17 December 2017

News Flash

व्यथा आणि कथा

मुस्लीम स्त्रियांशी बोलताना कित्येकदा डोळ्यांत पाणीही आलं, पण त्यांच्या दुर्दम्य आशावादाने उभारीही दिली

रझिया पटेल | Updated: September 30, 2017 1:01 AM

‘भारतीय मुस्लीम स्त्रियांचा सन्मानाने जगण्यासाठीचा संघर्ष’ या अभ्यासासाठी उत्तर प्रदेशमधील मुस्लीम स्त्रियांशी संवाद साधताना.

मुस्लीम स्त्रियांशी बोलताना कित्येकदा डोळ्यांत पाणीही आलं, पण त्यांच्या दुर्दम्य आशावादाने उभारीही दिली. या मुस्लीम स्त्रियांनी आणि या अभ्यासाने मला एक दिशा दिली. या अभ्यासात ८० टक्के मुस्लीम स्त्रियांनी सांगितलं की, आम्ही आमच्या मुलींना शिकवू इच्छितो. आम्ही जे सहन केलं ते त्यांना सहन करावे लागू नये. ‘पढ-लिखके हमारी बेटियों को पैरों पे खडा करना चाहते है।’ असे त्यांचे म्हणणे होते.

शाहबानो प्रकरणामुळे मुस्लीम स्त्रियांचा लढा पुढे जाण्याऐवजी मागे रेटला गेला. मला आठवतंय, त्या काळात मुस्लीम स्त्रियांच्या मुलाखती घेत असताना एक जण म्हणाली, ‘देश को २१ वी सदी में ले जाने की बात करनेवाले मुस्लीम महिलाओं को १४ वी सदी में क्यूं ले गये?’ या काळात मुस्लीम धर्मसंरक्षक मोठय़ा प्रमाणावर रस्त्यावर उतरले. देशभर मुस्लीम समाज सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात रस्त्यावर उतरतो आणि सरकार कायदा बदलते यातून खूप चुकीचा संदेश देशाला गेला आणि याचे दीर्घकालीन परिणाम भारतातल्या समाजकारणावर आणि राजकारणावर झाले.

या काळात १९८८ मध्ये मुंबईतील नारी केंद्र या संस्थेने आशिया खंडातील स्त्रियांची एक परिषद बोलावली होती. या परिषदेचा विषय होता ‘स्त्री, धर्म आणि कायदा’ आणि पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, चीन, हाँगकाँग, अल्जिरिया अशा विविध देशांतून स्त्री प्रतिनिधी आल्या होत्या. आणि प्रत्येक देशाच्या कायद्यात स्त्रीच्या दुय्यमत्वाचा प्रश्न होताच. याच काळात ‘विमेन लिव्हिंग अंडर मुस्लीम लॉज्’ ही आंतरराष्ट्रीय मुस्लीम स्त्री संघटना स्थापन झाली. या संघटनेने जीनिव्हा इथे एक आंतरराष्ट्रीय परिषद घेतली. जागतिक पातळीवरची मुस्लीम स्त्रियांची ही पहिली परिषद होती. जगभरातल्या १५ ते २० देशांमधून मुस्लीम स्त्रिया इथे आल्या होत्या. या परिषदेत महत्त्वाचा मुद्दा होता तो धर्माधता, धर्माच्या नावाने बनवण्यात येणारे स्त्रीविरोधी कायदे. यात महत्त्वाचा मुद्दा चर्चिला गेला तो असा की, सर्वच मुस्लीम देशांमध्ये स्थानिक संस्कृतीनुसार कायद्यांमध्ये विविधता आहे. कायद्यांमध्ये बदल घडवण्याची मागणी करताना ही विविधता महत्त्वाची आहे. त्यामुळे कायद्याचे धर्माधारित संहितीकरण (कोडिफिकेशन) घातक ठरू शकेल. आपल्या देशात ब्रिटिश सत्तेने १९३७ चा शरियत अ‍ॅक्ट निर्माण करताना भारतातील मुसलमानांमधील प्रांतीय, पंथीय विविधता तर संपवलीच, पण कायद्याच्या आधारे एक मुस्लीम आयडेंटिटी बळकट करत नेली. हीच भीती या परिषदेत व्यक्त करण्यात आली होती. या परिषदेला आलेल्या बऱ्याच स्त्रियांना सरकारविरोधी ठरवून त्यांच्याविरोधात अटकेचे हुकूम निघाले होते. त्या काळात इराणमध्ये खोमेनीची सत्ता होती. तिथली हाले अफशार नावाची स्त्री कशा पद्धतीने लपतछापत परिषदेला पोहोचली होती, ते ऐकणंसुद्धा भीतीदायक होतं. इजिप्तमधून डॉ. नवाल अल सहावी आल्या होत्या. या सर्व स्त्रिया आपल्या देशात हुकूमशाही आणि धर्माधतेच्या विरोधात लढत होत्या. या सर्व अनुभवातून हे जाणवत होतं की, स्त्रियांच्या लढय़ासाठी धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही किती महत्त्वाची आहे. त्या वेळी त्या आम्हाला म्हणत होत्या, तुमच्या देशात धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही आहे. मात्र आम्ही निराश होतो, कारण शाहबानो प्रकरण घडलं होतं. निराश होतो, कारण जगभर अशा पद्धतीचं राजकारण वाढताना दिसत होतं; पण स्त्रिया एकत्रितपणे त्याविरोधात आवाज उठवत राहिल्या आहेत, हे आशादायक होतं.

