20 January 2018

News Flash

गोयंका महाविद्यालयाचे ‘ते’ ४० विद्यार्थी वाऱ्यावरच

'भारतीय दंत परिषदे'ने मान्यता नाकारलेल्या अकोल्याच्या 'जमनालाल गोयंका दंत महाविद्यालया'त २०१२-१३ या शैक्षणिक वर्षांत प्रवेश घेतलेल्या ४० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पुनर्वनसन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने देऊनही

प्रतिनिधी, मुंबई | Updated: February 1, 2013 5:50 AM

‘भारतीय दंत परिषदे’ने मान्यता नाकारलेल्या अकोल्याच्या ‘जमनालाल गोयंका दंत महाविद्यालया’त २०१२-१३ या शैक्षणिक वर्षांत प्रवेश घेतलेल्या ४० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पुनर्वनसन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने देऊनही यावर कोणतीही कारवाई न झाल्याने या विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरीच आहे.
पात्रता निकषांची पूर्तता न केल्याने या महाविद्यालयाची मान्यता परिषदेने (डीसीआय) २०११-१२ साली काढून घेतली. २०१२पासून महाविद्यालयाला कोणतीही पदवी बहाल करता येणार नाही, असे डीसीआयने स्पष्ट केले आहे. यामुळे, २०११-१२ पूर्वी या महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या ९५ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पुनर्वसन वैद्यकीय शिक्षण विभागाला करावे लागले होते. पण, डीसीआयने मान्यता काढल्याचे माहीत असूनही प्रवेश घेणाऱ्या २०११-१२च्या ४० विद्यार्थ्यांची जबाबदारी घेण्यास सरकारने नकार दिला होता.
या विद्यार्थ्यांच्या पालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे दाद मागितली असता न्यायालयाने १९ डिसेंबर, २०१२ला आदेश देताना विद्यार्थ्यांना अन्य खासगी दंत वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सामावून घेऊन २८ फेब्रुवारीपर्यंत त्यांचे शैक्षणिक पुनर्वनसन करण्यात यावे, असे स्पष्ट केले. त्यानुसार वैद्यकीय शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांना अन्य खासगी महाविद्यालयात सामावून घ्यावे लागणार आहे. तसेच, २०११-१२पासून या विद्यार्थ्यांची परीक्षा आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतली नव्हती. यात त्यांचे एक वर्ष वाया गेले आहे. त्यामुळे, विद्यापीठाने परीक्षा घेऊन या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मात्र, वैद्यकीय शिक्षण विभाग या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा विचारात आहे. त्यामुळे, या विद्यार्थ्यांचे भवितव्य पुन्हा टांगणीला लागणार आहे.

आम्ही अनभिज्ञ
‘आमच्या मुलांनी वर्षभर महाविद्यालयात हजेरी लावली आहे. २०१२च्या वार्षिक परीक्षेच्या वेळेस विद्यापीठाकडून ओळखपत्रे (हॉलतिकीट) न आल्याने मुलांच्या प्रवेशांना विद्यापीठाने मान्यता नाकारल्याची बाब आमच्या लक्षात आली. तोपर्यंत आम्ही या प्रकाराबाबत अनभिज्ञ होतो. आता उच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांचे पुनर्वसन करावे असे स्पष्ट करूनही सरकार चालढकल करीत आहे. या गोंधळात आमची मुले नाहक भरडली जात असून सरकारने त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा,’ असे एका विद्यार्थ्यांचे पालक डॉ. श्यामकुमार हांडे यांनी पालकांची बाजू स्पष्ट करताना सांगितले.

First Published on February 1, 2013 5:50 am

Web Title: 40 student of goenka dental college rehabilation in dark
  1. No Comments.