स्त्रियांच्या व तरुणांच्या हातांत नेतृत्वाची धुरा दिल्यास भारत दुनियेपुढे एक नवा आदर्श निर्माण करू शकेल. आमचे प्रयत्न या दिशेने सुरू आहेत. केवळ भारतीय संविधानाचा रोज उद्घोष करून उपयोग नाही तर त्यातील मूल्ये, स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, विज्ञाननिष्ठा ही मूल्ये कसोशीने रुजवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. जीर्ण, टाकाऊ सनातनींचा जाणीवपूर्वक त्याग करावा लागेल. त्यासाठी प्राथमिक शिक्षणापासून संस्कार बदलले गेले पाहिजेत. भारताला नव्या निर्धाराची गरज आहे. सत्यमेव जयते!

भारतातील एकूण असंघटित कष्टकऱ्यांची संख्या ५० कोटींच्या पुढे गेलेली आहे. स्त्री कष्टकऱ्यांचे प्रमाण खूप मोठे आहे. देशात आर्थिक विषमता पराकोटीला पोचली आहे. देशाने स्वीकारलेले आर्थिक धोरण खासगीकरण-उदारीकरण-जागतिकीकरण (‘खा-उ-जा’) आहे. त्याची अंमलबजावणी कसोशीने केली जात आहे. पाश्चात्त्य भांडवल आणि पाश्चात्त्य तंत्रज्ञान यामुळे आर्थिक क्षेत्रात आपला देश मांडलिक बनतो की काय? अशी स्थिती आहे.

अमानवी पातळींवर आर्थिक शोषण पोचल्याचे रोज दाखले वाचायला-पाहायला मिळत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने रोज नव-नवे उच्चांक गाठले जात आहेत. आम्ही मोलकरणींची संघटना चालवतो. सभेला उशिरा आलेल्या स्त्रीला जाब विचारला तर तिने उत्तर दिले, ‘‘वेळच मिळत नाही इकडे यायला, पोराला पेट्रोलसाठी रोज शंभरची नोट द्यावी लागते. मोटरसायकल अन् संगणक-कम्प्युटर असल्याशिवाय त्याला काम मिळत नाही. म्हणून दोन कामे मला जास्त करावी लागतात. सभेला कशी येणार?’’ सुशिक्षित- अशिक्षित बेरोजगारांची संख्या रोज वाढतेय.

त्यांना रोजगाराची हमी सरकार देऊ शकत नाही. यातही स्त्रियांची तर आणखी कठीण परिस्थिती आहे. आता कष्टकरी स्त्रियांच्या चळवळीत शरीर विकणाऱ्या स्त्रिया म्हणतात, आम्हाला वेश्या म्हणू नका, लैंगिक कष्टकरी म्हणा! कष्टकरी स्त्रियांच्यात अस्मितेची एक नवी छटा अनुभवाला येते.

वास्तविक या प्रश्रांचा विचार वेगळ्या पातळींवर जाऊन करता येऊ शकतो. भारत गरीब आहे. परंतु भारतातील सोन्याचा साठा जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. दरवर्षी तीन ते साडेतीन हजार टन सोन्याची येथे आयात होते. लोकप्रिय धार्मिक स्थळांकडे प्रचंड सोन्याचा साठा आहे. या धार्मिक संस्थांना बॉन्ड लिहून देऊन ही संपत्ती देशातील उद्योगनिर्मितीसाठी वापरता येऊ शकेल. दिवंगत माजी मंत्री पंजाबराव देशमुख यांना यासाठी सूचना केली होती. पण भांडवलाचा प्रश्न यातून काही प्रमाणात सुटू शकतो. नव्या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी तरुणाईची तयारी करून घ्यावी लागेल. युद्धपातळीवर प्रयत्न करावे लागतील आणि तरुणाईला सज्ज करावे लागेल. भारताला स्वतचे नवे उद्योग तंत्र निर्माण करावे लागेल. ही क्षमता तरुणाईत आहे, असं निश्चित म्हणता येईल. ‘खा-उ-जा’ धोरणाचा फेरविचार केला पाहिजे. शेती धंद्यात हमी भावाची अंमलबजावणी झाल्यास पोटासाठी शहराकडे धावणारा तरुण वर्ग शेतीतच स्थिरावण्याची शक्यता आहे. आजच्या काळात तरुणाईला मूर्ख बनवणाऱ्या व खऱ्या अर्थाने साहसी न बनविणाऱ्या वातावरणाला तात्काळ छेद देण्याची आवश्यकता आहे.

