या अस्मा जहाँगीर तसेच कमी वयात नोबल पारितोषिकांनी सन्मानित केलेल्या मलाला त्यांच्या संघर्षमय जीवनाबद्दल जगप्रसिद्ध आहेत. बांगलादेशातील बंडखोर लेखिका तस्लीमा नसरीन यांनीही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहेच. अर्थात या वेगळ्या वाटेने जाणाऱ्या स्त्रियांना मोठी किंमत मोजावी लागली. पाकिस्तानात मानवी हक्क कार्यकर्त्यां सबीना महमूद यांना भर चौकात गोळ्या घालून ठार करण्यात आले.

भारतात चित्रपट, संगीत, साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अनेक मुस्लीम स्त्रिया आहेत. त्यांची श्रेय नामावली आपल्यासमोर आहेच. भारतीय राष्ट्रध्वजाचं डिझाइन करणाऱ्या सुरय्या तय्यबजी, ईस्मत चुगताईसारख्या नामवंत लेखिका.  क्रीडा क्षेत्रातील सानिया मिर्झा तर भारतीयांच्या गळ्यातली ताईत आहे. भारतात एम.फातिमाबी या मुस्लीम स्त्रीने तर सर्वोच्य न्यायालयाच्या पहिल्या न्यायमूर्ती हे पद भूषवले आहे. हे स्त्रियांसाठी नक्कीच आभिमानास्पद आहे. २८ जून २०१८ रोजी घाटकोपर मुंबई येथे झालेल्या विमान अपघातात मृत्यू झालेल्या पायलट मरिया झुबेरी या भारतातील पहिल्या मुस्लीम महिला पायलट होत्या. मागच्या महिन्यांत मलेशिया-न्यूझीलंड येथे झालेल्या सौंदर्य स्पर्धेत मूळच्या लोणावळा येथील आणि आता मुंबईत राहणाऱ्या मध्यमवर्गीय गृहिणी असणाऱ्या व बुरख्याआड राहणाऱ्या नुसरत परवीन यांनी सहभागी झालेल्या ९ हजार स्त्रियांच्या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय ‘मिसेस इंडिया’ हा किताब पटकावला.

भारतातील अनेक मुस्लीम स्त्रिया आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वाच्या पदावर आहेत. न्ययॉर्कमध्ये वैद्यकीय क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या डॉ. हिना चौधरी, न्यूयॉर्कमधील वरिष्ट शास्त्रज्ञ डॉ.समीना शाह, ‘नासा’मध्ये कार्यरत असणाऱ्या डॉ. तहाणी आमेर या भारतीय मुस्लीम स्त्रिया आहेत. परंतु या भारतीय स्त्रियांच्या बाबतीत पुरेशी माहिती तरुणांना नाही. त्यामुळे भारतीय मुस्लीम स्त्रियांची एकांगी व नकारात्मक बाजूच समोर येते. या वेगळ्या वाटेने जाणाऱ्या विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या या स्त्रिया अनेकांसाठी प्रेरणा ठरू शकतात.

व्यक्तिगत पातळीवर ज्या पद्धतीने या स्त्रियांनी आपल्या अंगभूत क्षमतांची सिद्धता केली आहे तसेच मुस्लीम स्त्रियांच्या विविधांगी प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी अनेक देशांमध्ये मुस्लीम स्त्रिया संघटित होऊन आपल्या आधिकारांसाठी संघर्ष करीत आहेत. पाकिस्तानात ‘विमेन्स अँक्शन फोरम ऑफ पाकिस्तान’, अल्जेरियात ‘क्राय विमेन’, इजिप्तमधील ‘सेंटर फॉर ह्य़ुमन राइट्स लिगल ऐड’, सुदानमध्ये ‘द अरब ऑर्गनायझेशन फॉर ह्य़ुमन राइट्स’ या स्त्रीवादी चळवळी अनेक मुस्लीम देशात कार्य करतात. यात कार्य करणाऱ्या विचारवंत स्त्रियांची यादी लांबलचक आहे. ‘मुस्लीम विमेन लिव्हिंग अंडर मुस्लीम पर्सनल लॉ’ नावाच्या संघटनेने जागतिक पातळीवरील नेटवर्क तयार केले आहे. जगातील मुस्लीम देशात दहशतवादी कारवाया वाढत असतानाही मुस्लीम महिला संघटनांची पीछेहाट होत नाही हे महिला चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी आश्वासक आहे. एकंदरीत जागतिक पातळीवर स्त्रियांच्या आंदोलनाचा प्रभाव वाढत असताना दिसत आहे.