भारतात मात्र परिस्थिती नंतर अधिकच चिघळली. शाहबानोप्रकरणी मुस्लीम मूलतत्त्ववादी पुढे होते. पाठोपाठ बाबरी मशीद उद्ध्वस्त केली गेली त्यात हिंदुत्ववादी पुढे होते. देशभर त्यानंतर अशांततेचं वातावरण निर्माण झालं, दंगली झाल्या. सामाजिक चळवळी मागे रेटल्या गेल्या. समाजात जेव्हा हिंसा होते तेव्हा स्त्रिया त्याची मोठी किंमत मोजतात. त्यातही शोषित समाजातल्या स्त्रिया, अर्थातच गरीब, दलित, मुसलमान अशा समूहांमधून असलेल्या स्त्रिया मोठय़ा प्रमाणावर आहेत असे आम्हाला या प्रश्नावर काम करताना आढळून आले. छात्र-युवा संघर्षवाहिनीने दंगलींचा प्रश्न समजून घेण्यासाठी ज्या समित्या नेमल्या त्यात बडोदा येथे १९८४ च्या सुमारास झालेली दंगल, याच सुमारास फैजपूर (जळगाव जिल्हा) येथे झालेली दंगल आणि उमापूर, जि. औरंगाबाद इथे १९८६ येथे झालेल्या दंगलीचा प्रश्न समजावून घेणाऱ्या समितीमध्ये मी होते. सोबत जयंत दिवाण, संजय पतंगे, संदेश पोतदार असे संघर्षवाहिनीचे साथी होते. व्यापक पातळीवरील संघटनेसोबत काम करताना दृष्टिकोन तर व्यापक झालाच, पण स्त्रीमुक्ती आणि स्त्री प्रश्न याबाबत संघटनेतील पुरुष साथींसोबत कडाक्याच्या चर्चाही कराव्या लागल्या. या काळात मी जवळून पाहिलं की, दंगली स्त्रियांना किती उद्ध्वस्त करून टाकतात. तिने काडी-काडी करून जमवलेले घरटे उद्ध्वस्त होते, घरातले बाप, भाऊ, नवरे, मुलगे गमावणं आणि त्यानंतरचं भीषण आयुष्य हे सगळं बघताना अतीव दु:ख आणि अगतिकता मनात दाटून येते. १९९२-९३ च्या दंगली आणि नंतर बॉम्बस्फोटांची मालिका, हिंसा आणि असुरक्षिततेच्या भावनेने संपूर्ण वातावरण झाकोळून गेले होते. गेली तीन दशकं आपण सारे या वातावरणाचे कैदी झालो आहोत. ही हिंसेची मालिका या ना त्या स्वरूपात सुरूच राहिली. १९८६, १९९२-९३, २००२, २०१५ मराठवाडा, मुंबई, गोध्रा, गुजरात, मुजफ्फरनगर अशा किती तरी घटना. या सगळ्याचा परिणाम असा झाला की, माणसाचा माणसावरील विश्वास उडून जावा. ‘आगीचा दर्या’ ही कुर्रतुल ऐन हैदर या ज्ञानपीठ विजेत्या लेखिकेची कादंबरी. या कादंबरीतील नायिका चंपा अहमद म्हणते, ‘मन आणि भावना यांच्या ओढाताणीतून कशी सुटका होईल? सगळीकडे या सावल्या पसरल्या आहेत. ज्याप्रमाणे जंगलात वादळ सुरू झालं की सावल्यांचा गुंताडा होतो, त्याप्रमाणे प्रत्येक पातळीवर ही ओढाताण सुरू असते. जमाती, जाती, राष्ट्रं,  राजवटी, माणसं या सर्वाचा सर्व बाजूंनी गुंता झाला आहे. माझ्या सभोवती भीतीचं अधिराज्य पसरलं आहे. अविश्वास, घृणा आणि परकेपणा, भीती आणि एकनिष्ठता यात ओढाताण चालली आहे. आज आपण सर्वच या परिस्थितीतून जात आहोत. या सर्वातून आपण काय साध्य करतो आहोत?

