डॉ. गिरीश कुलकर्णी

स्नेहालयच्या आरंभीच्या काळात वेश्याव्यवसायातील स्त्रियांना ओळख आणि नागरिकत्व मिळवून देण्यासाठी खूप संघर्ष झाला. भारतात सर्वप्रथम सर्व वेश्यांना शिधापत्रिका १९९३ मध्ये नगर जिल्ह्य़ात देण्यात आल्या. बँकेत खाते, मुलांच्या जन्मदाखल्याविना शाळेत प्रवेशाचा अधिकार, पोलिसांची हप्ताबंदी, आरोग्याचा अधिकार, मोफत कंडोम मिळण्याचा अधिकार, इतर समान अधिकार – दर्जा आणि प्रतिष्ठा मिळण्यासाठी केलेल्या आंदोलनांमुळे स्नेहालयचा लक्ष्यगट संस्थेशी एकरूप झाला.  स्नेहालयच्या कामातून प्रेरणा घेऊन स्नेहालयच्या लाभार्थी आणि कार्यकर्त्यांद्वारे १०० हून अधिक संस्था आज देशभरात कार्यरत आहेत. ज्योत से ज्योत जगाते चलो, आमचा प्रवास सुरू आहे..                  

Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
water Buldhana district, water shortage Buldhana
बुलढाणा : ‘दिल्ली’च्या लढतीत व्यस्त नेत्यांचे ‘गल्ली’कडे दुर्लक्ष! दोन लाख मतदारांची पाण्यासाठी ससेहोलपट
Numerology Girls born on this date are lucky for husband
Numerology: नवरा आणि सासरच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरतात या जन्मतारखेच्या मुली; जाणून घ्या त्या तारखा कोणत्या?
buldhana japan marathi news, japanese language buldhana marathi news
गरिबीच्या अंधारावर मात करत निघाली उगवत्या सूर्याच्या देशात; बकऱ्या वळणाऱ्या रमाई कन्येला जपानमध्ये लाखोंचे ‘पॅकेज’

समाजाच्या तळात काम करताना येणाऱ्या अनुभवातून मी शिकत होतो. महात्मा गांधींनी सांगितले होते की, समाजातील सगळ्यात खालच्या स्तरातील लोकांच्या आयुष्यात जेव्हा बदल घडतो तेव्हाच त्याला समाज आणि देशाचा विकास होणे, असे म्हणतात. सुराज्याशिवाय स्वराज्यास अर्थ नाही.

माझ्या लक्षात आलं की ‘लालबत्ती’ भागातील स्त्रिया आणि त्यांची मुले तर समाजाच्या सगळ्यात खालच्या स्तरातच आहेत. बापूजींच्या अंत्योदय या संकल्पनेचा अर्थ म्हणजे या स्त्रिया व त्यांच्या मुलांचे आयुष्य बदलणे. स्वामी विवेकानंद यांच्या विचारानुसार जी व्यक्ती आपल्या बुद्धी-क्षमता-संसाधन-कौशल्य यांचा वापर आपल्या समाजातील सगळ्यात खालच्या घटकासाठी करत नाही ती देशद्रोही आहे.

भारत मातेची सेवा म्हणजेच देहव्यापारात अडकलेल्या स्त्रिया व मुलांची सेवा, हे मला मनाच्या तळातून जाणवलं. आणि हेही जाणवलं की नुसता विचार करण्यापेक्षा मला अनेक वर्षांपासून अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांवर आता काम करायला सुरुवात करायला हवी. ते वर्ष होतं, १९८८. मी स्वत:ला एक प्रश्न विचारला, ‘आज नाही तर कधी आणि मी नाही तर कोण?’ यानंतरदेखील मी काहीच केले नसते तर माझ्याच नजरेतून मी कायमचा उतरलो असतो.