‘मुस्लीम सत्यशोधक मंडळ’च्या संपर्कात असणारे आणि मंडळाच्या मुशीत तयार झालेल्या महाराष्ट्रातील काही स्त्री कार्यकर्त्यांचा उल्लेख होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आज अनेक स्त्रिया विज्ञान विषयात पदवीधर होतात, विविध ठिकाणी नोकरीस जातात पण त्यांनी परिधान केलेला बुरखा घसरत नाही. अशा विज्ञान तंत्रज्ञानात उच्चशिक्षण घेणाऱ्या स्त्रियासुद्धा विषमतेच्या आहारी जातात, अन्याय सहन करतात. शिक्षण घेऊनही त्या स्वत:वर होणाऱ्या अन्यायाविरोधात उभ्या राहात नाहीत. मात्र काही स्त्रियांनी ही विषम परंपरेची चौकट तोडून स्वाभिमानाने आपले मार्ग निवडले आहेत आणि त्यात त्या यशस्वी ठरल्या आहेत.

नागपूर येथील समाज कार्यकर्त्यां रुबिना पटेल यांच्यावर जेव्हा तलाकची तलवार कोसळली तेव्हा बाबा आमटे यांनी त्यांना स्वाभिमानाने उभे राहण्याची प्रेरणा दिली. आत्महत्येसाठी निघालेल्या असताना आणि एकदा तर नवऱ्यानेच विहिरीत ढकललेलं असतानाही त्या स्वत: उभ्या राहिल्याच शिवाय इतर मुस्लीम स्त्रियांना उभे करण्यासाठी ‘रुबी सोशल वेल्फेअर सोसायटी’ची स्थापना केली. अनेक तरुणी त्यांच्याकडे कौशल्य विकसनासाठी येतात. त्यांनी ‘मुस्लीम महिला मंच’ स्थापन केले आहे. या मंचामार्फत कायदेविषयक सल्ला, समुपदेशन आणि अन्यायाविरोधात आंदोलन करतात. त्यांना मुस्लीम सत्यशोधक मंडळामार्फत हमीद दलवाई पुरस्काराने गौरवण्यात आले, शिवाय मागच्या वर्षी ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’चा (अमेरिका) पुरस्कार प्रदान करण्यात आला. रुबिना पटेल यांचा मुलगा दानिश याने गॅजेट करून आपले नाव बदलले आहे. तो आपल्या नावाच्या पुढे वडिलांच्या नावाऐवजी आईचे नाव लावतो. तसेच त्याने आडनाव ‘ह्य़ुमॅनिटी’ असे केले आहे. स्वत: आस्तिक-नास्तिकतेच्या पुढे जाऊन सामाजिक कार्यासाठी त्यांनी वाहून घेतले आहे.

मुस्लीम सत्यशोधक मंडळातर्फे देण्यात येणाऱ्या समाज प्रबोधन पुरस्काराच्या मानकरी मुंबई येथील मुमताज शेख यांची जीवन कहाणी फार प्रेरणादायी आहे. लहान वयात निकाह आणि काही वर्षांत तलाक झाल्यानंतर त्यांना अनेक यातना सहन कराव्या लागल्या. माहेरच्यांनी मुमताजसाठी घराची दारे बंद केली होती. अशात एका आंबेडकरवादी कार्यकर्त्यांने त्यांच्याशी विवाह केला. त्या समतावादी चळवळीत कार्यरत आहेतच शिवाय मुंबईत त्यांनी स्त्रियांच्या सार्वजनिक स्वच्छतागृहाचा प्रश्न घेऊन संघर्ष करणारी चळवळ सुरू केली. ‘कोरो’ या संघटनेच्या बांधणीत पुढाकार घेतला. स्त्रियांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने केलेली मुमताज यांची धडपड महत्त्वपूर्ण आहे. जगातील शंभर महत्त्वाकांक्षी व प्रेरणादायी स्त्रियांची यादी बीबीसीने तयार केली. त्यात सात भारतीय स्त्रिया आहेत, यात मुमताज शेख यांचा समावेश आहे. हा सन्मान व्यक्तिगत नसून संघभावनेचा आहे असे मुमताजला नेहमी वाटते. मुमताज शेख या मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या सोबत अनेक कार्यक्रमात असतात.

