बारावीच्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या परीक्षांचे अर्ज १२ जूनपासून उपलब्ध होणार असून अर्ज भरण्यासाठी २५ जून अंतिम मुदत आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचे म्हणजेच बारावीच्या परीक्षेचे अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने घेण्यात येणार आहेत. हे अर्ज गुरूवारपासून (१२ जून) संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. २५ जूनपर्यंत नियमित शुल्कासह आणि त्यानंतर २ जुलैपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत.
गेल्या परीक्षेच्या अनुभवाने शहाणे झालेल्या राज्यमंडळाने या परीक्षेचे अर्ज ऑफलाईन पद्धतीनेही घेण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यासाठी आपल्या शाळेशी किंवा कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधावा अशी सूचना राज्यमंडळाने दिली आहे. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची माहिती मंडळाकडे असल्यामुळे त्याचा उपयोग ऑनलाईन अर्ज भरताना केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शक्यतो ऑनलाईन अर्ज भरावा, असे आवाहन राज्यमंडळाने केले आहे.