राज्यातील अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे’ (एआयसीटीई)चे निकष पाळले जात नसल्याचे उघडकीस आल्यानंतर एआयसीटीईने युद्धपातळीवर उच्चस्तरीय चौकशी समितीच्या माध्यमातून अभियांत्रिकी महाविद्यालयांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई उच्च न्यायालयाने ज्या २९ महाविद्यालयांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे त्यांची बुधवारपासून तपासणी सुरू करण्यात आली आहे.
अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांकडे एआयसीटीईच्या निकषानुसार जागा नाही. प्रयोगशाळा, उपकरणे, लायब्ररी तसेच अध्यापकांची अपुरी संख्या असल्याचे यापूर्वी राज्याचे तंत्रशिक्षण संचालनालय (डीटीई) तसेच एआयसीटीईच्या चौकशीत आढळून आले आहे. यातील काही महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया थांबविण्याचे आदेश डीटीईने दिल्यानंतर संबंधित महाविद्यालये न्यायालयात जाऊन स्थगिती मिळवतात. न्यायालयानेही ही गोष्ट लक्षात घेऊन २९ महाविद्यालयांना निकषांच्या पूर्ततेबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे. त्यानुसार बहुतेक महाविद्यालयांनी प्रतिज्ञापत्र सादर केल्याचे डीटीईच्या सूत्रांनी सांगितले. तथापि प्रतिज्ञापत्राप्रमाणे तसेच एआयसीटीईच्या निकषांचे काटेकोरपणे पालन झाले आहे का, हे तपासण्यासाठी एआयसीटीईने निवृत्त न्यायाधीश, वास्तुविशारद, कायदेतज्ज्ञ, डीटीईचे सहसंचालक तसेच शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ अशा पाच जणांची चौकशी समिती तयार केली असून गुरुवारी या समितीने चौकशी सुरू केली आहे.
 आगामी वर्षांतील प्रवेश प्रक्रियेपूर्वी निकषात न बसणाऱ्या महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया रद्द करण्याबरोबरच त्याबाबतचा अहवाल न्यायालयालाही सादर करण्यात येणार आहे. यापूर्वीही डीटीईने केलेल्या चौकशींचे अहवाल शासनास सादर करण्यात आले असून निकषांची पूर्तता न करणाऱ्या महाविद्यालयांवर मान्यता रद्द करण्याची कारवाई करण्याची गरज असल्याचे तंत्रशिक्षण संचालक सु. का.  महाजन यांनी सांगितले. राज्यातील अपात्र महाविद्यालयांची केवळ प्रवेश प्रक्रिया रद्द न करता संबंधित महाविद्यालयांची मान्यता रद्द करणे, तसेच शासन व विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्वत: संबंधित महाविद्यालयांच्या विश्वस्तांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ‘सिटिझन फोरम’ संस्थेने केल्याचे संस्थेचे प्राध्यापक वैभव नरवडे यांनी सांगितले.
 निकषांची पूर्तता न करून विद्यार्थी व शासनाची फसवणूक करणाऱ्या १६ अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विश्वस्तांविरोधात तेलंगणामध्ये उपमुख्यमंत्र्यांनीच फौजदारी गुन्हे दाखल केल्याची माहिती सिटिझन फोरमचे प्राध्यापक वैभव नरवडे यांनी सांगितले.
ए.सी. पाटील इंजिनीयरिंग कॉलेज, एमजीएम इंजिनीयरिंग कॉलेज, एसआयईएस अभियांत्रिकी महाविद्यालय आणि सरस्वती अभियांत्रिकी महाविद्यालय या नवी मुंबई परिसरातील महाविद्यालयांची तपासणी केली असून दोन आठवडय़ांत ही तपासणी पूर्ण करण्यात येणार आहे. एप्रिलअखेरीस एआयसीटीई आपला अहवाल सादर करेल, असे तंत्रशिक्षण संचालक सु. का. महाजन यांनी सांगितले.