स्त्रियांच्या व तरुणांच्या हातांत नेतृत्वाची धुरा दिल्यास भारत दुनियेपुढे एक नवा आदर्श निर्माण करू शकेल. आमचे प्रयत्न या दिशेने सुरू आहेत. महाराष्ट्रातील माथाडी हमाल कामगार कायद्याची भलावण आज केंद्र सरकारकडून सुरू झाली आहे. त्यामुळे हुरळून जावं अशी स्थिती नाही.

वेठबिगारी, कंत्राटी पद्धत, उमेदवारी आणि जॉबवर्क इत्यादी घातक मजूर पद्धतींचा शासनाने अवलंब केला आहे. आमच्या हमालांच्या पाठीचा लिलाव सरकारी गोदामांतून हमालीच्या टेंडर पद्धतीच्या नावाने सर्रास सुरू आहे. हे याचे उदाहरण आहे. बाकी कामाची व जगण्याच्या स्थितीबाबत, बोलण्यासारखी स्थिती नाही. प्रगत देशात बौद्धिक क्षमतांची वाढ कशी होईल? व तिचा उपयोग कसा होईल? याचा विचार करावा (मसल पॉवर), शरीर बळाचीच अपरिहार्यता बनली, पुरुषी बलवता वाढत जाईल. आजही ते घडत आहे. त्याचा परिणाम स्त्री-कष्टकऱ्यांवर होत आहे आणि तो वाढण्याचा धोका आहे.

शेती मालाला हमीभाव व तरुणाला रोजगाराची हमी या आजच्या घटकेला प्रमुख गरजा आहेत. १९९४ ते १९९८ अशी सतत चार वर्षे अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनांत काम करता आले. तसा मी त्या आंदोलनांत ओढला गेलो. भ्रष्टाचारविरोधी आंदोलन न्यासाची आम्ही स्थापना करण्याचा प्रयत्न केला. मराठवाडय़ाचे नेते गोिवदभाई श्रॉफ, प्रा. पुष्पा भावे, अविनाश धर्माधिकारी, प्रा. ग.प्र. प्रधान यांच्यासह अनेक मंडळींनी भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यास निर्माण करण्याचे ठरवले आणि त्या न्यासाच्या वतीने कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याचे ठरले. त्याची जबाबदारी साथी पन्नालाल सुराणांनी घेतली. महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस प्रमुख भास्करराव मिसर, ज्येष्ठ विधिज्ञ सत्यरंजन साठे, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्यामार्फत कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण सुरू झाले. त्यांना पुणे ते राळेगणसिद्धी प्रवास करावा लागे. परस्पर कोणीही भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचा कार्यकर्ता म्हणून मिरवू नये यासाठी शिक्षण वर्गाची निर्मिती करण्यात आली. कार्यकर्त्यांची फळी उभी करण्याचा प्रयत्न झाला.

१९९८ मध्ये मला परदेशात मुलांकडे काही महिन्यांसाठी जावे लागले आणि अण्णांनी न्यासाची निर्मिती थांबवली व प्रशिक्षण वर्ग बंद झाले. माझी दोन्ही मुलं परदेशात आहेत. असीम ५० वर्षांचा झालाय. तो अमेरिकेत बोस्टनला राहतो. धाकटा अंबर कॅनडात टोरान्टोला राहातो. दोघेही आय.टी.क्षेत्रात इंजिनीअर आहेत. सुनाही शिक्षित आहेत. त्यांच्यामुळे आम्हा उभयतांना जग प्रवास घडलेला आहे. अधूनमधून जावं लागतं.

