खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील दुसऱ्या सामाईक प्रवेश फेरीनंतरच्या (कॅप) रिक्त जागांचे प्रवेश आपल्या नियंत्रणाखाली आणत खासगी संस्थाचालकांकडून होणाऱ्या प्रवेशांमध्ये होणाऱ्या गैरव्यवहारांवर अंकुश आणण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न उच्च न्यायालयाच्या एका आदेशामुळे या वर्षीही निष्प्रभ ठरले आहेत. त्यामुळे राज्यभरातील ३८ खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रिक्त असलेल्या तब्बल ६२८ जागांचे प्रवेश संस्थास्तरावरच केले जाणार आहेत.
महत्त्वाचे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार ३० सप्टेंबपर्यंत प्रवेश प्रक्रिया संपवावी लागणार आहे. अवघ्या १५ दिवसांत ६२८ जागांचे प्रवेश करावे लागणार असल्याने ते घाईघाईने उरकले जातील. अर्ज भरणे, स्वीकृती, प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर करणे आणि प्रवेश निश्चिती आदीकरिता केवळ १५ दिवस मिळणार असल्याने विद्यार्थी-पालकांची मोठीच तारांबळ उडणार आहे. याचा फायदा घेत गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही संस्थाचालक गुणवत्ता डावलून मनमानीपणे प्रवेश करण्याची संधी तर साधणार नाही ना अशी भीती विद्यार्थी व पालकांमध्ये आहे.
‘प्रिया गुप्ता विरुद्ध छत्तीसगढ सरकार’ या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आधार घेत गेल्या वर्षी ‘वैद्यकीय शिक्षण विभागा’ने प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता यावी यासाठी खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दुसऱ्या कॅप फेरीनंतर रिक्त राहिलेल्या जागा सरकारी नियंत्रणाखाली भरण्यात येतील, असे आदेश काढले. पण, संस्थाचालकांच्या दबावानंतर सरकारने महिनाभरात हे आदेश मागे घेतले. त्यानंतर संस्थाचालकांनी संस्थास्तरावर जागा भरताना मोठय़ा प्रमाणावर गैरव्यवहार केल्याचे सरकारनेच केलेल्या एका चौकशीत स्पष्ट झाले.
यंदा ही चूक सुधारत सरकारने पुन्हा एकदा दुसऱ्या फेरीनंतरचे प्रवेश ताब्यात घेण्याबाबत सुधारित आदेश काढले. मात्र, या आदेशांमध्ये रिक्त जागा एमएसयूपीएमडीसी या खासगी संस्थाचालकांच्या संघटनेने घेतलेल्या ‘असो-सीईटी’ऐवजी ‘नीट’ या केंद्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षेतून भरण्यात येतील अशी तरतूद होती.
सरकारच्या आदेशातील या त्रुटीचा फायदा घेत संस्थाचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने ७ सप्टेंबरला या आदेशाला स्थगिती दिल्याने या वर्षीही दुसऱ्या प्रवेश फेरीनंतर रिक्त राहिलेल्या जागा संस्थास्तरावर भरण्याचा संस्थाचालकांचा मार्ग मोकळा झाला .
एमएसयूपीएमडीसीने सोमवारी आपल्या संकेतस्थळावर जाहीर केल्यानुसार दुसऱ्या प्रवेश फेरीनंतर ९ एमबीबीएस आणि १९ बीडीएस खासगी महाविद्यालयात मिळून तब्बल ६२८ जागा रिक्त आहेत. या सर्व जागा आता संस्थास्तरावर भरल्या जाणार आहेत. यापैकी ८१ जागा एमबीबीएसच्या आहेत.