News Flash

कस्टाच्या धनिणी ते बचतीच्या धनिणी

तसे तिचे नवरा-सासूही बिचारेच होते.

‘‘१९९० च्या सुमाराला आम्ही पारगाव परिसरात बचत गट सुरू केले. तेव्हा दिवसभराच्या कामांनी शिणलेल्या असल्या तरी बाया जमायच्या. विषय निघाला की सांगायच्या, ‘हां! आमी बाया निस्त्या माराच्या आन् कस्टाच्या धनिणी.’ तोपर्यंत ‘धनी’ या शब्दाचं स्त्रीिलगी रूप मी ऐकलेलंच नव्हतं. धनी हा नेहमी पुरुषच असायचा; पण हळूहळू त्या स्वत:च्या बचतीच्याही धनिणी व्हायला लागल्या. हा बदल निश्चितच सुखवणारा होता.’’ कार्यकर्त्यांच्या नजरेतून आलेल्या अनुभवाचा हा भाग दुसरा.

मी आदिवासी भागात काम करत असतानाची गोष्ट. बाहेर गलका कसला ऐकू येतोय म्हणून पाहिलं तर कमळीची सासू तिला दरादरा ओढत घेऊन चालली होती. तोंडाने सतत बडबड चालू होती. ‘येत न्हाई म्हंजी? नौऱ्याची सता असते.’ कमळी बाळंतपणासाठी बापाकडे आलेली होती. बाळंतपण अवघड झालेलं. मूल गेलेलंच होतं. अंगात अजिबात ताकदच नव्हती म्हणून बिचारी कमळी जायला तयार नव्हती, पण हातात िशदीचा फोक घेऊन मागून तिचा नवरा चालला होता. म्हणून ती फरपटत चालली होती.

तसे तिचे नवरा-सासूही बिचारेच होते. भातलावणी तोंडावर आलेली असताना घरचं एक हक्काचं माणूस कामाला नसणं त्यांना परवडत नव्हतं. म्हणून पावसापाण्यात काम करण्याची कमळीची परिस्थिती नसतानाही ते तिला ओढून नेत होते. हे गरिबीचं दुखणं वेगळंच; पण पूर्वापार बाई म्हणजे वस्तू, मालमत्ताच समजली जात होती. तिने कामाला नाही म्हणण्याचा किंवा तिला तिच्या कष्टांचा मोबदला देण्याचा प्रश्नच नव्हता. बैलाला थोडाच त्याच्या कामाचा पागार मिळतो? ते पैसे मिळतात त्याच्या धन्याला. तसंच बाईवर पुरुषाची मालकीच जणू. कायद्याचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात आली होती : मालकी हक्कात जसा त्या वस्तूचा उपभोग घेण्याचा, विनियोग करण्याचा, तसाच तिची विल्हेवाट लावण्याचाही हक्क अंतर्भूत असतो. आजकाल बाईबाबत तो पुरेपूर बजावला जाताना दिसतो.

कमळीची ही गोष्ट चाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वीची; पण ‘नौऱ्याची सता असते’ हे वाक्य माझ्या डोक्यात खिळा ठोकल्यासारखं ठाण मांडून बसलं. बाईच्या शरीरावर आणि तिच्या श्रमांवरही सत्ता नवऱ्याची हे वास्तव पुढे नित्यनेमानं भेटत राहिलं. पुण्यात मोलकरणींनी प्रथम उत्स्फूर्तपणे संप केला. त्यांना पद्धतशीरपणे संघटित करण्याचे प्रयत्न नंतर झाले. संघटना बांधणीच्या त्या सुरुवातीच्या काळात माझा त्यात सहभाग होता. दहा-वीस घरचे केरवारे, धुणीभांडी आणि स्वत:च्या घरची सगळी कामं करून बायांना जमायलाच रात्रीचे नऊ-साडेनऊ व्हायचे; पण त्यांचा उत्साह अमाप असायचा. त्यांचे वेगवेगळे अनुभव आणि किस्से ऐकताना बाईच्या कष्टांच्या कहाणीचे अनेक पदर उलगडत जायचे.