या काळात भारतभर हिंडून मी मुस्लीम स्त्रियांशी संवाद साधला. मी संघटनेची पूर्णवेळ कार्यकर्ती असल्याने प्रवासासाठी आर्थिक मदतीची गरज होती. त्या वेळी टाइम्स फाऊंडेशनच्या शिष्यवृत्तीची जाहिरात आली होती. मी त्यासाठी अर्ज केला. त्यात माझ्या अभ्यासविषयाची निवड होऊन मला दोन वर्षांसाठी शिष्यवृत्ती मिळाली. माझा विषय होता ‘इंडियन मुस्लीम विमेन : द स्ट्रगल फॉर लिव्हिंग विथ डिग्निटी’. भारतीय मुस्लीम स्त्रियांचा सन्मानाने जगण्यासाठीचा संघर्ष. या अभ्यासासाठी देशभर फिरून मुस्लीम स्त्रियांशी बोलताना कित्येकदा डोळ्यांत पाणीही आलं, पण त्यांच्या दुर्दम्य आशावादाने उभारीही दिली. या मुस्लीम स्त्रियांनी आणि या अभ्यासाने मला एक दिशा दिली. या अभ्यासात ८० टक्के मुस्लीम स्त्रियांनी सांगितलं की, आम्ही आमच्या मुलींना शिकवू इच्छितो. आम्ही जे सहन केलं ते त्यांना सहन करावे लागू नये. ‘पढ-लिखके हमारी बेटियों को पैरों पे खडा करना चाहते है।’ असे त्यांचे म्हणणे होते. ‘लडकियोंने पढ-लिखकर क्या बनना चाहिए?’ या प्रश्नावर ‘नौकरी करे’- ३० टक्के, ‘उच्चशिक्षित बनें और अच्छा पद पाएं’ – ३२ टक्के, तर ‘स्वतंत्र व्यवसाय करे’ ९ टक्के अशी उत्तरे आली होती. आज मुस्लीम समाजाच्या शिक्षणावर काम करताना स्त्री पालकांच्या अपेक्षा आता जास्त स्पष्टपणे समोर येताना दिसतात. शिक्षक (२१ टक्के), डॉक्टर (१८ टक्के), पोलीस (१२ टक्के), सनदी अधिकारी (१२ टक्के), एअर होस्टेस (८ टक्के), वकील (५ टक्के) आपल्या मुलींनी बनावे, अशी या स्त्रियांची आणि त्यांच्या मुलींचीही स्वप्ने आहेत; पण मुस्लीम मुलींचा शिक्षणातील गळतीचा दर पाहता ही स्वप्नं क्वचितच पूर्ण होतात हे दु:खद वास्तव आहे.