पहिले पाऊल

‘लालबत्ती’ भागात काम करण्याच्या पक्क्या निर्धाराने मी जानेवारी १९८९ मध्ये परत एकदा तिथे पोहोचलो. मात्र माझ्या लक्षात आले होते की जोपर्यंत मी या स्त्रियांचा विश्वास आणि आस्था संपादन करीत नाही तोपर्यंत माझ्या मोठमोठय़ा शब्दांनी कोणीही प्रभावित होणार नाही. या स्त्रियांना उपदेश देण्यापेक्षा मी त्यांना हे विचारण्यास सुरुवात केली की माझ्यासारखा बाहेरचा माणूस त्यांच्यासाठी काय करू शकतो. १७ वर्षांच्या अलकाने मला त्याचे उत्तर दिले. वयाच्या १३व्या वर्षांपासून ती या धंद्यात सडत होती. तिला दोन मुले होती. तिने सुचविले की, मी तिच्या आणि इतर स्त्रियांच्या बालकांकडे लक्ष द्यायला हवे. रोज संध्याकाळी त्यांच्या वस्तीत ग्राहक येत. बालकांशी अनैसर्गिक संबंध करणारे यात होते. या लोकांसाठी बालकांनाच दारू-तंबाखू-गांजा-कंडोम इत्यादी आणायला लागे. या सगळ्या वातावरणाचा या मुलांवर परिणाम होऊन ती वाममार्गाला लागत होती. अलकासोबतच रुख्मिणी खोमणे आपली मुले देण्यासाठी पुढे सरसावली. अशा प्रकारे काम करण्याची पहिली संधी मला मिळाली. दोन मुलांसोबत माझे काम सुरू झाले. आणि पुढील तीन महिन्यांत त्याच वस्तीतील ८० बालके यायला लागली. त्यांच्याकरिता मी नाइट केअर सेंटर, अभ्यासिका, स्वच्छतागृहे तयार केली. पण जसे जसे काम वाढायला सुरुवात झाली तसे तसे नवीन समस्या आणि त्याचबरोबरीने नवीन संधी समोर येत गेल्या. काही वेश्यांचे कुंटणखान्याच्या मालकिणींशी हिशेबावरून वाद झाले. वेश्यांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन त्यांचे प्राणांतिक शोषण केले जाते. ते असह्य़ झाल्याने काहीजणी पळून गेल्या. त्यांच्या छोटय़ा मुला-मुलींची परिस्थिती अतिशय वाईट होती. त्यांच्याकडे कोणीच लक्ष देण्यास तयार नव्हते. माझ्याकडेदेखील कोणत्याच प्रकारची जागा किंवा इतर साधने नव्हती. मग मी सरळ या मुला-मुलींना माझ्या घरी नेले. आमच्या वाडय़ाचे नाव ‘बिल्वदल’. जुने वीट-मातीचे पण प्रशस्त घर. या बालकांना सांभाळण्यासाठी याच वस्तीतील काही वेश्यांनादेखील माझ्या घरी नेले. वंचित बालके आणि स्त्रियांना संस्था नव्हे तर घर मिळावे, अशी माझी इच्छा होती. ती फलद्रूप झाली. आमचे घर छान नांदू लागले. आमच्यात एक कौटुंबिक-भावनिक नाते  तयार झाले.

थोडय़ाच दिवसांत समजले की यातील सागर आणि काही मुले व स्त्रिया एच.आय.व्ही.बाधित आहेत. त्यावर तातडीने काही करणे गरजेचे होते. त्या गरजेतूनच १९९२ मध्ये एच.आय.व्ही.बाधित स्त्रिया आणि मुलांसाठीचे भारतातील पहिले निवासी पुनर्वसन संकुल अहमदनगर येथे सुरू झाले. एका बाजूला मी या कार्यासाठी लोकांना जोडत होतो तर दुसरीकडे या कामासाठी संसाधने गोळा करत होतो. आम्ही मनसुखलाल मुथा यांची जमीन मिळवली. तिथे इमारत उभी करायची होती, पण हाताशी पैसे नव्हते. बांधकामाला बराच काळ लागणार होता. त्या वेळी कामाची दिशा शोधण्यासाठी महामानव बाबा आमटे, अण्णा हजारे यांच्या भेटी घेतल्या. निवृत्त प्राचार्य म.वि. तथा मामा कौंडिण्य यांनीही बरेच अनुभव सांगितले. या सर्वाच्या संवादातून उमजले की, आधी संसाधने गोळा करून संस्था उभ्या राहात नाहीत. पहिल्यांदा काम सुरू करावे लागते. लोक आणि पैसे तुम्हाला त्यानंतर सहजतेने शोधत येतात. अहमदनगर औद्योगिक वसाहतीलगतच्या निंबळक गावाच्या हद्दीतील जमिनीच्या एका छोटय़ा तुकडय़ावर ‘स्नेहालय’ची सुरुवात झाली. गणपती उत्सव, दिवाळी यात आम्ही सामूहिक श्रमदानातून २० हजार रुपये साठवले. त्यातून पाबळच्या विज्ञानाश्रमातील डॉ. कालबाग यांच्याकडून डोमचे स्वस्त बांधकाम शिकून घेतले आणि ‘स्नेहालया’त त्याचा कित्ता गिरविला. त्यानंतर मधुबेनजी गादिया, सुवालाल शिंगवी, बिली नगरवाला, शिवशंकर राठोड असे हौशी सहयोगी मिळाले. मामा कौंडिण्य यांनी दिलेला सल्ला खरा ठरला. ‘लोग आते गये और करवाँ बनता गया’. आज ‘स्नेहालय पुनर्वसन संकुला’त ४०० मुलांचे आयुष्य बदलते आहे. त्यामधील ५० टक्के मुले एच.आय.व्ही.बाधित आहेत. ‘स्नेहालया’च्या पुनर्वसन केंद्रातून आजवर ३ हजारांवर बालके समाजात पुन:स्थापित आणि प्रतिष्ठित झाली.