तसं भारतातही िहडावं लागतं. या सगळ्या भ्रमंतीत खूप नवं काही पाहायला मिळतं. जागोजाग संवाद होतो. अमेरिकेतील सामाजिक सुरक्षा पाहूनच मला भारतातही तशी मागणी करावी असं वाटतं. देश-परदेशातील प्रवासात लोकांच्या बरोबर विशेषत  जन-सामान्यांबरोबर संवाद करावा लागतो. देशातील तळा-गाळातील स्त्रियांबरोबर बोलत असताना एक धागा मिळाला. थोडक्यात बोलावं-नेमकं बोलावं. त्यामुळे मला अनेक म्हणी पाठ करता आल्या. आमच्या एक कार्यकर्त्यां-भगिनी हेमा राईरकर यांनी २५ हजारांवर म्हणींचा संग्रह केल्याचं कळले. त्यामुळे स्त्री-मुक्ती आंदोलनांत याचा खूप उपयोग झाला.

संपर्क, संवाद, प्रबोधन, रचना आणि संघर्ष या मार्गाने काम चालत राहिले. आता तर संपर्काची नव-नवीन साधने निर्माण झाली आहेत. सुरुवातीची पाटी-पेन्सिल, खडू कुठल्या-कुठे लुप्त झाली आहे. नवा डिजिटलचा मामला सुरू झालाय. या नव्या संपर्क साधनांबरोबर जुळवून घेणं वाढत्या वयामुळे अवघड होतं. तसा माझा जनसंपर्क दांडगा आहे. प्रवासही भरपूर होतो. हमाल पंचायतने मला गाडी दिली आहे. प्रवासाच्या खर्चाची तरतूद जागोजागची मंडळी करतात. प्रत्येक उपक्रमाचे बँकेत स्वतंत्र खाते आहे. सह्य़ा करण्याचे अधिकार वाटून दिलेले आहेत.

नुसत्या म्हणीच नव्हे तर चळवळीतील गाणीही मी पाठ केली आहेत. सध्या महात्मा फुल्यांचे ‘सत्य सर्वाचे आदि घर’ हे प्रार्थना गीत आवर्जून म्हणवून घेतले जाते. ‘सत्यमेव जयते’चा नारा दिला जातो. आभाळाची आम्ही लेकरं काळी माती आई! हे गाणेही म्हटले जाते. तसेच वारंवार तुरुंगात गेल्यामुळे तुरुंगातील भाषा, कोडही अवगत झाले आहेत. तुरुंगग्रस्तांची कहाणी मी एका लेखात विदित केली आहे. अलीकडच्या काळात ‘जेल भरो’ला लोकांची तयारी नसते आणि त्यामुळे कदाचित हल्ला-बोलची भाषा होत असावी. वास्तविक तुरुंगवासामुळे बरंच काही वाचता येतं, चिंतन करता येतं, शिकता येतं.

म्हणूनच केवळ भारतीय संविधानाचा रोज उद्घोष करून उपयोग नाही तर त्यातील मूल्ये, स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, धर्मनिरपेक्षतता, समाजवाद, विज्ञाननिष्ठा ही मूल्ये कसोशीने रुजवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. जीर्ण, टाकाऊ सनातनींचा जाणीवपूर्वक त्याग करावा लागेल. त्यासाठी प्राथमिक शिक्षणापासून संस्कार बदलले गेले पाहिजेत. भारताला नव्या निर्धाराची गरज आहे. सत्यमेव जयते!

सत्य सर्वाचे आदि घर, सर्व धर्माचे माहेर!

(समाप्त)

rahul.nagavkar@gmail.com

chaturang@expressindia.com