उतारवयात आपल्या हालचाली कमी होत जातात, आहार कमी होत जातो आणि प्रतिकारशक्तीही कमी होत जाते. आणि त्याचबरोबर पोटाचे विविध विकार उद्भवायला लागतात. काय आहेत त्यांची कारणं?

आयुष्याची दुसरी इनिंग सुरू झाली की, माणसाच्या आयुष्यात काही ना काही आजार उद्भवू लागतोच. असे म्हणतात की आयुष्यात जेवढे कमावतात ते शेवटच्या दहा वर्षांत आरोग्यासाठी खर्च होतात. काही नाही तर रक्तदाब, मधुमेह हे असतातच असतात. पण सत्तरी ओलांडलेल्या काकू हल्ली सर्वच खायच्या गोष्टींना ‘नको’ म्हणू लागल्या आहेत. कारण काय तर अपचन, पोटफुगी! उतारवयातलं एक कायमचं दुखणं म्हणजे अपचन, गॅसेस, पोटफुगी अशा असंख्य पोटाच्या तक्रारी, आज आपण या आजारांविषयी माहिती करून घेऊ  या.
उतारवयात कॅन्सरसारख्या आजारांची भीती तर असतेच, परंतु या आजाराचे वेळीच निदान होणे आवश्यक आहे. या दृष्टीने उतारवयात कोणत्याही लक्षणाकडे दुर्लक्ष करू नये. गॅस आहे? सोडा घे, पोट दुखतंय? ओवा खा, हिंगाचं पाणी घे, हे एखाद्या वेळी ठीक. पण सतत पोट दुखायचा त्रास होत असेल तर घरगुती औषधोपचारांवर अवलंबून राहू नये. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उतारवयामध्ये अन्नमार्गात अन्ननलिकेपासून  (oesophgus) गुदद्वारापर्यंत कुठेही कॅन्सर उपटू शकतो व त्या भागाप्रमाणे व्यक्तीमध्ये त्याची लक्षणं दिसू लागतात. उदा. अन्ननलिकेमध्ये जर कॅन्सरची गाठ वा व्रण असेल तर अन्ननलिकेतून अन्न पुढे सरकायला अडचण निर्माण होते. घास गिळताना तो अडकतो. तो पुढे ढकलण्यासाठी प्रत्येक घासाबरोबर पाणी प्यावे लागते.
अपचन ही उतारवयातली एक सर्वसामान्यपणे दिसणारी समस्या. तिची माहिती करून घ्यायला हवी.
उतारवयातील अपचनाची कारणे
* आतडय़ाची हालचाल मंदावणे- (Decreased Motility of Intestine) वय झाले की ज्याप्रमाणे सांध्यांची हालचाल मंदावते, त्याप्रमाणे पोटातील आतडय़ाची हालचालही कमी होते. त्यामुळे अन्नमार्गातून पुढे सरकणारे अन्न हळूहळू पुढे जात राहते, त्यामुळे पोटाला फुगीरपणा जाणवतो, पोट जड होते व लोकांमध्ये बद्धकोष्ठता (कॉन्स्टिपेशन Constipation) सुरू होते. मंदावलेल्या हालचालीमुळे पोट किंवा जठर लवकर रिकामे होत नाही. त्यामुळे जेवून खूप तास गेले तरी पोट भरलेले वाटते आणि भूक लागत नाही.
* उतारवयात पोटातल्या सर्व अवयवांची क्षमता कमी होते. त्यामुळे संबंधित व्यक्ती एका वेळी खूप अन्न पचवू शकत नाही.
