डॉ. गिरीश कुलकर्णी

boyfriend sent bride nude photos on groom mobile phone to break marriage
वधूचे अश्लील छायाचित्र नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवले, हळदीच्या दिवशी प्रियकराच्या कृत्याने मोडले लग्न
Jupiter transits in Taurus sign
वृषभ राशीत गुरुचा प्रवेश होताच निर्माण होईल कुबेर योग! ‘या’ ३ राशींच्या लोकांना मिळेल अमाप पैसा!
Nagpur MIDC police arrested the youth who molested the girl crime news
विवाहितेच्या अंगावर चिठ्ठी फेकली, पुढे झाले असे की…
nia denies allegations of unlawful actions in bengal s bhupatinagar
छाप्यांमागे दुष्ट हेतू नाही! आरोपीच्या पत्नीच्या तक्रारीनंतर ‘एनआयए’चा खुलासा

आठव्या इयत्तेत असल्यापासून समाजातल्या वेश्याव्यवसायाचं कटुसत्य समोर आलं होतं आणि त्यातूनच वयाच्या १८ वर्षांपासून प्रत्यक्ष काम सुरू झालं. लालबत्तीत येणारे, स्त्रियांचा गरफायदा घेणारे आपल्याच समाजातले पुरुष होते.. त्यांना गोळ्या घालून ठार करायची इच्छा व्हायची. पण त्याने प्रश्न सुटणार नव्हता. हळूहळू यात काम करीत असताना या तीव्र प्रतिक्रियेचे प्रतिसादात रूपांतर होत गेले आणि अहमदनगर जिल्ह्य़ातील देहव्यापार बालमुक्त झाला. आज स्नेहालयपुनर्वसन संकुलात ५० टक्के एच.आय.व्ही बाधित मुलांसह ४०० मुलांचे आयुष्य बदलते आहे.. स्नेहालयच्या पायाभरणीविषयीचे लेख सलग चार शनिवारी.

डॉ. गिरीश महादेव कुलकर्णी हे ‘स्नेहालय’ या वंचित महिला व बालकांसाठी कार्यरत संस्थेचे संस्थापक सदस्य आहेत. राज्यशास्त्र या विषयात एम.ए., एम.फिल., पीएच.डी., समाजशास्त्र-कायदा-पत्रकारिता आणि संज्ञापन-व्यवस्थापन इत्यादी विषयांतील पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉ. कुलकर्णी यांनी काही काळ माध्यम आणि अध्यापनाच्या क्षेत्रात काम केले. ‘स्नेहालय’ मागील तीन दशकांत क्रमश: विकसित झाले. संस्थेची वाटचाल एक कल्पना ते संस्था, एक संस्था ते लोकचळवळ आणि एक लोकचळवळ ते प्रेरणा अशा टप्प्यातून होताना संस्थेची गुणवत्ता आणि मूल्यव्यवस्था अभंग राखली गेली. त्यामागे ‘स्नेहालय’च्या संस्थापकांची विकसित होत गेलेली जीवनदृष्टी होती.

अहमदनगर ही माझी जन्म आणि कर्मभूमी. भाऊसाहेब फिरोदिया विद्यालयात १९८२ मध्ये आठवीमध्ये शिकत होतो. एक घटना घडली आणि माझ्या आयुष्याचा भविष्यकाळ ठरवून गेली. त्या काळात गणित आणि विज्ञानाच्या शिकवणीला सर्वात आधी पोहोचण्याची मित्रांची आणि माझी पज लागली. मी जवळचा रस्ता शोधून पळत पळत एका गल्लीत घुसलो. तेथे तथाकथित प्रतिष्ठित लोक सूर्यास्तानंतरच जात. ती गल्ली म्हणजे एक बदनाम वस्ती होती, ‘चित्रा गल्ली’. अहमदनगर हे लष्कराच्या वेगवेगळ्या प्रशासकीय विभागांनी घेरलेले शहर आहे. जवळपास ५३० वर्षांचा इतिहास असलेल्या या शहरात ४ मोठय़ा लाल-बत्ती वस्त्या होत्या. लष्करामुळे इथे मोठय़ा प्रमाणात वेश्यांसाठी ग्राहक वर्ग उपलब्ध होता.

