२४ डिसेंबर, १९५१ साली स्वातंत्र्यसैनिक प्रकाशभाई मोहाडीकर यांनी ‘अखिल भारतीय सानेगुरूजी कथामाला शाखे’ची स्थापन केली. या वर्षी कथामालेच्या स्थापनेला ६१ वर्षे पूर्ण होत आहेत. सानेगुरूजींच्या विचारांची आजमितीस खूपच गरज आहे. त्यासाठी शाळाशाळात कथामालेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून बालमनावर सुसंस्कार घडविले गेले पाहिजे. कथामालेचे राष्ट्रीय अधिवेशन २९ व ३० डिसेंबरला नागपूरला होणार आहे. त्या निमित्ताने..
माहिती-तंत्रज्ञानामुळे बदलून गेलेले हे जग खूप धकाधकीचे बनले आहे. या गोंगाटात पालकांना आपल्या मुलांना द्यायला गुणात्मक वेळ नाही. दूरचित्रवाणीच्या अतिरेकामुळे मुलांवर होणाऱ्या संस्कारांचे स्वरूपही बदलून गेले आहे. या संस्कारांना कुसंस्कार म्हणावे अशी आजची परिस्थिती आहे. मुलांमध्ये वेगवेगळ्या भ्रामक कल्पना निर्माण होत आहेत. यामुळे आजची पिढी संस्कारांपासून दूर ढकलली जात आहे. सानेगुरूजींच्या विचारांची गरज यामुळेच अधोरेखित करावीशी वाटते. हे विचार मुलांमध्ये रूजविणे केवळ शाळेच्या माध्यमातूनच शक्य आहे.
मध्यवर्ती शाखेच्या वतीने कथामाला शाखा विस्तार, कथाकथन, प्रबोधिनी, कथामाला मासिक, मंगल वाडमय प्रसार, एक सूर एक ताल, श्रमसंस्कार शिबीर, सानेगुरूजी बालसंस्कार पुरस्कार, श्यामची आई संस्कार परीक्षा, गिताई पाठांतर परीक्षा, महात्मा गांधी विचार संस्कार परीक्षा, सानेगुरूजी आदर्श विद्यार्थी पुरस्कार इत्यादी उपक्रम राबविले जातात.
अखिल भारतीय सानेगुरूजी कथामालेच्या राज्यातील विविध शाखा उल्लेखनीय काम करत आहेत. मराठवाडय़ातील हेलस या छोटय़ाशा गावी १९९४ साली दत्तात्रय हेळसकर यांनी कथामालेची स्थापन केली. केवळ स्थापना करून ते थांबले नाहीत तर ग्रामीण भागातील विद्यार्थी, नागरिकांपर्यंत सानेगुरूजींचे विचार विविध उपक्रमाच्या माध्यमातून गेली अठरा वर्षे पोचवित आहेत. या ग्रामीण शाखेच्या वतीने संस्कार वर्ग, वसा शिक्षणाचा, बालमेळावे, दर्पण दिन, विभागीय सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा, सुसंस्कारित व्हा अभियान, गुणवत्तेचा गौरव, कथाकथन, जिल्हास्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक सहल, शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग आदी असंख्य उपक्रम राबविले जात आहेत. दरवर्षी सुमारे ३०० शाळा या उपक्रमांमध्ये सहभागी होता. संस्थेच्या सामान्यज्ञान परीक्षेला सुमारे १६ हजार विद्यार्थी बसतात. तर श्यामची आई संस्कार परीक्षा यंदा १२ हजार मुलांनी दिली. या निमित्ताने श्यामची आई इतक्या हजारो घरांमध्ये पोहोचली.
हेलस कथामालेचे काम पाहता मध्यवर्ती शाखेनेही आता कठोर पावले उचलायला हवी. शाखेत जास्तीत जास्त युवकांना संधी देत त्यांच्यामार्फत शाखांचे जाळे वाढविणे, शाळाशाळांत प्रार्थनेच्या वेळी मुल्यधिष्ठीत शिक्षणात परिपाठांतर्गत सानेगुरूडीच्या प्रार्थनेचे वाचन करणे, ज्यामुळे मुलांवर सुसंस्कारासोबत सामाजिक बांधिलकीची भावना जागृत होईल. साने गुरूजी कथामालेच्या माध्यमातून कथाकथन उपक्रमाचा लाखो शिक्षकांना फायदा झाला. ज्यामुळे ते आपले प्रभावी विचार मुलांसमोर मांडत आहेत.
सरकारने २८ फेब्रुवारी, २००२रोजी ‘शाळा तेथे कथामाला’ अशा प्रकारचा आदेश काढला होता. मात्र प्रभावी अंमलबजावणीअभावी हवेतच विरला. त्यामुळे आतातरी सरकारने व मध्यवर्ती शाखेने मुलांच्या विकासासाठी साने गुरूजींचे साहित्य खेडय़ापाडय़ातील मुलांपर्यंत पोहचवावे. छोटी-छोटी पुस्तके, मान्यवरांची व्याख्याने, सीड, पोस्टर्स, बॅनर यांच्या माध्यमातून साने गुरूजींचे विचार मांडता येतील. समाजातील प्रेम, आपुलकी, देशाची एकात्मता व अखंडता पुन:प्रस्थापित करण्यासाठी गुरूजींच्या प्रेरणादायी विचारांची गरज सर्वानाच आहे.