समाज प्रबोधन पुरस्काराच्या २०१८च्या मानकरी नूरजहाँ साफिया नियाझ आहेत. त्या मुस्लीम स्त्रियांच्या आत्मसन्मानासाठी कार्य करणाऱ्या ‘भारतीय मुस्लीम महिला आंदोलन’ या संघटनेच्या सहसंस्थापक आहेत. महिला हक्कविषयक शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करून त्यांनी पुस्तकांचे लेखन केले आहे. ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्स मुंबई’ येथून अंमलबजावणी आणि ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ’मधून समाजशास्त्र विषयात पीएच.डी. केली आहे. ‘विमेन्स रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅक्शन ग्रुप’ यांच्याबरोबर दहा वर्षे संलग्न राहून मुस्लीम व्यक्तिगत कायद्यासंदर्भात काही शैक्षणिक साहित्य तयार केले आहे. व्यवस्थापन, नेतृत्वबांधणी या विषयात अभ्यास करून स्वत:बरोबर इतरानांही सक्षम करण्यास त्यांनी महत्त्वाचे कार्य केले आहे. मुस्लीम कौटुंबिक कायद्याच्या संहितीकरणाचे कार्य त्या सध्या करीत आहेत. त्यांनी स्वत: आंतरधर्मीय विवाह केला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे. यात

डॉ. नरेंद्र दाभोलकर विज्ञाननिष्ठ सन्मानाचा समावेश आहे. स्त्रियांना हाजी अली दर्गा प्रवेश तसेच तोंडी एकतर्फी तलाक विरोधातील आंदोलनात त्यांचा सिंहाचा सहभाग आहे.

‘मुस्लीम सत्यशोधक मंडळ’ याच्या महिला मंच प्रमुख डॉ.बेनझीर तांबोळी यांना त्यांच्या व्यक्तिगत जीवनात तलाकचे चटके सहन करावे लागले. पुरोगामी कुटुंबात वावरलेल्या बेनझीरला घुसमट सहन करावी लागत होती. तलाकच्या आपत्तीनंतर त्यांनी इंग्रजी विषयाच्या प्राध्यापक म्हणून सुरुवात केली. नंतर रोज सहा तास बसने प्रवास करून बी.एड. केले. त्या महाविद्यालयात प्रथम आल्या. त्यांनी एम.एड. केले, सेट परीक्षा उतीर्ण झाल्या. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विभागात अध्यापक म्हणून कार्य करतानाच उर्दू माध्यमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे इंग्रजी कौशल्य विकसित करण्यासाठी एक मॉडेल तयार केले आणि याच विषयात पीएच.डी. केली. मुस्लीम सत्यशोधक पत्रिकेतील लिखाणाबरोबरच वर्तमानपत्रात लेखन करतात. आकाशवाणी आणि दूरचित्रवाणीच्या विविध वाहिन्यांवरील कार्यक्रमात सहभाग घेतात. प्रभावशाली शिक्षणतज्ज्ञ, शिक्षणशास्त्र शब्दकोश इत्यादी पुस्तकांचे लेखन केले असून सध्या त्या एमकेसीएलमध्ये  कार्यरत आहेत.

मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या उपाध्यक्षा सायरा मुलाणी या कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयात तत्त्वज्ञान विषयाच्या प्राध्यापिका आहेत. कार्यकारिणी सदस्य तमन्ना इमामदार यांनी ‘एक नजर तलाक नंतर’, ‘मुस्लीम महिला-शोध आणि बोध’, ‘मुस्लीम बलुतेदार’, ‘बाईची जात’ अशी चार पुस्तके लिहिली आहेत. त्या वेळोवेळी वर्तमानपत्रातून लेखन करतात. पतीच्या निधनानंतर उम्मेद न हारता संसार आणि सामाजिक कार्य मोठय़ा उम्मेदीने करतात. मुस्लीम महिला मंचच्या आबेदा शेख या मुख्याध्यापक आहेत. त्यांनी एम.ए., एम.एड. शिक्षण घेतले आहे. मुस्लीम स्त्रियांच्या प्रश्नाबरोबरच त्या अंध मुला-मुलींसाठी संघटना चालवतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना दिल्ली येथे राष्ट्रीय पातळीवरचा ‘मदर तेरेसा पुरस्कार’ देऊन सन्मानित केले गेले आहे.

