News Flash

अवरोधक कावीळ

कावीळ ही आपल्या शरीरातील पिवळ्या रंगाचे बिलीरुबीन हे रंगद्रव्य वाढल्याने होते.

कावीळ ही आपल्या शरीरातील पिवळ्या रंगाचे बिलीरुबीन हे रंगद्रव्य वाढल्याने होते. सर्वसामान्य लोकांना कावीळ सांसर्गिकच असेल असे वाटते. पण आज आपण ज्या काविळीबाबत चर्चा करणार आहोत ती अवरोधक कावीळ (Obstructive Jaundice). तिच्यावर नुसते औषधी उपचार न होता दुर्बिणीतून उपचारांची किंवा शस्त्रक्रियेचीही गरज भासते.
अवरोधक कावीळ म्हणजे काय?
यकृतापासून पित्तनलिका, पित्तरस लहान आतडय़ांच्या पहिल्या भागात (Duodenum) पोहोचविण्याचे काम करते. पित्ताशय हे छोटय़ा फुग्यासारखे असते व ते प्रमुख पित्तनलिकेला जोडलेले असते. इथे पित्तरस साठवला जातो. जेवणानंतर पित्ताशय आकुंचन पावतो व योग्य प्रमाणात पित्तरस लहान आतडय़ांत सोडला जातो. या वाहतुकीत काही अडथळा निर्माण होतो व पित्तरस पित्तनलिकांमध्ये साठून राहतो. काही दिवसांनंतर पित्तनलिका प्रमाणाबाहेर फुगून फुटतात व हे रंगद्रव्य रक्तात मिसळते व कावीळ होते. अशा प्रकारच्या काविळीला अवरोधक कावीळ असे म्हणतात. तिची प्रमुख लक्षणे म्हणजे कावीळ, लालसर रंगाची लघवी, पांढरट शौचास होणे व अंगाला खाज सुटणे.
अवरोधक काविळीची कारणे
पित्तनलिकेला अडथळा निर्माण करणारी कारणे प्रामुख्याने तीन आहेत. पहिले म्हणजे पित्ताशयातील खडे, दुसरे स्वादुपिंडाचा कर्करोग व तिसरे पित्तनलिकेचा कर्करोग. ९० ते ९५ टक्के रोगी हे या कारणांनी काविळीला बळी पडतात आणि यामधील सर्वात महत्त्वाचे कारण पित्ताशयातील खडे.
१. पित्तखडय़ांमुळे होणारी कावीळ
पित्तरसाचे घनत्व अधिक प्रमाणात वाढल्याने पित्ताशयात खडे निर्माण होतात व ते पित्तनलिकेत येतात. लहान खडे निघून जातात व मोठे खडे अडथळा निर्माण करतात. अडकलेल्या खडय़ांमुळे पोटाच्या वरच्या भागात उजव्या बरगडय़ांच्या खाली तीव्र स्वरूपाच्या कळा येतात व त्यामागे पाठीकडे जाणवतात. कळा सुरू झाल्या की मळमळ व उलटय़ा होतात व थंडी वाजून ताप पण येतो. (जंतूंचा प्रादूर्भाव असेल तर) स्निग्ध पदार्थाच्या सेवनानंतर जास्त त्रास होतो. गॅसेस, मळमळ, उलटय़ा होणार असल्याची भावना, ढेकर ही लक्षणे पण सुरुवातीस आढळतात. जर याकडे दुर्लक्ष केले व खडे मुख्य नलिकेत जाऊन अडथळा निर्माण झाला तर मग काविळीची लक्षणे दिसतात. या काविळीत बिलीरुबिनचे प्रमाण सात मिलीग्रामपेक्षा कमी असते व त्यात चढ-उतार असू शकतात.
२. स्वादुपिंडाचा कर्करोग
पाश्चात्त्य देशांप्रमाणे आपल्या देशातही याचे प्रमाण वर्षांनुवर्षे वाढतच आहे. पुरुषांमध्ये ३५ ते ५५ व स्त्रियांमध्ये ५०-६० या वयोगटात हे प्रमाण अधिक आहे. जवळ जवळ २/३ रुग्णांमध्ये या स्वादुपिंडाच्या मस्तकी (Head of pancreas) या भागात होतो व तेथील गाठीमुळे पित्तनलिकेवर त्याचा परिणाम होऊन अवरोध निर्माण होतो. हा कर्करोग मग लवकरच जवळपासच्या अवयवांमध्ये पसरतो. या काविळीचे महत्त्वाचे लक्षण म्हणजे वजन कमी होणे, अन्नावरची वासना उडणे व वेदनाशून्य कावीळ (Painless Jaundice) होणे. यासोबत पित्ताशयाचा आकार व यकृताचा आकार वाढतो. आणि म्हणून रुग्णास जर वेदनारहित कावीळ असेल व त्याचे पित्ताशय फुगलेले असेल तर स्वादुपिंडाच्या कर्करोगाची शक्यता अधिक असते.
