अकरावीच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयांमध्ये दुसऱ्या यादीत प्रवेश मिळालेल्या ५१,१७६ विद्यार्थ्यांपैकी अवघ्या १९,७५४ विद्यार्थ्यांनी मंगळवारी सायंकाळपर्यंत प्रवेश निश्चित केले. प्रवेश निश्चित न केलेले सुमारे तीस हजार विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे हे आणि अजूनही प्रवेशाविना असलेले ८४९१ विद्यार्थी मिळून सुमारे २८ हजार विद्यार्थ्यांचे ५ जुलैला जाहीर होणाऱ्या तिसऱ्या व शेवटच्या प्रवेश यादीकडे लक्ष असणार आहे. सायंकाळी ६ वाजता  यादी जाहीर केली जाईल.
अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाच्या रविवारी सायंकाळी जाहीर झालेल्या दुसऱ्या प्रवेश यादीची विज्ञान आणि वाणिज्य शाखेची कटऑफ एक ते दोन टक्क्यांनीच खाली आल्याने केवळ ५१,१७६ विद्यार्थ्यांना जागावाटप झाले होते. अजून चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल या अपेक्षेवर दुसऱ्या यादीकडे डोळे लावून असलेल्या जवळपास ६६ हजार विद्यार्थ्यांपैकी सुमारे ५० टक्के म्हणजे ३४,४३६ विद्यार्थ्यांना यावेळी बेटरमेंट मिळाले. तर पहिल्या यादीत कुठेच प्रवेश न मिळालेल्या २५ हजार विद्यार्थ्यांपैकी १६,७४२ विद्यार्थ्यांना दुसऱ्या यादीत कुठल्या ना कुठल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. ८४९१ विद्यार्थी हे दुसऱ्या यादीनंतरही प्रवेशाविना होते. मंगळवारी दुसऱ्या यादीतील प्रवेश निश्चित करण्याची शेवटची मुदत होती. तोपर्यंत अवघ्या १९,१७६ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केले होते.
अतिरिक्त जागा
इनहाऊस, व्यवस्थापन आणि अल्पसंख्याक महाविद्यालयांमधून आणखी २७१६ जागांची भर ऑनलाईनमध्ये पडली आहे.
दुसऱ्या यादीत प्रवेश निश्चित केलेले मंडळनिहाय विद्यार्थी
एसएससी – १८,५४६
आयसीएसई – ७८४
सीबीएसई – ३२०
आयजीसीएसई – ५२
एनआयओएस – २९
इतर – २३
एकूण – १९,७५४