चित्रा गल्लीतून पळत असताना मी जे दृश्य पहिले ते आजही माझ्या स्मरणात जसेच्या तसे आहे. माझ्याच वयाच्या, १२-१३ वय असलेल्या अनेक मुली तिथे उभ्या होत्या. माझ्या हातात माझे दप्तर होते तर त्यांच्याकडे तंबाखू-गुटख्याच्या पुडय़ा! काही सतत खोकणाऱ्या मुली तर गंभीर आजारीच वाटत होत्या. मी विचार केला की या मुली तर माझ्यासोबत शाळेमध्ये हव्या होत्या. माझा तो रस्ता रोजचा झाला होता. साहजिकच रोजच्या रोज त्यातलं अमानुष कौर्य नजरेस येत होतं.  ग्राहकासोबत जाण्यासाठी चालढकल करणाऱ्या मुलींना नागडं करून जनावरासारखं मारताना, काहीवेळा तर त्यांच्या गुप्तांगात मिरची टाकून त्यांची अमानुष मजाक करणाऱ्या लक्ष्मी भाऊराव राठोड हिच्यासारख्या क्रूर कुंटणखाना मालकिणींचे क्रौर्य पाहताना मी शब्दातीत दु:खी आणि अस्वस्थ झालो.  मला जाणवू लागले याविरोधात मला काहीतरी केलेच पाहिजे. मात्र लहान असल्याने स्वत:ची हतबलता समजत होती.

पुढे दोन वर्षांनंतर पेमराज सारडा महाविद्यालयात शिकत असताना मी पुन्हा त्याच वस्तीत गेलो. तिथे माझा एक मित्र राहायचा, तो त्या जातीत जन्मला होता, ज्या जातीतील स्त्रिया आणि मुलींना कुंटणखाने आणि कलाकेंद्रात वापरले जायचे. समाजातील धनदांडगे या जातीतल्या स्त्रिया आणि मुलींना अंगवस्त्र किंवा रखेल्या म्हणून ठेवत. जातीव्यवस्थेने लादलेल्या मानवी गुलामीची ही शतकांची घृणीत परंपरा होती. मित्राच्या घरी दिसले की त्याची १५ वर्षांची छोटी बहीण देहव्यापारात फसली होती. ४० वर्षांची आई आणि ७० वर्षांची आजीसुद्धा एका चहाच्या कपासाठी तेच करत होत्या. घरातील कत्रे पुरुष बायकांच्या ग्राहकांचा हिशोब ठेवत होते. क्षणभर मनात एक विचार तरळला. ‘‘या स्त्रियांच्या जागी माझी बहीण, आई किंवा आजी उभी असती तर.. मला काय वाटले असते?’’ या विचाराने माझी पुन्हा झोप उडाली. मला वाटायला लागले की मला त्वरेने  काहीतरी करायला हवे. देहव्यापारासह सर्व अनतिक आणि बेकायदेशीर धंदे पोलिसांच्या संमती आणि भागीदारीनेच चालतात. बालके आणि स्त्रियांच्या काळजी व संरक्षणाचे सर्वच कायदे केवळ अलमाऱ्यांना शोभा देतात. वास्तवातील जगण्याचा सरकारचे कायदे, धोरणे, उद्दिष्ट आणि घोषणा यांच्याशी संबंध नसतो, खरेतर विरोधाभासच असतो. लालबत्तीत येऊन हप्ता वसुली करणारे पोलीस माहीत होते. त्यामुळे या परिस्थितीची प्रतिक्रिया म्हणून अस्वस्थ मनात अनेकदा असे वाटायचे की, लालबत्तीत अल्पवयीन मुली लालबत्तीत पुरविणारे दलाल, या बालकांना विकत घेणाऱ्या कुंटणखान्याच्या चालक-चालिका आणि लहान मुलींना रानटी पद्धतीने वापरणारे क्रूर-प्रौढ ग्राहक यांना गावठी कट्टय़ाने अंधारात गोळ्या घालून ठार करावे. कारण जे लोक कायद्याला जुमानत नाहीत त्यांना कायद्याने कसे सरळ करणार, हा प्रश्न मला सुटत नव्हता. परंतु प्रत्यक्ष काम करीत असताना या तीव्र प्रतिक्रियेचे हळूहळू प्रतिसादात रूपांतर होत गेले. मूठभर गुन्हेगार नष्ट झाल्याने आणि पुढे आपणही कायद्याच्या कचाटय़ात अडकल्याने मूळ प्रश्न सुटणार नाही. कारण सामाजिक व्यवस्थेतील कुप्रथा आणि रूढी, ग्रामीण-दलित- आदिवासी – भटक्या-विमुक्त- मागास समाजांची आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थिती, बेसुमार शहरीकरण आणि त्यातून येणारी नवी मूल्यव्यवस्था, पर्यायांची अनुपलब्धता, समाजातील सुस्थितांचे पूर्वग्रह – गरसमज आणि अज्ञान, स्त्रियांकडे पाहण्याचा भोगवादी दृष्टिकोन, नतिकता आणि योनीशुचितेच्या रूढ कल्पना, शोषित – दुर्लक्षित बालकांबद्दलची असंवेदनशीलता ही या जटिल प्रश्नांची काही प्रमुख कारणे आणि स्रोत आहेत.

