भारत आणि भारतासारखी प्राचीन संस्कृती असलेल्या अन्य देशांत पारंपरिक ज्ञान जतन करून ठेवणारे आजीबाईचे बटवे आहेत. हे ज्ञान कुणा एकाचं नाही.. त्या सगळ्या समाजाचं आहे; म्हणून त्यावर पेटंट दिलं जात नाही. पण अमेरिकेच्या पेटंट कायद्यातली या बाबतीतली तरतूद मात्र इतर सर्व देशांपेक्षा वेगळी आहे. १९९५ मध्ये अमेरिकेत हळदीच्या जखम बरी करण्याच्या गुणधर्मावर पेटंट दिलं गेलं. भारताने त्याविरोधात लढा द्यायचा ठरवलं.. यातूनच सुरू झाला आपलं पारंपरिक ज्ञान जतन करण्याचा भगीरथ प्रयत्न!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रिय आजी,
तुला आठवतं, मी लहान असताना पावसाळ्यात रात्र रात्र खोकत असायचे आणि तू मला गरमागरम हळदगुळाचे दूध करून द्यायचीस.. प्रोजेक्टसाठी कटरने थर्मोकोल कापताना बोट कापलं की त्यात हळद आणून भरायचीस.. अरबटचरबट खाऊन पोट रात्री-अपरात्री दुखायला लागलं की ओवा खायाला द्यायचीस.. खोकला झाला की ज्येष्ठमध चघळायला द्यायचीस.. आठवतं ना गं? तुला माहिती होतं का तेव्हा आजी की तुझा हा आजीबाईचा बटवा पुढे जाऊन जगभरात एक मोठा वादाचा विषय निर्माण करणार आहे? आज माझ्या पेटंटच्या तासाला माझ्या सरांनी वर्गात हे शिकवलं आणि मला राहवलं नाही तुला लिहिल्यावाचून..
मागे मी तुला एकदा सांगितलं होतं बघ की, पेटंट मिळायचे तीन निकष असतात.. संशोधनाचं नावीन्य, असाहजिकता आणि औद्योगिक उपयोग. आता नावीन्य म्हणजे काय तर ते संशोधन त्याआधी जगात कुणालाही माहिती असता कामा नये. आणि ते कुणाला कसं माहिती असू शकतं? तर त्यावर आधीच पेटंट मिळालेलं असू शकतं किंवा शोधनिबंध लिहिले गेलेले असतात.. कुठल्या पुस्तकात किंवा लेखात त्याचा उल्लेख असतो किंवा मग ते कुणी तरी कुणाला तरी तोंडी सांगितलेलं असतं.. ते बाजारात विकायला आलेलं असतं किंवा मग ते दुसऱ्या कुठल्या तरी पद्धतीने लोकांना आधीपासून माहिती असतं. आता दुसऱ्या कुठल्या तरी पद्धतीने म्हणजे नक्की काय? तर तुला जखम झाली की हळद लावावी हे ज्या पद्धतीने माहिती होतं ना तसंच अगदी.. म्हणजे ना तुला कुणी कधी हे प्रत्यक्षपणे सांगितलं, ना तू याबद्दल कधी कुठे वाचलंस. पण तुझ्या आईला तू ते करताना पाहत आलीस.. आणि तुझी आई तिच्या आईला.. असं पिढय़ान्पिढय़ांपासून ते भारतात सगळ्यांना ठाऊक होतं.. नाही का? म्हणजे तो आपल्याकडे परंपरेने चालत आलेला ज्ञानाचा ठेवा होता.. जगातल्या कुठल्याही देशाच्या अशा परंपरागत ज्ञानावर त्या देशात किंवा इतर कुठल्याही देशात कुणाही एका व्यक्तीला म्हणूनच पेटंट घेता येत नाही. कारण तसं ते दिलं की ते एका व्यक्तीच्या मालकीचं होणार.. आणि दुसऱ्या कुणालाही ते वापरता नाही येणार.. आणि असं होऊ नये म्हणून यावर कुठल्याही देशात पेटंट मिळत नाही.. प्रत्येक देशाच्या पेटंट कायद्यात कलमच असतं तसं.