मुस्लीम समाजाच्या शिक्षणाच्या प्रश्नावर काम करताना या स्त्रियांच्या विचार करण्याच्या पद्धतीतून मी काही नवीन गोष्टी शिकले. शिकायचं का? या प्रश्नावर त्यांचं उत्तर होतं, ‘इन्सान बुढा हो जाता है, ईल्म कभी बुढा नही होता, इन्सान मर जाता है, ईल्म कभी नही मरता’ असं पिढय़ान्पिढय़ा प्रवाहित राहणाऱ्या, टिकाऊ ज्ञानाबद्दल त्या बोलत होत्या. आजची शिक्षण पद्धती असं ‘कभी न मरनेवाला’ ज्ञान देते का? यावर त्यांचं उत्तर ‘नही’ असं होतं. ‘फिर कैसी तालीम चाहिए’ या प्रश्नावर ‘तालीम तो ऐसी चाहिए जो हुनर और हिम्मत दे सके’ असे त्यांचे उत्तर होते. आजची शिक्षण पद्धती हे देत नसल्यामुळे त्या शिक्षण पद्धतीला नापास करत होत्या.

आमची मुलं खाडी देशांत रोजगारासाठी जातात. त्यापेक्षा ‘कम पैसा मिला तो चलेगा, लेकिन रोजगार तो अपने देश में ही मिलना चाहिए’ असं त्या म्हणतात. किती तरी स्त्रियांनी हेही सांगितलं की, समाजात शांतता असली तर आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करू शकतो. ‘आपको सब से ज्यादा खुशी कबहोती है, और ज्यादा दु:ख क ब होता है?’ या प्रश्नाचं जवळपास सर्वच स्त्रियांनी उत्तर दिलं, ‘जब दो समाज आपस में मिलजुलकर रहते है, जब अमन होता है, तब खुशी होती है। जब दो समाज आपस मे लडते झगडते है तो दुख होता है।’ १९९२-९३ च्या दंगलींच्या काळात विमनस्क होऊन घरी गेले तेव्हा मी घरीच राहावं, चळवळीत वगैरे जाऊ नये असं आधी वाटणारी माझी आई मला म्हणाली, ‘‘आता बसून कसं चालेल? विमनस्क होऊन कसं चालेल? सौ लोगें ने शायद मारा होगा लेकिन कोई दो तो जरूर होंगे जिन्होने बचाया होगा, उनको याद करो।’’ अत्यंत वाईट परिस्थितीतही माणुसकीवरचा विश्वास ढळू न देणं हा सकारात्मक विचार स्त्री करते. हे उपजत शहाणपण तिच्या येणाऱ्या पिढय़ांच्या मानव समूहांच्या अस्तित्वासाठी अपरिहार्य असतं.