* छातीच्या पोकळीत असणारी अन्ननलिका व पोटातील जठर यामध्ये एक द्वार असते. उतारवयात या द्वाराचे स्नायू (Spincter) शिथिल  होतात. त्यामुळे जेवून लगेचच झोपलं तर जठरातील अन्न वर अन्ननलिकेत शिरते- ज्याला गेर्ड (GERD)  म्हणतात. ज्यामुळे अॅसिडिटीसारखा त्रास सुरू होतो. अनेकदा छाती व पोटाच्या पोकळींना विभागणारा पडदा अशक्त झाल्याने जेवून आडवे झाल्यानंतर जठराचा काही भाग सटकन वर छातीच्या पोकळीत जाऊ शकतो व जळजळ उद्भवते, ज्याला हायटूस हार्निया म्हणतात.
* उतारवयात माणसाची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे रोगजंतूचा शिरकाव व लागण (कल्लऋीू३्रल्ल) लागलीच होते. जठरामध्ये एच. पायलोरी (ऌ.ढ८’१्र) नावाच्या जंतूचा संसर्ग झाला तर, पोटातील अॅसिडिटीचे प्रमाण वाढते. आतडय़ाला रोगजंतूचा संसर्ग होऊन लागण होते. त्यामुळे डायरिया उद्भवतो. याचे दुष्परिणाम पूर्ण शरीरावर, मेंदूवर होऊ  शकतात. शरीरातील इलेक्ट्रोलायटिसचं (electrolytes) प्रमाण बिघडतं व माणूस गुंगीत जाऊ  शकतो.
* उतारवयात अनेकांना रक्तदाबासाठी, हृदयविकारासाठी आणि मधुमेहासाठी अनेक औषधे चालू असतात. त्यामुळे अॅसिडिटी निर्माण होते. रक्तवाहिनीमध्ये गुठळी (उ’३) होऊ नये म्हणून रक्त पातळ ठेवणारी डिस्पिरीन/अॅस्पिरिनसारखी औषधे साधारणपणे प्रौढ व्यक्ती घेतच असतात. या औषधामुळे शरीरात कुठेही रक्तस्राव होऊ शकतो. पोटामध्ये रक्तस्राव झाल्यास रक्ताच्या उलटय़ा होऊ लागतात.
* उतारवयातील बद्धकोष्ठता (Constipation). उतारवयात वर सांगितल्याप्रमाणे आतडय़ाची हालचाल व अन्न पुढे पुढे ढकलण्याची क्रिया मंदावलेली असते. शिवाय पाचक रसांचे प्रमाणही घटलेलं असतं. त्यामुळे खाल्लेले अन्न अन्नमार्गातून फार हळूहळू पुढे सरकतं व बद्धकोष्ठ निर्माण होतो.
या बद्धकोष्ठामुळे मल बराच काळ मोठय़ा आतडय़ात राहतो व कडक बनतो. कडक मल व आतडय़ांची मंदावलेली हालचाल यामुळे शौचास जोर काढावा लागतो. त्यामुळे शौचाच्या जागी जखमा निर्माण होतात ज्याला अॅनल फिशर  (anal fissure) असे म्हणतात. याच्या जोडीला मूळव्याधही (piles) निर्माण होते.
बद्धकोष्ठतेमुळे व मंदावलेल्या आतडय़ाच्या हालचालीमुळे मोठय़ा आतडय़ामध्ये जखमा होऊ शकतात, जंतुसंसर्ग होऊ शकतो. त्यामुळे  डायव्हर्टिक्युलिट्स (diverticulits) नावाचे आजार निर्माण होतात व पोटदुखी सुरू होते.
* उतारवयात मंदावलेली आतडी, घटलेले पाचक रस यामुळे अपचन होत राहते व औषधांना प्रतिसाद पण कमी मिळतो.

Health Special, Pregnancy , dohale,
Health Special: गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
How Suryanamaskar and pranayama help to fight allergies
तुम्हाला वारंवार ॲलर्जी होते? सूर्यनमस्कार आणि प्राणायाम ठरतील फायदेशीर
Health Special Does pollution cause stomach disorders
Health Special: प्रदूषणामुळे पोटाचे विकार होतात का?

उतारवयात पोटात गॅस होणे
* डाळी, कडधान्य, कांदा लसूण, मुळा, गाजर, रताळी, बटाटे, काजू इत्यादी पदार्थामुळे वाजवीपेक्षा जास्त गॅस निर्माण होतात.