पण मला एक गंमत वाटायची. रात्रीच्या बैठकांमध्ये बाया मन मोकळं करायच्या, ते फक्त मालक-मालकिणी, त्यांच्या कामांच्या आणि वागवण्याच्या तऱ्हा एवढय़ाबद्दलच नाही. स्वत:च्या नवऱ्याबद्दलही घडाघडा सांगून टाकायच्या. त्याच्या सगळ्या भुका भागवून आपुन या मीटिंगीचं सूत्र जुळवतो, पण तरी तो नाराजच असतो. ‘दीडदमडीचा तुजा पगार नि त्यापायी इतक्या रातीच्या मीटिंगा नि फिटिंगा काय करायच्यात? आमीबी कामं करतो की..’ असलं कायबाय बाबा बडबडत असतुया, असं सांगून खुसुखुसू हसत बसायच्या. ‘नौऱ्याची सता असते’ ही आजवर अंगी बाणलेली रीत झुगारून नाही तरी घटकाभर बाजूला ठेवून बाईची सर्व कर्तव्यं पार पाडून आपण मीटिंगला येतोच याचा अभिमान त्यांच्या चेहऱ्यांवर झळकत असायचा. पगारवाढ, सुट्टय़ा, सन्मानाने वागणूक या मागण्या करताना संघटनेने दिलेल्या आत्मविश्वासाबरोबरच स्वत:च्या कष्टांची किंमत त्यांनी ओळखलेली जाणवायची. असेल माझा पगार थोडका, पण माझ्या कामाचं नि माझंही मोल कमी नाही हे त्या निश्चितपणे शिकल्या होत्या.

काळ बदलतो आहे. बाया शिकायला लागल्या. घराबाहेर पडून अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या अधिकाराची पदं सांभाळायला लागल्या. स्वातंत्र्यलढय़ापासून ते आजपर्यंत विविध चळवळींमध्येही त्या सामील होत आल्या आहेत. व्यासपीठांवर आणि माध्यमांत ‘स्त्रियांना घरकामाचा मोबदला द्यावा का?’ याच्या चर्चाही झडल्या. तरी नोकरी-व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांवरील कामाच्या दुहेरी बोजाचा प्रश्न अजूनही कायम आहे.

शहरातल्या, वर्षांनुवर्षांच्या भक्कम संघटनांत असणाऱ्या पगारदार महिलांची ही अवस्था, तर रूढी, परंपरा, प्रतिष्ठेच्या सरंजामी कल्पना, जातिव्यवस्थेचे बळकट ताणेबाणे यांनी जखडलेल्या खेडय़ापाडय़ांतल्या आपल्या मायबहिणींची परिस्थिती काय असेल याची कल्पनाच केलेली बरी. घरातली आणि गोठय़ातली कामं, दळण, जळण, पिण्याचं पाणी या अत्यंत जिकिरीच्या बिनमोबदल्याच्या कामातच ग्रामीण महिलेचे तासन्तास खर्च होतात. मग घरच्या किंवा दुसऱ्याच्या शेतातली मजुरी, नाही तर रोजगार हमी योजनेवर मिळेल ते काम. या आत्यंतिक कष्टांच्या बदल्यात त्यांना मिळतं काय? तर सासू-नणंदांची बोलणी, दारू पिणाऱ्या नवऱ्याचा मार, लादलेली बाळंतपणं. अशक्तपणा, अ‍ॅनिमिया, पाठदुखी नि कंबरदुखी.

कपाळीचा घाम घाम किती पुसू बाई।

या बाटलीनं नेली सारी धुऊन कमाई।।

शिवू शिवू कुठं सर्वे आभाळ फाटलं।

तान्हं बाई माझं वल्या डोळ्यांनी निजलं।।

अशी स्वत:च्या दु:खाला वाट करून देत त्या आला दिवस साजरा करत असतात.

पारगावला ‘नवनिर्माण न्यास’चं काम सुरू झालं तेव्हा कुठून तरी माहिती मिळाली आणि मी ‘महिलाप्रधान क्षेत्रीय बचत योजने’खाली बचतीचं काम सुरू केलं. ‘आपल्या नावावर ना घरदार ना सातबाराचा उतारा. आपल्या नावाचं एक पोष्टाचं बचत खातं तरी असू द्या’ हे माझं आवाहन मनाला भिडलं म्हणून म्हणा किंवा डाळ-तांदळाच्या डब्यात लपवलेले पैसेपण शेवटी नवऱ्याच्या हाताला लागतातच या अनुभवातून म्हणा या योजनेला बायांनी खूप मोठा प्रतिसाद दिला. वर्षांअखेरीस एकरकमी काही हज्जार अगदी सौताचे मिळाल्याने बाया खूश झाल्या. ही बचत गटांच्या कामाची पायाभरणी ठरली. फक्त महिला एजंटांनीच चालवायच्या या योजनेचा सुरुवातीचा फॉर्म भरण्याची गोष्ट मात्र फारच मनोरंजक आहे. फॉर्म भरून मी मुख्य पोस्ट ऑफिसात दाखल करायला गेले तेव्हा तिथल्या कारकुनाने मला विचारलं, ‘तुमचे मिस्टर कुठे आहेत?’ खरं म्हणजे अजित आणि मी दोघं गेलो होतो. एकटीचं काम आणि ऑफिसातली ती भाऊगर्दी पाहून अजित बाहेर थांबला होता. मी चकित. विचारलं, ‘बाहेर आहेत, पण ते कशासाठी?’ ‘त्यांना कामाचं सगळं समजावून सांगायचं आहे.’ आता मी व्यथित. तरी फॉर्मवर माझं शिक्षणबिक्षण लिहिलेलं होतं! ‘योजना महिलांसाठी आहे, पण सगळीकडे पुरुषच ती चालवतात.’ कारकुनभाऊंनी माहिती पुरवली. हा सरकारी ‘विमेन्स एम्पॉवरमेंट’चा माझा पहिला धडा होता.