या संदर्भातील बदलांसाठी सातत्यपूर्ण रचनात्मक कामाची आणि सनदशीर संघर्षांची आवश्यकता आहे, हा एका अनुभव आणि निरीक्षणातून विकसित झालेला परिस्थितीचा प्रतिसाद होता. लालबत्तीतील प्रत्येक आई-बहिणीसाठी मी मनातले प्रत्येक काम तर करू शकत नव्हतो. परंतु माझी कुवत एकवटून कोणा एकाचे अथवा त्यानंतर इतर काहींचे आयुष्य थोडे तरी बदलण्याचा प्रयत्न करू शकत होतो. मी काही करण्यासाठी लालबत्तीत पहिले पाऊल टाकले. त्या वेळी मी १८ वर्षांचा होतो. परंतु प्रत्यक्ष लालबत्तीत आलेल्या अनुभवांनी मला निराश केले. लालबत्तीतील स्त्रियांपकी कोणालाही भविष्याची चिंता नव्हती. दारू, गांजा, तंबाखू, गुटखा, मटका, चमचमीत सामिष जेवण, प्रेमाचे नाटक करणारा हक्काचा माणूस (बायका आपल्या खास माणसाला ‘सोनू’ किंवा मालक म्हणायच्या) या अंतहीन दुष्टचक्रात येथील बहुतांश स्त्रिया अडकल्या होत्या. व्यसने आणि विविध आजारांनी मरणाची भीती त्यांना वाटत नव्हती. उलट त्यांनी ते स्वीकारलं होते. यातील बहुतांश स्त्रिया खासगी सावकाराच्या भयानक पाशात अडकलेल्या होत्या. दरमहा १०० रुपयाला १५ रुपये व्याज स्त्रिया द्यायच्या. त्या वेळी एका ग्राहकाकडून त्यांना एका वेळचे १० रुपये मिळायचे. म्हाताऱ्या म्हणजे, चाळिशीतील स्त्रियांना याच्या निम्मेच पसे मिळायचे. यात मालकिणीचा वाटा  निम्मा तर उरलेल्यात पोलीस, धंद्याच्या वेळेत लहान बाळ सांभाळणाऱ्या आणि स्वयंपाक करणाऱ्या (ग्राहक मिळणे दुरापास्त झालेल्या) म्हाताऱ्या वेश्यांना काही वाटा द्यावा लागे. त्यांची अवस्था गुलामासारखीच झालेली होती. त्यामुळे माझे ऐकून घेण्याची कोणाचीही तयारी नव्हती. मी विचार करू लागलो की आता मी काय करू शकतो?

जडणघडण

माझी आई शोभा ही शिक्षिका तर वडील दिनूभाऊ हे शारीरिक शिक्षण संचालक आणि उत्तम खेळाडू तसेच सामाजिक कार्यकत्रे होते. त्यांनी माझ्या स्वतंत्र विचारांना आणि कृतीला नेहमीच पाठबळ दिले. माझ्या आईचे वडील (आजोबा) अ‍ॅड. गणेश पांडुरंग देशपांडे स्वातंत्र्यलढय़ात आणि हैदराबाद मुक्ती आंदोलनात सक्रिय स्वातंत्र्यसनिक होते. या दोन्ही चळवळीत त्यांनी दीर्घ तुरुंगवास भोगला होता. अच्युतराव पटवर्धन, सेनापती बापट, हबीब खान, राजकुमार शहा, रामभाऊ निसळ अशी स्वातंत्र्य चळवळीतली समर्पित माणसे जवळून पाहिली आणि ऐकली. माझी रेवाकाकू संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सक्रिय होती. तिचा मोठा भाऊ म्हणजे प्रा. मधु दंडवते. एक प्रामाणिक, चारित्र्यसंपन्न गांधीवादी कार्यकर्ता. त्यामुळे स्वातंत्र्य आंदोलनाच्या भावधारेशी माझे रक्ताचे नाते होते. जय िहद आणि भारत माता की जय, अशा घोषणा ऐकल्या की माझ्या शरीरावर रोमांच उभे राहात आणि आजही राहतात.

१९७५ ते ७७ या काळात आणीबाणीच्या विरोधातील आंदोलनात आमचे कुटुंब सक्रिय सहभागी होते. या काळात मुक्कामाला येणाऱ्या भूमिगत असणाऱ्या अनेकांशी संवादाची संधी मिळाली. १०वीची परीक्षा झाल्यावर अ.भा.वि.प अर्थात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थी आंदोलनाशी मी जोडला गेलो.

प्रा. यशवंतराव केळकर, सदाशिवराव देवधर असे असंख्य समर्पित कार्यकत्रे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि विचारांचा ठेवा देऊन गेले. या काळातील चळवळी आणि आंदोलनातून माझ्या व्यक्तिमत्त्वाला पलू पडत गेले. वाचन आणि व्याख्याने ऐकण्याची गोडी वाढली. महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मिळेल ते तपशिलात वाचले. मी पेमराज सारडा महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. तथापि माझा बहुतांशी वेळ सामाजिक चळवळी व आंदोलनातच जात असे.

त्याविषयी पुढील लेखात..

girish@snehalaya.org

chaturang@expressindia.com