आपल्याकडच्या प्रचलीत अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेत अभ्यासक्रमामध्ये कौशल्य विकासाला अधिक प्राधान्य देण्याची आवश्यकता असल्याचे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी गुरुवारी ठाण्यात व्यक्त केले.
ठाणे मॅन्युफॅक्चरींग असोसिएशनच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यानिमित्त आयोजित समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित डॉ. कलाम यांनी त्यांच्या भाषणात उद्योगस्नेही शिक्षण प्रणालीचा पुरस्कार केला.  
आजच्या शिक्षण पद्धतीत अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतनचे अभ्यासक्रम चार वर्षांचे असून त्यापैकी २० टक्के अनावश्यक लिखीत पद्धती बाद करून त्याऐवजी कौशल्य विकासावर भर देणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. भारतीय अवकाश संशोधन संघटनेत कार्यरत असताना मला उत्पादन निर्मिती क्षेत्रात काम करण्याचा  अनुभव मिळाला. खासगी उद्योजकांच्या सहकार्यानेच अवकाश संसोधन क्षेत्रातील नवी उत्पादने तयार होत आली आहेत. एकटय़ाने कितीही प्रयत्न केला तरी विकास होत नाही. त्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे असते. राष्ट्रविकास हा अर्थव्यवस्थेही निगडीत असतो. त्यामध्ये स्पर्धा, ज्ञान, तंत्रज्ञान आणि नाविन्य असले पाहिजे, असेही ते म्हणाले.
या समारंभात डॉ.पी.एस.देवधर आणि अशोक अडवाणी या उद्योजकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. टीएमएचे सुधीर कालिया आणि श्रीकांत बापट यावेळी उपस्थित होते.