राज्यातील सरकारी व खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रवेशाकरिता राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियची (कॅप) तिसरी आणि अखेरची समुपदेशन फेरी सोमवारी रात्री संपल्यानंतरही तब्बल ६४ हजार जागा रिक्त राहिल्या आहेत.
२३ हजार विद्यार्थ्यांकरिता तंत्रशिक्षण संचालनालयाने शेवटची समुपदेशन फेरी घेतली होती. या फेरीत सुमारे ६७०० विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतरही सुमारे ६४ हजाराच्या आसपास जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यापैकी १०० जागा या विविध सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील आहेत. सरकारी महाविद्यालयातील या जागा यंदा विशेष कॅप फेरी राबवून भरण्यात येणार आहेत. त्यामुळे, विद्यार्थ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सर्व विद्यार्थी या प्रवेशाकरिता पात्र ठरविले जाणार आहेत.
दरवर्षी सरकारी महाविद्यालयात रिक्त राहिलेल्या जागा संस्थास्तरावर भरल्या जातात. मात्र, विद्यार्थ्यांच्या सोयीकरिता व प्रवेश प्रक्रियेत पारदर्शता राहावी म्हणून यंदा आम्ही या जागा विशेष कॅप फेरीच्या माध्यमातून भरणार आहोत. यासाठीचे वेळापत्रक येत्या दोन-तीन दिवसात जाहीर केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, कॅपच्या तिसऱ्या फेरीनंतरही तब्बल ६४ हजार जागा रिक्त राहिल्या आहेत. यात खासगी संस्थांच्या व्यवस्थापन कोटय़ातील आणखी सुमारे १० ते १२ हजार रिक्त जागांची भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे, यंदा राज्यात अभियांत्रिकीच्या तब्बल ७५ हजारांच्या आसपास जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.