राज्यातील रात्रशाळा बंद करण्याचे शासनाच्या विचाराधीन असल्याचे वक्तव्य सचिवांनी केल्यानंतर नाराजीचा सूर उमटू लागला आहे. याविरोधात विविध शिक्षक संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी शासनाचा हा प्रयत्न हाणून पाडण्याचा मानस व्यक्त केला आहे.

यामुळे राज्यातील ३५ हजार विद्यार्थी शाळाबाह्य़ होणार असून शासनाचा हा डाव हाणून पाडण्याचा इशारा शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी दिला आहे. राज्यात सध्या १७६ रात्रशाळा असून त्यांपैकी १३७ शाळा मुंबईत आहेत. तर शासन रात्रशाळा वाचविण्यासाठी २८ जूनला मोर्चा काढण्यात येणार असल्याचे शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी स्पष्ट केले.