विद्यापीठ परीक्षांशी संबंधित सर्व कामावर महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने (एम. फुक्टो) बहिष्कार टाकल्यामुळे राज्यातील नऊ विद्यापीठातील जवळपास साडे तीन हजार परीक्षांना फटका बसला आहे. सुमारे २५ लाख विद्यार्थ्यांना या बहिष्कार आंदोलनाचा फटका बसणार असून विद्यापीठांमधील प्रश्नपत्रिकांच्या नियमनाचे काम अपुऱ्या अवस्थेत आहे.
राज्यातील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी महिला विद्यापीठ मुंबई, सोलापूर विद्यापीठ सोलापूर नऊ विद्यापीठातील चार हजारावर महाविद्यालयातील परीक्षा मार्च महिन्यात सुरू होणार आहेत. त्यासाठी प्रश्नपत्रिकांच्या नियमनाचे काम काही विद्यापीठात सुरू झाले होते. प्रश्नपत्रिका छापून तयार होण्याच्या कामासाठी एक महिना लागतो कारण प्रत्येक विद्यापीठात ३०० ते ४०० परीक्षा होतात परंतु प्राध्यापकांच्या परीक्षा बहिष्कार आंदोलनामुळे प्रश्नपत्रिका नियमनाचे काम ठप्प झाले आहे. शिवाय अनेक विषयाच्या प्रात्याक्षिक परीक्षा सुद्धा ठप्प होणार आहेत.
३९ हजार प्राध्यापक एम. फुक्टोचे आजीव सदस्य आहेत त्यातील ३५ हजार प्राध्यापक बहिष्कार आंदोलनात सहभागी आहेत. मराठवाडय़ात दुष्काळ असल्याने औरंगाबाद व नांदेड विद्यापीठात बहिष्कार नाही येथील चार हजार प्राध्यापकांना बहिष्कारातून वगळण्यात आले आहे, अशी माहिती एम. फुक्टोचे उपाध्यक्ष व ‘नुटा’ चे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी ‘लोकसत्ता’ ला दिली.
सहाव्या वेतन आयोगातील शिफारसींनुसार देय थकबाकी आणि इतर मागण्यांसाठी एम. फुक्टोने चार फेब्रुवारी पासून विद्यापीठ परीक्षा बहिष्कार आंदोलन राज्यभर सुरू केले आहे.
प्राध्यापकांना महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याने परीक्षांची कामे सक्तीची केली आहेत. कायद्याच्या तरतुदींचा वापर करीत काही विद्यापीठांनी प्राध्यापकांना ‘कारवाई’ चा इशारा देऊन कारणे दाखवा नोटीसा जारी केल्या आहेत पण या नोटिशींना भीक न घालण्याचा निर्णय नुटाचे सचिव प्रा. अनिल ढगे यांनी जाहीर केला आहे. गेल्या वर्षी सुद्धा बहिष्कार आंदोलन झाले होते नोटीसा जारी झाल्या होत्या आणि सरकारच्या आश्वासनानंतर ५० दिवसांनी आंदोलन मागे घेण्यात आले होते. कुणावरही कोणतीच कारवाई झाली नव्हती हा इतिहास ताजा आहे.
एम. फुक्टोचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील, माजी अध्यक्ष प्रा. सदाशिवन, सचिव प्रा. मुखोपाध्याय, नुटा अध्यक्ष प्रा. प्रवीण रघुवंशी, माजी आमदार प्रा. बी.टी. देशमुख यांनी गेले दोन दिवस राज्य सरकारशी चर्चा केली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उप मुख्यमंत्री अजित पवार, उच्च शिक्षण मंत्री राजेश टोपे, प्रभारी सचिव सहारिया यांच्या सोबत झालेली चर्चा पूर्णपणे निष्फळ ठरल्याची प्रतिक्रिया आहे.