‘लालबत्ती’त पुणे येथील विजयाताई लवाटे यांचे काम १९७८ पासून आणि मुंबईतील ‘प्रेरणा’ संस्थेच्या प्रीती पाटकर यांचे काम १९८६ पासून सुरू झाले होते. परंतु त्यांची माहिती आम्हाला ‘स्नेहालय’ सुरू करताना नव्हती. त्यामुळे माझ्या आतल्या आवाजाला अनुसरून आणि अनुभवातून शिकत आम्ही कार्यरत होतो. आमच्या टीमपुढे येणारी प्रत्येक समस्या पूर्णपणे नवीन होती. त्या समस्यांसोबत लढतानाच माझ्यातील कार्यकर्त्यांची ओळख मला होत गेली. माझ्या समोर येणाऱ्या प्रश्नांना मी कधीच ‘प्रतिक्रिया’ दिली नाही. उलट त्या प्रश्नांना दिलेल्या ‘प्रतिसादामधूनच’ ‘स्नेहालया’तील १७ प्रकल्प उभे राहिले. केअिरग फ्रेंड्स उपक्रमाचे संस्थापक रमेश कचोलिया आणि निमेश सुमती, सिंजेन्टा कंपनीचे अध्यक्ष प्रकाश आपटे, अरुण शेठ, डॉ. प्रवीण पाटकर अशांचे बोट धरायला मिळाले. ‘स्नेहालय’मध्ये, मिलिंद एकनाथ कुलकर्णी, संजय हरकचंद गुगळे, राजीव गुजर, जयकुमार मुनोत अशांची एक टीम उभी राहात गेली. ‘स्नेहालय’च्या कार्याला जीवन समर्पित करणाऱ्या यशवंत कुरापट्टी, अनिल गावडे, हनीफ शेख, प्रवीण मुत्याल, महेश मरकड, विकास पाटील, विशाल आहिरे, दीपक बुरम, पूजा गायकवाड, अंजू दाबी अशा माजी विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांची दुसरी फळी समर्थ आणि सक्रिय झाली. लालबत्तीत लता पवार, अंजना सोनावणे, गीता मोरे, जया जोगदंड, संगीता शेलार अशांची भक्कम फळी स्त्रियांच्या संरक्षणासाठी आणि परिवर्तनासाठी निर्माण झाली.

