17 December 2017

News Flash

IIT campus, placement, IIT

अवघ्या अठरा दिवसात मुंबईच्या 'इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी'च्या (आयआयटी) तब्बल ८०० हून अधिक विद्यार्थ्यांची

प्रतिनिधी, मुंबई | Updated: February 7, 2013 3:51 AM

अवघ्या अठरा दिवसात मुंबईच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या (आयआयटी) तब्बल ८०० हून अधिक विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटमध्ये नोकरी पक्की झाली आहे.
मुंबई आयआयटीचा २०१२-१३ या शैक्षणिक वर्षांच्या कॅम्पस प्लेसमेंटचा पहिला टप्पा नुकताच पार पडला. जागतिक स्तरावरील आर्थिक स्थिती अनिश्चित असतानाही तब्बल २४० कंपन्या प्लेसमेंटमध्ये सहभागी झाल्या होत्या. यात आयआयटीच्या तब्बल ७० टक्क्य़ांहून अधिक विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या निश्चित झाल्या आहेत. कंपन्यांनी तब्बल ९०० विद्यार्थ्यांच्या हातात ‘ऑफर लेटर’ ठेवले आहे.
पहिल्या टप्प्यात बीटेकच्या ४१७पैकी २९९ जणांच्या नोकऱ्या निश्चित झाल्या आहेत. तर डय़ुएल पदवीच्या २३९पैकी १८६, एमटेकच्या ५३२पैकी ३३२ आणि एमएससीच्या १८पैकी ११ विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यात ‘निकल पडी’च्या भावनेचा आनंद घेता आला. मुलाखतीचा दुसरा टप्पा जानेवारी ते जून दरम्यान पार पडेल. तेव्हा यात तब्बल १०० कंपन्या सहभागी होणार असून आणखी काही विद्यार्थ्यांच्या हातात ऑफर लेटर पडण्याची शक्यता आहे.
आयआयटीतून बीटेक, डय़ुएल डिग्री, एमटेक, एमफील, पीएचडी आदी अभ्यासक्रमांतून दरवर्षी तब्बल पंधराशे विद्यार्थी उत्तीर्ण होतात. ऑगस्टमध्ये सुरू होणाऱ्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये या सर्व विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. कंपन्या प्लेसमेंटमध्ये सहभागी होताना विद्यार्थ्यांशी मुलाखतींच्या माध्यमातून संवाद साधतात. त्याचबरोबर काही कंपन्या विद्यार्थ्यांकरिता एटीकेट्स, संवाद साधण्याची कला आदी सॉफ्ट स्कीलवर लहानमोठय़ा कार्यशाळाही आयोजित करीत असतात.
माहिती-तंत्रज्ञानाबरोबरच अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानविषयक कंपन्यांमधील नोकऱ्या स्वीकारण्याकडे या वर्षीही आयआयटीयन्सचा कल राहिला. तसेच व्यवस्थापन सल्लागार व वित्त क्षेत्रातील करिअरकडेही विद्यार्थ्यांचा ओढा वाढत असल्याचे यावेळी दिसून आले. या क्षेत्रातील १८ कंपन्यांनी तब्बल १५० विद्यार्थ्यांना नोकरी देऊ केली आहे. यापैकी बहुतांश कंपन्या या जागतिक स्तरावर काम करणाऱ्या आहेत. व्यापारविषयक अत्यंत गुंतागुंतीचे विषय या कंपन्या हाताळत असल्याने उमेदवारांच्या निवडीबाबत त्या फारच काटेकोर आणि चोंखदळ असतात. आयआयटीच्या तब्बल ८४ विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांनी नोकरी देऊ केल्या आहेत. पहिल्या टप्प्यात मॅनेजमेंट कन्सल्टींग, अभियंत्रिकी, आयटी, फायनान्स आदी क्षेत्रातील कंपन्यांचा प्रभाव कॅम्पस प्लेसमेंटवर राहिला.

First Published on February 7, 2013 3:51 am

Web Title: 70 percent students were get placement in iit campus