पण होतं काय आजी, की अमेरिका हा देश मात्र स्वत:ला या सगळ्यांपेक्षा वेगळा समजत असतो गं नेहमी. म्हणजे गल्लीतल्या क्रिकेट सामन्यात कसं एखाद्या धष्टपुष्ट गुंड मुलाला आऊट करण्याचे नियम वेगळे असतात बघ.. म्हणजे तीनदा आऊट केलं तर कुठे तो एकदा आऊट होणार.. आणि इतर िलबूटिंबू मुलं मात्र एकदा आऊट झाली की आऊट.. असं असतं की नाही? ..तो मुलगा दादागिरीच करतो तशी.. तसंच या बलाढय़ अमेरिकेने स्वत:साठी बनवलेले नियम वेगळे.. नेहमीच स्वत:ला इतरांपेक्षा चार अंगुळं वर समजणारे.
तर अमेरिकेच्या पेटंट कायद्यातल्या नावीन्याच्या व्याख्येत आणि इतर देशांच्या व्याख्येत एक मोठा फरक होता बघ. तो असा की, फक्त अमेरिकेतल्या लोकांना माहिती असलेल्या पारंपरिक ज्ञानावर अमेरिका पेटंट देणार नाही.. म्हणजे याचा दुसरा अर्थ असा की, दुसऱ्या कुठल्या देशाच्या पारंपरिक ज्ञानावर मात्र अमेरिकेत पेटंट घेता येईल. म्हणजे एकीकडे सगळे देश एकमेकांच्या पारंपरिक ज्ञानाचं संरक्षण करत असताना अमेरिका मात्र फक्त स्वत:च्याच ज्ञानाचं संरक्षण करणार आणि इतरांच्या ज्ञानावर मात्र खुश्शाल आपल्या देशात मक्तेदारी देऊन ठेवणार असा उफराटा कारभार.
तर १९९५ मध्ये अमेरिकेतल्या मिसिसिपी विद्यापीठातल्या दोन संशोधकांना हळदीच्या जखम बरी करण्याच्या गुणधर्मावर अमेरिकेत पेटंट मिळालं! त्याच वर्षांत डॉ. रघुनाथ माशेलकर दिल्लीमध्ये सीएसआयआरचे (वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद) संचालक म्हणून रुजू झाले होते. हो गं तेच ते प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ.. त्यांनी दिलेल्या बासमती पेटंटच्या लढय़ाबद्दल मागे मी तुला सांगितलं होतं. तर त्यांनी वृत्तपत्रात अमेरिकेत हळदीच्या जखम बरी करण्याच्या गुणधर्मावर पेटंट दिलं गेल्याचं वाचलं आणि ते चक्रावूनच गेले. कारण माझ्यासारखंच त्यांनीही त्यांच्या आईला जखमेवर हळद लावताना पाहिलं होतं ना! आणि भारताच्या या पिढय़ान्पिढय़ा चालत आलेल्या संचितावर कुणी मक्तेदारी कशी मिळवू शकतं, असा त्यांना प्रश्न पडला. त्यांनी हळदीच्या या पेटंटच्या विरोधात लढा द्यायचं ठरवलं.. आणि सीएसआयआरमधले शास्त्रज्ञ कामाला लागले. त्यासाठी हळदीचा हा गुणधर्म भारतातल्या लोकांना हे पेटंट फाईल होण्याआधीपासून ठाऊक होता हे सिद्ध करणं गरजेचं होतं. सीएसआयआरने तसे तब्बल ३२ संदर्भ शोधून काढले.. हे संस्कृत, उर्दू आणि हिंदीमधले होते.. यातील काही तर शंभर वर्षांपेक्षा जुने होते. त्यामुळे १९९८ साली हे पेटंट अमेरिकन पेटंट ऑफिसने नाकारलं. एखाद्या विकसनशील देशाच्या पारंपरिक ज्ञानाला मान्यता देण्याच्या बाबतीत हळदीवरील पेटंटची केस हा एक मलाचा दगड ठरला.
हीच तऱ्हा कडुिनबाच्या पेटंटची. डब्ल्यू. आर. ग्रेस नावाच्या कंपनीला युरोपात कडुिनबापासून बनवलेल्या एका कीटकनाशकावर पेटंट देण्यात आलं.. हळदीसारखीच कडुिनबाची पानं साठवणीच्या धान्यात ठेवताना आम्ही मुलांनी आमच्या आयांना आणि आज्यांना नेहमीच पाहिलं आहे. पण तरी यावर पेटंट दिलं गेलं. मग परत भारताने पाच र्वष लढा देऊन हे पेटंट उलथवलं.. हीच तऱ्हा बासमतीवरच्या पेटंटची ..आणि अगदी काल-परवा परतवून लावलेल्या जायफळापासून बनवलेल्या माऊथवॉशच्या पेटंटची.