एच.आय.व्ही.बाधित लोकांसाठी सुरुवातीला झोपडीवजा जागेतच रुग्णालय सुरू केले. शहरातील कोणताच वैद्यकीय व्यावसायिक या रुग्णांना तपासण्यास तयार नव्हता. डॉ. मार्सिया वोरन यांच्या मदतीने एच.आय.व्ही.बाधित लोकांसाठीचा पहिला दवाखाना १९९५ मध्ये सुरू केला. वेळेवर डॉक्टर मिळत नसल्याने आमच्या टीमला डॉक्टरकी शिकावी लागली. आम्ही १५-१६ प्रकारची औषधे-इंजेक्शन-सलाइन देत असू. त्यानंतर १९९५ मध्ये देहव्यापार, लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या मुलांना सोडविण्यासाठी ‘स्नेहालय’ने ‘मुक्ती वाहिनीची’ स्थापना केली. बालकांच्या देहव्यापाराविरुद्ध युद्धच छेडले. १४० पेक्षा जास्त केसेसमध्ये फिर्यादी, साक्षीदार आणि पंच म्हणून काम केले. बऱ्याच वेळा या युद्धात जिवावरदेखील बेतले. २००५-०६ मध्ये दोन अल्पवयीन मुलींना देहव्यापारातून सोडविले. त्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्यांमध्ये राजकीय नेत्यांपासून पोलिसांपर्यंत आणि व्यापाऱ्यापासून उद्योगपतींपर्यंत अनेक स्तरांतील ३९ आरोपी सामील होते. ८ वर्षांच्या संघर्षांनंतर त्या सर्व आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा झाली. या संपूर्ण संघर्षांनंतर आकाराने सगळ्यात मोठा असलेला अहमदनगर जिल्ह्य़ातील देहव्यापार बालमुक्त झाला. आज या जिल्ह्य़ात ३५०० स्त्रिया देहव्यापारात आहेत. पण त्यातील एकही अल्पवयीन नाही. इमानदारीने आणि नैतिक भूमिकेतून तरुणांनी सत्याग्रह केला तर आजही व्यवस्थेमध्ये परिवर्तन घडू शकते. ‘स्नेहालय’चा ‘स्नेहज्योत’ हा प्रकल्प ३५०० वेश्यांच्या जीवनात परिवर्तन घडवत आहे. ‘स्नेहालय’च्या आंतरराष्ट्रीय शाळांशी संलग्न असलेल्या ई-स्कूलमध्ये आज ४०० मुले शिकत आहेत. ‘स्नेहालय’च्या ‘केअिरग फ्रेंड्स हॉस्पिटल’मध्ये १०० रुग्णांसाठी सर्व प्रकारच्या वैद्यकीय सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. ८ झोपडपट्टय़ांमध्ये राहणाऱ्या २००० मुलांसाठी ‘बालभवन’ प्रकल्प कार्यरत आहे. शिक्षण-आरोग्य-संस्कार-रोजगार या चौकटीत बालभवनचे कार्य चालते. ‘स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राद्वारे’ आतापर्यंत ८०० च्या वर मुलांना उत्तम परिवारात पुनर्वसित केले आहे. त्याचबरोबर ६०० पेक्षा जास्त अल्पवयीन माता आणि बलात्कारित स्त्रियांना नवे आणि प्रतिष्ठित आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. ‘स्नेहाधार’ हा स्त्रियांवर होणाऱ्या घरगुती हिंसा, छेडछाड, बलात्कार अशा सर्व अत्याचारांसाठी अहोरात्र कार्यरत असणारा प्रकल्प आहे. ‘स्नेहाधार हेल्पलाइन’ १९९३ पासून स्त्रियांच्या मदतीसाठी कार्यरत असणारी भारतातील पहिली हेल्पलाइन आहे. ३० एकर परिसरात वसलेल्या ‘हिम्मतग्राम’ प्रकल्पामध्ये राहणाऱ्या एच.आय.व्ही.बाधित स्त्रिया आणि कुटुंबांना आपले जीवन आमूलाग्र बदलण्याची संधी मिळत आहे. तेथे राहणाऱ्या सर्वाना पॉलीहाउस, शेती, डेअरी येथे काम शिकण्याच्या आणि काम करण्याच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. ‘युवनिर्माण’प्रकल्पांतर्गत दर वर्षी २००० युवकांना सेवाकार्याचे प्रशिक्षण आणि प्रेरणा दिली जाते. अहमदनगर जिल्ह्य़ात प्रत्येक लालबत्ती भागात डे-केअर आणि नाइट-केअर सेंटर व त्याचबरोबर महिला बचत गट ‘स्नेहालय’तर्फे चालविले जातात.

देहव्यापार करणाऱ्या स्त्रिया आणि त्यांच्या मुलांसोबतच ‘स्नेहालय’चे कार्य सुरू झाले. आज हे लाभार्थी ‘स्नेहालय’चे आजीव सदस्य, देणगीदार आणि विश्वस्तदेखील आहेत. समाजातील प्रत्येक घटकाला ‘स्नेहालय’ने आपल्या कामासोबत जोडून घेतले आहे. आपल्या गिऱ्हाईकाकडून मिळणाऱ्या बिदागीतून १० रुपये देणारी वेश्या असो किंवा आपला पगार झाल्यावर त्यातून एक दूध-पावडरची पिशवी आणून देणारा कार्यकर्ता असो, हे सगळेच ‘स्नेहालय’ची खरी ताकद आहेत. गांधी-विवेकानंद-आंबेडकर यांच्या जगण्यातील समान धागा हाच आहे की त्यांनी देशातील गरीब माणसाची समज आणि दानत यावर विश्वास ठेवला. ‘स्नेहालय’ संस्थेला सरकारी अनुदान नाही. केवळ समाजातील अनेक लोकांच्या मदतीवरच ‘स्नेहालय’चे काम सुरू आहे. आणि म्हणूनच ‘स्नेहालय’चे मॉडेल शाश्वत आहे.