मला या ठिकाणी शबनम पुनावाला आणि त्यांची मुलगी सना यांचा मुद्दाम उल्लेख केला पाहिजे. पुरोगामी विचारवंत ताहेरभाई पुनावाला यांची कन्या शबनम या आर्किटेक्ट आहेत. त्या बोहरा समाजात जन्मल्या. या समाजात स्त्रियांची लहान वयात सुंता केली जाते. या कुप्रथेचा आणि धर्माचा काडीचा संबंध नाही. धारदार शस्त्राने जनन इंद्रियावर आघात केला जातो. याला ‘फिमेल जनायटल म्युॅटीलेशन’ म्हणतात. पुरुषांनी स्त्रियांवर केलेला हा मोठा अन्याय, परंपरा आणि रूढीच्या नावाने चालवला जातो. शबनम आणि त्यांची कन्या सना यांनी या विरोधात आंदोलन उभे केले आहे. स्त्रियांच्या अधिकारावर हा घाला आहे. अनेक स्त्रिया एकत्र येऊन निर्भिडपणे या विरोधात आवाज उठवला जातोय. शबनम या आंदोलनात आघाडीवर आहेत. त्यांचे वडील ताहेरभाई यांना मंडळाने हमीद दलवाई पुरस्कार मा. नानासाहेब गोरे यांच्या हस्ते दिला होता.

‘मुस्लीम सत्यशोधक मंडळ’ समाजासाठी वैशिष्टय़पूर्ण कार्य करणाऱ्या आणि योगदान देणाऱ्या स्त्रियांची नोंद घेऊन त्यांना ‘सत्यशोधक फातिमाबी शेख स्मृतिगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करते. अल्मास या १७ वर्षीय तरुणीने आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात नाव कोरले आहे. बॉक्सिंगमध्ये विदेशात पारितोषिके मिळवली आहेत. सातारा येथे शालेय क्रीडा शिक्षक असणाऱ्या सायराबानो शेख या आंतरराष्ट्रीय कब्बडीच्या पंच आहेत. तबस्सुम इनामदार यांनी मुस्लीम स्त्रियांच्या आर्थिक व समाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या शमीम मडकी या स्त्रियांच्या प्रश्नांवर कार्य करतात तर इचलकरंजीच्या अ‍ॅड. दिलशाद मुजावर यांनी स्वत: आंतरधर्मीय विवाह केला असून मानवी आधिकारावर कार्य करतात. पुण्याच्या रझिया पटेल यांनी तर तहहयात याच कार्याला वाहून घेतले आहे. या सर्व स्त्रियांचे त्यांच्या क्षेत्रातील योगदान महत्त्वाचे आहेच शिवाय मुस्लीम स्त्रियांची पारंपरिक प्रतिमा पुसणारे आहे. याव्यतिरिक्त शिक्षण, संशोधन आणि साहित्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या मिरजच्या

डॉ. जुल्फिकारबानो देसाई, नांदेडच्या प्रा. तसनीम पटेल, प्रसारमाध्यमातून कार्य करणारी हलीमा कुरेशी, हीनाकौसर खान, मिनाज लाटकर, पोलीस आधिकारी रेश्मा मुलाणी, प्रशासकीय क्षेत्रातील सहारा, पूनम, नर्गीस, आरजू, पदवीपलीकडचे शिक्षण घेणारे रुक्साना, रुक्सार, जरीना, छप्परबंद समाजातील तसनीम सय्यद, अंजुमन अशा अनेक तरुणी हमीद दलवाई स्टडी सर्कलमधून तयार होत आहेत. या तरुणी समाजाला वेगळी दिशा देतील याची खात्री आहे.

हमीद दलवाई यांनी मुस्लीम स्त्रियांना वेगळी भविष्यवेधी वाट दाखवली आहे. मुस्लीम स्त्रियांच्या अन्याय निवारणाचा लढा सर्वोच्य न्यायालयात घेऊन जाणाऱ्या शहाबानो, शबानाबानो, सायराबानो यांचे मनोबल मंडळाने वाढवले. मुस्लीम व्यक्तिगत कायद्यातील अन्यायी तरतुदी रद्द करण्यासाठी या तरुणींनी आपली कंबर कसली आहे. ‘नया जमाना आऐगा’ असा भरोसा निर्माण झाला आहे.

अनुकूल वातावरणात लढा देणाऱ्या स्त्रिया जशा आहेत त्याप्रमाणेच प्रतिकूलतेशी दोन हात करून, संघर्ष उभारून स्व- प्रतिमा उज्ज्वल करणाऱ्या अनेक ज्ञात अज्ञात मुस्लीम स्त्रिया आहेत. यांच्या पाठीशी समर्थपणे उभी राहणारी मुस्लीम सत्यशोधक चळवळ आहे. ‘आम्ही चालवू हा पुढे वारसा’ असे सांगणाऱ्या तरुणी पुढे येत आहेत हे चित्र नक्कीच आश्वासक आहे.

tambolimm@rediffmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2018 1:01 am

Web Title: shamsuddin tamboli article about muslim women problem
Next Stories
1 गुलामगिरीविरुद्धचे बंड
2 मानियले नाही बहुमता..
3 सत्यमेव जयते!
Just Now!
X