* अन्न अन्नमार्गातून जात असता तेथील बॅक्टेरिया अतिरिक्त प्रमाणात गॅस निर्माण करतात.
* खाताना, पिताना हवा गिळली जाते. विशेषत: भराभर खाल्ले व प्यायले तर जास्त प्रमाणात हवा गिळली जाते.
* धूम्रपान, च्युइंगगम चघळणे यामुळे हवा जास्त प्रमाणात गिळली जाते.
* खाल्लेले अन्न नीट पचले नाही तर गॅसेस होतात.
* स्वादुपिंडाच्या विकारात गॅस प्रॉडक्शन वाढते.
* आयबीएस- इरिटेबल बॉवेल सिन्ड्रोम (IBS – Irritable Bowel Syndrome) असलेल्यांना पण पोटात खूप गॅसेस होतात.
* अन्नरसाचे नीट शोषण झाले नसेल तर गॅसेस होतात.
* अन्नमार्गाचा कॅन्सर व त्याचे उपचारही पोटात जास्त प्रमाणात गॅस तयार करतात.
कॅन्सर
आतापर्यंत पाहिलेले वरील आजार हे तसे साधे किरकोळ असतात व औषध-गोळ्यांनी व काही वेळा एन्डोस्कोपीसारख्या उपचाराने बरे होतात, परंतु उतारवयात अन्नमार्गात कुठेही उद्भवणाऱ्या कॅन्सरसारख्या आजाराकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.
जठरातील कॅन्सर सर्वसाधारणपणे अॅसिडिटीसारखी लक्षणे निर्माण करतो. त्यामुळे अॅसिडिटी नेहमीची औषधे घेऊन बरी होत नसेल तर पोटाच्या तज्ज्ञांकडे जाऊन तपासून घ्यावे.
आतडय़ाचा कॅन्सर असेल तर पोटात खूप दुखू लागतं. अगदी शेवटच्या टप्प्याला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे वरचेवर पित्ताच्या उलटय़ा होणे, बद्धकोष्ठ, पोटात दुखणे, शौचावाटे रक्त पडणे ही लक्षणे अगदी धोकादायक आहेत.
उतारवयातील व्यक्तींना जर शौचावाटे रक्त जात असेल तर मूळव्याध समजून उपचार करत बसू नये. पोटाच्या सर्जनकडून गुदद्वाराची जागा आतून तपासून घ्यावी. अनेकदा गुदद्वाराच्या कॅन्सरमुळे हे रक्त पडत राहते.
धोकादायक लक्षणे
* अन्न गिळताना त्रास जाणवणे.
* पित्तासारखा त्रास होणे व औषधाचा उपयोग न होणे
* अॅसिडिटी व अपचन या बरोबर भूक न लागणे वा भूक मंदावणे
* शौचाच्या वेळांमध्ये बदल होणे
* वजन बऱ्याच प्रमाणात घटणे
* उलटीतून रक्त पडणे
* सततची पोट दुखी, पोट जड वाटणे
* टेनेस्मस (Tenesmus) – एकसारखी शौचाची भावना होणे
* शौचाला काळे होणे वा शौचावाटे रक्त पडणे
* खाण्याआधीच पोट भरल्यासारखे वाटणे. याकडे मुळीच दुर्लक्ष करू नये.
एन्डोस्कोपी (Endoscopy म्हणजे दुर्बीण अन्नमार्गात घालून) तपासणी केल्याने अन्नमार्गातील कॅन्सर शोधून काढणे सोपे जाते. यामुळे कॅन्सरसारख्या मोठय़ा आजाराचे निदान लवकर होते. सुरुवातीलाच निदान झाल्यास उपचार त्वरित करून कॅन्सर आटोक्यात आणणे शक्य असते.
