News Flash

बिनघंटेची शाळा

मु. पो. शिंदेवाडी, ता. भुदरगड, जिल्हा कोल्हापूर येथे आम्ही मिलिंद ताम्हनकरबरोबर पोहोचलो. शिंदेवाडीच्या या शाळेत मला अनेक दिवसांपासून यावयाचे होते, कारण या शाळेच्या दोनच शिक्षकांनी

| July 7, 2013 12:54 pm

मु. पो. शिंदेवाडी, ता. भुदरगड, जिल्हा कोल्हापूर येथे आम्ही मिलिंद ताम्हनकरबरोबर पोहोचलो. शिंदेवाडीच्या या शाळेत मला अनेक दिवसांपासून यावयाचे होते, कारण या शाळेच्या दोनच शिक्षकांनी जो चमत्कार घडविला आहे तो मी वेबसाइटवर पाहिला होता. कोण आहेत हे दोन शिक्षक? मारुती गणपती देवेकर आणि दशरथ कृष्णा कोटकर अशी त्यांची नावे आहेत आणि ‘मला वेळ आहे, मी ते करणार आहे आणि मला ते जमणार आहे’ या विचारांनी दोघे झपाटले आहेत. या शाळेत घंटाच नाही.
खरं तर शिंदेवाडी हे गाव गवंडय़ांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. या गवंडय़ांची मुले गुणवत्तेत कोठेही कमी पडू नयेत म्हणून या शाळेत इतके वैविध्यपूर्ण उपक्रम राबविले जातात की पाहणारा स्तिमित व्हावा. इथे ज्ञानभिंत आहे, कौन बनेगा ज्ञानपती हा खेळ आहे, अक्षरबाग आहे, गटचर्चा आहेत, वाचन मंडळ, बौद्धिक खेळ, मेंदूला खुराक अशा उपक्रमांनी विद्यार्थी ‘पुस्तकी’ न होता ‘विकासकी’ होताना पाहून मन मोहून जाते. मुलांचे सुंदर अक्षर, शुद्घ मराठी, इंग्रजी बोलगीतांचा अर्थ समजून केलेला अभिनय, स्पेलिंग बिनचूक असण्याची कला.. हे बघून एका प्राध्यापिकेने आपले मूल या जिल्हा परिषदेच्या गवंडय़ांच्या शाळेत घातले.
येथे रात्रीची अभ्यासिका आहे नि ३०० पैकी ३०० गुण पटकावणारे शिष्यवृत्ती परीक्षेचे विद्यार्थीही. चौथीच्या मुलांना डिस्कशन, डिसीजन, ब्युटिफुल अशा शब्दांचे स्पेलिंग अगदी बिनचूक येत होते. काही महाराष्ट्र कन्यांच्या गोष्टी मी त्यांना सांगितल्या त्यावर प्रश्नोत्तरांचा खेळ मस्त रंगला. गुरुजी १५ तास काम करणारे! शाळेचेच झालेले. मुलांचे हस्ताक्षर मी मुद्दाम घेऊन आलेय. ते पाहून आपण आश्चर्यमुग्ध व्हाल आणि ज्यांना आपले मूल मराठी माध्यमाच्या शाळेत शिकावे असे अजूनही, आजही वाटते त्यांना शिंदेवाडीची ही शाळा आपल्या येथेही जन्मावी असे निश्चितपणे वाटेल.
गवंडय़ांची मुले. प्राध्यापकांची मुले, वकिलांची मुले अशी प्रतवारी पुसली गेलीय या शाळेत पूर्ण. मी म्हटलेली गाणी त्यांनी मजबरोबर साभिनय म्हटली. ज्या मुलाला मी फळ्यावर लिही, म्हटले त्याने सुंदर हस्ताक्षर काढून आत्मविश्वासाने लिहिले.
रात्र-अभ्यासिकेला इथे लोडशेडिंगचा अडथळा नाही. कारण पालकांनी इनव्हर्टर बसविला आहे. वेळापत्रकाप्रमाणे तासिका नाहीत तर रसपरिपोषाप्रमाणे आहेत. मुले शाळेतून घरी जाण्यास उत्सुक नसणे हे शाळेच्या यशाचे लक्षण आहे.
सकाळी शाळेत ७।। ला हजर! सायंकाळपर्यंत रममाण! १०० टक्के हजेरी आणि १०१ टक्के उत्साह. ‘मी १५ तास काम करूनही ताजा’ असे दोन्ही शिक्षक. कारण? शाळा म्हणजे शिकविण्याचे ठिकाण ही व्याख्या मनात नाही. शाळा हे ‘व्यक्तिविकासाचे केंद्र’ ही व्याख्या मंजूर!
इवल्याशा गावातील, इवल्याशा शाळेतली, ती इवलीशी मुले प्रसन्न, प्रफुल्ल आणि जीवनविद्येने भारलेली पाहून ४० वर्षे शिक्षणक्षेत्रात काढलेल्या या जुन्या फांदीलाही नवी हिरवी पालवी फुटली. ज्यांना नवे काही करायचेय त्यांनी अवश्य पाहावी ही बिनघंटेची शाळा!

एका तिसरीच्या विद्यार्थिनीचे हे उत्स्फूर्त मनोगत
हसा, खेळा व शिका अशी माझी शिंदेवाडी शाळा आहे. आम्ही शिक्षक बनून सहकाऱ्यांना शिकवितो. मला शाळेत कंटाळाच येत नाही. कारण आमच्या हाताला काम दिले जाते. वेगळे उपक्रम राबविणारी आमची शाळा आहे. आमचे गुरुजी गटामध्ये कृती करून घेतात. माझ्या शाळेत बाहेरील गावची मुले शिकण्यास आली आहेत. माझ्या शाळेला छोटेसे अंगण आहे. मला मैदान असावेसे वाटते. शाळेतील गुरुजी तळमळीने शिकवितात. शाळेचे नाव उंचावण्यासाठी मी प्रयत्न करणार. आमच्या गुरुजींना उपक्रम कसे सुचतात हे मला कळतच नाही. आमचा विकास करण्याचा ध्यास गुरुजींनी घेतल्याने त्यांस माझा सलाम.
प्रतीक्षा मोहन तोंदले, इ. ३री.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2013 12:54 pm

Web Title: a school without bells
Next Stories
1 ‘जेईई-मेन्स’ व बारावीच्या गुणवत्ता यादीचे पर्सेटाईल सूत्र सदोष?
2 २८ हजार विद्यार्थ्यांचे तिसऱ्या यादीकडे लक्ष
3 लक्ष्मीपतींसाठी मुक्त विद्यानगरी हवी!
Just Now!
X