भारतीय शिक्षणसंस्थेतर्फे आम्ही अजून एका प्रश्नावर काम केलं ते भटके-विमुक्त मुस्लीम समाज कोणते आहेत? आणि त्यांचे प्रश्न काय आहेत यावर. एक तर मुस्लीम समाजात जातिव्यवस्था नाही असा गैरसमज सर्वसामान्य समाज ते धोरणकर्ते यांच्यापर्यंत पसरलेला आहे. मात्र मुस्लीम समाजातले तडवी भिल्ल, मदारी, गारुडी, कलावंत, फकीर, बंदरवाले, उंटवाले असे किती तरी भटके विमुक्त समूह आम्हाला आढळून आले आणि या समूहांची स्थिती वंचितातील वंचित अशी आहे. वन्यजीव संरक्षण कायदा आणि इतर कारणांमुळे यांचे रोजगार गेले. ‘सरकारने प्राण्यांना वाचवलं, पण आम्हा माणसांना मारलं’ अशी त्यांची कैफियत आहे. प्राण्यांना वाचवणं आणि माणसांना मारणं हे धोरण आजही चालूच आहे. आता गाईच्या नावाने माणसं मारली जातात. सांगायचं आहे ते हे की, या समूहांमधील स्त्रिया या वंचितातील वंचितांच्या शेवटच्या पायरीवर आहेत.

या संपूर्ण काळात मी अनौपचारिक पद्धतीने माझे शिक्षण हळूहळू पूर्ण करत नेले. कारण माझा लढा सुरू झाला त्यात तो एक मुख्य मुद्दा होता. त्यामुळे संघटनेचं काम करत मी बाहेरून माझे शिक्षण हळूहळू पूर्ण केले. माझ्या कामाशी माझ्या पदवीचा संबंध असला पाहिजे म्हणून मी डॉक्टरेटसाठी प्रबंधाचा जो विषय निवडला तो होता ‘पॉलिटिक्स ऑफ मुस्लीम एज्युकेशन इन इंडिया’आणि यात जो केस स्टडी केला तो होता ‘कोरिलेशन बिटविन एज्युकेशन अँड एम्प्लॉयमेंट स्पेशल रेफरन्स टू मुस्लीम कम्युनिटी’ यात महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांतून साडेसातशे कुटुंबांची मी पाहणी केली. त्यात मुस्लीम समाजाचे शिक्षणाचे विदारक वास्तव समोर आले; पण एक तरुण मुलगी म्हणाली, ‘जिस समाज में मर्द भी पढे लिखे न हो, वहां औरतों को पढना कैसे मुमकीन है?’ लक्षात घ्या, हे सच्चर समितीच्या अहवालाच्या आधीची गोष्ट आहे. जे वास्तव आमच्या अवतीभवती सर्वसामान्यांना दिसते ते धोरणकर्त्यांना दाखवण्यासाठी अट्टहास करावा लागतो. सच्चर समितीने संपूर्ण देशात मुस्लीम समाजाचा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक अभ्यास करून जो अहवाल तयार केला तो विदारक आहे. स्त्रियांच्या बाबतीत आणि समाजातल्या अगदी तळातल्या जातींबद्दल त्यात फारसे विशेषत्वाने आले नसले तरी अशी विदारक स्थिती असलेल्या समाजात ते ‘मायनॉरिटी विदिन मायनॉरिटी’ आणि ‘मार्जिनलाइज्ड विदिन मार्जिनलाइज्ड’ असणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे गांधीजी म्हणतात त्याप्रमाणे समाजाच्या तळाशी असलेल्या या घटकांकडे बघून योजना आणि कार्यक्रम आखले गेले पाहिजेत. त्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे.