आमी कस्टाच्या धनिणी

१९९० च्या सुमाराला आम्ही पारगाव परिसरात बचत गट सुरू केले. तेव्हा दिवसभराच्या कामांनी शिणलेल्या असल्या तरी बाया जमायच्या. विषय निघाला की सांगायच्या. ‘हां! आमी बाया निस्त्या माराच्या आन् कस्टाच्या धनिणी.’ तोपर्यंत ‘धनी’ या शब्दाचं स्त्रीिलगी रूप मी ऐकलेलंच नव्हतं. धनी हा नेहमी पुरुषच असायचा, पण हळूहळू त्या स्वत:च्या बचतीच्याही धनिणी व्हायला लागल्या. बचत किती? दरमहा दहा रुपये. महिन्यातून एकदा मीटिंग भरली का लुगडय़ाच्या केळ्यातून, कडोसरीतून घडीदार, धूर आणि फोडणीच्या वासाच्या नोटा बाहेर पडायला लागायच्या. बायांच्या या नस्त्या उठाठेवींनी हैराण झालेले काही पुरुषोत्तम बाहेर फेऱ्या मारत ‘धा धा रुपयं गोळा करून बाया आता माडय़ा बांदनार..’ वगैरे उद्धार करत असायचे. बचत गटाच्या मीटिंगच्या निमित्ताने चार सुखदु:खाच्या गोष्टी व्हायच्या. गाणी म्हटली जायची. बारा वाजले तरी बाया उठायला तयार नसायच्या.

सहा महिन्यांनी पहिलं पाचशे रुपयांचं कर्ज वाटलं. र्वष सरली तशी बचतीची रक्कम वाढली आणि कर्जाचीही. अर्थात नियमित परतफेड होत असल्यानेच हे शक्य होत होतं. पैशांचे व्यवहार करायला नि कळायला लागल्यापासून बायांचा आत्मविश्वास वाढीला लागला होता. अशात एका मीटिंगीत बायडाबाईंनी पन्नास हजारांची मागणी केली. एवढी मोठी मागणी पहिल्यांदाच येत होती. अर्जावर कर्जाचं कारण लिहिलं होतं, ‘टरक खरेदी.’

बायडाबाईंनी खुलासा केला. ‘‘आमच्या ह्य़ेनला टरक घेयाचा हाये. बेंकत परकरन करायचं तर आपला पन काई हिस्सा दावावा लागतो. तवा ह्य़ेंनी सांगितलं तुज्या गटातून आन. मला लई आनंद झाला बगा.’’ आम्हाला कळेना आनंद कसला?

‘आजवर लईंदा आयकलं. तुजी आक्कल चुलीपुरती. पैशाचं समदं मलाच बगावं लागतं. तुला काय कळतंय? आता माज्याच पैशांनी टरक येनार का न्हाई घरात?’ मंग मीबी म्हनलं त्येंनला, ‘आनते की गटातून पैसं. पन त्येवडं टरकवर माजंबी नाव लिवा.’ सगळी मीटिंग हसण्याच्या कल्लोळात बुडून गेली. जणू गटाचाच ट्रक येतो आहे असा अभिमान आणि आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चमकत होता. त्या बायांत मला कमळीचाही चेहरा दिसत होता..

(क्रमश:)

वसुधा सरदार

ajitvasudha@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2017 1:24 am

Web Title: women self help groups
Next Stories
1 कार्यकर्त्यांच्या नजरेतून : कार्यकर्ती घडताना..
Just Now!
X