राज्यातील शिक्षणशास्त्र पदविका अभ्यासक्रमासाठी (डीएड) आलेल्या अर्जापैकी जवळपास फक्त एक चतुर्थाश जागांवर प्रत्यक्ष प्रवेश झाले असून राज्यातील शासकीय महाविद्यालयांमधील जागाही मोठय़ा प्रमाणावर रिक्त राहण्याची शक्यता आहे, असे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक एन. के. जरग यांनी सांगितले.
राज्यात डीएड अभ्यासक्रमाच्या एकूण ७२ हजार ९२ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी ४८ हजार ५२ जागांचे प्रवेश हे केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. यावर्षी डीएड अभ्यासक्रमासाठी मुळातच अर्ज विक्री कमी झाली. यावर्षी राज्यभरातून फक्त १९ हजार ५०० अर्ज उपलब्ध झाले होते. मात्र आता प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उपलब्ध अर्जापैकीही बहुतेक विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी पुढे आलेले नाहीत.
आतापर्यंत प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार अपेक्षित असलेल्या विद्यार्थ्यांपैकी फक्त एक चतुर्थाश विद्यार्थ्यांनीच प्रत्यक्ष प्रवेश घेतले आहेत. राज्यातून रोज सरासरी २ हजार अर्जाची प्रवेश प्रक्रिया होणे अपेक्षित आहे. मात्र, रोज जेमतेम चारशे विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. डीएडची विभागीय स्तरावरील प्रवेश प्रक्रिया १ सप्टेंबरपासून सुरू झाली असून ती ७ सप्टेंबपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी १५ सप्टेंबरला स्वतंत्र प्रवेश फेरी घेण्यात येणार आहे.
याबाबत जरग यांनी सांगितले,‘‘राज्यात मोठय़ा प्रमाणावर जागा रिक्त राहणारच आहेत. मात्र, यावर्षी शासकीय महाविद्यालयांमध्येही जागा रिक्त राहतील अशी भीती आहे. शासकीय महाविद्यालयांचे शुल्क कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांचा या महाविद्यालयांकडे कल असतो. मात्र, यावर्षी शासकीय महाविद्यालयांमध्येही जागा रिक्त राहतील असे वाटत आहे. खासगी महाविद्यालयांना याचा मोठा फटका बसणार आहे. आतापर्यंत राज्यातील ६४ महाविद्यालयांचे अभ्यासक्रम बंद करण्यासाठीचे प्रस्ताव आले आहेत. प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली, की यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.’’