अकरावी प्रवेशासाठी मुंबईतून ऑनलाइन प्रणालीतून अर्ज सादर करण्यासाठी बुधवारी शेवटचा दिवस होता. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर १८ जूनपासून सुरू झालेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत मुंबईतील दोन लाख आठ हजार ३७० विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहे. यातील एक लाख ९६ हजार ९१ विद्यार्थ्यांनी पर्यायांचा अर्जही सादर केला आहे. यातील पाच हजार १६ विद्यार्थ्यांचा पर्यायांचा अर्ज अजूनही अपूर्ण आहे तर ९५१ जणांचा अर्ज भरून पूर्ण झाली आहे. तर एक लाख ९० हजार १२४ विद्यार्थ्यांचे अर्ज नक्की झाले आहेत. पण रात्री उशीरा शिक्षण उपसंचालक कार्यालयाने मुदत आणखी दोन दिवस वाढवल्याचे स्पष्ट केले. यामुळे आता विद्यार्थ्यांना २७ जूनला दुपारी चार वाजेपर्यंत अर्ज भरता येतील.  
मुंबईत यंदा अकरावीसाठी एकूण दोन लाख ८३ हजार ७२२ जागा असून यातील एक लाख २३ हजार ५९४ जागा या इनहाऊस, अल्पसंख्याक व व्यवस्थापन कोटय़ासाठी राखीव आहेत तर उर्वरित एक लाख ६० हजार १२८ जागांसाठी ही ऑनलाइन प्रक्रिया पार पडणार आहे. यामुळे जागांच्या तुलनेत ३६ हजार अर्ज जास्त दाखल झाले आहेत. मात्र महाविद्यालयांनी कोटय़ामधील रिक्त जागा ऑनलाइनसाठी खुल्या केल्यानंतर ही तफावत भरून निघेल असे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले.
शाखा निहाय प्रवेश क्षमता
*कला- एकूण ३८ हजार ५५९ जागा. १५ हजार ०८८ जागा इनहाऊस, अल्पसंख्याक व व्यवस्थापनसाठी राखीव. उर्वरित २३ हजार ४७१ जागा ऑनलाइन प्रवेशासाठी.
*वाणिज्य – एकूण ८४ हजार २१६ जागा.  ३६ हजार ४९४ इनहाऊस, अल्पसंख्याक व व्यवस्थापनसाठी राखीव. उर्वरित ४७ हजार ७२२ जागा ऑनलाइन प्रवेशसाठी.
*विज्ञान – एकूण एक लाख ६० हजार ९४७ जागा.  ७२ हजार ०१२ इनहाऊस, अल्पसंख्याक व व्यवस्थापन राखीव उर्वरित ८८ हजार ९३५ जागा ऑनलाइन प्रवेशासाठी.