३. पित्तनलिकेचा कर्करोग
तीन प्रमुख लक्षणांव्यतिरिक्त महत्त्वाचे लक्षण म्हणजे इथे काविळीचे प्रमाण कमी-जास्त होते आणि म्हणूनच रुग्ण व डॉक्टर यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. यात शौचातील व लघवीतील बदल पण उशिरा दिसून येतात. म्हणून निदानाला विलंब होण्याची शक्यता असते.
अवरोधक काविळीचे निदान
२० वर्षांपूर्वी फक्त रक्तातील तपासणीनंतरच याचे निदान करत असत. आणि म्हणून निदान होण्यास विलंब होत असे. या चाचणीत रक्तामधले (Alkaline PO4) चे प्रमाण वाढल्यामुळे निदानास मदत होते. आज आधुनिक तपासण्यात सोनोग्राफी म्हणजे सूक्ष्म ध्वनिलहरींच्या साहाय्याने तपासणी केल्यास निदान लगेच करता येते. यामध्ये अवरोधामुळे पित्तनलिकेमध्ये झालेले बदल, पित्ताशयाचा आकार व त्यातील खडे आणि त्यामुळे होणाऱ्या अडथळयांचे संभाव्य कारण समजू शकते. ही तपासणी राज्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी उपलब्ध आहे.
आधुनिक तपासण्या
या नवीन तपासण्यांतून (लिव्हर), यकृत, स्वादुपिंड, नलिका यांच्या आकाराबद्दल व क्षमतेबद्दल अधिक माहिती मिळू शकते व कर्करोग असेल तर सूक्ष्म असा तुकडा काढणे (Biopsy) शक्य होते. या तपासण्या म्हणजे सीटी स्कॅन, न्यूक्लीअर स्कॅन आणि एमआरआय. MRCP चा उपयोग करून पित्तनलिका व स्वादुपिंड नलिका यांची हुबेहूब प्रतिमादेखील निर्माण होते. यामुळे अचूक निदान तर होतेच व उपचारांची योजना करणे सोपे जाते. मात्र या तपासण्या महागडय़ा आहेत आणि फक्त काही विशेष केंद्रांमध्ये उपलब्ध आहेत. याचप्रमाणे दुर्बिणीच्या साहाय्याने पित्तनलिकेचा तपास (ERCP ) करता येतो. यामध्ये डाय घालून क्ष-किरणांनी तपास केला जातो. या दोन्ही पद्धतीने कारण कळले नाही तर यकृताला सरळ सुई घालून डाय करून फोटो काढण्यात येतो. त्यामुळे पित्ताशय व पित्तनलिकेमधील अडथळा समजू शकतो.
अवरोधक काविळीवर उपाय
१. पित्तनलिकेतील खडे दुर्बिणीतून किंवा शस्त्रक्रियेने काढून कावीळ बरी होते. २. स्वादुपिंडाच्या व पित्तनलिकेच्या कर्करोगावर उपाय
कर्करोगाच्या गाठी शस्त्रक्रियेने काढणे हाच उत्तम उपाय. रुग्ण लवकर आले तर मोठी शस्त्रक्रिया करून या गाठी काढता येतात. परंतु या कर्करोगाचे रोगी हे वैद्यकीय सल्ला उशिराने घेतात व म्हणून प्रत्येक वेळी शस्त्रक्रिया करून गाठ काढणे शक्य होत नाही. हे रोगी उशिरा आल्यामुळे कर्करोग इतर अवयवांमध्ये पसरतो. म्हणून तो संपूर्ण काढून टाकणे शक्य होत नाही व अशा रोग्यांना आम्ही बायपास सर्जरी किंवा पॅलिएटिव्ह (Palliative) सर्जरी करतो. अशा रुग्णांमध्ये पित्तनलिका आतडय़ास जोडून एक वेगळा मार्ग करून देण्यात येतो आणि कावीळ बरी होते व काही काळ त्यांचे जीवन सुकर होते. अशा प्रकारच्या कर्करोगात केमोथेरपी देता येते, पण फारसा उपयोग होत नाही.
डॉ. अविनाश सुपे – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2015 1:14 am

Web Title: jaundice 2
टॅग : Kashasathi Potasathi
Next Stories
1 पित्ताशयातील खडे
2 यकृत प्रत्यारोपण
3 लिव्हर सिरॉसिस
Just Now!
X