पदव्युत्तर परीक्षेच्या निकालांचा दर्जा एकसमान राखण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्व पदव्युत्तर विद्याशाखेतील परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणांपैकी सरासरी किमान ५० टक्के गुण मिळविणे आवश्यक राहील. परंतु, ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात पेपरनिहाय किमान ४० टक्के गुण मिळविणे आवश्यक असणार आहे.
आरोग्य विद्यापीठाच्या पदव्युत्तर परीक्षांबाबत विद्या परीषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी त्याबाबत माहिती दिली. एम. डी. आणि एम. एस. आयुर्वेद अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षांत चार लेखी प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात परीक्षा घेतली जाते. त्यात चारही लेखी प्रश्नपत्रिकेतील गुणांचे एकत्रितपणे मूल्यांकन करून निकाल ठरविण्यात यावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. याबाबत भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेकडून संबंधित अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्ष परीक्षेच्या मूल्यांकनाबाबतचे पत्र विद्यापीठास प्राप्त झाले. त्यावर विद्या परीषदेच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. सर्वच आरोग्य पदव्युत्तर विद्याशाखांमध्ये एकसमान पद्धती असावी, असे डॉ. जामकर यांनी सांगितले. हा निर्णय वैद्यकीय पदव्युत्तर विद्याशाखेसाठी आधीपासून लागू आहे. तथापि, आयुर्वेद पदव्युत्तर विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांसाठी हिवाळी २०१३ परीक्षेसाठी लागू राहील व उन्हाळी २०१४च्या परीक्षेपासून सर्व पदव्युत्तर विद्याशाखांसाठी हा निर्णय लागू राहणार असल्याचे कुलसचिव डॉ. के. डी. गर्कळ यांनी सांगितले.