थोडक्यात-
* जे खाल ते नियमित व व्यवस्थित खा. भरपूर जेवण घेण्यापेक्षा तीन-चार तासांनी थोडे थोडे खात राहा. म्हणजे त्याचे पचन होणे सोपे जाईल.
* बाहेरचे कच्चे (म्हणजे न शिजवलेले), उघडे अन्नपदार्थ खाऊ  नयेत. म्हणजे उकळलेला चहा प्यावा पण बाहेरील लिंबू सरबत नको, त्यामुळे पोटामध्ये जंतुसंसर्ग होऊ शकते. कारण उतारवयात प्रतिकारशक्ती मंदावलेली असते.
* शौचाच्या सवयीतील बदल वा वर सांगितलेली काही धोकादायक लक्षणे दिसल्यास दुर्बीण तपास करून घ्यावा, त्यामुळे कॅन्सरचे निदान लवकर होते.
* अन्नपचन व्यवस्थित होण्यासाठी – नियमितपणे फिरणे, सोपे सोपे व्यायाम करणे, योगासने-प्राणायाम करणे चालू ठेवावे.
उदा. पोटातील गॅस कमी करण्यासाठी ‘पवन मुक्तासन’ नावाचे आसन मदत करते. तसेच बद्धकोष्ठता असेल तर ताडासन हे आसन व कपालभाती, प्राणायाम हे प्रकार करावेत.
* आहार : जेवणात पालेभाज्या, कोशिंबिरी आवर्जून घ्याव्यात. दिवसभरात दोन-तीन तरी फळे खावीत. जेवण, नाश्ता हलकाफुलका असावा. उदा. नाश्त्यात लाह्य़ा घेणे इत्यादी. गॅस निर्माण करणारे पदार्थ खाणे टाळावे. उदा. दूध व दुधाचे पदार्थ, डाळी, कडधान्ये, कोबी, मुळा, फ्लॉवर यासारख्या भाज्या, फळे, जर्दाळू, बेदाणे, केळी, बटाटे, काकडी व सफरचंद.
तेलकट-तूपकट, तळलेले खूप चमचमीत मसालेदार पदार्थ टाळावेत. शीतपेय (cold drinks/ aerated drinks) टाळावीत. भराभरा व जास्त जेवू नये. पोटाचे व इतर व्यायाम नियमित करावे. ढेकर मुद्दाम काढण्यासाठी हवा गिळून ढेकर काढू नये. जेवताना जास्त बडबड करू नये. त्यामुळे खूप हवा पोटात जाते. पोटामध्ये गॅस कमी होण्यासाठी  बडिशेप व पुदिनहरा खावा.
आयुर्वेदात सांगितले आहे की, बालपणात कफप्रवृत्ती असते, तारुण्यात व म्हातारपणी वातप्रवृत्ती असते म्हणून उतारवयात वाताचा त्रास होत राहतो. उतारवयात शरीराच्या हालचाली मंदावलेल्या असतात, तसेच अन्नपचनाचे अवयवही थकलेले असतात. व्यायाम किंवा कामे कमी झालेली असतात. खाण्यातल्या वक्तशीरपणा गेलेला असतो, आवडनिवड वाढलेली असते. शिवाय उतारवयातील एकाकीपणा, औदासीन्य, निद्रानाश, मानसिक ताण या सर्व गोष्टींमुळे खाल्लेले नीट पचत नाही. खाल्लेले अन्न घशाशी येत राहते व अॅसिडिटी निर्माण होते. (माणसाचे मन जिंकायचे झाले तर रस्ता जातो त्याच्या पोटातूनच. पण जेव्हा हे पोट आजारी पडते, तेव्हा हा मार्ग तर बंदच होतो) वर वर दिसायला साधे असलेले हे त्रास केव्हा गंभीर रूप धारण करतील हे सांगणे कठीण. म्हणून उतारवयात पोटाच्या तक्रारींची वेळीच काळजी घेतलेली बरी.
डॉ. अविनाश सुपे – response.lokprabha@expressindia.com