थोडक्यात काय गं आजी.. तुझा हा जो आजीबाईचा बटवा आहे ना.. ते तुझ्या पूर्वजांच्या ज्ञानाचं संचित आहे. आणि भारतासारखी प्राचीन संस्कृती असलेल्या अनेक देशांत असे आजीबाईचे बटवे आहेत.. म्हणजे लॅटिन अमेरिकेतले देश म्हण.. किंवा चीन किंवा इजिप्त म्हण. अमेरिका काय गं आत्ता आत्ता जन्माला आलेला देश.. त्याला फारशी परंपराच नाही तर पारंपरिक ज्ञान कुठून असायला? ..म्हणून तर त्यांनी इतरांचं पारंपरिक ज्ञान चोरण्याचा सपाटा लावला.. जैविक चोरीच ही.. याला इंग्रजीत म्हणतात बायोपायरसी. हळदीच्या पेटंटसाठी लढणाऱ्या सीएसआयआरने मग या प्रकरणात अजून खोलात जायचं ठरवलं. आणि त्यांना शोध लागला की हळदीचं पेटंट ही काही पहिली आणि शेवटची केस नाही.. तर दर वर्षी जवळजवळ २००० अशी पेटंट्स जगभरात दिली जातात. जी कुठल्या ना कुठल्या देशाच्या पारंपरिक ज्ञानावर आधारित असतात. मग असं एक एक पेटंट घेऊन कसं लढत बसणार? त्यावर खर्चही प्रचंड होणार आणि वेळही खूप जाणार.. शिवाय कित्येकदा पेटंट पारंपरिक ज्ञानावर आधारित आहे हे समजणारच नाही.. मग याच्याविरोधात लढण्यासाठी भारताने अग्रणी व्हायचं ठरवलं.. कसं ते मला सर पुढच्या तासाला शिकवणारेत.. शिकवलं की तुला पुढच्या आठवडय़ात आणखी एक पत्र लिहीनच..
पण हे सगळं का झालं सांगू का आजी? आपलं पारंपरिक ज्ञान आपलं सगळ्यांचं आहे.. ते सगळ्यांनी मिळून वापरलं पाहिजे हा झाला सरळ विचार.. तू शिकवलंस ना आम्हाला ॐ सहनाववतु, सह नौ भुनक्तु सहर्वीय करवावहै.. तोच हा विचार; पण ही नवीन आलेली अमेरिकन संस्कृती मात्र व्यक्तिकेंद्रित आहे. ज्यात स्वत:चा फायदा आधी पहिला जातो.. नेमक्या याच गोष्टीमुळे ही जैविक चोरी सुरू झाली बघ.. पण घाबरू नकोस आजी.. तुझा हा आजीबाईचा बटवा तुझ्या देशाने आता सुरक्षित केला आहे.
जाता जाता आणखी एक सांगते.. या जैविक चौर्याला कारणीभूत असलेल्या अमेरिकेच्या पेटंट कायद्यातील ‘नावीन्याची’ व्याख्या शेवटी २०११ मध्ये अमेरिकेला बदलायला लागली ..आणि आता ती इतर देशांसारखीच आहे.. म्हणजे आता इतर देशांच्या पारंपरिक ज्ञानाचं संरक्षण करणं अमेरिकेला भाग आहे.
चल.. आता मला झोपायला हवं.. पुढच्या आठवडय़ातल्या तासानंतर तुला परत लिहीनच.. बाय आजी!!
तुझी,
मिनी.
ता. क.- वाईट एवढंच वाटलं की, हळदीचं पेटंट अमेरिकेत फाईल करणारे संशोधक हरिहर कोहली आणि सुमन दास हे भारतीय.. अमेरिकन पेटंट कार्यालयात ते तपासणारा कुमार हा पेटंट परीक्षकही भारतीय.. आणि या अमेरिकी-भारतीयांच्या विरोधात लढत होती भारतातली सीएसआयआर ही संस्था!

मराठीतील सर्व कथा अकलेच्या कायद्याची बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India wins turmeric patent case in us
First published on: 03-12-2015 at 00:40 IST