या काळातील सांप्रदायिकतेचा भीषण होत जाणारा प्रश्न बघताना दोन समाजांच्या आणि विशेषत: हिंदू आणि मुस्लीम समाज एकमेकांच्या विरोधात उभे राहतात तेव्हा वंचितांचे प्रश्न गौण होऊन जातात. एकमेकांबद्दलचे अपप्रचार सुरू होतात. साहित्य, इतिहास आणि जे सोईचं असेल ते सर्व यासाठी वापरलं जातं. या विषयावर के. के. बिर्ला शिष्यवृत्तीच्या मदतीने मी ‘समकालीन भारतीय साहित्यात मुस्लीम समाजाचे चित्रण या विषयावर अभ्यास केला. मराठी आणि इतर प्रांतीय भाषिक साहित्याचा तुलनात्मक अभ्यास मी केला. हा अभ्यास करताना धक्केही बसले; पण स्थिर करणाऱ्या गोष्टीही मला आढळून आल्या. मुख्य म्हणजे मराठी भाषेतील लोकप्रिय मानल्या गेलेल्या कथा-कादंबऱ्यांमध्ये मुसलमान बहुतांशी खलनायक तरी रंगवला गेला आहे किंवा अदृश्य तरी आहे. मुसलमान स्त्री मुस्लीम पुरुषाच्या क्रूर विळख्यात आहे, अबला आहे असे दाखवले आहे वा तीही अदृश्य आहे. तिचं योगदान समाजाला जणू काहीच नाही. अगदी काही बोटांवर मोजता येतील अशा मराठी कथा कादंबऱ्यांत ती आणि मुस्लीम समाज वास्तवाच्या जवळ जाणारा दिसतो.

महाराष्ट्राबाहेरच्या साहित्यात मुस्लीम समाजाचं चित्रण कुठलाही मानवसमूह जसा असेल तसं येतं. चांगल्या प्रवृत्ती, वाईट प्रवृत्ती, जीवनसंघर्ष हे अतिशय सहजपणे येतं. त्यासाठी समाज असा फ्रेम करावा लागत नाही. प्रेमचंदाच्या ‘कर्मभूमी’ कादंबरीमधली सकीना किंवा फणीश्वरनाथ रेणूंच्या ‘जलवा’ या कथेतली ‘फातिमा दी’ या स्वातंत्र्य चळवळीला मदत करणाऱ्या लढाऊ स्त्रिया आहेत. बांगडय़ा विकणारी, पण बदलत्या काळात यंत्रावर तयार होणाऱ्या काचेच्या बांगडय़ांमुळे लाखेच्या बांगडय़ा कोणी विकत घेत नाही म्हणून रोजगार गमावणारी रजिया ‘ही रामवृक्ष बेनीपुरींच्या कथेत आहे. बदीउज्जमा यांच्या ‘छाको की वापसी’ या कादंबरीत फाळणीला विरोध करणारी आई आहे. कथेचा नायक म्हणतो, ‘अम्मा के किसी एक रुप पर स्थिर नहीं हो पाता हूं. सैंकडो हजारो वर्षो से दबी हुवी भारतीय नारी, जिसमे बगावत की एक चिंगारी नहीं या फौलाद की तरह मजबूत दिल रखनेवाली औरत जो कडी से भी कडी स्थिती में भी विचलित नहीं होती.’ एकीकडे ही स्त्री पितृसत्तेशी झुंजते आहे. तलाक, हलाला, बहुपत्नीत्व, परदा, सांप्रदायिक राजकारण याची बळी ही ठरते आहे, पण ती झुंजतेही आहे. या साहित्यात तिची ही झुंज तिचं जगण्याचं तत्त्वज्ञान खूप हृदयस्पर्शीपणे पुढं येतं, तिचं माणूसपण पुढे येतं. ‘मुझे मौत दे दे खुदाई जिंदगी का भरोसा नही है, मेरी आँखो पे परदा पडा है तेरी आँखों पे तो परदा नही है?’ असं सुफी तत्त्वज्ञान सांगत परमेश्वराला प्रश्न विचारणारी, तर ‘इबादत गैर करानी है जहन्नूम सर्द कर या रब, ईबादत दिल से होती है, डराने से नहीं होती’ – आमच्याकडून भक्ती करून घ्यायची असेल तर आम्हाला नरकाच्या अग्नीची भीती घालू नकोस. भक्ती हृदयातून येते, भय दाखवून होत नाही! असं ठणकावून सांगणारी मुस्लीम स्त्री मला या साहित्यात भेटली.

रझिया पटेल raziap@gmail.com

First Published on September 30, 2017 1:01 am

Web Title: struggles story of muslim women
टॅग Muslim Women