बारावीच्या इंग्रजी विषयाच्या शुक्रवारी झालेल्या परीक्षेत मुंबईत आढळून आलेली सर्व सहाही प्रकरणे भिवंडीच्या शाळांमधील आहेत. राज्यभरात कॉपीची ७५ प्रकरणे आढळून आली आहेत. त्यापैकी मुंबईत आढळून आलेली प्रकरणे फारच कमी असली तरी एकाच शहरातील आहेत हे विशेष.
बारावीची परीक्षा २० फेब्रुवारीपासून सुरू झाली. शुक्रवारी प्रथम भाषा असलेल्या इंग्रजी विषयाची परीक्षा झाली. सुधारित अभ्यासक्रमानुसार झालेल्या या परीक्षेचे स्वरूपही यंदा बदलण्यात आले होते. त्यात विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेवर भर देण्यात आला होता. त्यामुळे, या परीक्षेविषयी विद्यार्थ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मुंबईतून २ लाख ८६ हजार ९८८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.
या परीक्षेसाठी मुंबई विभागाअंतर्गत २१२ मुख्य केंद्रे तर ३७५ उपकेंद्रे आहेत. त्यापैकी ४१ ‘उपद्रवी केंद्रे’ म्हणून ठरविण्यात आली आहेत. या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार घडत असल्याच्या तक्रारी असल्याने मुंबई शिक्षण मंडळाने या केंद्रांवर लक्ष केंद्रित केले आहे. भरारी पथकांच्या मदतीने या केंद्रांना भेट देऊन कॉपीसारख्या गैरप्रकारांना आळा घातला जात आहे, असे मुंबई शिक्षण मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पांडे यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यभरात शुक्रवारी आढळून आलेल्या ७५ कॉपीच्या प्रकरणांपैकी सर्वाधिक २० नागपूरमधील आहेत. त्या खालोखाल पुण्यात (१७) आज कॉपीची सर्वाधिक प्रकरणे आढळून आली. कोल्हापूर, कोकणात एकही कॉपीचे प्रकरण आढळून आले नाही. तर लातूरमध्ये केवळ एकच प्रकरण आढळून आले आहे.