एमएमआरडीए क्षेत्रात होणाऱ्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेकरिता इनहाऊस, अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोटय़ातील ३१,४३१ जागा विद्यार्थ्यांना उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे, अकरावी ऑनलाइनसाठी आता एकूण १,९१,५५९ जागा उपलब्ध झाल्या आहेत. शुक्रवारी शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल १,९८,६२३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. आता या १,९१,५५९ जागांकरिता स्पर्धा असणार आहे.
अर्ज भरण्याची मुदत दोन दिवसांनी वाढवली असली तरी प्रवेशाच्या पुढील वेळापत्रकावर परिणाम होणार नसल्याचे ही प्रवेशप्रक्रिया राबविणारे मुंबईचे शिक्षण उपसंचालक न. बा. चव्हाण यांनी स्पष्ट केले. मुंबईत यंदा अकरावीसाठी एकूण दोन लाख ८३ हजार ७२२ जागा आहेत. यातील एक लाख २३ हजार ५९४ जागा या इनहाऊस, अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोटय़ातील असून त्या संस्थास्तरावर भरल्या जातात. तर उर्वरित एक लाख ६० हजार १२८ जागा या ऑनलाइनमधून भरल्या जाणार आहेत.
इतर कोटय़ातून ऑनलाइन जागा
इनहाऊस – ५,३३९
अल्पसंख्याक – २५,२०४
व्यवस्थापन – ८८८ एकूण – ३१,४३१