‘स्नेहालय’च्या आरंभीच्या काळात स्त्रियांना ओळख आणि नागरिकत्व मिळवून देण्यासाठी खूप संघर्ष झाला. भारतात सर्वप्रथम सर्व वेश्यांना शिधापत्रिका १९९३ मध्ये नगर जिल्ह्य़ात देण्यात आल्या. बँकेत खाते, मुलांच्या जन्म दाखल्याविना शाळेत प्रवेशाचा अधिकार, पोलिसांची हप्ताबंदी, आरोग्याचा अधिकार, मोफत कंडोम मिळण्याचा अधिकार, इतर स्त्रियांप्रमाणे समान अधिकार – दर्जा आणि प्रतिष्ठा मिळण्यासाठी केलेल्या आंदोलनांमुळे ‘स्नेहालय’चा लक्ष्यगट संस्थेशी एकरूप झाला.

आम्हाला याची जाणीव आहे की ‘स्नेहालय’ संस्था प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही. पण ‘स्नेहालय’च्या कामाची प्रेरणा, सेवा आणि स्नेहाची भावना जाती-धर्म-प्रांत-भाषा-देश यांच्या सीमा ओलांडून सर्वदूर पोहोचू शकते. याच कामातून प्रेरणा घेऊन ‘स्नेहालय’च्या लाभार्थी आणि कार्यकर्त्यांद्वारे १०० हून अधिक संस्था आज देशभरात कार्यरत आहेत. त्यांच्यासाठी ‘स्नेहालय’ संस्था मातृत्वभावनेने काम करते. पुणे जिल्ह्य़ातील सासवड परिसरात डॉ. अनिल कुडिया याने व्यसनी आणि लालबत्तीतील बालकांसाठी सुरू केलेली ‘सार्थक’ संस्था, ‘विठ्ठल ग्रामीण विकास संस्थे’द्वारे ग्रामविकासाचे ‘पिंपळगाव वाघा मॉडेल’ (ता.जि. अहमदनगर ) विकसित करणारा अजय वाबळे, ‘पसायदान’ संस्थेद्वारे नेवासे तालुक्यातील तरुणाईत नवचैतन्य आणणारा सर्जेराव तुवर, उसतोडणी कामगारांच्या मुलांची भटकंती ‘उचल फाउंडेशन’द्वारे थांबविणारा सचिन खेडकर, फासेपारधी आणि इतर भटक्या विमुक्तांचे बालकांचे जीवन बदलणारा ‘महामानव बाबा आमटे संस्थे’चा अनंत झेंडे, आणि ‘जय माता दी’ संस्थेचा फारुक बेग, संगमनेरच्या ‘स्वयंप्रेरित’ संस्थेचा संतोष पवार, बुलढाण्यातील ‘सेवासंकल्प फाउंडेशन’चा नंदू पालवे, ‘आदिवासी-पारधी समाजविकास संस्था’ चालविणारा विकास भोसले, कुर्डूवाडी येथे एचआयव्हीग्रस्त बालकांना घर देणारा ‘उम्मीद प्रकल्प’, अंध-अपंगांसाठी भारतात अभिनव प्रकारचे काम करणारी ‘अनामप्रेम’ संस्था इत्यादी ‘स्नेहालय’चाच विस्तारित परिवार आहे. नावे वेगळी, पण प्रेरणा आणि भावधारा एकच आहे.

भारताबाहेर इंग्लंड, जर्मनी आणि अमेरिकेत लोकांनी ‘स्नेहालय’च्या नावाने नोंदणीकृत संस्था स्थापन केल्या आहेत. आपल्या प्रयत्नांच्या मर्यादा ठाऊक असल्याने व्यापक परिवर्तनासाठी संस्थेतून एका प्रेरणेत रुपांतरित होण्याची आणि अनेकांसोबत स्वत: पायाचे दगड बनून काम करण्याची ‘स्नेहालय’ची धडपड जारी आहे. त्याविषयी पुढील शनिवारी.

girish@snehalaya.org

chaturang@expressindia.com