‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे’ची (एआयसीटीई) मान्यता नसलेल्या राज्यातील १४ खासगी अभियांत्रिकी पदवी व पदविका महाविद्यालयांचे प्रवेश हंगामी स्वरूपाचे असल्याची माहिती विद्यार्थ्यांना न दिल्यास अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेची जबाबदारी असलेल्या तंत्रशिक्षण संचालनालयासमोर ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशारा मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने दिला आहे. तसेच, विद्यार्थ्यांना फसविल्याबद्दल व न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल संचालकांवर आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. अमोल मातेले यांनी स्पष्ट केले आहे.
पात्रता निकषांची पूर्तता न केल्याने एआयसीटीईने राज्यातील १९ खासगी अभियांत्रिकी पदवी व पदविका संस्थांना २०१४-१५ या शैक्षणिक वर्षांचे प्रवेश करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे, राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांकरिता ‘केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया’ (कॅप) राबविणाऱ्या तंत्रशिक्षण संचालनालयाने या संस्थांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी करून घेण्यास नकार दिला. त्यापैकी १४ महाविद्यालयांनी उच्च न्यायालयाकडून स्थगिती आदेश आणल्याने त्यांना प्रवेश करता येणार आहेत. मात्र, या १४ महाविद्यालयातील ७५०० जागांवरील प्रवेश हंगामी असणार आहेत. या सगळ्याची माहिती संचालनालयाने केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना देणे आवश्यक होते. मात्र, तशी माहिती देण्यात न आल्याने विद्यार्थ्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. कारण, या प्रवेशांचे भवितव्य न्यायालयाच्या अंतिम आदेशावर अवलंबून असणार असल्याने या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणे, हा एक प्रकारचा जुगार ठरू शकतो. त्यामुळे, या वस्तुस्थितीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात यावी, अशी मागणी मातेले यांनी केली आहे.
विद्यार्थ्यांच्या करिअरशी चालविलेला खेळ थांबवून संचालनालयाने विद्यार्थ्यांना वस्तुस्थितीची माहिती द्यावी, अशी मागणी ‘प्रहार विद्यार्थी संघटने’ही केली आहे. तसेच, १४ महाविद्यालयांमधील काही महाविद्यालये आपल्या व्यवस्थापन कोटय़ातील जागा भरण्याकरिता जाहिरातीही करीत होती. या जाहिरातींवरही संचालनालयाने पायबंद घालायला हवा होता, असा आक्षेप संघटनेचे अ‍ॅड. मनोज टेकाडे यांनी घेतला आहे.